'फैज अहमद फैज - एक प्यासा शायर' हे प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांनी लिहिलेलं चरित्र साहित्य संमेलनात राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या चरित्रातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश....
.............................................................................................................................................
१९६२ साली त्यांना कळवण्यात आलं की, सोव्हिएत युनियननं त्यांना पहिलं 'शांतता पारितोषिक' दिलं आहे. लेनिनच्या नावानं दिला जाणारा शांततेचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना मॉस्कोला जायचं होतं. तिकडे जाण्याची परवानगी अयूबखान देतील की नाही, ही शंका होती; पण सरकारनं दिली परवानगी.
फैज मार्क्सवादी असल्यामुळे लेनिन म्हणजे त्यांच्यासाठी दैवतच. त्यांच्या नावाचा पहिलाच पुरस्कार मिळाल्यामुळे फैज यांचं अंत:करण भरून येणं स्वाभाविक होतं. ते म्हणाले, 'मानवी जीवन सुंदर आणि सुखीसमाधानी बनवायचं असेल, तर त्याची प्राथमिक अट म्हणजे स्वातंत्र्य आणि शांती हवी. लेनिन हे स्वातंत्र्य आणि शांतीचे अग्रेसर पुरस्कर्ते होते. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मला मिळणं हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट सन्मान आहे... मानवसमाजातील नवनवोन्मेष कला, शास्त्रीय ज्ञान आणि उद्योगशीलता यांच्यामध्ये आपल्यातील प्रत्येकालाच जे जे हवं, ते ते देण्याची क्षमता असते. त्यामुळेच प्रत्येक जण सुखासमाधानानं जगू शकतो. पण ही गोष्ट तेव्हाच शक्य होते, जेव्हा काही लोक निसर्गानं आपल्याला दिलेल्या संपत्तीचा, माणसानं निर्माण केलेल्या गोष्टींचा फायदा फक्त स्वत:च न घेता, संपूर्ण मानवजातीच्या फायद्यासाठी त्याचा वापर करतात... पण हे सगळं तेव्हाच शक्य होतं, जेव्हा मानवी समाजाचा पाया स्वार्थ, शोषण, मालकी हक्क यावर नसून त्याऐवजी फक्त न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि प्रत्येक व्यक्तीचं सुखस्वास्थ्य या तत्त्वांवरच रचला जाईल. मला एका गोष्टीची खात्री वाटतेय की, जो समाज शत्रूपुढं कधीही पराभूत झालेला नाही, तोच समाज अखेरीस यशस्वी होतो. युध्द, द्वेष, क्रौर्यापेक्षा प्रेमाच्याच पायावर मानवजातीचं कल्याण अवलंबून असतं!'
फैज यांच्या या भाषणामुळे फक्त जगाचंच लक्ष फैज यांच्याकडं वेधलं गेलं नाही, तर साम्यवादी रशियानं फैजना डोक्यावर घेतलं.
त्या वेळी त्यांनी केलेली ही गझल लक्षणीय म्हणावी लागेल - 'पास रहो'-
तुम मेरे पास रहो
मेरे कातिल, मेरे दिलदार मेरे पास रहो,
जिस घडी रात चले,
आसमानों का लहू पीके सियह रात चले,
मरहमे मुश्क लिए, नश्तरे-अलमास लिए,
बैन करती हुई, हंसती हुई, गाती निकले,
दर्द के कासनी पाजेब बजाती निकले
जिस घडी सीनो में डूबे हुए दिल,
आस्तीनों में निहा हाथों की राह तकने लगे,
आस लिए,
और बच्चों के बिलखने की तरह कुलकुले मन,
बहरे - नासूदगी मचले तो मनाए न मने,
जब कोई बात बनाए ना बने,
जब ना कोई बात चले,
जिस घडी रात चले,
जिस घडी मातमी, सुनसान, सियह रात चले,
पास रहो,
मेरे कातिल, मेरे दिलदार, मेरे पास रहो।
ही गझल लिहिली, तेव्हा मॉस्कोमध्ये त्यांच्याजवळ ऍलिस होत्याच, दोन्ही मुलीदेखील होत्या. तरीही ते 'मेरे पास रहो' असं कुणाला उद्देशून म्हणत असावेत? ऍलिसला उद्देशून नाहीच. प्रेयसीला उद्देशूनही नाहीच. तर मग ते 'मेरे पास रहो' कुणाला उद्देशून म्हणत असावेत? अर्थात, आपल्या देशालाच उद्देशून; कारण त्या वेळी पाकिस्तानात जनरल अयूबखान यांची अमेरिकेकडे जोरदारपणे झुकणारी लष्करशाही सुरू होती. मॉस्कोला जाण्याची त्यांनी परवानगी दिली होती, हेच आश्चर्य.
पण परवानगी दिली नाही, तर रशियासारखा बलाढय देश दुखावेल, याची जाणीव अयूबखान यांना असणार. तरीही इथून परत गेल्यावर फैजना पुन्हा एकदा तुरुंगवास घडण्याची शक्यता, भीती होतीच. त्यामुळे मॉस्कोहून परस्परच लंडनला निघून जाण्याचा विचार झाला होता. पण त्यामुळे आपल्या देशापासून आपण दूर जाणार, या देशाची काय अवस्था, माझा देश अस्तनीत लपलेल्या हातांच्या मदतीसाठी वाट पाहतोय, अशा वेळी मी त्याला सोडून जातोय. या विचारांचा कल्लोळ माजला असणार. त्यातूनच या गझलेनं जन्म घेतला असणार, हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.
अयूबखानच्या लष्करशाहीनंतर तीन वर्षांनी त्यांनी राजकीय पक्षांना परवानगी देऊन निवडणुका घेतल्या. अंदाजानुसार सर्वाधिक मतांनी जनरल अयूबखानच निवडून आले आणि ते राष्ट्राध्यक्ष बनले. अशा फसव्या लोकशाहीच्या वातावरणात फैज यांनी, त्यांचे मित्र सिब्ते हसन यांच्याबरोबर 'लैला-ओ-नेहरफ-अहोरात्र' हे मासिक सुरू केलं. पण दोन महिने मासिक प्रसिद्ध झाल्यानंतर अयूबखान यांनी त्या मासिकावर बंदी घातली. कारण, 'हे मासिक जरा जास्तच डाव्या विचारांचं आहे' म्हणून. त्यानंतर मग फैज पुन्हा नव्या दमानं 'लाहोर आर्ट कौन्सिल'च्या कामाला लागले. स्वत: एकांकिका लिहून त्या सादर केल्या. इतर कवी, लेखक, नाटककारांनाही प्रोत्साहन देऊन, त्यांचे कार्यक्रम रेडिओवरून सादर केले.
पण त्यांच्यासमोर सर्वांत मोठा पेच होता, तो म्हणजे पाकिस्तानचा इतिहास कसा लिहायचा? त्या इतिहासात कोणकोणत्या गोष्टींचा, घटनांचा समावेश करायचा? हा फार मोठा पेच फैज यांच्याबरोबरच इतरही विचारवंत, लेखक, कवी, शिक्षणतज्ज्ञांसमोर होता.
१९७६ साली फैज आणि त्यांचे मित्र मिर्झा जफर उल् हसन यांनी ‘Our National Culture’ (आमची राष्ट्रीय संस्कृती) हे पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकात म्हटलं होतं, 'आजच्या आपल्या संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये जुन्या काळातील दरबारी संस्कृतीची लक्षणं दिसतात. विविध लोक-संस्कृतींच्या बरोबरच, पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये मुरलेल्या, कॉलर ताठ करून चालणाऱ्यांची संस्कृतीदेखील त्यामध्ये आहेच. असं असताना आता प्रश्न असा आहे की, या सगळ्यांशी संबंध कसे ठेवायचे? या अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांचं हित ज्यामध्ये आहे, त्याच्याशी जुळवून घेण्यामध्येच आज आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील.' या मुद्दयावरच फैज यांनी अधिक जोर दिला होता. 'पाकिस्तानी संस्कृती' म्हणून मांडणी करताना, पाकिस्तान स्थापनेच्या पूर्वीची हजारो वर्षांची वैभवशाली संस्कृती स्वीकारावी, तर त्यात इस्लामच्या खुणा नाहीत आणि पाकिस्तान निर्मितीनंतरच्या संस्कृतीचा विचार करावा, तर अभिमानानं काय सांगावं? हा पेच फारच मोठा होता.
त्या काळात फैज यांनी एक कविता लिहिली. त्यामध्ये त्यांनी पाकिस्तानी संस्कृतीचा संबंध वेदांमध्ये उल्लेख असलेल्या, दैवी रूप दिलेल्या एकशिंगी प्राण्याशी जोडला. त्याचबरोबर मोहेंजोदरो इथे उत्खननात सापडलेल्या नृत्य करणाऱ्या नग्न मुलीशीदेखील जोडला. अशाच खुणा ग्रीक, रोमन संस्कृतीमध्येही सापडतात, असा दावा केला! फैज यांनी ही कविता नेहमीप्रमाणे उर्दू भाषेत न करता इंग्रजी भाषेत केली होती. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली ही कविता फक्त पाश्चात्त्य वाचक आणि ज्यांना जगाचं भान आहे, असे पाकिस्तानातील इंग्रजी भाषा बोलणारे लोकच वाचू शकतील; त्यांनाच या कवितेचं वैशिष्टय, महत्त्व कळेल, असं त्यांना वाटत होतं. कविता जर उर्दू भाषेत लिहिली असती, तर उर्दू भाषिकांना पाकिस्तानचा संबंध इस्लामपूर्व काळाशी, विशेषत: हडप्पा, मोहेंजोदरो, वैदिक परंपरेशी जोडलेला आवडणार नाही. त्यांचा तीव्र विरोधच होईल, याची पूर्ण जाणीव फैजना होती. पाकिस्तानातील सर्वसामान्य, बहुसंख्य मुस्लिमांना दुखावणं परवडण्यासारखं नाही, याचीही पूर्ण जाणीव त्यांना होती. पण त्याच वेळी अंत:स्फूर्तीदेखील स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून ही कविता इंग्रजी भाषेतच लिहून आपलं मन, विचार त्यांनी बंधमुक्त केले. त्या कवितेचं शीर्षक होतं, 'City of the Dead'. (मृतांचं शहर), जुन्या सिंधी भाषेतील 'मोहेंजोदरो'!
फैज यांची ही मतं आजच्या पाकिस्तानातील विचारवंतांच्या विचारांची प्रतिबिंबंच असावीत, अशी आहेत. फैज यांच्या अखेरच्या दिवसांत अहमद सलीम यांनी फैज यांची, त्यांच्या 'लाहोर आर्ट कौन्सिल'मधल्या कामाबद्दल, अनुभवांबद्दल मुलाखत घेतली होती. तीदेखील फार महत्त्वाची आहे.
फैज यांच्या लेखनातून आणि त्यांच्या मुलाखतींमधून त्यांची मतं स्पष्ट होत होती, ती अत्यंत महत्त्वाची होती. पाकिस्तानची इस्लामी अस्मिता प्रस्थापित करण्याच्या मार्गातील हे जे तिढे होते, त्यांवर फैज यांनी नेमकेपणानं बोट ठेवलं होतं. इथे एका गोष्टीची नोंद करावीशी वाटते. फैज यांनी 'गांधार संस्कृती ही पाकिस्तानी संस्कृती,' असं म्हणून हडप्पा-मोहेंजोदरोपासूनचे आधार घेत पाकिस्तानी संस्कृती ही किती श्रेष्ठ दर्जाची आहे, अशी मांडणी केली होती. त्याला अनुसरून कार्यक्रम सादर केले. तेव्हा झुल्फिकार अली भुट्टो हे अयूबखानांच्या सरकारात मंत्रिपदावर होते. त्यांनी हा मुद्दा अत्यंत अभिमानानं उचलला. मोहेंजोदरो, हडप्पा इथली संस्कृती आमचीच. तक्षशिलेसारख्या जगप्रसिद्ध मानल्या जाणाऱ्या विद्यापीठात ग्रीक, चिनी लोकदेखील शिक्षणासाठी यायचे, ते तक्षशिला विद्यापीठ आमचंच; असं म्हणून भुट्टो पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आपल्या कचेरीत बु्द्धाचा अर्धपुतळा ठेवला होता. पण त्यानंतर कुणीतरी त्यांच्या लक्षात आणून दिलं, की मोहेंजोदरो, हडप्पा इथे उत्खननात सापडलेली एका नग्न नर्तिकेची मूर्ती, एका साधुपुरुषाची मूर्ती, त्याशिवाय तिथे सापडलेलं - इतरही अनेक पुराणं, गौतमबुध्द, त्याची शिकवण हे सगळं इस्लामी तत्त्वज्ञानानं धिक्कारलेलं आहे. तक्षशिला येथील, जगातील पहिलं व्याकरण लिहिणाऱ्या पाणिनीनं संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिलं होतं, संस्कृत भाषा तर हिंदूंची. अशा गोष्टी लक्षात आल्यानंतर भुट्टोंनी आपल्या या पुरातन संस्कृतीवरचा दावा सोडून दिला. कचेरीतील बुध्दाची मूर्ती काढून टाकली.
आज पाकिस्तानातील, जगाचं भान असणाऱ्या बुद्धिवादी, विचारवंत, लेखक, कलावंतांची होणारी घुसमट आणि तेथील सामाजिक, धार्मिक, राजकीय अवकाशातील अपरंपार अस्वस्थता याची पाळंमुळं फैज यांच्या वर दिलेल्या लेखात आणि त्यांच्या मुलाखतीत सापडतात.
फैज यांचे हे विचार १९६२ सालचे आहेत. त्यानंतर अनेक दशकं उलटून गेली. तरी पाकिस्ताननं आपली अस्मिता जपण्यासाठी, आपली ओळख देण्यासाठी, आपल्या सांस्कृतिक वारशाऐवजी इस्लामचीच निवड केलेली दिसते आणि आजच्या घटकेला तर पाकिस्तानची एक दहशतवादी देश म्हणून जगभर बदनामी झाली आहे.
१९६५ साली जनरल अयूबखानांनी, स्वत:ची इच्छा नसतानाही, विजयाची खात्री वाटत नसतानाही, भुट्टो यांच्या दडपणामुळे भारतावर हल्ला केला. भारताच्या सैन्यानं जबरदस्त प्रतिकार करीत, पाकिस्तानी सैन्याला मागे रेटत रेटत, पाकिस्तानातील महत्त्वाच्या शहरांवर, लाहोरवरदेखील जोरदार हवाई हल्ले सुरू केले. पाकिस्तान सरकारनं खोटा प्रचार चालवला होता, तरी लोकांचं मनोबल हादरू लागलं होतं. अशा वेळी फैज यांना सांगण्यात आलं की, लोकांचं मानसिक बळ वाढवण्यासाठी गझल लिहा. त्या वेळी फैज यांनी आपल्या मनातील भावना या शब्दांत गुंफल्या -
उठो, माटी से उठो, जागो मेरे लाल।
तुमरी सीज सजावन कारन।
देखो आई, रैन अंधियारन।
नीले शाल दुशाले लेकर।
जिनमें इन दुखियन आंखों ने।
ढेर किये हैं इतने मोती
इतने मोती जिन्हें की जियुती।
दानसे तुमरा, जग जग लागा।
नाम चमकतो... उठो माटी से उठो।...
घरघर बिखरा भंवर का कुंदन।
घोर अंधेरा अपना आंगन।
जाने कबसे राह तके है।
बाली दुल्हनिया बांके वीरा।
सूना तुमरा राज पडा है।
देखो कितना काज पडा है।
बीरी बरजय राज संगसन, तुम माटी के लाल।
उठो, माटी से उठो।
हठ ना करो.. माटी से उठो.. मेरे लाल।
फैजनी ही गझल तर केली, पण त्यामुळे अनेक लोकच काय, पण सरकारदेखील नाराज झालं, दुखावलं गेलं. फैजनी लोकांना भारताविरोधात चेतवण्याऐवजी, आपल्या सैनिकांच्या शौर्याचे पोवाडे गाण्याऐवजी, युध्दभूमीवर निष्प्राण होऊन पडलेल्या आपल्याच सैनिकांना उद्देशून ही गझल लिहिली, म्हणून राग आला होता. पण ज्यांची मुलं, भाऊ, नवरे युद्धात बळी पडले होते, त्यांचे आईबाप, भावंडं, पत्नी यांच्या हृदयाला मात्र ही गझल खोलवर जाऊन भिडली होती. या गझलेमुळे त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले गेले होते. ही गझल घराघरातून म्हटली जाऊ लागली. या गझलेला सुरेल सुरांवर बसवून ती जाहीरपणानं सादर केली जाऊ लागली आणि मग सरकारनं फैजच्या गझलांच्या जाहीर कार्यक्रमांवर बंदीच घातली.
१९७१मध्ये पाकिस्तानची फाळणी झाली. आणि पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानपासून वेगळं झालं, या नव्या देशाचं नाव बांगलादेश. त्यानंतर भुट्टो पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. भुट्टो सत्तेवर येताच फैज पाकिस्तानात परत आले. या वेळी ते लाहोरऐवजी कराचीला जाऊन राहू लागले. भुट्टोंनी त्यांना कराचीच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नेमलं. त्याच वेळी सांस्कृतिक आणि शिक्षणखात्याचे सल्लागार म्हणूनही त्यांची नेमणूक केली.
पूर्व पाकिस्ताननं वेगळं होऊन बांगलादेशची स्थापना होणं, ही फार मोठी जखम झाली होती पाकिस्तानला. त्या जखमेवर मलम लावण्यासाठी, बांगलादेशाशी संबंध सुधारावेत म्हणून भुट्टो बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांना भेटायला ढाक्याला गेले. जाताना फैज यांना बरोबर घेऊन गेले. भुट्टो आणि मुजीबुर रहमान यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर असं म्हटलं जातं की, त्या वेळी मुजीबुर रहमान यांनी फैजना आपली एखादी नवी गझल ऐकवायची विनंती केली. या पूर्वीच्या काळी फैज यांच्या गझलांचे अनेक कार्यक्रम ढाक्यामध्ये झाले होते. फैज अनेकदा ढाक्यामध्ये गेले होते. फैज यांच्या मनात बांगलादेश झाल्यावेळच्या घटना घोळत होत्याच. शिवाय फैज यांनी पूर्व पाकिस्तानातील मच्छीमारांवर चित्रपट बनवलेला होता. भुट्टोंबरोबर तिथे गेल्यानंतरचं वातावरण अनुभवलं होतं. त्याला अनुसरून आपली नवी गझल मुजीबुर रहमान यांना ऐकवली होती. ती होती - 'ढाका से वापसी के बाद'
हम जो ठहरे अजनबी इतनी मदारातों के बाद।
फिर बनेंगे आशना कितनी मुलाकातों के बाद।
कब नजर में आयेगी बेदाग सब्जे की बहार।
खून के धब्बे धुलेंगे, कितनी बरसातों के बाद।
थे बहोत बेदर्द लम्हें खत्म ए-दर्द-इष्कके।
थी बहोत बे मेहर सुबहें, मेहरबाँ रातों के बाद।
दिल तो चाहा पर शिकस्त-ए-दिल ने मुहलत न दी।
कुछ गिले शिकवे भी कर लेते, मुना-जातों के बाद।
उनसे जो कहने गये थे फैज जाँ सदका लिये।
अनकही ही रह गयी दो बात सब बातों के बाद।
फैज यांच्या अतिशय लोकप्रिय गझलांपैकी ही एक गझल. या गझलेनं लोकांच्या मनात वादळं उठली होती. प्रत्येक मुशायऱ्यामधून ही गझल गायली जाऊ लागली. अजूनही गायली जाते. पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली, पश्चिम-पूर्व पाकिस्तानात दुरावा आला. त्या दु:खानं विदीर्ण झालेल्या मनाची अतिशय भावनोत्कटता या गझलेमधून दिसते. पण त्याच वेळी पश्चिम पाकिस्तानातील सैन्यानं पूर्व पाकिस्तानातील सर्व थरांतील लोकांवर केलेले अमानुष अत्याचार, बलात्कार, याबरोबर लाखो लोकांना मारून टाकलं, त्याबद्दलची अपराधीपणाची भावना, खंत स्पष्टपणानं व्यक्त होत नाही. अखेरच्या दोन ओळींमध्ये मात्र त्याची सूचना फक्त मिळते. कदाचित भुट्टोंच्या उपस्थितीत फैजना अधिक स्पष्टपणानं व्यक्त करता आले नसेल, असं म्हणू या आपण. फाळणीनंतरची पाकिस्तानातील भीषण परिास्थिंती आणि नंतर पूर्व पाकिस्ताननं पाश्चिंम पाकिस्तानपासून सुटका करून घेऊन बांगलादेशची निर्मिती याचे परिणाम अनेकांवर झाले होते.
त्यांच्यापैकीच हे आणखी एक महत्त्वाचं उदाहरण. जिनांचे अत्यंत विश्वासू, घनिष्ठ मित्र होते, जिनांवर प्रेम करणारे होते ते सारा सुलेरी या पाकिस्तानी नामवंत लेखिकेचे वडील. पाकिस्तान होण्याची चिन्हं दिसू लागताच ते मेरठहून आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन कराचीला येऊन स्थायिक झाले. पत्रकार, लेखक म्हणून त्यांनी खूप नाव कमावलं. आपल्या भोवतीचे भयानक दंगे, रक्तपात बघून त्यांची आई त्यांना म्हणाली होती, 'हे कसले स्वातंत्र्य? माणसाला माणसानंच तोडून टाकणारं हे कसलं स्वातंत्र्य?'
साराच्या वडलांनीदेखील आरंभी पाकिस्तानचं कौतुकच केलं होतं, आपल्या लेखनातून. पण हळूहळू त्यांचा भ्रमनिरास झाला. तो एवढा तीव्र होता, की त्यांनी 'Whither Pakistan?' हे पुस्तक लिहिलं. बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर तर त्यांचा पूर्ण भ्रमनिरास झाला. एकदा ते साराला म्हणाले, 'मी आता द्विराष्ट्राबद्दल बोलतच नाही. फाळणीबद्दल बोलत नाही. मी रक्तपाताबद्दल बोलतोय.' हळूहळू त्यांचं मानसिक संतुलनच बिघडत गेलं. बसल्या जागीच ते कागदावर आपली बोटं फिरवत बसत. अक्षरं गिरवीत राहत. आपल्याला हव्या होत्या त्या प्रिय देशामध्येच ते जणू निर्वासित बनून राहिले होते.
.............................................................................................................................................
'फैज अहमद फैज : एक प्यासा शायर' या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5164/Faiz-Ahmad-Faiz
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 14 January 2020
हिंदूंच्या वेदनांवर कधी लिहिलं होतं का या फैज साहेबांनी? काये की, सरकारी कवी असल्यावर काही मर्यादा आपोआप पडतात.
-गा.पै.