अजूनकाही
मराठी चित्रपटसृष्टीत राजकारण हा विषय केंद्रस्थानी असणारे, राजकीय आशय असलेले चित्रपट तसे अगदीच क्वचित दिसतात. त्यातही पुन्हा ते दिसले तरी अशा चित्रपटांचं तितक्या प्रभावीरीत्या हाताळलं जाणंदेखील महत्त्वाचं असतं. दिग्दर्शक समीर विद्वांस आणि लेखक क्षितीज पटवर्धन या दोघांनी स्वतंत्रपणे आणि एकत्र येऊन अशा दोन्ही प्रकारे केलेल्या विविध प्रकल्पांपैकी बहुतांशी प्रकल्प हे मराठी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहेत. हे महत्त्वाचं असणं अनेक अर्थांनी लागू पडतं. म्हणजे त्या कलाकृती मांडणी आणि आशय अशा दोन्ही पातळ्यांवर प्रगल्भ आणि प्रभावी असणं हे एक झालं, पण सातत्याने चांगल्या नि दखलपात्र कलाकृती निर्माण करत राहणं हे आणखी एक. ‘धुरळा’ पूर्वी हे दोघे एकत्र आले तेव्हा त्यांनी ‘टाइम प्लीज’ (२०१३), ‘वायझेड’ (२०१५), ‘डबल सीट’ (२०१६) यांसारख्या कलाकृती दिल्या. यातील बहुतांशी सर्वच कलाकृती या समकालीन प्रेक्षकांना समोर ठेवून तर बनवल्या गेल्या होत्याच, पण सोबतच या कलाकृती दृकश्राव्य आणि आशयात्मक पातळीवर प्रभावी होत्या. ‘धुरळा’च्या निमित्ताने हे दोघे आणखी एक महत्त्वाचा चित्रपट समोर आणतात.
आंबेगाव बुद्रुकमध्ये निवृत्ती उभे या सरपंचाच्या निधनानंतर निवडणूक होणार असते. नवनाथ ‘दादा’ उभे (अंकुश चौधरी) या त्यांच्या थोरल्या मुलाने त्यांचा वारसा पुढे चालवत सरपंचपदी बसण्याचा विचार करणं तसं स्वाभाविक असतं. सुरुवातीला केवळ नवनाथ विरुद्ध हरिष गाढवे (प्रसाद ओक) यांच्यात असणारी ही थेट लढाई कालानुरूप अनेक अपेक्षित-अनपेक्षित वळणं घेते. नवनाथची सावत्र आई ज्योती (अलका कुबल), तिचा मुलगा निलेश (अमेय वाघ), भाऊ हणमंत (सिद्धार्थ जाधव), हणमंतची पत्नी मोनिका (सोनाली कुलकर्णी), स्वतः नवनाथची पत्नी हर्षदा (सई ताम्हणकर) या सर्वांनाच या रणधुमाळीत महत्त्व प्राप्त होतं.
या लेखक-दिग्दर्शक द्वयीचे आधीचे तिन्ही चित्रपट हे एक छोटेखानी कथानक घेऊन त्यातील पात्रांच्या, त्यांच्या आयुष्याच्या कथा सांगणारे होते. या कथानकांमध्ये तिथल्या पात्रांना, त्यांच्या आपापसांतील संबंधांना, कौटुंबिक राजकारण आणि समस्यांना महत्त्वाचं स्थान मिळालं होतं. ‘धुरळा’मधील ग्रामपंचायतीच्या राजकारणाभोवती फिरणारं कथानक हे अनेक लहान-मोठ्या पात्रांची मागणी करणारं आहे. इथे तशी पात्रं येतात. मात्र अशा पात्रांच्या गराड्यातही चित्रपटकर्ते मानवी स्वभावाशी निगडीत काही मूलभूत समस्या हाताळतात. या समस्या जितक्या चित्रपटाच्या राजकारण या विषयाला अनुसरून आहेत, तितक्याच इथल्या प्रचंड वैशिष्ट्यपूर्ण अशा पात्रांनाही न्याय देणाऱ्या आहेत. ही सारी पात्रं इथल्या विषयाला अनुसरून डाव-प्रतिडाव टाकतात. ती त्यांच्या ग्रे शेडबाबत अनअपोलोजेटिक आहेत. सत्तेच्या खेळासाठी आणि मुख्य म्हणजे सत्तेत येण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही छटा नको तितकी महत्त्वाची ठरण्याची शक्यता असते. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो हेही ते ओळखतात. इथल्या पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांतील हीच क्लिष्टता आणि एका मोठ्या कथानकाच्या अंतर्गत इथल्या पात्रांच्या आपापसातील संबंधांची उपकथानकं चित्रपटाला अधिक रंजक पैलू प्राप्त करून देतात.
स्त्री-पुरुषांतील नात्याचं राजकारण हाही इथला महत्त्वाचा भाग आहे. निवडणुकीत महिलांसाठीच्या राखीव जागांवर पत्नीला निवडून आणत पडद्याआडून सर्व कारभार सांभाळणाऱ्या पुरुषांची आपल्याकडे कमी नाही. अशात ‘धुरळा’मध्ये स्त्री-पुरुष ही (निरनिराळ्या अर्थांनी) सत्ताकेंद्रं कशी काम करतात, याची अनेक रूपं पहायला मिळतात. उदाहरणार्थ, हणमंत आणि त्याची पत्नी मोनिका यांच्यातील अगदी सुरुवातीचंच संभाषण त्यांच्या बेडरूममध्ये घडताना दिसतं. त्यांच्या वैयक्तिक असणं अपेक्षित असलेल्या जागेत प्रवेश मिळाल्यावर त्यांच्या नात्यात दोघांपैकी कोण अधिक अधिकार राखून आहे याची कल्पना येते. हेच इतर जोडप्यांबाबत किंवा अगदी दोन स्त्रिया किंवा दोन पुरुषांमधील संबंध नि सत्तासंघर्ष कशा रीतीने रेखाटला जातो, यातूनही दिसतं.
कुटुंब ही इथली आणखी एक महत्त्वाची संकल्पना आहे. निवृत्ती उभे या घराचं सत्ताकेंद्र असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात उभे कुटुंबातील सदस्यांतील आपापसातील संबंध कसे बदलत जातात हे इथं दिसतं. ‘धुरळा’ राजकारण, स्त्री-पुरुषांतील नात्याचं राजकारण आणि कुटुंब संकल्पना ज्या पद्धतीने हाताळतो, ते ‘हाऊस ऑफ कार्ड्स’सारख्या मालिकेची आठवण करून देणारं आहे. निवडणूक जिंकणं हे एकच ध्येय समोर असताना या तिन्ही संकल्पनांच्या माध्यमातून इथे घडणाऱ्या गोष्टींकडे नैतिक दृष्टिकोनातून पाहिल्यास इथे कुणीच स्वच्छ चारित्र्याचं दिसणार नाही. लोकांची स्मरणशक्ती ही फारच अल्प असते, हा राजकारणातील महत्त्वाचा धडाही त्यांच्या परिचयाचा आहे. उदाहरणार्थ, एके ठिकाणी एक पात्र राजकीय कोंडीत सापडल्यावर - यातून बाहेर पडण्यासाठी आपल्यावरील लक्ष उडून शत्रूपक्षावर जाईल यासाठी मोठं काहीतरी करावं लागेल - अशा अर्थाचं वाक्य म्हणतं. इथे अगदी ग्रामपंचायत पातळीवरही अनेक लोकांचं केवळ कळसूत्री बाहुली असणंदेखील दिसतं. जगभरातील राजकारणात कुठेही घडणाऱ्या घडामोडींवर आधारित ही निरीक्षणं, या लहान लहान बाबी सदर चित्रपटाला त्याच्या आशय-विषयाशी अधिक प्रामाणिक बनवतात.
इथल्या जवळपास प्रत्येक पात्राची स्वतःची अशी एक बोलण्याची शैली आहे, विशिष्ट असा लहेजा आणि शब्दसाठा आहे. नवनाथ आणि हर्षदा हे दोघे पती-पत्नी एखाद्या प्रगल्भ आणि परिवर्तनशील जोडप्याला शोभेल अशा रीतीने बोलतात. निलेश आणि मोनिका या दोघांचीही भाषा इंग्रजी मिश्रित आहे, त्यांच्या बोलण्यात समाजमाध्यमांच्या, त्या निगडीत गोष्टींचे उल्लेख येत राहतात. इतर पात्रांचे निरनिराळे भाषिक लहेजे त्यांच्या ग्रामीण पार्श्वभूमीतील मुळांना अधोरेखित करणारा आहे. यासारख्या मल्टीस्टारर चित्रपटात प्रत्येक पात्राला त्याच्या भाषिक आणि शारीरिक हावभावांमुळे ठळकपणे वेगळं आणि उल्लेखनीय बनवण्यात ते ते पात्र साकारणाऱ्या कलाकारांचा तितकाच महत्त्वाचा वाटा आहे.
ए. व्ही. प्रफुल्लचंद्रचं पार्श्वसंगीत चित्रपटाच्या अनेक उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण अंगांपैकी एक आहे. ‘नाद करा’ हे गाणं स्वतंत्ररीत्या तितकंसं श्रवणीय वाटत नसलं तरी चित्रपटात ते ज्या संदर्भात येतं, ज्या पार्श्वभूमीवर येतं तिथे ते अजिबात खटकत नाही.
इथे लेखक-दिग्दर्शक हे दोघेही आश्वासक असल्याने ‘धुरळा’चं चांगलं असणं तसं अपेक्षित होतं. सदर चित्रपट एका चांगल्या कथानकाच्या तितक्याच कौशल्यपूर्ण सादरीकरणामुळे या अपेक्षा पूर्ण करतो. ‘धुरळा’ हा समीर विद्वांसच्या इतर चित्रपटांप्रमाणे कलात्मक आणि व्यावसायिक यांच्यातील सुवर्णमध्य साधणारा आहे. मराठी चित्रपटसृष्टीची सद्यपरिस्थिती पाहता तिला अशा कलाकृतींची नितांत गरज आहे. मुख्य म्हणजे केवळ असे चित्रपट बनून चालणार नाही, तर त्यांना तितकाच चांगला प्रतिसादही मिळायला हवा.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment