जेव्हा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते, तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे
पडघम - साहित्य संमेलन विशेष
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
  • संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो
  • Sat , 11 January 2020
  • पडघम साहित्य संमेलन विशेष फ्रान्सिस दिब्रिटो Father Francis Dibroto अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan

उस्मानाबाद येथे कालपासून सुरू झालेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा दुसरा संपादित भाग...

.............................................................................................................................................

राजकारण ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे. एखाद्या देशाचे भवितव्य त्या देशाच्या भल्याबुरया राजकारणावर अवलंबून असते. निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपले नागरी जीवन राजकारण्यांच्या हवाली करत असतो. म्हणून साहित्यिक या प्रक्रियेपासून अलिप्त राहू शकत नाही. जेव्हा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते, तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे आणि लिहिले पाहिजे. अशा वेळी मौन राखणे हा भेकडपणा आहे. समर्थ रामदास यांनी आपल्या ‘दासबोध’ या ग्रंथात म्हटले आहे - 

मुख्य ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण | तिसरे ते सावधपण | सर्व विषयी

राजकारण का करावे आणि कसे करावे याचा वस्तुपाठ समर्थांनी घालून दिलेला आहे. पोप अकरावे पायस (१८५७-१९३९) यांनी आपल्या एका लेखात म्हटले होते, ‘ज्यांना राजकारणात रस आहे, जे राजकारणात सक्रिय भाग घेतात, त्यांनी अतिशय अवघड परंतु अतिशय सन्माननीय अशा राजकारणाच्या कलेत पारंगत झाले पाहिजे.’ पोप पायस यांच्या या विधानाला हिटलर आणि मुसोलिनी यांची पार्श्वभूमी होती. ज्यूंचा संहार होत असताना पोप पायस बारावे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल संदिग्धता व्यक्त केली जाते. सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी त्या काळचे सगळे दस्तऐवज आता खुले केले आहेत. योग्य वेळी सत्य बाहेर येईलच. जेव्हा समाजात असाधारण परिस्थिती निर्माण होते, जेव्हा हुकूमशहा आणि लष्करशहा यांचा उदय होतो, तेव्हा मानवी हक्क, प्रतिष्ठा आणि जीवन पायदळी तुडवले जाते, तेव्हा साहित्यिक, विचारवंत, धर्माचार्य या सर्वांनी एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे.

आपल्याकडचे उदाहरण म्हणजे स्वामी अग्निवेश. ते एका धर्मसंघटनेचे अध्यक्ष आहेत. तरीही मानवी हक्कांची पायमल्ली होताच, त्यांनी लोकशाही मार्गाने आपला विरोध दर्शवला. त्यांच्यावर तथाकथित धर्मवाद्यांनी हल्ले केले. पोलंडमध्ये जेव्हा एकाधिकारशाहीचा कहर झाला, तेव्हा पोप दुसरे जान पाल यांनी, जेव्हा फिलिपाइन्समध्ये मार्कोस आणि त्याची पत्नी इमेल्डा यांनी आपली हुकूमशाहीची वाघनखे बाहेर काढली, तेव्हा कार्डिनल सिन यांनी आणि एल्-साल्वादोरमध्ये हुकूमशाहीने उग्र रूप धारण केले, तेव्हा आर्चबिशप रोमेरो यांनी ठाम भूमिका घेतली आणि लोकशाहीचा पुरस्कार केला. १९८१मध्ये पोप दुसरे जान पाल यांच्यावर प्राणांतिक हल्ला झाला आणि आर्चबिशप रोमेरो यांची निर्घृण हत्या झाली, कारण त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती.

ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेतादेवी या बंगाली लेखिका होत्या. बंगाली साहित्यामध्ये त्यांनी मोलाची भर घातली आहे. मात्र स्वत:ला अभ्यासिकेत कोंडून न घेता त्यांनी रस्त्यावर उतरून गोरगरिबांसाठी संघर्ष केला. नयनतारा सहगल या गाजलेल्या लेखिका आहेत. भारतात अलीकडे अनेक प्रकार घडत आहेत, ज्यामुळे कायद्याची पायमल्ली होते, लेखनस्वातंत्र्य मर्यादित केले जाते, त्याबद्दल त्या आपले मत स्पष्टपणे मांडतात. त्यामुळे अनेकांना त्यांना कार्यक्रमांना बोलावण्याची भीती वाटते. ज्यांच्या लेखणीत नैतिकता ठासून भरलेली असते आणि वृत्तीमध्ये एकप्रकारचा बेडरपणा असतो, त्यांचा समाजमनाला धाक वाटतो. ज्यांच्याविषयी धाक वाटावा असे किती साहित्यिक आपल्या आजूबाजूला आहेत? आपल्या महाराष्ट्रात आपण नेहमी दुर्गाबाईंची आठवण काढतो. दुर्गा भागवत यांना साहित्यातील ‘रणरागिणी’ असे म्हटले जाते. कारण त्या भूमिका घेत आल्या अन भूमिका लढवत आल्या.

जेव्हा नागरी स्वातंत्र्याच्या संकोच होतो, तेव्हा समाजामध्ये धर्माच्या नावाने भेदाभेद केला जातो आणि समाजाचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा निर्णय घेतला जातो. जेव्हा एखाद्या प्रदेशाला नजरकैदीचे स्वरूप येते, जेव्हा दोष नसताना अश्राप नागरिकांची उपासमार होते, त्यांचे उपजीविकेचे साधन हिरावून घेतले जाते, तेव्हा विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी गर्जना केली पाहिजे. आपणा सर्वांच्या कठोर आत्मपरीक्षणाची वेळ जवळ आलेली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

मानवाचा इतिहास हा अन्यायाचा, गुलामगिरीचा, विषमतेचा आणि भेदभावाचा आहे. लिंग, वंश, जात, धर्म आणि जन्मस्थान या कारणांवरून माणसाने माणसावर, सबलांनी दुर्बळावर, उच्चवर्णियांनी कनिष्ठांवर, पुरुषांनी स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले आहेत आणि अन्यायाची ही मालिका अजूनही खंडित झालेली नाही. माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आपले सुरूच आहे. मात्र शत्रू खूप प्रबळ आहे. त्याला सात जीव आहेत. प्रतिगामी शक्तींचा सहज पराभव होत नाही. वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या रीतीने हा अन्याय सुरू असतो. त्याची कारणमीमांसा बदलत जाते, परिस्थिती बदलत जाते, परंतु अन्याय बदलत नाही. उदा. आधुनिक काळामध्ये इलेक्ट्रानिक्स साधनांद्वारे होणारे शोषण.

भारतीय संविधानाला एका रथाची उपमा दिली, तर स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व सामाजिक न्याय ही चार मूल्ये त्या रथाची चार चाके आहेत, सहा मूलभूत हक्क त्या रथाचे सहा अश्व आहेत. ‘सेक्युलर’ या इंग्रजी शब्दाला काही जण आक्षेप घेतात. या इंग्रजी शब्दाचा उगम युरोपमध्ये झालेला आहे. तिथे ‘सेक्युलर’ म्हणजे केवळ ‘इहवाद’ किंवा ‘धर्मविहीनता’ असा केला जातो. आपली ‘सेक्युलर’ ही कल्पना त्याहून खूप भिन्न आहे. तिचा अर्थ ‘सर्वसमावेशकता’ म्हणजे सर्वांना समान वागणूक आणि कुठलाही एक धर्म राष्ट्रधर्म नाही, असा आहे. पंडित नेहरूंनीही सेक्युलॅरिझमची ही भारतीय संकल्पना जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ‘सेक्युलॅरिझम’ (धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता) हा भारतीय घटनेचा आत्मा आहे. ते रथाचा सारथी आहे. जोपर्यंत सारथी सुरक्षित आहे, तोपर्यंत आपल्या देशाच्या अखंडतेला कुठलाही धोका नाही, असे मला वाटते. म्हणूनच आपल्या एका हातात आपापल्या धर्माचा धर्मग्रंथ असेल, तर दुसऱ्या हातात भारतीय संविधानाची प्रत असली पाहिजे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली

सर्जनशील व्यक्ती अनेकदा द्रष्टी असते. जे सर्वसामान्यांना दिसत नाही, ते त्या व्यक्तीला दिसत असते. आपले द्रष्टेपण ते कलात्मकरीत्या व्यक्त करत असतात. त्यांचा लेखन किंवा कलाविष्कार प्रक्षोभक असू शकतो. हे सर्व स्वीकारणे आणि पचवणे परंपरावाद्यांना आणि संस्कृती-संरक्षकांना प्रसंगी अवघड जाते.

लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असे जेव्हा जेव्हा घडते, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी व विशेषत साहित्यिकांनी व विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असे मला वाटते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानसभेत शेवटचे भाषण झाले. त्या भाषणात त्यांनी देशाला सावध केले होते -

लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, लोकांनी आपले स्वातंत्र्य, कितीही मोठा माणूस असला, तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये, तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की, जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील... विभूतिपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आपण नेहमीच लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपण भारतीय स्वभावाने भाबडे आणि भावनाशील आहोत. राजकीय नेत्यांनी केलेल्या घोषणाबाजीचा आपण डोळे बंद करून स्वीकार करतो. त्यांचे स्तोम माजवतो. उक्ती आणि कृती यांच्यात मेळ आहे की नाही, हे आपण तपासून पाहिले पाहिजे. म्हणून तर संतांनी आपल्याला सांगितले आहे- बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.

प्रसार-साधनांचा लोकांच्या मनांवर व मतांवर खूप प्रभाव पडत असतो. प्रसिद्ध झालेली प्रत्येक बातमी ही काही लोकांना धर्मवचनाप्रमाणे वाटते, परंतु आज ‘पेड न्यूज’ आणि ‘फेक न्यूज’ असे प्रकार चालू झाले आहेत. कधी कधी राजकीय पक्षांची भूमिका बातम्यांच्या स्वरूपात अगदी पहिल्या पानावर झळकत असते. हादेखील लोकशाहीवर केलेला एक छुपा हल्ला आहे. तोसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे.

उलटी गंगा

आपल्याकडे संविधानासारखे धन आहे. त्यानुसार आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनुभवत आहोत. जगातील सर्वांत मोठी लोकशाही अशा शब्दांत आपण आपलीच पाठ थोपटून घेत आहोत. हे सगळे खरे आहे. परंतु दुर्दैवाने अधूनमधून आपल्याकडे विचारांची गंगा उलट्या दिशेने वाहू लागते. आपला प्रवास सहिष्णुतेतून असहिष्णूतेकडे, विशालतेकडून संकुचितपणाकडे आणि अहिंसेकडून हिंसेकडे होऊ लागतो. काहींच्या भावना अतिशय हळव्या असतात. त्या पटकन दुखावल्या जातात. धर्म, जात, भाषा, प्रांत, एतिहासिक व्यक्ती यांच्याविषयी चिकित्सक भाष्य केले की, संबंधित गट उसळून उठतात. कायदा हाती घेतात, प्रसंगी हिंसाचाराचा अवलंब करतात. अहिंसेकडून हिंसेकडे चाललेल्या अशा प्रवासाची अलीकडची उदाहरणे म्हणजे नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या झालेल्या भेकड हत्या.

कुणाच्या ताटात काय आहे, कुणाच्या वाटीत काय आहे, यावर एखाद्याचे जगणे किंवा मरणे अवलंबून असावे, ही अतिशय दुखद बाब आहे. काही ठिकाणी जमावाकडून गायीच्या नावाने विशिष्ट समाजातील व्यक्तींच्या हत्या करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी गायीविषयी केलेली चिकित्सा अतिशय पुरोगामी आहे. गाय जगली पाहिजे, तसा माणूसही जगला पाहिजे. म्हणून गायीच्या नावाने केलेल्या हत्या हा सावरकरांच्या विचारांचा केलेला पराभव आहे. देसभरात झालेल्या इतर २०८ पत्रकारांच्या हत्यासुद्धा तशा निषेधार्ह आहेत.

तसेच विभूतिपूजा, कर्मठपणा, पोथिनिष्ठा वाढत आहे. त्यामुळे हाडाच्या संशोधकांची कुचंबणा हेते. विचारवंतांचा कोंडमारा होतो. विविध प्रकारच्या दडपणांमुळे शास्त्रशुद्ध संशोधन आणि धर्मचिकित्सा करणे अवघड होते. ही देशाची सांस्कृतिक हानी आहे. निखळ व शास्त्रशुद्ध संशोधन करण्यासाठी निर्मळ वातावरणाची गरज असते. आपल्याकडे मुळात संशोधक वृत्तीचा हवा तितका विकास झालेला नाही. संशोधनामुळे नवी आणि निराळी माहिती उपलब्ध होते. त्यामुळे धर्मग्रंथांचे, ऐतिहासिक गोष्टींचे, व्यक्तींचे वस्तुनिष्ठ पुनर्मूल्यांकन करता येते.

याचे उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ते ज्यू धर्मात वाढले. ‘जुना करार’ हा त्या काळच्या ज्यू लोकांचा धर्मग्रंथ. त्यात अनेक परमसत्ये आहेत. त्याचबरोबर काही आक्षेपार्ह विधानेसुद्धा आहेत. प्रभू येशूंनी त्या विधानांची चिकित्सा केली आणि तिथे जे जे मानवताविरोधी होते, त्यात बदल केला आणि तसे शिकवले.

आपला देश बहुधार्मिक आहे. प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ आहेत. त्या धर्मग्रंथांना काळाचा आणि तत्कालीन संस्कृतीचा संदर्भ आहे. धर्मग्रंथांतील काही वचने कालबाह्य होऊ शकतात. त्या वचनामुळे मानवी स्वातंत्र्याचे, प्रतिष्ठेचे आणि हक्कांचे उल्लंघन होऊ शकते. धर्मग्रंथातील अशा वचनांची शास्त्रशुद्ध चिकित्सा झाली पाहिजे आणि ती चिकित्सा त्या त्या धर्मातील धर्मपडितांनी केलेली उत्तम.

दुसऱ्याचे मत विरोधी असले तरी ते मांडण्याचा त्याचा हक्क कुणी हिरावून घेऊ शकत नाही, या संदर्भात फ्रेंच विचारवंत व्हाल्टेअरचे एक वचन उदबोधक आहे. ते वचन असे आहे की, ‘तू जे बोलतोस, ते मला मान्य नाही, तथापि तुला तुझी भूमिका मांडता यावी म्हणून मी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत लढत राहीन.’ स्वतची भूमिका पक्की व ठाम असली की, आपल्याला निराळ्या, विरोधी मताची भीती वाटत नाही. उलट निराळ्या विचारांचे स्वागत केले जाते. अशा प्रकारचा उदारमतवाद हे प्रगल्भतेचे लक्षण असते. अशा वातावरणातच लोकशाही मूल्यांचे संवर्धन होत असते.

मूलतत्त्ववाद आणि देशाचे खरे प्रश्न

भारतीय घटनेने आपल्याला मूलभूत स्वातंत्र्य बहाल केले आहे. तुम्हाला सत्य कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील, याऐवजी सत्य तुम्हाला कळणार नाही, सत्य तुम्हाला अंधारात ठेवील, अशी काही उद्योगपतींची भूमिका आहे. त्या भूमिकेमुळे प्रसारमाध्यमे आपल्या कह्यात ठेवता येतात. सत्य सांगण्याचा, गैरकृत्ये उघड करणाऱ्या वाहिन्यांच्या पत्रकारांचा आवाज दडपला जातो. त्या वाहिन्या त्यांना सोडाव्या लागतात किंवा अशा निर्भीड पत्रकारांना सामदामदंडभेद वापरून बोलायला बंद केले जाते. परंतु काही वाहिन्या, काही वर्तमानपत्रे या विरोधाला न जुमानता आपली भूमिका स्पष्टपणे मांडत असतात. हीदेखील एक बाजू आहे. कधी आपल्याला प्रश्न पडतो, आपण पूर्णपणे स्वतंत्र आहेत का? आत्माविष्कार करण्यासाठी कलाकार, पत्रकार व साहित्यिक मुक्त आहेत का? एक प्रकारच्या अदृश्य दडपणाखाली तर आपण वावरत नाही ना. त्यावेळेस जर्मन कवी मार्टिन न्यूमायर यांनी लिहिलेली कविता तत्कालीन परिस्थितीवर विदारक प्रकाश टाकते -

जर्मनीमध्ये नाझी पहिल्यांदा कम्युनिस्टांवर येऊन थडकले, धडकले

मी कम्युनिस्ट नव्हतो म्हणून गप्प बसलो

त्यानंतर ते ज्यू लोकांवर येऊन घसरले

साहजिकच, ज्यू नव्हतो ना मी मग गप्पच बसलो.

नंतर कर्मचारी संघटनांवर ते अगदी तुटून पडले

आपण म्हणजे, मी ब्रसुद्धा काढला नाही

आपला कर्मचारी संघटनांशी काय संबंध

ते मग कथोलिकांच्या पाठीस हात धुवून लागले

अगदी... तरीपण मी काहीच म्हटलं नाही

मी प्रोटेस्टंट होतो

अखेरीस...

म्हणजे आता ते माझ्या मागे लागले आहेत

आणि काय

यावेळेस आवाज उठवण्यासाठी

हाळी देण्यासाठी माझ्यासाठी काय

पण अगदी कुणासाठी कुणीच उरलं नाही...

मूलतत्त्ववादाने जगभर आपले विद्रूप डोके वर काढले आहे आणि आपल्या आक्टोपसी पंजात सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा संकोच केला जात आहे. समाजात पद्धतशीरपणे उन्माद निर्माण केला जातो. भावना भडकावल्या जातात. हिंसाचाराची प्रकरणे घडतात आणि क्रिया-प्रतिक्रिया हा न्याय लावून हिंसेचे समर्थन केले जाते. हे सर्व आपण  प्रत्यक्ष पाहत आहेत. ‘अहिंसा परमो धर्म’ ही आपल्या देशाची शिकवण आहे. संत तुकाराम म्हणतात - ‘कुणाही जिवाचा न घडे मत्सर’. नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत प्रत्येकाला जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे... हिटलरच्या काळी बहुसंख्य जर्मन विचारवंत गप्प बसले, परंतु डिआट्रिच बानहाफर, जेम्स डेल्प आणि इतर काहीजण मात्र हिटलरच्या विरोधात उभे राहिले. त्याबद्दल त्यांना आपल्या प्राणांची किमत मोजावी लागली... प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कुणीही हिटलरच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करू शकत नाही. तो राक्षसीपणा होईल. ज्यांना हिटलरचे तत्त्वज्ञान मान्य आहे, ते माणुसकीचे मारेकरी असतात.

.............................................................................................................................................

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मचरित्राच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4945/Nahi-Mi-Ekla

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या इतर पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

..............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 14 January 2020

फ्रान्सिसबुवा,
आर्चबिशप रोमेरो यांनी घेतलेली तशी स्पष्ट भूमिका तुम्ही घेणार का? चालू पोप बर्गोग्लियोचे हात रक्ताने रंगलेत का? तो ब्युनॉस आयर्स चा फादर असतांना अर्जेंटिन हुकुमशहा जॉर्ग विडेला याने ओर्लांद योरियो आणि फ्रान्झ यालिक्स या दोन जेसुइटांचं अपहरण व छळ कोणाच्या सांगण्यावरून केला? तसंच या दोघांसोबर इतर ८ जणांचं अपहरण झालं होतं. त्यापैकी कोणाचाही तपास आजवर का लागला नाही? या सर्वांना कोणती रहस्य माहित होती? आम्ही वाट पाहत आहोत. लवकर काय ती भूमिका घ्या.
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......