या खंडप्राय देशात ग्रेटा थुनबर्गसारखी जन्माला आलेली मुलगी मला पाहायची आहे.
पडघम - साहित्य संमेलन विशेष
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
  • संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो
  • Sat , 11 January 2020
  • पडघम साहित्य संमेलन विशेष फ्रान्सिस दिब्रिटो Father Francis Dibroto अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan

उस्मानाबाद येथे कालपासून सुरू झालेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा तिसरा संपादित भाग...

.............................................................................................................................................

पर्यावरण - श्वासाची लढाई

लेखन, ग्रंथप्रसार आणि पर्यावरणाचा समतोल यांचे घनिष्ट नाते आहे. कागद करण्यासाठी लगदा लागतो आणि लगद्यासाठी वृक्षतोड करावी लागते. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण हे आपले प्राथमिक कर्तव्य ठरते.

जागतिक पर्यावरणाने जे उग्ररूप धारण केले आहे, त्याची माहिती आपणा सर्वांना आहे. ओझोन खिंडार विस्तारत आहे, नद्यांना पूर येत आहेत. अतिवृष्टी, महापूर, वणवे आणि उन्हाच्या झळा यांचे प्रमाण वाढले आहे. जैवविविधतेची अपरिमित हानी होत आहे.

या वर्षी जगभरातील १५३ देशांतील ११५८ शास्त्रज्ञांनी पर्यावरणाबाबत निर्वाणीचा इशारा देत म्हटले आहे की, आपण समजत होतो, त्यापेक्षा लवकर ही अत्यवस्थ स्थिती येऊन ठेपली आहे. आपल्या भवितव्याच्या भल्यासाठी आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपल्या विचारांमध्ये क्रांतिकारक बदल करावे लागणार आहेत.

गेल्या वर्षी ग्रेटा थुनबर्ग या सोळा वर्षांच्या मुलीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून जगाच्या विवेकबुद्धीला आवाहन करणारे / हृदय हेलावणारे भाषण केले. तिने हात जोडून विनंती केली की, आमच्या भवितव्याला धोका निर्माण करू नका.

आज जगाने विविध क्षेत्रात प्रचंड घोडदौड केली आहे. ज्ञान ही शक्ती आहे, हे माणसाने ओळखले. परंतु या शक्तीवर विवेकबुद्धीचा अंकुश नसेल, तर ज्ञान धोकादायक ठरू शकते.

अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्य

ज्ञानाच्या विकासाबरोबर व्यक्तिगत स्वातंत्र्याचाही विकास झाला आहे. मला जे पटते, माझ्या सोयीचे जे आहे, मला जे उपयुक्त आहे, ते करण्यास मी पूर्णपणे मोकळा आहे. त्या माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर कुणीही निर्बंध आणू शकत नाही. म्हणून जे जे शक्य आहे, ते अनुज्ञ आहे. ते करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मला आहे. उदा. जीवनसंहारक अण्वस्त्र बनवण्याचे ज्ञान माझ्याकडे आहे आणि ती मी बनवू शकतो. समुद्रामध्ये भराव घालून जमीन वाढवण्याचे तंत्रज्ञान मला अवगत आहे, साधनसामग्री माझ्याकडे आहे आणि ते मी करणार. माझ्याकडे ज्ञान आहे, धन आहे आणि मला स्वातंत्र्यही आहे. म्हणून मी गरीब राष्ट्रांतील साधनसामग्रीची राजरोजपणे लूट करू शकतो. याला व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विकास म्हणता येईल का? ज्ञान आणि स्वातंत्र्य अंतिम मानले गेले आहेत. आगीवर तेल पडावे त्याप्रमाणे त्याला सापेक्षवादाची आणि उपयुक्ततावादाची जोड मिळाल्यामुळे मानवी जीवनासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्ञानाच्या विस्फोटाने आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावावर सर्व काही करता येते, अशी भूमिका घेतल्यामुळे आज जगात पर्यावरणाच्या विध्वंसाने कळस गाठला आहे.

आपण पर्यावरणाच्या विनाशावर विचार करत आहोत. कारण पर्यावरणाचा प्रश्न केवळ वातावरणाशी निगडित नाही, तो नैतिकतेशी जोडलेला आहे. जगाने जी विकासनीती स्वीकारलेली आहे, त्या विकासनीतीचाही नैतिकतेच्या निकषावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे. निसर्गाचे चक्र बदलले आहे, असे आपण मानतो. परंतु ते का बदलले आहे? कारण माणसांचे आणि राष्ट्रांचे विचारचक्र बदलले आहे.

