आम्ही १९८७मध्ये देवडुंगरीत आमच्या कामाची सुरुवात केली. बदलाची कक्षा हळूहळू निश्‍चित होऊ लागली.
ग्रंथनामा - आगामी
अरुणा रॉय
  • ‘कहाणी माहिती अधिकाराची’चे मुखपृष्ठ
  • Fri , 10 January 2020
  • ग्रंथनामा Granthnama अरुणा रॉय Aruna Roy The RTI Story कहाणी  माहिती  अधिकाराची शंकर सिंग Shankar Singh निखिल डे Nikhil Dey

‘द आरटीआय स्टोरी’ हे अरुणा रॉय व त्यांच्या सहकार्‍यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक रोली बुक्स, दिल्ली यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद  ‘कहाणी  माहिती  अधिकाराची’ या नावाने अवधूत डोंगरे यांनी केला आहे.  १२ जानेवारी २०२० रोजी तो ‘साधना प्रकाशना‘कडून समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील पहिल्या प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

देवडुंगरीमध्ये बांबूच्या झुडपांनी वेढलेल्या धुळकट वाटांलगत एका मातीच्या घरात  १९८७मध्ये या सगळ्याची सुरुवात झाली. मजदूर किसान शक्ती संघटनेची स्थापना होण्याच्या तीन वर्षं आधीची ही गोष्ट आहे. माहिती अधिकारासंदर्भातील चर्चेला आकार देणार्‍या घटना व संवादांना त्या खोपट्याने निवारा दिला आणि हे घरच पुढील घटनाक्रमासंबंधीचं एक ठोस विधान, एक प्रतीक व मूक साक्षीदार बनून गेलं. ब्यावरमध्ये १९९६मध्ये माहिती अधिकाराच्या मागणीसाठी निदर्शनं करणार्‍या गटामध्ये सहभागी झालेले इंडियन एक्स्प्रेसचे माजी संपादक अजित भट्टाचारजी लिहितात

राजस्थानच्या या दुर्गम भागात असलेलं देवडुंगरी हे नमुनेदार गाव थंडगार व खडकाळ अरवली डोंगररांगांच्या उतारावर वसलेलं आहे. तिथल्या डोंगराच्या माथ्यावर एक लहानसं मंदिर आहे. इथली काळी माती अगदी रखरखीत आहे. पाण्याची मोठीच वानवा असल्यामुळे थोड्या-थोडक्या पाण्याला अमूल्य मानलं जातं. इथे खोल विहिरींमधून पाणी काढतात नि खडकाळ मातीमध्ये खणलेल्या खळग्यांमध्ये ते साठवलं जातं. हा परिसर अगदी रखरखीत असला, तरी त्यात विलक्षण चैतन्यशीलताही आहे. धान्याची पिवळसर शेतं आणि प्रत्येक शेताला घातलेलं दगडी कुंपण, यामुळे या तपकिरी भूप्रदेशाला भौमितिक आकृतिबंधाचं रूप आलं आहे. खडकाळ जमिनीवर उपजीविका करण्यासाठी इथले लोक पाठ मोडेपर्यंत कष्ट करत आले आहेत, असं दीर्घ इतिहासाचं प्रातिनिधिक चित्र या आकृतिबंधाद्वारे दृश्यमान होतं.

गावातलं जगणं साधं असतं. घर आणि कामाचं ठिकाण यातल्या सीमा अस्पष्ट असतात. लाकूड कापताना, स्वयंपाक करताना, झाडू मारताना आणि जेवताना महत्त्वाचे संवाद व वादविवाद होतात. कधी मधेच कोणी शेजारी आला तर त्यामुळे बोलणं अर्धवट राहातं, कधी जेवण वाढायच्या गोंधळातच संभाव्य पर्यायांविषयी मनात आलेलं थेट व्यक्त केलं जातं, कधी भांडी घासताना असहमतीचे मुद्दे मांडले जातात; त्यावर आणखी चर्चेची व तोडगा काढण्याची गरज असते. या सतत सुरू असलेल्या चर्चेमध्ये चिकित्सक मर्मदृष्टींची बीजं सामावलेली असतात.

राजस्थान सुंदर आहे. इथे शुष्क तपकिरी व धुळकट धुक्याच्या वातावरणामध्ये नेत्रदीपक सौंदर्य लपलेलं पाहायला मिळतं. राजस्थानच्या मध्य भागात राहणार्‍या लोकांचा भवताल अरवली पर्वतरांगांनी व्यापला असून भारतातील सर्वांत जुनी पर्वतरांग अशी अरवलीची ओळख आहे. प्राचीन अवशेष शोधण्यात रुची असलेल्यांना इथे आजही अतिशय जुन्या स्मृतिखुणा वागवणारे जीवाश्म सापडू शकतात. आता हे सगळे अवशेष खणून काढले जात आहेत, इमारती व इतर बांधकामांसाठी सगळ्या टेकड्या खोदण्याचं काम सुरू आहे. जयपूर-दिल्ली महामार्गावरही हे दृष्टीस पडतं.

आम्ही (निखिल डे, शंकर सिंग, त्यांची पत्नी अंशी व मी) १९८७मध्ये देवडुंगरीत आमच्या कामाची सुरुवात केली. चौकडिया खेड्यातील हग्गू व जैत सिंग यांनी आम्हाला त्यांच्या घरामध्ये जागा दिली.

या प्रदेशामध्ये सरंजामशाहीच्या खुणा अजूनही दिसतात. इथलं जगणं कष्टप्रद आहे, सुपीक जमीन अभावानेच आढळते आणि अधून-मधून दुष्काळ पडत राहिल्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट होते. या जमिनीत उगवणार्‍या पिकावर अवलंबून असलेले बहुतांश लोक रात्री भुकेल्या पोटीच झोपी जातात. सरंजामशाहीचं युग इतिहासजमा झालं असलं, तरी सामाजिक विषमता व प्रशासकीय अन्याय इथे अजूनही टिकून आहे. या सगळ्या वातावरणातही इथल्या लोकांची सचोटीची वागणूक, रंगीबेरंगी कपडे, मोहक गाणी, विलक्षण मिथ्यककथा, बोलीभाषा व हसत-खेळत संवाद साधण्याची वृत्ती, यांमुळे या प्रदेशातील पारंपरिक संस्कृती जिवंत आहे. सतत वाहणारा चैतन्याचा प्रवाह त्यांच्या हसण्यात पाहायला मिळतो. बदल घडवण्याची इच्छा व सामर्थ्य इथे टिकून आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ४० वर्षांनी- १९८७मध्ये अतिशय भिन्न पार्श्वभूमी असलेल्या तीन व्यक्ती देवडुंगरीमध्ये राहण्यासाठी व काम करण्यासाठी आल्या. यांपैकी अरुणा रॉय यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता. दूरदृष्टी व अनन्यसाधारण संवादकौशल्य लाभलेले शंकर सिंग हे राजस्थानचेच रहिवासी होते. तर, अमेरिकेतील महाविद्यालयात शिक्षण घेणारे निखिल डे तिथल्या चंगळवादी जीवनशैलीचा उबग येऊन नुकतेच भारतात परतले होते- निखिल यांचे वडील भारतीय हवाई दलामध्ये एअरमार्शल पदावर कार्यरत होते. या तिघांनी गावातील दगड-मातीची एक झोपडी भाड्याने घेतली. अजमेर-भीम महामार्गाला लागून एक कच्चा रस्ता या गावापर्यंत येतो. अजूनही तिथं हे खोपटं उभं आहे. त्यांनी गावातील इतर शेजार्‍यांसारखंच राहायला सुरुवात केली. ते जमिनीवरच झोपायचे, विहिरीतून पाणी काढून आणायचे, बादल्या डोक्यावरून वाहून न्यायचे, चुलीवर चपात्या नि डाळ शिजवायचे, स्वतःचे कपडे नि भांडी स्वतःच धुवायचे. खोपट्याशेजारची शेळ्यांची जागा त्यांनी स्वयंपाकघर आणि मोरी म्हणून वापरायला सुरुवात केली. संडास बाहेरच्या बाजूला होता.

या तिघांचीही पार्श्वभूमी आणि अनुभवविश्व परस्परांहून अतिशय भिन्न होतं. तिघांमध्ये अरुणा वयाने सर्वांत मोठ्या होत्या, तर निखिल सर्वांत तरुण. अरुणा यांनी सात वर्षं भारतीय प्रशासकीय सेवेत काम केलं होतं. त्यापूर्वी दिल्लीतील इंद्रप्रस्थ महिला महाविद्यालयात काही काळ त्यांनी इंग्रजी वाङ्मयाचं अध्यापन केलं. त्या स्वतः याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी. कालांतराने, १९७५मध्ये त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात ग्रामीण भागांमधील गरिबांसोबत करणार्‍या ‘सोशल वर्क अँड रिसर्च सेंटर’ (एसडब्ल्यूआरसी) या ग्रामीण स्वयंसेवी संस्थेमध्ये त्या दाखल झाल्या. एसडब्ल्यूआरसीमधील नऊ वर्षांच्या कामानंतर १९८३मध्ये अरुणा यांनी दुर्गम गावात जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला. मूलभूत राजकीय व लोकशाही अधिकार वापरण्यासाठी लोकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही दिशा निवडली.

