अजूनकाही
एकविसाव्या शतकाचं दुसरं दशक या वर्षाच्या शेवटी संपेल. या दशकात भारतात आणि जगभर बरंच काही घडलं. त्याचा आढावा लवकरच ‘अक्षरनामा’वर घेतला जाईलच. पण एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातही बरंच काही घडलं. तेही नीट समजून घ्यायला हवं. कारण त्यामुळे हे दुसरं दशक चांगल्या प्रकारे समजू शकतं. त्यामुळे आधी पहिल्या दशकाविषयीचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाची ही थोडक्यात ओळख...
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानं जग बदलवलं असं खरोखर म्हणता येईल की नाही, असा प्रश्न काहींना नक्की पडू शकतो. पण या दशकात घडलेल्या नानाविध घटना, घडामोडी, तंत्रज्ञानातील बदल आणि जग गमावून बसलेल्या गोष्टी यांची गोळाबेरीज केली तर त्यात तथ्य आहे, हे नाकारता येत नाही.
कुठलंही शतक संपून नवीन शतक सुरू झालं की, त्याचा आढावा घेण्याची पद्धत असते. मागे वळून त्या शतकाकडे पाहिलं की, त्यात घडून आलेल्या किती तरी उलथापालथींनी आपण स्तिमित होऊन जातो. केवळ भारतापुरता विचार करायचा तर एकोणिसावं शतक हे भारतीय प्रबोधनाचं शतक मानलं जातं. या शतकात केवळ भारतातच नाही तर जगातही उत्क्रांतीचा अतिप्रगत टप्पा ओलांडला गेला. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, तंत्रज्ञान, माहिती, संस्कृती, व्यापार अशा अनेक क्षेत्रांत विधायक बदल घडून आले. जगाची एका नव्या संकल्पनेशी ओळख होऊन त्याचा प्रवास अधिकाधिक विधायकतेकडे होईल, असा आशावाद निर्माण झाला.
पण विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानंतरच त्याला पहिल्या महायुद्धाच्या रूपानं तडे जायला सुरुवात झाली. नंतर दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध यांनी जग ढवळून निघालं. जगातले किती तरी देश स्वतंत्र झाले आणि मग जग पुन्हा नव्या बदलांना सामोरं जाऊ लागलं.
साठीच्या दशकानं तर साहित्यापासून समाजापर्यंत मोठं स्थित्यंतर घडवून आणलं. त्याचा प्रभाव ओसरतो न ओसरतो तोच नव्वदचं दशक सुरू झालं. विसाव्या शतकातल्या या शेवटच्या दशकानं एकविसाव्या शतकाची नांदी केली आणि मग एकविसावं शतक पुन्हा नवी आव्हानं घेऊन आलं आणि नव्या संधीही.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानं आशा, निराशा आणि अनेक धक्कादायक गोष्टी यांचं संमिश्र रूप दाखवलं. म्हणून या दशकाला ब्रिटिश पत्रकार, लेखक आणि संपादक टीम फुटमन यांनी ‘द नॉटिज’ असं म्हटलं आहे. २००० ते २००९ या दशकानं जग बदलवलं. दहशतवाद, युद्ध, आर्थिक पेचप्रसंग यांनी या दशकाची सुरुवात झाली. यूट्यूब, ट्विटर, फेसबुक, आयपॅड, विकिलिक्स, सीसीटीव्ही अशा अनेक तंत्रज्ञानीय चमत्कार याच काळात उदयाला आले. ग्लोबल वॉर्मिंग, रिअॅलिटी टीव्ही शोज, उच्चभ्रू संस्कृती-सेलिब्रिटी संस्कृतीचा उदय, ऑनलाइन शॉपिंग, सुपरमार्केट्स, आयट्यून्स, अशा गोष्टी जन्मल्या त्याही याच दशकात.
११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर दहशतवाद्यांनी जमीनदोस्त केलं आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ‘वॉर ऑन टेरर’ची ललकारी दिली. ही घटना टीव्हीमुळे जगभर पोहोचली, पाहिली गेली. साहित्यापासून चित्रपटापर्यंत या घटनेचे कसकसे पडसाद उमटले याचा आढावा फुटमन यांनी पहिल्या प्रकरणात घेतला आहे.
दुसऱ्या प्रकरणात अमेरिका-युरोपात मुस्लिमांविषयी तयार झालेल्या वातावरणाची आणि बुश यांच्या युद्धखोर कारनाम्यांची जंत्री सादर केली आहे. तिसऱ्या प्रकरणात ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येचं गांभीर्य सांगतानाच अमेरिकेसारख्या भांडवलशाहीचा पुरस्कार करणाºऱ्या देशांनी पर्यावरणाच्या तत्त्वांना सोडचिठ्ठी कशी दिली; तर कतार, सौदी अरेबिया, चीन या देशांनी नव्या संधींचा कसा वापर करून घेतला, याचा स्थूल आढावा घेतला आहे. प्रकरण चार ते आठमध्ये रिअॅलिटी टीव्ही शोजपासून आयपॉडपर्यंतच्या तंत्रज्ञानातील करामतींचं विहंगावलोकन केलं आहे.
नवव्या प्रकरणात जगातील एकमेव महासत्ता म्हणवल्या जाणाºऱ्या अमेरिकेचा ऱ्हास आणि नवी महासत्ता म्हणून पुढे येत असलेल्या चीनची घोडदौड मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दहाव्या प्रकरणात २००८च्या आर्थिक पेचप्रसंगाची उकल केली आहे. शेवटच्या निष्कर्षाच्या प्रकरणात पुढच्या दशकात काय काय होऊ शकेल, याचा अदमास वर्तवला आहे. (हे प्रकरण स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तो लेखही लवकरच प्रकाशित होईल.)
त्यानंतरच्या तीन परिशिष्टांत या दशकात जन्माला आलेले नवे शब्द, काळाच्या पडद्याआड गेलेल्या व्यक्ती, संकल्पना आणि सांस्कृतिक मानदंड आणि दशकातील महत्त्वाचे वाक्प्रचार दिले आहेत. ९\११, इस्लामोफॅसिझम, इर्नोनॉमिक्स, नूब, ब्लूक (ब्लॉगचं पुस्तकरूप), सेक्सटिंग, डिकॅडिटीज, सेलेब्युटार्ड, बँकस्टर, ट्याइब अशा अनेक शब्द-संकल्पना या शतकात जन्माला आल्या, रूढ झाल्या.
जगाला एका विशिष्ट दिशेनं ढकलण्याचं, त्याला वळण लावण्याचं, निदान त्याला विचारप्रवृत्त करण्याचं काम वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान, बुद्धिमान आणि प्रतिभावान मंडळी करत असतात. पण या दशकात त्या आघाडीवरही मोठी हानी झाली आहे. बार्बारा कार्टलंड, डॉन ब्रॅडमन, जॉर्ज हॅरिसन, स्टॅन्ले अनविन, रॉबर्ता बोलॅनो, यासर अराफत, मर्लिन मन्रो, एडवर्ड सैद, जॅक देरिदा, रोनाल्ड रेगन, आर्थर मिलर, बेटी फ्रिडमन, जे. के. गालब्रेथ, सद्दाम हुसेन, इंगमार बर्गमन, बेनझीर भुत्तो, ऑर्थ सी क्लार्क, बॉबी फिशर, एडमंड हिलरी, मरिअम मकेबा, हेरॉल्ड पिंटर, जॉन अपडाईक अशा अनेक मान्यवरांना जग या दशकात गमावून बसलं.
इथं या पुस्तकाची अगदी धावती ओळख करून दिली असली तरी हे पुस्तक केवळ घटना-घडामोडींची जंत्री देत नाही, तर त्यांचा कार्यकारण संबंध आणि त्यांची इष्टनिष्टताही स्पष्ट करतं. त्यामुळे या पुस्तकात या दशकाचा चांगल्यापैकी आढावा घेतला गेला आहे. मुख्य म्हणजे हे पुस्तक केवळ दशकाची दैनंदिनी झालेलं नाही.
हे पुस्तक वाचणं हा अनुभव काहीसा रोलर कोस्टरमधून केलेल्या दशकभराच्या प्रवासासारखा गमतीशीर व उत्कंठावर्धक आहे.
.............................................................................................................................................
‘द नॉटिज २०००-२००९ - अ डिकेड दॅट चेंजन्ड द वर्ल्ड’ : टीम फुटमन
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 06 January 2020
अहो, आजून दुसरं दशक संपलं नाहीये. २०२० च्या अखेरीस संपणार आहे. हा लेख एक वर्षं आधी आलाय. घाई म्हणावी की नजरचूक? ;-)
-गामा पैलवान