नैतिकतेच्या ऱ्हासाची कारणे

नैतिकतेचा ऱ्हास हा अचानक घडलेला नाही. त्यालाही इतिहास आहे. तो माणसांचा तुटलेला संवाद किंवा निर्माण झालेला दुरावा. या संदर्भात बिशप रॉबर्ट मॅक एलरॉय यांनी अमेरिकेत क्रेगटन येथे झालेल्या क्लायमेट कॉन्फरन्स या परिषदेवेळी केलेल्या चिंतनातील काही मुद्दे -

१) परमेश्वराबरोबर तुटलेला संवाद

पर्यावरणाच्या विनाशाच्या कारणांवर विचार करताना आपण निर्माणकर्त्या परमेश्वरापर्यंत येऊन पोहोचतो. आपला भारतीय समाज प्रामुख्याने देवावर विश्वास ठेवणारा आहे. जगात कुठे होत नसेल, त्यापेक्षा जास्त देवाची उपासना आपल्या देशात होत असते. प्रार्थनास्थळे बांधण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. या सर्वाचे प्रतिबिंब आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवनात उमटते का? तो म्हणजे, सर्व परममूल्यांचा संचय आहे. माझ्यासाठी तो येशू पिता आहे. सर्व मूल्यांची मुळे त्याच्यात आहेत. तो सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता आहे. त्यामुळे सृष्टीचा वापर व पर्यावरणाचा विनाश ही खरी नास्तिकता आहे. ‘बायबल’च्या पहिल्या पुस्तकात पर्यावरणाच्या हानीची मीमांसा केलेली आहे. अर्थात, ती विज्ञानपूर्व भाषेत आहे. आपण तिचा मतितार्थ समजणे आवश्यक आहे. परमेश्वराने आदि मात्यापित्याची निर्मिती केली आणि त्यांना निसर्गसंपन्न अशा नंदनवनात ठेवले. त्या सुखाचा हेवा करणारी दुष्ट शक्ती होती. तिने आदि माता-पित्यांना वश केले. ते त्या दुष्ट शक्तीच्या मोहाला बळी पडले. त्यामुळे निसर्गसंपन्न नंदनवनातून त्यांची हकालपट्टी झाली. ती दुष्ट शक्ती म्हणजे, आजचे पर्यावरणाचे विरोधक होत. आपल्या ‘पॅरेडाइज लॉस्ट’ या महाकाव्यात कवी मिल्टनने या प्रसंगाचे प्रत्ययकारी वर्णन केले आहे.

एकविसाव्या शतकात आपले धरतीबरोबरचे नाते बिघडले आहे. कारण आपण या वसुंधरेचे विश्वस्त नाही, मालक आहोत, असे आपण समजू लागलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाला पृथ्वीवरच्या साधनसामग्रीचा मनमानी विध्वंस करण्याचा जणू हक्कच प्राप्त झाला आहे. ‘सबका मालिक एक आहे’, अशा परमश्वराबरोबरचा संवाद तुटण्याचे ते एक कारण आहे. वसुंधरेला मन मानेल तसे लुटण्याचा जणू काही आपल्याला हक्क मिळालेला आहे. कारण आपण आपल्याला विश्वाचे राजे समजतो.

२) निसर्गाबरोबरचा तुटलेला संवाद

आज जगाने निरनिराळ्या क्षेत्रांत वाखाणण्यासारखी प्रगती केली आहे. परंतु आपण निसर्गाचे अध्यात्म नाकारले आहे. आपल्याकडे तुकोबांनी म्हटले आहे, 'वृक्षवल्ली वनचरे आम्हा सोयरे'. तेराव्या शतकात युरोपमध्ये होऊन गेलेले संत फ्रान्सिस चंद्रसूर्याला, ताऱ्याग्रहांनी, वक्षवेलींना, हिंस्त्र प्राण्यांना आपले बंधू आणि भगिनी समजत असत. मात्र आज आपण ते नाते विसरलो आहोत.

वास्तविक आपल्या देशात तरी तसे व्हायला नको होते. आपले आदिवासी बांधव निसर्ग पूजक आहेत. जगातील प्रत्येक आदिम जमातीमध्ये निसर्गाचा आदर केला जातो. हिंदू धर्मात सूर्यनमस्काराची पद्धत आहे. नदी किंवा समुद्रातल्या पाण्याने सूर्याला अर्घ्य देतात. सरोवराच्या किंवा तलावाच्या पाण्यात शिरताना प्रथम पाय स्वच्छ करून, नमस्कार करून, प्रार्थना करून, मगच प्रवेश केला जात असे. आपले पारशी बांधव अग्निपूजक आहेत.

आज आपण उपयुक्ततावाद हे एकमेव मूल्य मानलेले आहे. त्यामुळे आपण सरोवरांची, तलावांची डबकी करत आहोत. समुद्रकिनाऱ्यांची आपण काय अवस्था केली आहे, हे आपणांस माहीत आहेच. अगदी मध्यरात्रीसुद्धा हजारो वृक्षांची तोड करत आहोत. जंगलांना वणवे लावत आहोत. याचे कारण निसर्गाबरोबरचा आपला तुटलेला संवाद हेच आहे. जे अस्तित्वात आहे, ते सर्व केवळ मानवासाठीच आहे, हे मूत्र मानल्यामुळे निसर्गाची फार मोठी हानी झाली आहे. त्याच्यामधून 'वापरा आणि फेका' ही नीती जन्माला आली आहे आणि ती माणसासाठीदेखील वापरली जात आहे.

३) सत्याबरोबरचा तुटलेला संवाद

कर्ब वायूमुळे होणारे प्रदूषण, निसर्गाचे बदलेले चक्र, पाण्याची बिघडलेली गुणवत्ता, जैवविविधतेचा होणारा ऱ्हास, मानवी जीवनाची होणारी हानी अशा अनेक कारणांमुळे आजचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आपण सर्व एकमेकांशी जोडलेले आहोत ह्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. आर्थिक विकास आणि फसवे विज्ञान ह्यांच्या नावाखाली हवा, पाणी आणि मानवी जीवन धोक्यात आलेले आहे.

शाश्वत सत्य असा काही प्रकार नाही. त्यामुळे सापेक्षतावाद हा जगण्याचा अंतिम निकष ठरलेला आहे. परिणामतः अंतिम सत्याबरोबरचा आपला संवाद तुटला आहे. नैतिकतेचे हरवलेले भान हे आपल्या सर्व र्हासाचे, मग तो पर्यावरणाचा असू द्या, राजकारणाचा असू द्या किंवा आणखी कशाचा असू द्या, एक मुख्य कारण आहे. म्हणून अंतिम सत्याकडे वळण्याशिवाय अन्य पर्याय नाही.

४) आपला एकमेकांबरोबरचा तुटलेला संवाद

उपयुक्ततावाद आणि सापेक्षतावाद यांचा अवलंब केल्यामुळे निसर्गाची कशी हानी होते हे आपण पाहिले. हेच तत्त्वज्ञान मानवी जीवनालाही लागू केले जात आहे. जन्म आणि मृत्यू ही जीवनातील सत्ये आहेत. आज या दोन्ही पातळ्यांवर धोके निर्माण झालेले आहेत. त्यामुळे उगवत्या कोंभाला जगण्याची शाश्वती नाही आणि वृद्धावस्थेची उपेक्षा केली जात आहे. संवेदना, करुणा, दया, सहवेदना या भावना बोथट होत आहेत. वेश्याव्यवसाय आणि गरीब राष्ट्रांतील मुलींची व स्त्रियांची होणारी निर्यात यांच्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आपले 'वसुधैव कुटुंबकम' याचा आपल्याला विसर पडलेला आहे.

पर्यावरणाच्या हानीमागे वरील चार प्रकारचा तुटलेला संवाद कारणीभूत आहे.

संवाद तुटल्यामुळे काय अनर्थ होतात याचे मार्मिक वर्णन हिंदी कवी गिरिजाकुमार माथुर यांच्या 'क्रांति की भूमिका' या कवितेत केले आहे.

सिर्फ अपनेही लिए जब जीने लगते है आदमी

तब उनकी हर चीज बिकाऊ हो जाती है!

 जब जोखिम उठाने की आदत मिट जाती है

हम कौम मर जाती है...

जेव्हा मानवी संबंध धोक्यात येतात आणि मनुष्य स्वार्थाच्या आहारी जातो आणि जेव्हा त्याला आजूबाजूचे भान उरत नाही, तेव्हा समाजदेखील मृतावस्थेला पोहोचतो.

आपण पर्यावरणाच्या रक्षणाविषयी खूप बोलत आहोत, नामशेष होणाऱ्या प्रजातीबद्दल चिंता व्यक्त करत आहोत, पण त्याचबरोबर जेव्हा माणुसकीला ग्रहण लागते, गरिबांना समाजात स्थान राहत नाही, आपला सारा विकास धनधार्जिणा होतो, जेव्हा आपल्याला अडचण असलेल्या व्यक्तीला नष्ट केले जाते, तेव्हा मानवतेपुढे मोठे आव्हान उभे राहते. याउलट, जेव्हा सारी मानवजात आपल्या प्रेमाची विषय होते, त्यांची सुखदुःखे ही आपली सुखदुःखे बनतात, तेव्हा जगण्याला आणि जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो.     

जेव्हा विश्वाच्या भल्याचा विचार मागे पडतो आणि केवळ राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य मिळते, तेव्हा  माणसांमाणसांमध्ये जातिधर्मावरून विभागणी केली जाते, तेव्हा मानवतेची मोठी हानी होते. माणसाचे जग कुटुंबापुरते मर्यादित होते, तेव्हा बेगडीवादाला आणि चंगळवादाला आमंत्रण मिळते. जेव्हा माणसाचे हृदय पोकळ होते, तेव्हा तो आपले घर उंची फनिर्चरने सजवत असतो. मग आपले घरगुती कार्यक्रम श्रीमंतीचे देखावे बनतात.

पूज्य विनोबा भावे मानवतेच्या भल्याचा विचार करत असत. ‘यत्र विश्वं भवति एक नीडम’... हे सारे विश्व पक्ष्याच्या घरट्यासारखे व्हावे, असे त्यांचे स्वप्न होते आणि ते स्वप्न साकार व्हावे, यासाठी ते प्रयत्नशील हेते. अतिरिक्त राष्ट्रवाद स्वार्थाला, दहशतवादाला, राष्ट्रांच्या द्वेषाला जन्म देत असतो. ते आणि आपण अशी राष्ट्राची विभागणी किंबहुना फाळणी केली जाते. विनोबा भावेंची घोषणा असे - ‘जय जगत’... ही ‘सब भूमि गोपलकी’. म्हणजे ही भूमी अन त्याच्यावर जे जे निर्मित आहे, ती परमेश्वराने मानवाला दिलेली देणगी आहे. त्या धनावर भावी पिढ्यांचाही हक्क आहे. तो नाकारून फक्त वर्तमान काळाचा विचार करणे हा आत्मघात आहे. त्यामुळे केवळ आपल्याच नाही, तर विश्वाच्या भल्यासाठी एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे विचार करणारी ग्रेटा थुनबर्ग ही जगाच्या व्यासपीठावरून भरल्या डोळ्यांनी आणि जड अंत:करणाने आपल्या आणि आपल्यानंतर येणारया पिढ्यांचा विचार केला जावा असा संदेश देऊन मानवतेच्या विवेकाला आवाहन करते. तो संदेश सर्वदूर पसरवण्यासाठी आपल्या शाळेला रामराम ठेकून ती बालिका वणवण हिंडते आहे.

या सगळ्यांवर विचारमंथन करणे हेदेखील आपल्या साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट असले पाहिजे. जर माणूसच टिकला नाही, तर साहित्याची निर्मिती कोण करणार आणि वाचणार तरी कोण? आज देशाला आणि सगळ्या जगाला गांधीजींसारख्या प्रेषिताची नितांत गरज आहे. त्यांनी केवळ भारताचा नाही, तर विश्वाच्या भल्याचा विचार केला. त्यामुळे लघुदृष्टीच्या राजकारण्यांना गांधीजी नकोसे झाले आहेत. ज्या देशात, ज्या भारतीय संस्कृतीत निसर्गाची पूजा केली जाते, त्या देशाने, निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी जगात आघाडीवर असले पाहिजे.

माझे वय आज ७६ वर्षे आहे. या खंडप्राय देशात ग्रेटा थुनबर्गसारखी जन्माला आलेली मुलगी मला पाहायची आहे. त्यानंतरच येशूनचे मला घेऊन जावे अशी प्रार्थना आहे.

.............................................................................................................................................

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मचरित्राच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4945/Nahi-Mi-Ekla

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या इतर पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

..............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......