याच दरम्यान, अरुणा व शंकर यांची पहिल्यांदा भेट झाली. गावांमधील शोषण, गरिबी व विषमता याबद्दल दोघांनाही आस्था वाटत असल्याने त्यांची लगेचच मैत्री जुळली. शंकर यांनी प्रौढ साक्षरतेसंबंधी काम सुरू केलं होतं. अनेक आस्थेवाईक ग्रामीण तरुणांप्रमाणे त्यांनाही ग्रामीण राजकारणाची अंगभूत जाण होती. प्रत्येक वैयक्तिक समस्या व्यापक राजकीय संदर्भात पाहण्याची प्रगल्भता त्यांच्यामध्ये होती. शिवाय, स्वतःच्या दृष्टिकोनाची विविध मार्गांनी अभिव्यक्ती करणं शंकर यांना सहज शक्य व्हायचं. त्यांच्या या अतुलनीय संवादकौशल्याची भुरळ अरुणा यांना पडली. शंकर उपस्थित असतील तिथे औदासीन्य आसपासही कधीच फिरकत नसे. अगदी टीका करत असतानाही ते हसत-खेळत स्वतःचं म्हणणं मांडत. त्यांच्या असण्यानेच वातावरणात चैतन्य निर्माण होत असल्यामुळे त्यांची लोकप्रियताही वाढली. अरुणा व शंकर यांच्यात अनेक प्रश्‍नांवर सातत्याने वादविवाद होत असत. लिंगभावाच्या प्रश्‍नावर तर दोघांच्या दृष्टिकोनांमध्ये प्रचंड तफावत होती. शिवाय, भारतासारख्या प्रचंड श्रेणीबद्ध समाजातील जात व धर्माशी निगडित सूक्ष्म विषमतांकडे पाहण्याची दोघांची दृष्टीही भिन्न होती. शब्दार्थ, नाट्य तंत्रज्ञान, नाटकांसाठीची विषयसूत्रं- या विषयांवर त्यांचा शब्दच्छल सुरू असायचा. लोकप्रियता हा चांगल्या नाटकाचा एकमेव निकष असू शकत नाही, समता व न्याय ही मूल्यं नाकारल्याची भरपाई वा त्याचं समर्थन टाळ्या कमावण्यातून होत नाही- असे युक्तिवाद केले जात. अशा वादसंवादांमुळे दोघांनाही काम करण्यात उत्साह वाटायचा.

अजमेर जिल्ह्यातील हरमाडा पंचायत क्षेत्रात अरुणा यांची मैत्रीण नौरती यांनी १९८१मध्ये किमान वेतनाच्या मुद्यावर पहिला संप पुकारला, त्यामध्येही शंकर व अरुणा एकत्र सहभागी झाले होते. कठपुतळ्या आणि विनोदबुद्धी ही त्यांची नेहमीची अस्त्रं सोबत घेऊन शंकर तिथे आले, त्यामुळे संपातील वैरभाव सौम्य होण्याला मदत झाली. यादरम्यान, अरुणा व शंकर यांच्या मैत्रीप्रवासाला आणखी एक खास वळण मिळालं. राजस्थानातच १९८३मध्ये या दोघांची निखिलशी गाठ पडली. तेव्हा ते वीस वर्षांचे होते. उत्कृष्ट शैक्षणिक कारकीर्द सुरू असताना अखेरच्या क्षणी त्यांनी अमेरिकेतील पदवी अभ्यासक्रमाला सोडचिठ्ठी दिली. एका बुद्धिमान, सरळ-साध्या व ‘चांगल्या’ विद्यार्थ्याने महाविद्यालयीन शिक्षण असं का सोडावं, हे न कळल्यामुळे त्यांचे आई-वडील गोंधळून गेले. अमेरिकेतील आजूबाजूचं वातावरण आणि आपल्या लोकांना मदत करण्याची उत्कट इच्छा, यातील वाढता तुटलेपणा असह्य झाल्याने निखिल यांनी अमेरिका सोडून परत यायचा निर्णय घेतला. त्यांना लोकांच्या राजकारणाचा भाग व्हायचं होतं. शंकर यांच्या मिश्कीलपणाकडे व असाधारण निसर्गदत्त कौशल्यांकडे निखिल आकर्षित झाले. शंकर व अरुणा यांच्याकडून आणखी शिकायची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. दरम्यान, अरुणा व निखिल यांची मैत्री झाली होती. अखेरीस, जगण्याविषयी आणि कामाविषयी आपली स्वप्नं सारखीच असल्याचा साक्षात्कार तिघांना झाला.

ग्रामीण भारतातील कामाची सुरुवात करण्यासाठी एखादी संघटना व संदर्भबिंदू शोधण्याच्या प्रयत्नात ते मध्य प्रदेशातील झबुआ इथे गेले. विविध कारणांमुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही, पण त्यांनी शोध सुरू ठेवला. राजकीय विचारसरण्या, तत्त्वं व जीवनशैलीशी जोडलेली विशिष्ट मूल्यं यांमध्ये सामाइकता असलेला अनुरूप मित्रपरिवार ही त्यांची पहिली गरज तर पूर्ण झाली होती. लोकशाही संस्थांची भूमिका आणि नागरिक म्हणून आपल्याला असलेले अधिकार लोकांनी समजून घेण्याची गरज आहे, या मुद्यावर तिघांचंही एकमत झालं. आपण काम करत असलेल्या संघटनेचं स्वरूप व रचना लोकांच्या साथीने विकसित व्हायला हव्यात, असं त्यांचं ठाम मत होतं. भारतामध्ये असं राजकीय कार्य पक्षीय व्यवस्थेच्या बाहेर राहून करता येणं शक्य आहे. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण व इतर अनेकांनी अशा कामाची परंपरा पाडलेली आहे. केवळ सत्ताधार्‍यांचा रंग बदलल्याने स्वातंत्र्य मिळत नाही. भूक, अस्पृश्यता, गरिबी व हिंसा यांपासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल, तर पारंपरिक सामाजिक भेदभावाच्या प्रथांविरोधात टिकाऊ लोकचळवळ आवश्यक आहे. डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांनी आकार दिलेल्या राज्यघटनेतील अधिकार कृतीत आणण्यासाठी लोकांमध्ये चेतनाजागृती गरजेची आहे, अशी तिघांचीही धारणा होती. शेवटी, शंकर यांच्या लोटियाना गावापासून जवळच असलेल्या देवडुंगरीमध्ये कामाला सुरुवात करण्याचं त्यांनी ठरवलं. देवडुंगरी ३५ किलोमीटर दूर असलं, तरी शंकर यांचे अनेक नातलग व त्यांच्या समुदायातील लोक तिथे राहत होते. शंकर यांची पत्नी अंशी यांच्यासाठी ते गरजेचं होतं- त्यांना स्वतःच्या परिसरात व सहजपणे जगता येईल अशा सामाजिक वातावरणात राहायचं होतं.

किमान प्रतिष्ठा असलेलं जीवन, समान वेतन, शालेय शिक्षण, आरोग्यसुविधा आणि काही लोकांना स्वाभाविक सहजतेने मिळणार्‍या इतर गोष्टी मिळवायच्या असतील, तर गरिबांना कामाची गरज असते. कायद्यानुसार ते समान असतात. पण गरिबांना तुच्छतेने विषम वागणूक सर्वत्र मिळते. सरकार, राजकीय व्यवस्था आणि जातिव्यवस्थेने विभागलेला समाज या सर्व स्तरांवर ते विषमता भोगतात. न्याय व समता असलेलं जग त्यांच्यासाठी स्वप्नापुरतंच उरतं. या पोर्शभूमीवर, प्रायोगिक स्तरावर सुरू झालेला शंकर, अंशी, निखिल व अरुणा यांचा प्रवास अजूनही सुरू आहे.

ग्रामसमुदायामध्ये भाड्याने किंवा अगदी विकत घेण्यासाठी जागा मिळवणं सोपं नसतं. शंकर यांनी राहण्यासाठी घर शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांची चुलत बहीण हग्गूने तिच्या मालकीच्या वापरात नसलेल्या एका झोपडीत राहायची परवानगी या चौघांना दिली. लग्नाआधी हग्गू तिथे राहत होती. घट्ट नात्यांनी बांधलेल्या समुदायात प्रवेश करणं सर्वसाधारणतः अतिशय अवघड जातं, पण शंकर ‘भाऊ’ असल्यामुळे हा प्रवेश तुलनेने सहज झाला. या नात्यामुळेच अरुणा व निखिल यांना सुरुवातीच्या काळात लोकांशी ओळखी करून घेणं सोपं झालं. देवडुंगरी गाव राजसमंद जिल्ह्यात आहे. दिल्लीहून मुंबईला जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग आठवरील भीम या लहानशा शहरापासून देवडुंगरी आठ किलोमीटरवर आहे.

त्या झोपडीरूपी घराला वैयक्तिक व राजकीय स्तरावर विलक्षण मूल्य प्राप्त झालं आहे. बाहेरून परत आल्यावर आम्हाला आश्वस्त करणारी ती जागा. साधेपणा व सामुदायिकता ही मूल्यं जपत जगण्याच्या प्रयत्नाला आश्रय देणारी जागा. आमचे दलित समुदायातील शेजारी व अल्पभूधारक शेतकरी मोहनजी यांनी केलेल्या प्रवाही मांडणीतून माहिती अधिकाराच्या संघर्षाने आकार घेतला, तोही याच जागेत. हक्काचं वेतन मागितल्यावर गरिबांवर अधिकारी संस्थांकडून खोटेपणाचा आरोप केला जातो, यासंबंधीची मांडणी मोहनजींनी केली. ते म्हणाले, “त्यांच्याकडच्या नोंदी आमच्या हातात येत नाहीत, तोपर्यंत आम्ही खोटारडेच ठरत राहू.’’ माहिती अधिकारासाठीच्या संघर्षाला महत्त्वाचं वळण देणारे हे उद्गार होते. भ्रष्टाचार व सत्तेचा मनमानी वापर यांच्या विरोधातील साधन म्हणून पारदर्शकतेची भूमिका किती तर्कशुद्ध व कळीची असते, हे मोहनजींच्या साध्या विधानातून स्पष्ट झालं.

माहिती अधिकारासाठी मजदूर किसान शक्ती संघटनेने सुरू केलेल्या संघर्षाला या घरातील चर्चा व युक्तिवादांनी ठोस रूप दिलं.

लोकांसोबत राहणं अनेक कारणांसाठी महत्त्वाचं होतं आणि आहे. आपल्या जगण्याच्या मर्यादांमध्ये लोकांचे प्रश्‍न समजून घेण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. कोणत्याही संघटनेच्या कामाचं मूल्यमापन लोकांच्या नजरेतून करणं आवश्यक असतं. काम व मूल्यं वाटून घेण्याचा हा एक चांगला व्यवहार्य मार्ग होता. देवडुंगरीमध्ये येण्यापूर्वी राजस्थानच्या ग्रामीण भागात नऊ वर्षं काम करताना अरुणा यांनी हा धडा घेतला होता. शंकर तर या समजुतीसोबतच लहानाचे मोठे झाले.

देवडुंगरीला भेट देणार्‍या अगदी सुरुवातीच्या लोकांपैकी एक होत्या रजनी बक्षी. मुक्त पत्रकार व मजदूर किसान शक्ती संघटनेची अगदी जवळची मैत्रीण असलेल्या रजनी अनेकदा इथल्या घराला भेट देत आणि कुटुंबातल्या एक होऊन तिथे राहत. या चळवळीच्या प्रारंभिक वर्षांची नोंद करणारं लेखन त्यांनी केलं. देवडुंगरीला अनेकदा भेट दिल्यामुळे त्यांच्या या लेखनाला सेंद्रिय स्वरूप प्राप्त झालं.

देवडुंगरी : डांबरी रस्त्याकडेचं जीवन

अरवली पर्वतरांगांच्या उत्तरेकडील टोकाला. थोडं अंतर राखल्यासारखी एक बुटकी टेकडी आहे, त्यावर दगड-मातीचं एक लहानसं मंदिर उभं आहे. इथून जाणारा मार्ग बहुधा प्राचीन काळापासून वर्दळीचाच असावा आणि तेव्हापासून या मंदिरातील ग्रामदेवता त्या वाटेच्या राखणदाराप्रमाणे पहारा देत उभी आहे...

माथ्यावर लहानं मंदिर असलेल्या या बुटक्या टेकडीच्या- देवडोंगराच्या- सावलीत देवडुंगरी हे गाव आहे. या उजाड टेकडीच्या उतारावरच, गावाच्या पूर्व टोकावर एक असाधारण कुटुंब राहतं. त्यांचं दगड-मातीचं घर विविध प्रकारच्या पाहुण्यांचं स्वागत करत असतं. शेजारी राहणारा एखादा इसम इथल्या स्वयंपाकघरात सारवलेल्या जमिनीवर बसून राज्याच्या राजधानीतून आलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत जेवताना दिसतो. कधी मुंबईहून आलेला एखादा पत्रकार किंवा शेजारच्या जिल्ह्यातला सीमान्त शेतकरीही त्यांच्यासोबत जेवत असतो. या घरातील कष्ट आणि हास्यकल्लोळात मीही अनेकदा सहभागी झाले आहे. या घरात केर काढणं किंवा शेळीला चारा घालणं, यांसारखी रुक्ष घरगुती कामं करत असताना मला अनेकदा बापू कुटीची आठवण झाली. पण हे साधर्म्य नोंदवणं अवघड आहे. बापू कुटी आणि इतिहास घडवणार्‍या तिथल्या व्यक्तिमत्त्वाशी तुलना केली, तर देवडुंगरीतल्या माझ्या यजमानांना शरमल्यासारखं होईल. ते केवळ नैसर्गिकरीत्या साध्या पद्धतीने जगण्याचा व काम करण्याचा प्रयत्न करत होते.

या संदर्भात भट्टाचारजी लिहितात -

ते घर आणि तिथल्या वातावरणामुळे लोक देवडुंगरीकडे आकर्षित होऊ लागले. साधी जीवनशैली राखत असतानाच जगभरातील बदलाच्या संकल्पनांना सामावून घेणार्‍या या घरामधील व्यक्तींशी आपल्या समस्यांबाबत चर्चा करण्याकरिता शेजारच्या गावांमधले लोकही इथे येत असत. भारतातील नागरी अभिजनवर्गातून आलेल्या आपल्या दोन साथीदारांची स्वप्नं ग्रामीण वास्तवाशी जोडण्याचं काम शंकर सिंग यांनी केलं. त्यांचा जन्म इथल्याच जवळच्या एका गावातील होता. नवनवीन संकल्पना गावाच्या भाषेत गाण्यांमध्ये, नाटकांमध्ये व कठपुतळ्यांच्यासादरीकरणामध्ये गुंफण्याची क्षमता शंकर यांच्याकडे होती. त्यामुळे भाषेची मर्यादा सहज ओलांडली जात असे. वंशपरंपरागत सामाजिक अन्यायाचा प्रतिकार कसा करायचा, यावर संध्याकाळच्या चर्चांमध्ये अधिकाधिक लक्ष केंद्रित केलं जात होतं.

देवडुंगरीतील हा परिवार वरकरणी मुख्य प्रवाही जगण्यापासून वेगळा पडला आहे, या धारणेमुळे त्यांच्या मित्र-मैत्रिणींना व सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांना कुतूहल तरी वाटायचं किंवा चिंता तरी वाटायची. गरिबी आणि विषमता यांचा अनुभव घेत जगत असताना त्याबद्दल खुल्या स्वरूपाची चर्चा केल्यामुळे बाहेरच्या जगाशी दुवे टिकून राहिले. देवडुंगरीमध्ये जाणं अवघड होतं. कोणताही लोहमार्ग तिथून जात नव्हता किंवा जवळ काही विमानतळही नव्हता. उदयपूर ते अजमेर यांना जोडणार्‍या मुख्य महामार्गाला लागून असलेल्या या गावात फक्त रस्त्यानेच पोचणं शक्य होतं. राष्ट्रीय महामार्ग-८ हा उर्वरित भारताचं एक प्रातिनिधिक चित्रच होता. अनेक भपकेदार बस, कार, क्रेन, मालवाहू गाड्या व विविध आकारांतील ट्रक देवडुंगरीवरून पुढे जात आणि या विचित्र तंत्रज्ञानाकडे गावकरी अचंबित नजरेने पाहत.

विख्यात पत्रकार व माजी संपादक अजित भट्टाचारजी व प्रभाष जोशी आमचे मित्र होते. देवडुंगरीच्या पहिल्या भेटीचा अनुभव प्रभाष जोशी यांनी त्यांच्या खास मोकळ्याढाकळ्या शैलीत नोंदवला आहे -

खूप पूर्वी सेवाग्राममधील बापू कुटीमध्ये जाताना माझ्या मनात जशा भावना उमटल्या होत्या, तसाच अनुभव देवडुंगरीमध्ये पहिल्यांदा जाताना मला आला!

आपल्याला प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळत नाही, तोपर्यंत बहुतेक स्थळं आपल्यासाठी केवळ नावापुरती अस्तित्वात असतात. भीम व देवडुंगरी यांच्याबाबतीत माझी हीच स्थिती होती. पण एकदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये- १ मे रोजी सूर्य आकाशात तळपत असताना मी जीपने तिथे गेलो. सूर्य अरवली डोंगरांवर आग ओकत होता आणि खाणकामामुळे जमीन विद्रूप झाली होती. जीपच्या काचांवरून सूर्यकिरणं प्रतिबिंबित होत असल्यामुळे डोळे चरचरायला लागले. पण बाहेर लोक भर उन्हात काम करतच होते- घरबांधणी, खाणकाम आणि माती व दगड काढणं, अशी कामं सुरू होती.

त्या रात्री आम्ही भीमहून देवडुंगरीला आलो. पोळी-भाजी खाल्ली. अरुणाने चुलीवर पोळ्या केल्या. बाहेर सारवलेल्या ओटीवर आम्ही झोपलो. दुसर्‍या दिवशी सकाळी उठलो, तेव्हा गुलमोहर आणि बोगनवेल झाडांच्या मधून सूर्य उगवताना दिसला... देवडुंगरी- गुर्जरांचं दैवत असलेले देवनारायणजी यांच्या मंदिरामुळे या ठिकाणाच्या नावात ‘देव’ शब्द आला आणि डोंगरांच्या अस्तित्वामुळे ‘डुंगरी’ ही जोड मिळाली. घरांप्रमाणे मंदिराचं बांधकामही मातीचं होतं आणि जमीन व भिंती नीट सारवलेल्या होत्या. या घराशेजारीच खोपट्यात अंघोळीची सोय होती आणि सांडपाणी बांबूच्या वनात सोडलं जात होतं... परसदारात संडास होता- तीही मातीची झोपडीच होती... स्वच्छ, नेटकी व दुर्गंधी नसलेली... फाइव्ह स्टार हॉटेलांपेक्षाही इथल्या सोई चांगल्या होत्या!

आमचा मित्रपरिवार या सगळ्याबद्दल साशंक होता.

त्यांना हा खटाटोप स्वप्नाळू वृत्तीचा भासत होता. शेळीला घराच्याच आवारात ठेवून भरपूर खाऊ-पिऊ घातल्यावर ती देशी प्रजातीच्या शेळ्यांहून अधिक दूध देत होती, हा घटकही त्या स्वप्नवत् चित्रामध्ये भर टाकत होता! साधं राहणीमान, शेळी- हे सगळं आदर्श ग्रामजीवनाचा भ्रम अनुभवण्यासाठी सुरू आहे, अशी त्यांची धारणा झाली होती. त्यांच्या सुरुवातीच्या प्रतिक्रियांमधून हा शंकासूर डोकावतही होता- ‘तुम्ही पुन्हा आपल्या सभ्य संस्कृतीमध्ये माघारी आलात, तर त्याचं काही आम्हाला आश्‍चर्य वाटणार नाही!’

या सगळ्या प्रयोगातून काही निष्पन्न होईल की नाही, याबद्दल सुरुवातीला काही कल्पनाही नव्हती. त्या दिवसांची आठवण शंकर सांगतात :

देवडुंगरी हे लहानसं खेडं आहे, जेमतेम १५ ते २० उंबर्‍यांची तिथली वस्ती. त्यातच स्वयंपाकघर असलेलं एक लहानसं मातीचं घर आम्हाला राहाण्यासाठी मिळालं... या घरामध्ये काही दुरुस्ती करण्यात व अदलाबदल करण्यात आमचे पहिले काही दिवस गेले. अरुणा, निखिल, अंशी आणि मी १९८७ पासून तिथे राहायला लागलो. कामाची सुरुवात कशी करायची याची काहीच कल्पना आम्हाला नव्हती. पण काय करायचं नाही, हे मात्र आम्हाला माहीत होतं. निधीपुरवठा लागेल असे प्रकल्प उभारायचा किंवा संस्था चालवायचा प्रयत्न आम्ही करणार नव्हतो.

जयपूरस्थित विकास अध्ययन संस्थेच्या देखरेखीखाली आम्ही किमान वेतनाविषयी अभ्यास करत होतो. आणि त्यातून आम्हाला स्वतःच्या उपजीविकेसाठी गरजेइतकं किमान वेतन मिळत होतं. हा अभ्यास करत असतानाच आम्ही जवळपासच्या गावांमध्ये जाऊन छोट्या-छोट्या बैठका घ्यायला सुरुवात केली. आम्ही व्यक्तिगत पातळीवरही लोकांशी संवाद साधला.

लोकांसोबत एका समुदायात राहणं आणि त्यांच्या दैनंदिन जगण्यामध्ये सहभागी होणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे साध्या, नेहमीच्या कृतीतून सातत्याने प्रश्‍न उपस्थित करण्याची संधी आम्हाला मिळाली.

या सततच्या संवादातून प्रचलित मूल्यांना आव्हान दिलं गेलं आणि त्यांमध्ये बदलही घडत गेला. सुरुवातीला त्यांनी लिंगभावावर आधारित भूमिकांसंबंधी वाद उपस्थित केले, चर्चा घडवल्या. पुरुषांनी डोक्यावरून पाणी वाहून आणणं, सार्वजनिक ठिकाणी भांडी धुणं, अस्पृश्यता, एकाच भांड्यातून पाणी पिणं, एकाच विहिरीतून पाणी घेणं, स्वच्छता व आरोग्याचे मुद्दे, सामाजिक संवादप्रक्रियांचे नियम, आदर दाखवणं व समारंभातील विधी यांमधील भेद- हे सगळे विषय वादचर्चेसाठी घेतले गेले आणि काही वेळा त्यासंबंधी असहमतीही दिसून आली. एकाच पातळीवर बसणं, किंवा पाहुणे म्हणून आलेल्या सर्व वर्गांतील लोकांना सारखंच अन्न वाढणं- यांसारख्या मुद्यांवर काही जण चिडले, काहींनी टीका केली, तर काहींना याचा अचंबा वाटला. नव्याने गावात दाखल झालेल्या या मंडळींनी हे नियम धुडकावले आणि समता व मानवता यांना अग्रक्रम दिला. त्यामुळे त्यांना क्वचित प्रसंगी संभाव्य हिंसक परिस्थितीला तोंड द्यावं लागलं आणि त्यावर तोडगा काढावा लागला.

रोजच्या जगण्यातील संघर्ष हाताळत असताना लोकांना विचार व कृती यांमधील तफावत भरून काढायला मदत होते. आपण काय केलं किंवा काय केलं नाही, याची दैनंदिन पातळीवर चिकित्सा करणं महत्त्वाचं ठरतं.

लोकांना जाणून घेताना...

वरकरणी सुस्थितीतील भारतीय व्यक्ती अशा विपरीत परिस्थितीमध्ये राहण्याची जोखीम पत्करत असतील, तर त्यांचा हेतू शोषण करण्याचाच असतो; याशिवाय वेगळा काही उद्देश त्यांच्या कृतीमागे असू शकेल, याची कल्पनाही ग्रामीण भारतामध्ये करता येत नाही. शहरातील भौतिक सुख सोडून कष्टप्रद (संडास, कायमचा पाणीपुरवठा वा वीज यांचा अभाव असलेल्या) परिस्थितीत राहायला जाण्याचा निर्णय सहज-सोपा नव्हता. आम्ही देवडुंगरीला आल्यावर वर्षभरानंतर संडास बांधला गेला. आमचे मित्र अनिल बोर्डिया यांनी दिलेल्या देणगीतून हे बांधकाम झालं. लोकांना जे समोर दिसत होतं, त्यावरून त्यांनी सुरुवातीला प्रश्‍न विचारले : ‘हे लोक खाणकाम सुरू करायला आलेत, की मजूर जमवायला आलेले कंत्राटदार आहेत?’ प्रतिष्ठितपणाचा शिक्का घेऊन न आलेल्या लोकांवर कोणी विश्वास का ठेवावा? त्यामुळे प्रत्येकाने आपापलं डोकं लढवलं.

गावात फारसं काही लपवता येत नाही. भारतीय गावं एका खुल्या चौकटीमध्ये राहतात. रात्र सोडता बाकीचा वेळ घराची दारं उघडीच ठेवली जातात आणि कोणाला आत प्रवेश नाकारला, तर संशय घेतला जातो. घरातली मंडळी काही तरी लपवू पाहतायत, असाही अर्थ त्यातून काढला जाण्याची शक्यता असते. त्यातून कुतूहलाची पातळी वाढत जाते आणि शेवटी फाजील चौकसपणा दाखवला जातो.

त्यामुळे आम्ही थोडं सामान घरात नेलं, तेव्हा त्याकडे शेजार-पाजारच्यांचं काटेकोर लक्ष होतं. बरेच अंदाज बांधले गेले. श्रीमंत वर्गाशी संबंध दाखवणारं कोणतंही खास फर्निचर आमच्या सामानात नव्हतं. दोन लोखंडी पलंग आणले होते, त्यांचे पाय अतिशय छोटे होते. हे विचित्र पलंग बघायला अनेक लोक येऊन गेले. गावात नव्यानं आलेली मंडळी कशी राहातायंत, हे बघायला काही जण घरी फेरफटका मारून गेले. लोकांनी विविध गोष्टी गृहित धरलेल्या होत्या. पण बहुतेकसे लोक कुतूहल म्हणून आले. अनेक लोक कामाची संधी शोधण्यासाठीही भेटून गेले. आपण सैन्यातील जवान आहोत, अशी घोषणा करत दुर्ग सिंग आले. या गरीब-बिचार्‍या, भरकटलेल्या मानवांकडे त्यांनी तुच्छ कटाक्षही टाकला.

निखिल, अरुणा, शंकर व अंशी यांनी सगळी कामं स्वतः केली. विहिरीतून पाणी आणण्यापासून ते जेवण शिजवणं आणि घर झाडणं... सगळंच काम त्यांनी आपापसात वाटून घेतलं. दुधाची वानवा होती, त्यामुळे एक शेळी आणली. पण प्राण्यांचं लहान मुलांसारखंच असतं. आई होऊन त्यांचा सांभाळ करावा लागतो, त्यामुळे एक व्यक्ती कायम घरात असणं गरजेचं बनलं. नागोदाजी यांच्या विहिरीतून पाणी आणलं जात असे. सर्व जण याच विहिरीतून पाणी घेऊन जात, पण दलितांनी आपल्या मडक्याला हात लावलेला मात्र कोणाला चालत नसे. हा पारंपरिक ढोंगीपणा तिथे प्रचलित होता. शंकर यांच्या मुलीने स्वतःचं पाण्याने भरलेलं मडकं उचलण्यासाठी नागोदाजीकडे मदत मागितली, तेव्हा सगळ्यांनी विरोधाचा जोरदार आवाज उठवला. सगळं गाव आमच्या घरापाशी जमलं आणि घरातल्यांना जोरदार शिव्या घातल्या. शेवटी अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिल्यावर गर्दी पांगली.

पण सगळेच विरोध करत होते, असंही नाही. अनेक जण मोकळेपणाने भेटायला आले. अनेकांनी आमच्याशी चांगली मैत्रीही केली. समता व भेदभाव या तत्त्वांच्या बाबतीत कोणतीही तडजोड शक्य नव्हती, पण त्या व्यतिरिक्त मात्र कोणत्याही मुद्यावर मतभेद मांडून वादविवाद करण्याला पूर्ण मोकळीक होती. सावकाराकडून पैसे उधार घेण्याची पद्धत, अंत्यसंस्काराशी निगडित विधींमुळे गरिबांना करावा लागणारा अवाजवी खर्च व अखेरीस त्यांच्यावर वाढणारा कर्जाचा बोजा, जातीशी निगडित निषिद्ध गोष्टी व अर्थातच लिंगभावात्मक पूर्वग्रह, खाली-वर बसण्याशी संबंधित श्रेणीव्यवस्था, स्त्रियांसाठीची घुंगट प्रथा आणि इतर अनेक सामाजिक व राजकीय प्रश्‍नांवर चर्चा होऊ लागल्या. बदलाची कक्षा हळूहळू निश्‍चित होऊ लागली.

.............................................................................................................................................

‘कहाणी माहिती अधिकाराची’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5167/Kahani-Mahiti-Adhikarachi

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......