अजूनकाही
उस्मानाबादच्या ९३व्या नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ख्रिस्ती धर्मगुरूपणाचा मुद्दा आता मागे पडला आणि साऱ्या साहित्य-वारकऱ्यांचे औत्सुक्य जागे झाले आहे. चला, या निमित्ताने ‘धर्माचे साहित्य’ बाजूला पडून ‘साहित्याच्या धर्मात’ डुंबण्यासाठी साहित्य पंढरी सज्ज झाली आहे.
सहजच विचार मनी आला. अशी संमेलने सोळाव्या-सतराव्या शतकात सुरू असती तर समुचे संतमंडळ ओळीने एकानंतर एक अध्यक्ष झाले असते! सर्वांची पाळी संपल्यानंतर तो मान कुणाला मिळाला असता? अर्थात नामदेवांना! मात्र नामदेवांनी ही माळ स्वत:च्या गळ्यात घालण्याऐवजी ‘पहिले आप’ म्हणत फादर थॉमस स्टीफन्स यांच्या गळ्यात घातली असती!
होय, एव्हाना संत नामदेवांनी फादरांचे मराठीविषयक गौरवगीत
जैसी हरळामाजी रत्नकीळा
कि रत्नामाजि चोखळा
तैसी भासांमाजि हिरा निळा
भासा मराठी
ऐकले-वाचलेले असणार! नाहीतर नामदेवांचे उत्तर भारतात पंजाबला जाणे, तिथे अध्यात्मपंथियात लोकप्रिय होणे आणि त्यांची अभंगरचना ‘गुरू ग्रंथसाहिब’सारख्या शीख धर्माच्या धर्मग्रंथात समाविष्ट होणे, असे व्यापकत्व त्यांच्या वाट्याला येणे, घडले नसते! ते समाजसुधारणा आणि समाजप्रबोधन यांच्याबाबतीत अत्यंत जागरूक होते, हे यावरून दिसून येते.
चार शतकानंतर संमेलनाध्यक्ष एका धर्माचा धर्मगुरू आहे, यावरून वाद होणे, हे दुर्दैवी आहे!
तसेही ख्रिस्ती मराठी वाङमयाला धर्मप्रचाराचे वाङ्मय आणि ‘बायबल’ची मराठी भाषा, याला वाङमयेतिहासकार आणि समीक्षकांनी हिणवून त्याची संभावना केली आहे. भारतात येऊन मोठ्या परिश्रमाने मराठी भाषा आत्मसात करून साहित्यनिर्मिती करणाऱ्या मिशनऱ्यांना कधीच मानाने वागवले नाही. अन्यथा ‘ख्रिस्तपुराण’कार फादर थॉमस स्टीफन्स, कोकणी भाषेचे कोशकार फादर टिबैरू, ‘सेंट पीटरचे पुराण’कार फादर क्रुवा, मराठीतील पहिला संतचरित्रकार पाद्री सालंदाज, ‘वनवाळ्याचा मळा’ या ग्रंथराजचा कर्ता फादर मिगेल, ‘सर्वेश्वराचा भक्त’ या ग्रंथाचा लेखक फादर गॉमिश, ‘क्रिस्ताचे यातनागीत’कार भारतीय पाद्री मानुएल ज्याकिस यांच्या साहित्याकडे अक्षम्य दुर्लक्ष्य केले गेले नसते! अर्थात हे सर्व साहित्य कोकणी भाषेत होते म्हणून काय झाले? कोकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळण्यापूर्वी ती मराठीचीच एक बोली म्हणून मानली जात होती ना?
वरील सर्व मराठी साहित्य प्राचीन साहित्य असे गणले जाते. आज आहे का एखाद्या मराठीच्या वाङमयेतिहासात यांचा समावेश किंवा उल्लेख? ख्रिस्ती मराठी साहित्याला मराठीने ‘अस्पृश्य’ म्हणूनच वागवले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर फादर दिब्रिटो यांच्या संमेलनाध्यक्षपदावरील आक्षेप काही फार वेगळा मानला जात नाही, हेच खरे. पण आता काळ बदलला आहे, विचार व्यापक झाले आहेत, आता ख्रिस्त धर्मगुरूच्या नावाला विरोध करणे शोभत नाही.
विरोध करणाऱ्यांपैकी कुणीतरी त्यांची विचारसरणी विचारात घेतली आहे काय? नाही ना? मग त्यांच्या धर्मगुरूपदाच्या नऊ वर्षांच्या प्रशिक्षणात त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्मशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला, हे सांगितल्यास नवल वाटावे!
फादर दिब्रिटो यांनी तरुण वयापासूनच लेखन सुरू केले. आज त्यांच्या ग्रंथसंपदेत ‘बायबल’विषयक पुस्तकांव्यतिरिक्त ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’, ‘ओअॅसिसच्या शोधात’, ही दोन प्रवासवर्णने; ‘तेजाची पाऊले’, ‘सृजनाचा मोहोर’ हे ललितलेखसंग्रह; ‘‘बायबल’चे सुबोध भाषांतर’ हे समस्त मराठी लोकांसाठी पाद्री मराठीतून सुबोध मराठीत आणून दिलेले ज्ञान-वाङ्मयभांडार आहे, हे विसरून कसे चालेल?
एकदा शिक्षणतज्ज्ञ चित्रा नाईक यांनी फादर दिब्रिटो यांनी लिहिलेल्या ‘बायबल’च्या कथा एका दैनिकाच्या सदरात वाचल्या. त्या त्यांना आवडल्या. त्यांनी दिब्रिटोंना पत्र लिहून कळवले की, तुम्ही अशा भाषेत लिहिणार असाल तर आम्हा गैरख्रिश्चनांना त्या कथा वाचायला आवडतील. हीच ती ‘सुबोध बायबल’च्या निर्मितीमागील प्रेरणा! झाले, फादर दिब्रिटो यांनी दहा वर्षांहून अधिक काळ यासाठी देऊन ‘सुबोध बायबल’ तयार केले. ते राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले. एकाच वर्षात या भाषांतराच्या दोन आवृत्त्या संपल्या. या ग्रंथाला २०१३सालच्या अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे!
फादर दिब्रिटो यांनी १९९२मध्ये १० ते १२ जानेवारी दरम्यान पुणे येथे भरलेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून व्यक्त केलेले विचारही समजून घेणे, या निमित्ताने अगत्याचे ठरते. ते म्हणाले होते –
‘साहित्यातील किंवा संमेलनातील मुख्य प्रवाह किंवा दुय्यम प्रवाह हे कुणी ठरवले? असे दोन प्रवाह असतात असे सांगणाऱ्या उच्चवर्णीय लोकांनी प्रामुख्याने मराठीची प्रकृती बिघडवली आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘ख्रिस्ती समाज राष्ट्रीय किंवा मुख्य प्रवाहात कधीचाच समरस झालेला आहे. असे नसते तर, बिशप थॉमस डाबरे यांनी संत तुकारामांवर, फादर फेलिक्स मचाडो यांनी ज्ञानेश्वरांवर, फादर ख्रिस्तोफर शेळके यांनी रामदासांवर, फादर फ्रान्सिस डिसा यांनी उत्तरमीमांसेवर पीएच.डी. केली नसती. म्हणूनच एका गटाने निर्माण केलेले साहित्य किंवा साहित्यसमीक्षा ही सर्वांनीच स्वीकारली पाहिजे, हा दुराग्रह आहे. एकमेकांच्या धर्मातील व्यंगे शोधून, त्याचे भांडवल करण्याच्या संघर्षाचा काळ समाप्त झाला आहे. सहकार्याच्या आणि सुसंवादाच्या नव्या युगाची पहाट झाली आहे.’ असे म्हणून त्यांनी आपले वेगळे साहित्य (किंवा इतरांच्या दृष्टीने धर्मप्रचार साहित्य) मानणाऱ्या संकुचित विचारसरणीच्या साहित्यिकांना चांगलेच खडसावले. ते म्हणाले, ‘एकमेकांच्या श्रद्धांचा, श्रद्धास्थानांचा केवळ आदर राखणे पुरेसे नाही, सामंजस्य वाढवण्यासाठी त्यांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. ख्रिस्ती प्रशिक्षण केंद्रातून असे प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.’ हा त्यांनी एकप्रकारे वर्तुळात राहण्यात धन्यता मानणाऱ्या मराठी ख्रिस्ती साहित्यिकांना घरचा आहेर दिला.
येशू ख्रिस्त, त्याची शिकवण किंवा विचारसरणी यांच्यावर एकट्या ख्रिश्चनांची मिरासदारी नाही, हे सांगताना ते म्हणाले, ‘करुणा, शेजारप्रीती, क्षमाशीलता ही ख्रिस्ती धर्माने मानलेली उच्च मूल्ये आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांच्या अनेक कादंबऱ्यांत ‘बायबल’मधील ही मूल्ये सहजपणे झिरपलेली जाणवतात. त्यांच्या कथांतून ‘बायबल’प्रणीत मूल्यांचे सहजगत्या दर्शन होते. जगातील प्रतिभावंत, लेखक, कवी आणि कलाकार यांच्या सर्जनशीलतेला अखंड आवाहन करणारा ‘बायबल’चा हा ग्रंथ मराठी भाषेत आपल्याकडे उपलब्ध आहे. ख्रिस्ताच्या उत्तुंग मनाचा वेध घेताना साहित्यिकांच्या लेखण्या थिट्या पडल्या, तरीदेखील गेली दोन हजार वर्षं हा महामानव शेकडो कवी-लेखकांच्या ध्यानचिंतनाचा विषय झालेला आहे. मराठी लेखकांनी ‘बायबल’मधील साहित्यरत्ने शोधून काढली तर महाराष्ट्र सारस्वताचे एक अंग संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही.’
असे साक्षेपी त्यांचे भाषण होते!
मायमराठीची मनोभावे सेवा करणाऱ्या वरील शिलेदारांव्यतिरिक्त अजून काही नावांचा उल्लेख करणे अगत्याचे ठरते. संदीप हळदणकर (तुकाराम व फ्रान्सिस आसिसीकर), फादर मॅथ्यू लेदर्ले (मराठी संत परंपरा), फादर डलरी (पंढरीचा विठोबा), कामिल बुल्के (रामायण, महाभारत), डॉ. सुभाष पाटील (तुकाराम व रेव्ह. टिळक), यांसारख्या अनेक साहित्य-संशोधकांची भर सातत्याने पडत आहे.
फादर दिब्रिटो एक ख्रिस्ती धर्मगुरू असूनही ते देवळाबाहेर देवाचे अस्तित्व शोधणारे शोधक आहेत. त्यांना लोकांत देव दिसतो आणि ते आपल्या लेखणीचा त्यासाठी वापर करतात. वसईहून प्रकाशित होणाऱ्या ‘सुवार्ता’ या मासिकाचे संपादक असताना त्यांनी त्यात अनेक प्रयोग केले. कारण प्रस्तुत नियतकालिक एक धार्मिक मासिक म्हणून त्यांच्या हातात पडले नाही. त्यांनी एक खिडकी उघडून मराठी साहित्यिकांना त्यात लिहिते केले. लोकही त्यात लिहीत राहिले. परिणामी ते अध्यात्माबाहेर व्यापक नजरेने पाहणारे म्हणून मराठीविश्वात प्रसिद्ध झाले. आजही महाराष्ट्राच्या शेकडो वाचनालयात ‘सुवार्ता’ वाचायला मिळते. त्याचे श्रेय केवळ दिब्रिटोंना जाते.
लिओ टॉलस्टॉय धर्मगुरू नसले तरी अस्सल निष्ठावंत ख्रिश्चन होते. त्यांनी केवळ दोनच मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या, मात्र त्यांच्या कादंबरिका आणि कथांची संख्या पुष्कळ आहे. त्यांनी १८६० साली लिहिलेली ‘वॉर अँड पीस’ ही सर्वश्रेष्ठ कादंबरी म्हणून ओळखली जाते.
त्याच्या देव, धर्म, नीतीमत्ता यांसारख्या तत्त्वज्ञानावरील साहित्यामुळे ते जगविख्यात झाले आहेत.
उस्मानाबाद येथील ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो लिओ टॉलस्टॉय परंपरेचे पाईक आहेत. असा हा मराठी पुत्र संमेलनाध्यक्ष झाला, याचा अभिमान वाटावा, एवढी ही गौरवाची गोष्ट आहे!
.............................................................................................................................................
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मचरित्राच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4945/Nahi-Mi-Ekla
............................................................................................................................................................
लेखक सुभाष पाटील हे नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयाचे माजी मराठी विभाग प्रमुख आहेत. तसेच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत.
Patilsubhash662@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Fri , 10 January 2020
सुभाष पाटील,
तुमचं हे विधान पटलं नाही :
दिब्रिटोंच्या येशुभक्तीवर आक्षेप नाहीये. त्यांच्या धर्मगुरू असण्यावरही नाहीये. आक्षेप आहे तो त्यांनी केलेल्या पोपच्या चमचेगिरीवर. एकीकडे पोपची चमचेगिरी करायची आणि दुसरीकडे गप्पा हाणायच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या आणि सांस्कृतिक सेतू बांधायच्या.
आम्हांस ढोंगं कळतात.
आपला नम्र,
-गामा पैलवान