एका गमतीशीर प्रकरणाने ‘पिफ २०२०’ची सुरुवात झाली आहे!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अक्षय शेलार
  • ‘पिफ २०२०’चा उदघाटन समारंभ
  • Tue , 14 January 2020
  • कला-संस्कृती चलत्-चित्र पिफ PIFF

‘पुणे फिल्म फाऊंडेशन’ आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या १८व्या ‘पुणे आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘पिफ’चे उद्घाटन झाले असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘पिफ’च्या निमित्ताने पुण्यातील सिनेरसिक जगभरातील विविध भाषांतील शेकडो चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. ९ जानेवारीला संध्याकाळी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, अभिनेते शिवाजी साटम, दयानंद शेट्टी, आदित्य श्रीवास्तव, मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ‘पिफ’चा उद्घाटन समारोह पार पडला. यानंतर रात्री आठ वाजता ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया’मध्ये (एनएफएआय) ‘द वीजल्स टेल’ या अर्जेन्टिनियन चित्रपटाची स्क्रिनिंग होऊन महोत्सवातील पहिला दिवस पार पडला.

९ ते १६ जानेवारी दरम्यान पुण्यातील निवडक चित्रपटगृहांमध्ये पार पडणाऱ्या या महोत्सवाची यावर्षीची थीम ‘महाराष्ट्र राज्याचे हिरक महोत्सवी वर्ष’ अशी आहे. ज्या अंतर्गत सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्रातील तमाशावरील ‘सांगत्ये ऐका’सारख्या (१९५९) चित्रपटांपासून ते ‘छत्रपती शिवाजी’ (१९५२), ‘कुंकू’ (१९३७) या चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे. याखेरीज ‘ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’च्या संयुक्त विद्यमाने आदिवासी संस्कृती आणि जीवनमानावर आधारित लघुपटांचा एक स्वतंत्र विभागही यावर्षी आहे. 

‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ या विभागांतर्गत भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जींचे ‘आनंद’ (१९७१), ‘अनाडी’ (१९५९), ‘अनुराधा’ (१९६०), ‘असली-नकली’ (१९६२), तर जागतिक पातळीवर नावाजलेला इटालियन चित्रपट दिग्दर्शक फेडरिको फेलिनीचे ‘एट अँड अ हाफ’ (१९६३) आणि ‘ला दोल्ची विता’ (१९६०) हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. याखेरीज चित्रपटसृष्टीतील अलीकडील काळात निधन पावलेल्या लोकांना आदरांजली वाहणाऱ्या ‘ट्रिब्यूट’ या विभागांतर्गत नाटककार, अभिनेते गिरीश कार्नाड, अभिनेते श्रीराम लागू यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. तसेच फ्रेंच न्यू वेव्हमधील महत्त्वाची दिग्दर्शिका अग्नेस वर्दावरील एक माहितीपटही पहायला मिळणार आहे. नानाविध विभागांतर्गत समावेश असलेल्या चित्रपटांखेरीज पहायला मिळणारे इतरही बरेच कार्यक्रम या महोत्सवात असणार आहेत.

कल्पक आणि रंजक ‘द वीजल्स टेल’ 

ऊआन होजे कॅम्पानेला या प्रसिद्ध अर्जेन्टिनियन चित्रपटकर्त्याच्या ‘द वीजल्स टेल’ या रंजक चित्रपटाने ‘पिफ’ला सुरुवात झाली. ऑस्कर विजेता दिग्दर्शक कॅम्पानेला या चित्रपटाच्या निमित्ताने थेट चित्रपट या माध्यमाचीच खिल्ली उडवणारी एक कल्पक नि चातुर्यपूर्ण मांडणी असलेली कलाकृती समोर आणतो. चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे दिग्गज लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते वृद्धापकाळात एकाच घरात राहत असल्याच्या एकोळी कथानकात बसवता येणारा सदर चित्रपट देशीविदेशी चित्रपट, संगीत नि चित्रकलेचे संदर्भ वापरत राहतो. ऑस्कर मार्टिनेझ, लुई ब्रँडोनी, ग्रासिएला बोर्गेज, क्लेरा लॅगो आणि निकोलस फ्रँकेला अशा अगदी मोजक्या कलाकारांचा समावेश असलेला ‘द वीजल्स टेल’ आशय आणि मनोरंजन या दोन्हींतील समतोल साधतो. 

सदर चित्रपटाचं दिग्दर्शन करताना कॅम्पानेला चित्रपट लेखन आणि दृकश्राव्य मांडणीतील रटाळ क्लुप्त्यांचा वापर करून या सगळ्याचं विडंबन-वजा नाट्य मांडतो. मुळात प्रभावी उपहास निर्माण करण्यासाठी आपण ज्यावर विनोद करतो आहोत त्याची, म्हणजे इथे चित्रपट माध्यमाची जाण असणं गरजेचं असतं. कॅम्पानेलाच्या दिग्दर्शनातून नेमकं हेच जाणवतं. त्याची पात्रं जेव्हा ‘बघा आता आपल्या आयुष्यात खलनायकाची तेवढी कमी आहे!’ असं म्हणतात तेव्हा खरोखर खलनायक येतात. किंवा आणखी कुठेतरी त्याचं पात्र खलपात्राची खिल्ली उडवताना म्हणतं ‘किती फिल्मी आणि क्लिशे गोष्टी सुरु आहेत!’ हे मेटा संदर्भ ‘द वीजल्स टेल’ला अधिक परिपूर्ण आणि आवर्जून पाहावंसं बनवतात. ऑस्कर मार्टिनेझ नेहमीच्या सराईतपणे प्रभावीपणे भूमिका रंगवत धमाल आणतो. एकंदरीत एका गमतीशीर प्रकरणाने ‘पिफ’ची सुरुवात झाली आहे! 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख