अजूनकाही
ग्रेटा थुनबर्ग या शाळकरी मुलीच्या मोठ्या लढ्याची गोष्ट सांगणारं, त्यानिमित्ताने जगाची झोप उडवणाऱ्या पर्यावरणीय प्रश्नांचं आक्राळ-विक्राळ स्वरूप मांडणारं अतुल देऊळगावकर यांचं ‘ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होत आहे. उद्या, ४ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृहात हा प्रकाशन सोहळा होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीला संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत विचार मांडायला आमंत्रित करणे, असे आजवर कधीही घडले नव्हते. २३ सप्टेंबर २०१९ रोजी न्यूयॉर्कमध्ये जगातील ६६ राष्ट्रप्रमुख एकत्र जमले होते. आजवर अनेक आश्वासने झाली, तरी कर्ब उत्सर्जन काही कमी होत नाही आणि हवामान बदलाचा अतिरेक संपूर्ण जगाला वेठीला धरत आहे. हे पाहून संयुक्त राष्ट्रसंघाने केवळ एक दिवसाची विशेष परिषद भरवली होती. तिचे उद्घाटन करताना संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँतोनियो गुट्रेस यांनी परखड शब्दांत सांगून टाकले, ‘‘वेळ निघून जात आहे. येथे २०१५०पर्यंत कर्ब उत्सर्जन शून्य करण्याचा कृती आराखडा असणार्या नेत्यांनाच बोलण्याची संधी दिली जाणार आहे. हवामान बदल ही आपण हरत चाललेली स्पर्धा आहे; परंतु आपण ती जिंकूही शकतो.’’
ह्या परिषदेत केवळ एकच व्यक्ती संपूर्ण जगातील जनतेचे प्रतिनिधित्व करत होती. ती होती अर्थातच ग्रेटा थुनबर्ग! गणितज्ज्ञ व हवामानशास्त्रज्ञ एडवर्ड लॉरेन्झ यांनी १९६३ साली ‘‘फुलपाखरानी एका ठिकाणी पंख फडफडवले तर जगाच्या दुसर्या टोकाला चक्रीवादळ येऊ शकतं.’’ असा सिद्धान्त मांडला होता. स्वीडनमधील एक चिमुकली मुलगी ‘हवामानासाठी शाळा बंद’ असं लिहून त्यांच्याच संसदेबाहेर धरणे देऊन बसली, तो दिवस होता, २० ऑगस्ट २०१८! केवळ १३ महिन्यांत म्हणजे २० सप्टेंबर २०१९ रोजी तिच्या साथीला जगातील सुमारे ५० लक्ष मुले रस्त्यावर येतात. ही परिकथा वा विज्ञान कादंबरी नसून वास्तव आहे. पालक, बहीण वा मैत्रीण कोणीही सोबतीला येण्यास तयार नाही. तिकडे शाळा चुकवणे हा गुन्हा असल्यामुळे शिक्षा होऊ शकते. तरीही नवव्या इयत्तेत शिकणार्या ग्रेटा थुनबर्गला स्वत:च्या देशाच्या संसदेबाहेर ठाण मांडून बसण्याचं धाडस होतं. यानंतर मिळालेल्या पाठिंब्यामुळे ती मुले ‘हवामानासाठी शाळा बंद आंदोलन’ चालू करते. आणि पाहता पाहता हे आंदोलन जगभर पसरतं. तेव्हा हवामानाचे संशोधक लॉरेन्झ यांचा ‘कोलाहल सिद्धान्त’ (केऑस थिअरी) हा नव्याने सिद्ध झाला आहे, याची खात्री पटते. छोट्या मुलीच्या एका छोट्या कृतीमुळे लक्षावधी मुलांना व तरुणांना स्फूर्ती मिळाली आणि भवितव्याच्या धास्तीने हादरलेली शाळकरी मुले आणि तरुण हे लाखोंच्या संख्येने हवामानाविरोधी लढ्यात उतरू लागले. त्यांना जगातील आघाडीचे शास्त्रज्ञ पाठिंबा देऊ लागले. ही मुले ‘‘आमचं नाही, विज्ञानाचं ऐका आणि कर्ब उत्सर्जन थांबवून जगाला वाचवा’ असं त्यांच्या नेत्यांना सांगू लागली.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत, जगातील नेत्यांना पाहून रुद्रावतारात ती गरजली, ‘‘मी इथे असणेच चुकीचे आहे. मी समुद्राच्या पलीकडे शाळेत असायला पाहिजे. तुम्ही आम्हा तरुणांना आशा दाखवता? तुम्हाला हिंमत होतेच कशी? तुम्ही माझं बालपण, माझी स्वप्नं हिरावून घेतली आहेत.’’ भावनोत्कटतेने तिचा आवाज कंप पावू लागला. ‘‘मानवजातच लुप्त होण्याच्या मार्गावर असताना तुम्ही पैसा व सर्वकाळ होणार्या आर्थिक विकासाच्या परीकथा सांगत बसता. तुमची हिंमत होतेच कशी? तुम्ही पोक्त व पक्व नाही आहात. तुम्ही आम्हाला फसवत आहात आणि आता तुमची फसवणूक आम्ही सहन करणार नाही.’’ उद्विग्न ग्रेटा बोलतच होती, ‘‘पुढील सर्व पिढ्यांच्या नजरा तुमच्यावर रोखलेल्या आहेत. आता आणि इथेच सोक्षमोक्ष लागला पाहिजे.’’
ग्रेटाच्या साडेचार मिनिटातील ४९५ शब्दांत व्यक्त केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण जगावर विलक्षण परिणाम झाला आहे. तिच्या ह्या छोटेखानी व्याख्यानाची जगातील अग्रगण्य दैनिकांनी अग्रलेखातून दखल घेतली.
‘लॉस एंजिल्स टाइम्स’ - ‘‘जगातील मुले नेतृत्व गुण दाखवत आहेत आणि नेते बालिश वर्तन करीत आहेत.’’
‘न्यूयॉर्क टाइम्स’ - ‘‘संयुक्त राष्ट्रसंघात ग्रेटाच्या मर्मभेदक हल्लामुळे टीकेचे मोहोळ’’
‘न्यूयॉर्क पोस्ट’ - ‘‘बेजबाबदार मोठ्यांमुळे मुलांमधील हवामान भय’’
‘वॉशिंग्टन पोस्ट’ - ‘‘ पर्यावरणासाठी उठाव’’
‘द इंडिपेंडंट’ - ‘‘टीकाकारांनी हल्ले करूनही हवामान बदलासंबंधीची विदा (देटा) व विज्ञान स्वयंस्पष्ट आहे.’’
‘हिंदुस्थान टाइम्स’ - ‘‘हवामानाच्या धोक्यावर कृती करण्याची निकड’’
‘टाइम्स ऑफ इंडिया’ - ‘‘ नुसते बोलू नका समस्या सोडवा.’’
‘ब्लूमरँग’ - ‘‘ग्रेटा सत्य तेच सांगतेय’’
ग्रेटा जगातील पर्यावरण चळवळीची राजदूत झाली, त्या वेळी तिच्यावर टीकेचे हिंस्त्र हल्लेदेखील सुरू झाले. ‘डाव्या- उदारमतवादी विचारांच्या प्रसारासाठी अब्जावधी खर्चून जनसंपर्क माध्यमांच्या मदतीने उभी केलेली ग्रेटा ही एक कळसूत्री बाहुली आहे.’ ‘आत्ममग्न व विषण्णतेच्या विकाराची ग्रेटा ही हेकेखोर, एकसुरी आवाजात बोलणारी असून तिला गांभीर्याने घेणे हाच एक विनोद आहे.’ या सर्व टीकेला जगातील आघाडीच्या वृत्तपत्रांनी अग्रलेखातून उत्तर दिले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातील संबोधनातून सत्तेच्या संघर्षातील महत्त्वाचा मुद्दा हवामान बदल हाच आहे, हे जगाला दाखवून देण्याची लक्षणीय कामगिरी ग्रेटाने केली आहे. तिने तिथे जमलेल्या सत्तांसमोर त्यांनाच थेट आव्हान दिले. तिने सोप्या शब्दात, हवामान बदलावर कृती करण्याची मागणी करणारे ‘आम्ही’ आणि त्यास नकार देणारे ‘तुम्ही’ अशी मांडणी केली. प्रदूषणकर्ते आणि प्रदूषणग्रस्त, पर्यावरणमस्त व पर्यावरणत्रस्त ही सीमारेषा तयार केली. त्यातून तिने कोट्यवधी लोकांच्या भावना पोहोचवत सत्तांना आव्हान दिले आणि जनसामान्यांमध्ये चेतना निर्माण केली. लंडनच्या ‘द गार्डियन’ने संपादकीयात ‘‘ ‘आम्हाला’ धोक्याचा इशारा!’’ असे सांगून टाकले आहे.
पर्यावरणीय संकटासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक, तज्ज्ञ व तळमळीचे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. तरीही लोकांना पर्यावरण व हवामान बदल समस्येचे गांभीर्य समजत नव्हते. त्यांची कारणे व उपाय लक्षात येत नव्हते. ती अतिशय दूरची वाटत होती. शिवाय तिला काही तात्काळ उत्तर नव्हते. अशांना समाजशास्त्रज्ञ ‘दुष्ट समस्या’ असे संबोधतात. ग्रेटा म्हणाली, ‘‘हवामान बदलामुळे आमचे (मुलांचे) भविष्य धोक्यात आले आहे. भविष्यच नसेल तर शाळेत का जाऊ’’ आणि तिने एकटीने शाळेवर एक दिवस बहिष्कार घातला, या कृतीने जगातील मुलांचे लक्ष वेधून घेतले.
ग्रेटाने मांसाहार वर्ज्य करून शाकाहार स्वीकारला, मोटारीऐवजी बस निवडू लागली. विमानाऐवजी जहाजाने खडतर प्रवास केला. जिथे कडाक्याच्या थंडीत उष्णतेसाठी शेगडी नाही वा गरम करून खाण्याची सोय नाही इतकंच काय शौचालयाऐवजी बादली वापरावी लागते, अशा हालअपेष्टा कोण व का सहन करेल? ती मानधन घेत नाही, पुस्तकाच्या स्वामित्वधनाच्या देणगा देते. हे साधेपणाचे प्रदर्शन की इतरांनी स्वत:ला अपराधी समजावे यासाठी? हा सारा खटाटोप हा तिची विचारपूर्वक जीवनशैली व्यक्त करतो. संपूर्ण जगाच्या कायम नजरा तिच्याकडे असतात, याचे भान चिमुरडीला आहे. मत तयार करणे, मत बदलणे हेच महत्त्वाचे आहे, याची तिला जाण आहे.
कोणतीही व्यक्ती आणि कोणतीही कृती ही किरकोळ नसते. त्यातून एक तरंग उमटला तर त्यातून अनेक तरंग पसरत जायला वेळ लागत नाही. हेच ती तिच्या कृतींमधून सांगत आहे. आज एक शाळकरी बालिका तिच्या कर्तृत्वाने आज संपूर्ण जगातील जनतेची प्रतिनिधी झाली आहे. ती, जगाला वाटणारी हवामानाची भीती व पर्यावरणीय धास्ती व्यक्त करत आहे. जगातील प्रसारमाध्यमे तिच्या उद्धरणासाठी आसुसलेले असतात. एखाद्या राष्ट्रप्रमुखालासुद्धा मिळत नसेल एवढा मान तिच्या वक्तव्याला आलेला आहे.
ग्रेटामुळे ही समस्या सर्वांना आपली वाटू लागली. ती अतिशय मोजक्या व नेमक्या शब्दात मांडणी करते. हवामान बदलामुळे काय झालं? काय होणार आहे? काय केलं पाहिजे? हे मार्मिकपणे सांगते. मोठ्यांनी कधीही न विचारलेले प्रश्न जाहीरपणे विचारण्याचं धैर्य तिच्याकडे आहे. ती सातत्यानं विज्ञानाचं ऐकण्याचा आग्रह धरते. तिच्या भाषणांत तर्क आणि भावना, नीती आणि मूल्ये, यांचा उत्तम समतोल असतो. तिला संपूर्ण मानवजातीची काळजी वाटते. गरीब लोक आणि गरीब देशांची बाजू घेऊन ती श्रीमंत देशांना फटकारते. उधळ्या जीवनशैलीला फोडून काढते. जगातील प्रभावशाली तत्त्वज्ञ अशी ख्याती असलेले प्रो. पीटर सिंगर (प्रीन्सटन विद्यापीठ) म्हणतात, ‘‘एकविसाव्या शतकासमोरील सर्वांत मोठे नैतिक आव्हान हवामान बदलाचेच आहे, हे ध्यानात आणून देणे हेच ग्रेटाचे विलक्षण कार्य आहे.’’ ती दरवेळी नवी प्रतीके वापरते. तिच्या मांडणीत कल्पकता व नाविन्य असते. ‘आपले घर जळत आहे’ असं ती म्हणते तेव्हा पर्यावरण समस्या ही आपल्यापर्यंत आणून ती भिडवते. ती आपल्याच भीती, दु:ख, संताप ह्या भावना व्यक्त करते. सार्वत्रिक भावनेला ती वाचा फोडते. मग ती विचारते ‘तेव्हा तुम्ही शांत कसे बसाल? बोलत बसाल? की आग विझवाल?’ अखेरीस आवाहन करते - ‘चला, वाचवायचा प्रयत्न करू’ आणि त्याचा परिणाम थेट होतो. एकाच वेळी लहान विद्यार्थ्यांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत, राजकीय नेत्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत, लेखकांपासून अभिनेत्यांपर्यंत जगातील कोट्यवधी लोकांसाठी ग्रेटा ही प्रेरक वाटत आहे.
२०१८च्या ऑगस्टपासून जगातील मुले पर्यावरणाबाबत संवेदनशीलता प्रकट करू लागले आणि तेव्हापासून त्यांना निसर्ग व पर्यावरणावरील पुस्तके वाचण्याचा छंदही जडला. जगातील ग्रंथ विक्रीचे मापन व विश्लेषण करणार्या ‘निएल्सन बुक रीसर्च’ संस्थेने ‘‘मागील १२ महिन्यात बालकांच्या पुस्तक मागणीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली.’’ असे सांगितले. निसर्ग विनाश, प्रदूषण, निसर्ग दूत अशा विषयांवरील पुस्तकांना बालकांची पसंती आहे. ‘ए वाइल्ड चाइल्डस गाईड टू एनडेन्जर्ड अॅनिमल्स’, ‘व्हेअर द रिव्हर रन्स गोल्ड’, ‘किड फाइट प्लास्टिक’ आणि ‘अर्थ हिरोज’ या पुस्तकांवर मुलांच्या उड्या पडत आहेत. ‘अर्थ हिरोज’ मध्ये पृथ्वी वाचवण्याचा वसा घेतलेल्या २० व्यक्तींच्या कार्याची महती सांगितली आहे. त्यामध्ये विख्यात वृत्तपटकार सर डेव्हिड अॅटनबरो, चीनमधील मंगोलियाच्या वाळवंटात सहा लक्ष वृक्षांची लागवड करणार्या यिन युझेन, पर्यावरण स्नेही वस्तुंचे कल्पक डिझाइन करुन त्यांना लोकिाय करणार्या स्टेला मॅकार्टनी यांचे कार्य व त्याचे महत्त्व सांगतिले आहे. मुखपृष्ठावर आहे ग्रेटा! ‘निएल्सन बुक रीसर्च’च्या विश्लेषक राशेल केलर म्हणतात, ‘हा ‘ग्रेटा थुनबर्ग परिणाम’ आहे. तिच्यामुळे मुलांमध्ये बदल घडत आहेत. मुले अंतर्मुख होऊन ह्या पुस्तकांतून प्रेरणा घेत आहेत.
२० सप्टेंबर रोजी सात खंडांतील १६३ देशांतील ५००० ठिकाणी सुमारे ५० लाखांहून अधिक मुलांनी जागतिक बंद करून दाखवला आहे. अजूनही त्यांची नेमकी संख्या लक्षात येणे कठीण असले तरी अतिशय शांततेत पार पडलेली ही जागतिक निदर्शने संपूर्ण जगाला थक्क करून गेली आहेत. विलक्षण, अद्भुत, अभूतपूर्व अशा कुठल्याही विशेषणात न सामावणारी ही घटना आहे.
‘पैशासाठीच आयुष्य’ हेच ध्येय असणार्या काळात पैसा सोडून निसर्ग वाचवण्यासाठी व्यक्ती व संस्था ह्या दोन्हींच्या संख्येत झपाट्याने वाढ दिसू लागली आहे. मागील एक वर्षात स्वत:ची जीवनशैली आणि सभोवताल या दोन्हींत बदल करण्यासाठी सज्ज होणार्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वैयक्तिक पातळीवर कर्ब पदचिन्ह कमी करणे व सभोवतालच्या संस्थांना त्यासाठी भाग पाडणे ही महत्त्वाची कृती सर्वत्र दिसत आहे. या आठवड्यात युरोप, अमेरिका व ब्रिटनमध्ये घेतलेल्या सर्वेक्षणात ‘हवामान बदल’ व ‘पर्यावरण रक्षण’ या विषयांना प्राधान्य देणार्या मतदारांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आढळले आहे. ‘आशा हीच शक्ती आहे’ असं म्हणणार्या मुलांमुळेच जगात पर्यावरण कृतीवादाचे (अॅक्टिव्हिझम) नवे युग अवतरले आहे. हीच परिवर्तनाची नांदी आहे.
२१व्या शतकाची ‘तुतारी’ ही जगातील मुलांनी फुंकली असून त्यांच्यापाठीशी शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी पृथ्वीला संजीवनी देण्याकरता काळी गगने भेदून निरभ्रता आणण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. त्यांचा लढा हा संपूर्ण जग व जागतिक संस्था ताब्यात असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांशी आहे. प्रदूषकांच्या विरोधात सुरू असलेल्या ऐतिहासिक लढ्यात प्रदूषकशाहीचा वरवंटा वाढत गेल्यास सिव्हिलायझेशनच्या तसेच जीवसृष्टीच्या अंताकडे वाटचाल असेल आणि जनतेचा विजय झाला तर नव्या पहाटेची आशा करता येईल. संपूर्ण जगातील दिशा उजळावयाच्या असतील तर या प्रयत्नांचे गतीवर्धन आवश्यक आहे. छोटेच त्यांच्या वयापेक्षा मोठे होऊन त्यांनी उठावाचे पर्यावरण निर्माण केले आहे. प्रश्न आहे तो मोठ्यांचा!
.............................................................................................................................................
अतुल देऊळगावकर यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 06 January 2020
ग्रेटा थुनबर्ग ब तिची भाषणं हा एक घपला आहे. तिचा बाप स्वान्ते थुनबर्ग अभिनेता आहे. तिची आई मलेना अर्नमन ही ऑपेरा गायिका आहे. स्वान्तेचा बाप प्रसिद्ध नट ओलाफ थुनबर्ग आहे. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Olof_Thunberg#Personal_life
ग्रेटाला जगभर उंडारून सगळं सांभाळून शाळा बरी शिकायला मिळाली ! तिच्यावर कोण्या बड्या हस्तीचा वरदहस्त आहे म्हणूनंच ना ? कोणत्या शाळेत शुक्रवारी शाळा बुडवून निदर्शनं करायची परवानगी मिळते ? आणि शुक्रवारीच का करायची ती निदर्शनं ? शनिवारी केली तर कुणाला काय मोठी धाड भरणारे ?
ग्रेटा ही स्वान्ते आऱ्हेनियस या शास्त्रज्ञाची दूरची नातेवाईक लागते. त्याची आई थुनबर्ग होती. हा तोच शास्त्रज्ञ ज्याने वातावरणातल्या कार्बन-डाय-ऑक्साईड मुळे गीनहाऊस इफेक्ट वाढून पृथ्वीचे तापमान वाढते असा सिद्धांत मांडला. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Svante_Arrhenius#Greenhouse_effect
एकंदरीत अभिनायाप्रमाणे जागतिक तापमानवाढ हादेखील थुनबर्ग फ्यामिलीचा पिढीजात व्यवसाय आहे. तर, आपण त्यांची उत्पादनं विकंत घ्यायची का?
-गामा पैलवान