अजूनकाही
पत्थरांचा मारा सनातन
पाप्यांची नजर विखारी
बडव्यांचा बाजार सभोती
कालवरीच्या जखमा जिव्हारी
परी सुवार्तेची वेळ समिप
होता ख्रिस्त मनात माझ्या...
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची उस्मानाबादला होणाऱ्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली अन् सनातन पत्थरांचा मारा सुरू झाला. फ्रान्सिस दिब्रिटो फादर आहेत. धर्मगुरू आहेत. त्याहीपेक्षा ते ख्रिश्चन आहेत. पत्थरांचा मारा त्यासाठी आहे. दिब्रिटोंची ज्यांनी निवड केली, त्यात एकही ख्रिश्चन नव्हता. यु. म. पठाणांची निवड झाली, तेव्हा मतदार होते काही, पण साहित्य महामंडळावर एकही मुसलमान नव्हता. शंकरराव खरात अन् दया पवारांची निवड झाली तेव्हा एकही बौद्ध नव्हता. आताच्या निवड समितीवर एकही दिब्रिटोंच्या उपासना धर्माचा नव्हता. पण निवड समितीवरच्या प्रत्येक सदस्याचा समाजधर्म आणि साहित्यधर्म समान होता. त्यांची मातृभाषाही अर्थात समान होती, जशी ती वसईच्या फ्रान्सिस दिब्रिटोंची आहे. पण समानतेचा हा धागाच ज्यांना मान्य नाही, त्यांनी धमक्यांचे दगड कौतिकराव ठाले पाटील आणि श्रीपाद जोशींच्या शिरावर मारले.
जैसी पुष्पांमाजी पुष्पा मोगरी
की परिमळांमाजी कस्तुरी
तैसी भाषामांजी, साजिरी मराठिया
असं मराठीचं रसाळ वर्णन करणाऱ्या फादर स्टिफन्स यांची मातृभाषा मराठी नव्हती. १५५९ इंग्लंडमधून आले होते फादर स्टिफन्स भारतात. मराठी शिकले. ख्रिस्तपुराण लिहिलं. त्यात केलेलं मराठीचं वर्णन संत ज्ञानेश्वरांशी नातं सांगतं. फादर दिब्रिटो यांची मातृभाषा मराठी आहे. त्यांच्या एकट्याचीच नाही. मुंबईत, कोकणात अन् वसईत राहणाऱ्या तमाम कॅथलिकांची मातृभाषा मराठीच आहे. ते मराठीत बोलतात. मराठीत विचार करतात. मराठी शाळा चालवतात. मराठीत शिकतात. मुंबईतील शाळांमध्ये वसईकर ख्रिस्ती शिक्षक मराठीत शिकवतात. कार्डिनल सायमन पिमेंटा यांनी ही मराठी जपली आणि वाढवली.
त्यांचा उपासना धर्म ख्रिस्ती असेल, पण त्यांची समाज भाषा मराठी आहे. रेव्हरंड नारायण वामन टिळकांच्या वाटेनं गेलेल्या कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, चंद्रपूर अशा महाराष्ट्रातल्या कैक जिल्ह्यातील प्रोटेस्टंट ख्रिस्तीधर्मीय भूमिपुत्रांची मातृभाषा मराठीच आहे. मराठीचे पहिले कादंबरीकार बाबा पदमनजी धर्माने ख्रिस्तीच होते. लोकमान्य टिळकांचे अनुयायी थोर स्वातंत्र्य सैनिक बॅ. काका बाप्टिस्टा यांची मातृभाषा मराठीच होती. दोघांच्याही कबरी शिवडीच्या ख्रिस्ती स्मशानभूमीत आहेत. तिथल्या कबरींवरची प्रार्थना मराठीत आहे.
शांती आणि समतेच्या शोधात उपासनेचा धर्म बदलणाऱ्या या मराठीच्या पुत्रांनी आपली मायबोली आणि समाज भाषा बदलली नाही. कारण त्या मराठीचा वारसा ज्ञानेश्वर, तुकारामांचा आहे. करुणा आणि शांतीच्या शोधात त्यांना ख्रिस्त जवळचा वाटला. कौतिकराव पाटील आणि श्रीपाद जोशींवर सनातन पत्थरांचा मारा करणाऱ्यांचा धर्म त्यांना जवळचा वाटला नाही. म्हणून तर त्यांनी धर्मांतर केलं. पण ज्ञानोबा, तुकोबांची मायबोली तीच करुणा आणि शांतीची उब देते म्हणून ती भाषा त्यांनी सोडली नाही. फादर दिब्रिटोंनी ‘सुबोध बायबल’ लिहिलं म्हणून आक्षेप आहे. फादर दिब्रिटो त्यांना धर्मप्रचारक वाटतात. पाणी शिंपडून धर्मांतर करणारे वाटतात. फादर दिब्रिटोंनी कोणाचं धर्मांतर केलं असतं तर बातमी आजवर लपून राहिली नसती. मराठीत ‘भावार्थ दिपिका’ आणि ‘गीतारहस्य’ यांचं जितकं महत्त्व आहे, तितकंच दिब्रिटोंच्या ‘सुबोध बायबल’चं आहे. तो काही धार्मिक ग्रंथ नाही. ती रसाळ, सुंदर साहित्य कृती आहे. मानवाच्या महान पुत्राची गाथा सांगताना मराठीचा जिव्हाळा आणि कळवळा ‘सुबोध बायबल’मध्ये पानोपानी जाणवतो. पानोपानी तुकाराम अणि ज्ञानेश्वरांचा अभंग हटकून येतो. जेरूसलेमचे राजे डेव्हिड आणि देहूचे तुकाराम बुवा यांची ईश्वरपरायण मनं जुळणारी आहेत.
फादर दिब्रिटो सांगतात -
हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी
लुलपते तसा हे देवा
माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे
- राजे डेव्हिड
कन्या सासूराशी जाये
मागे परतूनी पाहे
तैसे झाले माझे जीवा
केव्हा भेटसी केशवा
- संत तुकाराम
महाराष्ट्रात मराठीची गोची झाली आहे. तशी अन्य राज्यात तिथल्या भाषांची नाही. इथे मराठी म्हणजे हिंदू अशी ओळख बनली आहे. ‘वसईकर परेरा, डाबरे, दिब्रिटो ख्रिश्चन असूनही मराठी चांगलं बोलतात.’, ‘शफाअत खान, अब्दुल कादर मुकादम मुसलमान असूनही किती सुंदर मराठी लिहतात.’, असं आपण सहजपणे बोलतो. मनाला वेदना होतात तेव्हा. यात कौतुकापेक्षा मराठी असणं म्हणजे धर्मभेद बाळगणं असं अंतर पडलेलं असतं. अरे, त्यांचीही मातृभाषा मराठीच आहे. जशी ब्राह्मण, मराठा, साळी कोळी यांची भाषा मराठी आहे. विदर्भातले आदिवासी पूर्ण महाराष्ट्रीय असले तरी त्यांची मातृभाषा मराठी नाही. ती असते गोंडी, माडिया, कोरकू.
वसंतराव नाईक, सुधाकर नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांची मातृभाषा गोरमाटी (बंजारा). गुजरात, केरळ, तामिळनाडू इथे असा भेद नाही. तिथे भाषेला धर्म चिकटलेला नाही. केरळी ख्रिश्चन, हिंदू आणि मुसलमान यांची मल्यालमच असते. तीच गोष्ट तामिळींची. गोव्यातले हिंदू आणि ख्रिश्चन कोकणीच बोलतात. गुजरातमधले मुसलमान भाषेने गुजराती असतात.
दिब्रिटोंचं ललितलेखन विपुल आहे, तितकंच वैचारिक लिखाण. पर्यावरणाच्या त्यांच्या लढाईत त्यांनी जे जे लिहिलं त्यात धर्माचा संबंध येतो कुठे? ते माणसांसाठी लिहितात आणि आपला समाजधर्म माणुसकी आहे हेच सांगतात. मी अस्सल भारतीय आहे, हे त्यांना सांगायला लागावं? आपल्या समाजातल्या नतद्रष्ट्यांनी त्यांचा खुलासा मागावा यासारखं दुःख काय आहे? धर्माव्यतिरिक्त त्यांनी खूप काही लिहिलं आहे. पण त्यांनी नुसतं ‘सुबोध बायबल’ लिहिलं, तरीही ती मराठीची फार मोठी सेवा ठरते. जगभर बायबलच्या रोज हजारो प्रती विकल्या जातात. म. गांधी, लिओ टॉलस्टॉय, पंडिता रमाबाई, आचार्य विनोबा भावे, महात्मा फुले अशा महामानवांनी या ग्रंथातून प्रेरणा घेतली. त्या बायबयलचा परिचय करून देणं म्हणजे धर्मप्रचार नाही.
दिब्रिटोंचा तो ग्रंथ म्हणजे केवळ अनुवाद नाही. ललितरम्य शैलीतला भावानुवाद तर तो आहेच, पण मानवाच्या इतिहासावर प्रभाव टाकणाऱ्या धर्मग्रंथाचा आणि परंपरेचा शोध घेणारा संशोधनपर ग्रंथ आहे. तो सांस्कृतिक सेतू आहे.
फादर दिब्रिटो लिहितात, ‘येशूसाठी मुक्ती केवळ आध्यात्मिक जीवनापुरती मर्यादित नव्हती. तर तिचा ऐहिक जीवनाशी अनन्य संबंध होता. माणूस केवळ आत्मा नाही. त्याला देहही आहे. म्हणजे तो देहात्मा आहे. म्हणूनच मुक्ती म्हणजे माणसाचे सर्वंकष कल्याण साधणे होय. हा विचार या शुभवर्तमानातून आलेला आहे.’ तिसरं शुभवर्तमान सांगताना संत लुकने येशूची प्रतिमा रंगवली आहे, ‘गोरगरीब, वंचित, पीडित, स्त्री, मुले, विधवा, परित्यक्त्या यांचा मित्र.’
फ्रान्सिस दिब्रिटो साहित्यिक म्हणून मोठे आहेतच. पण त्यापेक्षा माणूस म्हणून मोठे आहेत. संत लुक यांनी लिहिलेली तिसऱ्या शुभवर्तमानातली ख्रिस्ताची ती पायवाट दिब्रिटोंनी कधीच सोडली नाही. ख्रिस्त निर्भयपणे क्रुसावर गेला.
‘हरीत वसई’चा लढा उभारताना तीच निर्भयता दिब्रिटोंनी महाराष्ट्राला शिकवली. डेव्हिड-गोलिएथच्या कथेसारखी. गांधींच्या सत्याग्रहासारखी. खुद्द दिब्रिटोंनीच गांधींच्या सत्याग्रहाचं नातं डेव्हिड-गोलिएथच्या कथेशी जोडलंय. डेव्हिडने गावकऱ्यांना निर्भय बनवलं होतं. भारतीयांना गांधींनी. वसईतल्या दिब्रिटोंनी वर्तमानाला.
ते निर्भय फादर दिब्रिटो मी पाहिले आहेत. अनुभवले आहेत. अफवांचं विष कालवलेल्या विहिरीत उतरलो आहे. तळ गाठलेल्या त्या निर्मळ पाण्यात सौहार्द आणि सलोख्याचे मासे मुक्त विहरताना पाहिले आहेत. फादर दिब्रिटोंच्या ओंजळीने त्या विहिरीतलं पाणी मी प्यायलो आहे.
९३व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर दिब्रिटोंची निवड होणं, ही अवघ्या मराठीसाठी सुवार्ता ठरावी.
परी सुवार्तेची वेळ समिप
होता ख्रिस्त मनात माझ्या...
हा ख्रिस्त कोणी देवाचा पुत्र नाही. ख्रिस्ती धर्माचा प्रेषित नाही. हा ख्रिस्त सनातन वेदनेवर फुंकर घालणारा मानवाचा महापुत्र आहे. माणुसकीच्या चिरंतन प्रवाहातून वाहणारी करुणा आहे. झाकोळलेल्या अलम मराठी दुनियेसाठी, द्वेष अन् भेदाच्या जखमांनी विव्हळणाऱ्या भारतासाठी साहित्य संमेलनाची ही घटना सुवार्ता ठरावी. ख्रिस्त अन् ज्ञानेशाच्या करुणेसारखी.
.............................................................................................................................................
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मचरित्राच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4945/Nahi-Mi-Ekla
.............................................................................................................................................
लेखक कपिल पाटील शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment