अजूनकाही
उस्मानाबाद येथे कालपासून सुरू झालेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा पहिला संपादित भाग...
.............................................................................................................................................
वेदना हा एक मूलभूत मानवी अनुभव आहे. वेदनेतून प्रेरणा घेऊन अनेक साहित्यिकांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली आहे. साहित्यिकाच्या, अस्तित्वाच्या अंतरात्म्यापर्यंत ती पोहोचलेली असते. म्हणून वेदना ही साहित्याची जननी ठरलेली आहे. वेदना या मनुष्यमात्रांच्या असोत, पशु-पक्ष्यांच्या असोत किंवा वृक्षवेलींच्या असोत, त्या माणसाला, त्याच्या आत्म्याला गदगदून हलवतातच.
वाल्मिकी ऋषींनी स्नान करून परतत असताना शिकाऱ्याने मारलेल्या बाणामुळे जखमी झालेली क्रौंच पक्ष्याची मादी पाहिली, तिच्याभोवती आक्रोश करणारा व्यथित नर पाहिला आणि ते विव्हळ झाले. त्या पक्ष्याच्या वेदनेशी ते ऋषी तादात्म्य पावले व उर्त्स्फूतपणे त्यांच्या मुखातून निघालेला महानिषाद श्लोक अजरामर झाला.
ज्यांची शंभरावी पुण्यतिथी या वर्षी साजरी होत आहे, त्या रेव्हरंड नारायण वामन टिळक यांनी लिहिलेली ‘केवढे हे कौर्य’ ही कविता आपण पाठ्यपुस्तकात शिकलो. जखमी झालेली पक्षिणी आपल्या चोचीत घास घेऊन कशीबशी घरट्याकडे परतत असताना, तिची धडपड कवीने पाहिली आणि ‘क्षणेक्षणी पडे, उठे परि बळे’ ही कविता जन्माला आली. तिचे वाचन करताना पाषाणहृदयी माणसालाही पाझर फुटतो.
एकोणिसाव्या शतकात विकसित झालेल्या ‘ब्लॅक लिटरेचर’मध्ये तत्कालीन गुलामगिरीत खितपत पडलेल्या कृष्णवर्णियांच्या नरकयातनांचे दर्शन घडते. साहित्याला दिलेले ते वेगळे वळण होते आणि जगाचे त्या साहित्याकडे लक्ष वेधले गेले, कारण वेदनेबरोबर त्या साहित्यात अभिजातताही होती. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी साहित्याच्या वृक्षाला दलित साहित्याच्या रूपाने रसरशीत धुमारे फुटले आणि कवितांच्या व आत्मचरित्रांच्या रूपात ते व्यक्त होऊ लागले. वंचित व शोषितांची दखल घेण्यात आणि त्यांच्या साहित्याचे योग्य मूल्यमापन करण्यात प्रस्थापित समीक्षक कमी पडले. वेदना ही सर्वव्यापी आहे. त्याचे उदाहरण म्हणजे काश्मिरी पंडितांनी आपल्या राहित्या भूमीत काय कमी वेदना भोगल्या. त्यांची पद्धतशीरपणे नाकेबंदी करून आपली मायभूमी त्यांना सोडावी लागली. हे निषेधार्ह आहे. तसा प्रकार पॅलेस्टीनबाबत झालेला आहे आणि होत आहे. त्यांच्या राहत्या भूमीतून त्यांना हद्दपार करण्यात आले. पॅलेस्टिनी लोक कसे इस्त्रायलपुरस्कृत अत्याचाराला अलीकडे (१९८४नंतर) तोंड देत आहेत, हे मी पॅलेस्टीनमधल्या माझ्या वास्तव्यात डोळ्यांनी पाहिले आहे आणि तेथल्या अभ्याससत्रावेळी त्याविषयी ऐकलेसुद्धा. मनुष्य जेव्हा वेदनेत असतो आणि त्याचे तोंड बंद केले जाते, तेव्हा त्याचे हृदय बोलू लागते. काही पॅलेस्टिनी कवितांचा अनुवाद माझ्या वाचनात आला. रक्तात बुडवलेल्या लेखणीने केलेले ते काव्यलेखन आहे. तेथील कवी गसान झक्तान म्हणतात-
अंधाराशिवाय एकही गोष्ट मिळाली नाही,
झोपलो आम्ही छपराशिवाय,
पण घेऊन पांघरून अंगावर
आणि वाचलेला जीव.
कुणीही आला नाही त्या रात्री
सांगायला आम्हाला इतरांच्या मृत्युबद्दल.
रस्ते वाजवत राहिले शिट्ट्या
आणि रस्ते खून झालेल्यांनी खच्चून भरलेले,
आले होते ते शेजारच्या प्रदेशातून
ज्यांच्या किंकाळ्या
सुटून आल्यागत आमच्याकडे,
आम्ही पाहिलंय आणि एकलंयही
मेलेला माणूस हवेतून चालताना,
त्यांच्या बसलेल्या
धडकीच्या दोरीनं बांधलेला
खळखळाट खेचून घेतोय
चमकणारया गवताच्या पात्यांतून
धगधगत्या गवताच्या चट्यांवरून
पडत राहिलंय सारं रस्त्यांवर,
स्त्रियांनी दिलाय जन्म फक्त या जगाचा निरोप घेतलेल्यांना
आणि त्यानंतर आता
स्त्रिया देणार नाहीत जन्म
जे काळजातून निघते, ते काळजाला भिडतेच आणि वाचकाला अंतर्मुख करते. साहित्य हा सत्याचा आविष्कार आहे. लेखक आपल्या साहित्यकृतीतून माणसाचा शोध घेत असतो आणि विशेषत स्खलनशील माणसामध्ये असा शोध लवकर लागतो. त्या संघर्षाला भिडता भिडता माणूस थकून जातो. परंतु संघर्ष जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
ऑस्ट्रेलियन लेखिका मेरी मक्ले यांनी आपल्या ‘द थाॅनबर्डस’ या कादंबरीत एका तरुण तरण्याबांड फादरची कथा वर्णन केलेली आहे. तो तरुण फादर अतिशय बुद्धिमान असतो. त्याचे भवितव्यही उज्ज्वल असते. तो स्वत:ला खूप सांभाळतो. आपल्या ब्रह्मचर्य व्रताची त्याला जाणीव होती. त्यामुळे लोकांमध्ये मिसळताना ते स्त्रिया आणि मुली यांच्यामध्ये अंतर ठेवत असे. एक वयस्क स्त्री त्याला नादी लावण्याचा प्रयत्न करते. परंतु तो ताकास तूर लावत नाही. त्याचे फार मोठे नाव होते. त्याच्या प्रवचनाला लोक मोठ्या संख्येने गर्दी करत. सर्व धार्मिक विधी तो चित्त लावून साजरे करत असे.
काही वर्षे जातात. कार्य करत असताना त्याची नजर एका निळ्या डोळ्यांच्या आणि परीसारख्या दिसणाऱ्या एका मुलीकडे जाते. आणि मुलीचीही त्याच्याकडे. दोन्ही गोष्टी नकळत घडतात. कुठेतरी सुप्त भावना जन्माला येते आणि दोघांनाही सर्व जाणवते. कुणाच्याही ध्यानात येणार नाही अशा प्रकारे त्यांचे प्रेमसंबंध रंगत जातात. परंतु ते लपून राहत नाहीत आणि त्याचा बभ्रा होतो. त्या दोघांना प्रचंड यातनेमधून जावे लागते. त्याचे भवितव्य धोक्यात येते. त्या दोघांच्या मनांची झालेली होरपळ, उलघाल अतिशय धारदारपणे या कादंबरीत वर्णिलेली आहे.
‘कंटकपक्षी’ (थाॅनबर्ड) नावाचा एक जगावेगळा पक्षी असतो. ते आयुष्यात फक्त एकदाच गातो. त्याची सूर आळवायची वेळ जवळ आली की, तो काटेरी वृक्षाचा माग काढतो. अतिशय तीक्ष्ण आणि अणकुचीदार अशा काट्यावर तो स्वत:ला झोकून देतो. दु:खाचा काटा त्याच्या हृदयातून आरपार गेला म्हणजे त्याच्या कंठातून एक सुरेल गीत बाहेर पडते. ते ऐकून सारे जग स्तिमित होते आणि जीवाचे कान करून त्या गाण्याचा आस्वाद घेते, त्या वेळी स्वर्गातून देव मंद स्मित करतो...
ज्याच्या काळजातून काटा आरपार जातो आणि त्या काट्याची लेखणी करून जो लिहितो, अशी साहित्यकृती अभिजात पदाला पोहोचते. कलात्मकरीतीने वर्णन केलेली वेदना रसिकाला एक प्रकारचा इंद्रियातीत आनंद देत असते. यालाच समीक्षक ब्रह्मानंदाच्या जातीचा आनंद समजतात.
.............................................................................................................................................
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मचरित्राच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4945/Nahi-Mi-Ekla
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या इतर पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
..............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 14 January 2020
फ्रान्सिसबुवा,
कवी गसान झक्तान म्हणतात :
हे प्रत्यक्ष काश्मिरी हिंदू स्त्रियांनी अनुभवलंय. अतिदहशतीमुळे त्यांची पाळी तिसाव्या वर्षी बंद व्हायची. काश्मिरी हिंदूंविषयी थोडी सहानुभूती दाखवलेली शोभून दिसली असती.
आपला नम्र,
-गामा पैलवान