साचलेपणाचा बर्फ फोडायला तर हवाच!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
प्रतिमा जोशी
  • ‘पुरुष स्पंदनं’च्या २०१९च्या दिवाळी अंकाच मुखपृष्ठ आणि त्यातील प्रतिमा जोशी यांच्या लेखाचं चित्र
  • Thu , 02 January 2020
  • अर्धेजग कळीचे प्रश्न व्यभिचार adultery लैंगिक छळ sexual harassment मानसिक क्रौर्य cruelty विनयभंग outraging modesty बलात्कार Rape लैंगिकता Sexuality वात्स्यायन Vatsyayana कामसूत्र Kama Sutra

भारतीय समाजातील तथाकथित परंपराप्रिय लोक प्रागतिक विचारांना विरोध करताना असे विचार हे पाश्चात्त्यांकडून आयात केलेले विचार असून भारतीय संस्कृतीला असा अनर्थ परवडणार नाही, अशी हाकाटी सतत करत असतात. परक्या देशांतले आचारविचार आपल्या लोकांनी अंगीकारले, तर समाजाचे आणि देशाचे वाटोळे होईल असा धाक ते सतत दाखवत असतात. त्यातही विशेषकरून पाश्चात्त्य समाज हा उन्मुक्त, बेभान आणि अनीतिमान आहे; तर भारतीय संस्कृती ही नैतिक बंधनांना, त्यागाला आणि भौतिकतेऐवजी आत्मिक उन्नतीला महत्त्व देणारी आहे, असे सतत बिंबवले जाते. विशेषकरून जिथे स्त्री-पुरुष संबंधांचा, ऐहिक सुखाचा मुद्दा येतो, तिथे हा धाक अधिक तीव्र आणि कडवा होत जातो. ब्रह्मचर्य, पातिव्रत्य, संयम, विरक्ती अशा संकल्पनांचा मारा इतका धडाधड आणि प्रभावीपणे केला जातो की, त्यापलीकडले जरी कोणाला काही गवसले, तरी ते मांडण्याची हिंमत व्यक्ती करू शकत नाही आणि तरीही तशी हिंमत कोणी केलीच, तर समूह त्या व्यक्तीवर पाखंडाचे, अनीतीचे आणि वेळप्रसंगी पापी असल्याचेही ठप्पे मारून त्याचे जीवन अवघड बनवून टाकतात.

मात्र स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष आणि स्त्री-पुरुष यांतील द्वैत-अद्वैत, साहचर्य-संघर्ष, वैरभाव-समभाव यांचा शोध भारतीय संस्कृतीच्या संदर्भात घेऊ गेलो, तर आपल्या हाताला काही वेगळे लागते. स्त्री-पुरुष संबंधांबाबत, लिंगभाव वर्तनाबाबत मूल्यसंकल्पनांच्या ज्या चौकटी वर्तनात आणि गेल्या काही शे वर्षांच्या ज्ञात इतिहासात रुजलेल्या आणि रूढ झालेल्या आपल्याला दिसतात, त्यापेक्षा अतिशय भिन्न आणि कधीकधी तर अगदी टोकाच्या विरोधी धारणा आणि चालीरीती भारतीय समाजात प्रचलित होत्या असे लक्षात येते. केवळ धारणाच नाही, तर समाजाचे वर्तनही निराळे दिसते. आजच्या रूढ नीती-अनीतीच्या कल्पनांच्या मर्यादेत राहून जर आपल्या इतिहासपूर्व काळाकडे नजर टाकली, तर त्या वेळच्या लोकांचे वर्तन आजच्या संदर्भात अनीतीचे वाटू शकेल अशी स्थिती आहे.

याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, की आपण डोळे, कान, मन आणि मेंदू खुला ठेवून आपल्या भूतकाळाचे वाचन करायला हवे. उदाहरणार्थ आपला बव्हंश भारतीय समाज आजही रामायण आणि महाभारत यांबद्दल आदर बाळगतो आणि ते आपले सांस्कृतिक संचित आहे असे मानतो. असंख्य लोकांसाठी पुराणकथाही वंदनीय आहेत. आता रामायण, महाभारत, पुराणकथा हा खरोखर घडलेला इतिहास आहे की, ती मिथके अथवा केवळ महाकाव्ये किंवा कथात्म साहित्य आहे, हा खरोखर वादाचा मुद्दा आहे. किंबहुना हा खरा इतिहास नाहीच असा संशोधकांचा दावाच आहे. आपण आत्ता या वादात जाऊया नको. मात्र तो इतिहास आहे असे मानले किंवा जर त्या मिथककथाच (mythology) आहेत असेही मानले, तरी काही विलक्षण बाबी हाताशी लागतातच.

उदाहरणार्थ कुंती आणि पांडव. जे महाभारत आपल्या देशात प्रचलित आहे, पिढ्यानपिढ्या सांगितले जाते, त्यानुसारच पाहिले तर हे स्पष्ट आहे की, पाचापैकी एकही पांडव पंडुचा औरस पुत्र नाही. पंडु हा अशक्त आणि नपुंसक होता. कुंती आणि माद्री या त्याच्या दोन्ही पत्नींना झालेली मुले त्याची असूच शकत नव्हती. नियोग पद्धतीतून चार वेगवेगळ्या व्यक्तींपासून कुंतीला तीन आणि माद्रीला जुळे अशी पाच मुले झालेली आहेत. अगदी पंडूचे राजघराणे असल्यामुळे त्याला हा विशेषाधिकार होता आणि सामान्य जनतेसाठी हा अधिकार उपलब्ध नव्हता असे मानले, तरीही काही मुद्दे हाताशी लागतातच. मूल देण्यास पती असमर्थ असल्याने नियोग पद्धतीचा अवलंब करून संतानप्राप्ती करून घेणे याला समाजाची आणि धर्ममार्तंडांचीही संमती असल्याशिवाय हा व्यवहार होणे अशक्यच. नियोग हा शब्दप्रयोगही अस्तित्वात आहे. शब्द आपोआप उगम पावत नाहीत आणि प्रचलितही होत नाहीत. त्यांच्यामागे समाजव्यवहार आणि समाजधारणा असतात. आपल्या पतीशिवाय अन्य पुरुषाशी अगदी कोणत्याही उदात्त कारणाने का होईना, पण रत होणे ही चौकटीबाहेरचीच आणि ज्याला लिंगभाव ओलांडणे म्हणतात अशी धीट कृती झाली.

आणखी काही उदाहरणे बघू. द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी. तरीही कर्णाला पाहताच तिचे मन त्याच्याकडे ओढ घेऊ पाहते. ‘वनवास पर्वा’त ती भीमाला म्हणते, ‘पुढील जन्मी तू मोठा भाऊ हो’. पाचजणांची पत्नी असली, तरी प्रथेप्रमाणे तिच्यावर मालकी थोरल्याची हा संदर्भ या संभाषणाला आहे. कृष्ण हा तिचा सखा (आजच्या भाषेतल्यासारखा मानलेला भाऊ किंवा ‘नुसताच’ मित्र वगैरे नाही, तर सखाच!). त्याचे तिचे नाते हे स्त्री-पुरुषांधील एक रम्य नाते आहे. शिळोप्याच्या गप्पा मारताना कृष्ण द्रौपदीच्या मांडीवर पाय ठेवून सैलावून बसला आहे आणि अर्जुनासोबत त्याचे राजकारण, कला, साहित्यादी विषयांवर बोलणे चाललेले आहे नि द्रौपदीही त्यात सहभागी आहे अशी वर्णने ही आधुनिक काळातही प्रागतिक वाटू शकतील अशी आहेत.

सीता तर स्त्रीत्वाच्या मर्यादा या सामर्थ्यात कशा बदलू शकतात त्याचा वस्तुपाठच आहे. चारित्र्याबद्दल सतत शंका घेणार्‍या पतीचे समाधान करत सारे आयुष्यच अग्निपरीक्षा बनण्यापेक्षा भूमिगत होणे परवडले असे नुसते हताश उद्गार काढत न बसता ते प्रत्यक्षात आणणारी सीता ही सनातनी मंडळी रंगवतात तसे परंपराप्रिय स्त्रीचे, दुबळेपणाचे निदर्शन नाही, तर स्वाभिमानी स्वतंत्र विचाराच्या व्यक्तीचे निदर्शन आहे. एका लोकप्रिय, सार्वभौम राजाचा, आपल्या पतीचा अव्हेर सामर्थ्यशाली स्त्रीच करू शकते.

अहल्येची कहाणीही समजून घेण्यासारखी आहे. अजाणतेपणाने इंद्राच्या वासनेला बळी पडलेल्या अहल्येलाही शृंगाराची तीव्र इच्छा झाली होती. ती तिने लपवली नाही. शृंगाराची इच्छा न लपवण्याचे उदाहरण शूर्पणखेबाबतही दिसते. तिने रामाला पाहून आपली लैंगिक वासना उत्तेजित झाल्याचे लपवलेले दिसत नाही. फसवणूक झाल्याचे अहल्येने परोपरीने सांगूनही पतीने, गौतम ऋषींनी शाप देऊन तिची शिळा केली असे पुराण सांगते. शिळा झाली, म्हणजे तिच्या भावना, संवेदना गोठल्या. तिचे मन दगड बनले आणि त्यामुळे शरीरही जड होऊन गेले, चैतन्य संपले असा अर्थ आपण घेऊया. तिला रामाचा स्पर्श होताच तिच्यात पुन्हा चेतना संचारली असे पुराण सांगते. अजाणतेपणाने का होईना, पण परपुरुषाशी रत झालेल्या अहल्येला चेतना देणारा राम स्वतःच्या पत्नीला, सीतेला मात्र चारित्र्यावरून संशय घेऊन आरोपीच्या पिंजर्‍यात उभी करतो, हा विरोधाभासही आहेच. पण तो मुद्दा बाजूला ठेवू. अहल्या या शब्दाचा अर्थ हल (नांगर) न चाललेली जमीन. म्हणजेच जिच्या भूमीत बीज अंकुरण्याची प्रक्रिया नाही अशी. थोडक्यात बराच काळ पुरुषाशी समागम न झालेली स्त्री. ही तिला पतीने दिलेली शिक्षा.

सरळसरळ या कहाण्या स्त्रीपुरुषांच्या समागमाशी, रत होण्याशी, विरुद्धलिंगी सख्य असण्याशी संबंधित आहेत. आजच्या काळात या कहाण्या घडत्या, तर आयपीसी आणि सीपीसीखाली त्यातील पात्रांना व्यभिचार (adultery), लैंगिक छळ (sexual harassment), मानसिक क्रौर्य (cruelty), विनयभंग (outraging modesty) अशा अनेक कलमांखाली दोषी ठरवले गेले असते. पाच पती असलेली आणि तरीही कर्णावर भाळलेली द्रौपदी आजच्या काळात ‘कुलटा’ ठरली असती. पती मूल देण्यास असमर्थ आहे म्हणून परपुरुषाकडून अपत्यप्राप्ती आजच्या काळात एखादी स्त्री करू मागेल तर तिचे कायद्याने आणि सामाजिक स्थान काय असेल? परंतु आपल्याकडे या सर्व स्त्रियांना सन्मानाने स्वीकारले गेलेले दिसते. नुसते स्वीकारलेच नाही, तर वंदनीय मानले जाते.

अहल्या द्रौपदी तारा कुंती मंदोदरी तथा ।

पंचकन्याः स्मरेतन्नित्यं महापातकनाशम् ॥

असे म्हटलेलेच आहे. या सर्व स्त्रिया खर्‍या होत्या की खोट्या नि काल्पनिक या वादाचे काय करायचे ते नंतर पाहू. परंतु या सर्व कथांचा आपल्या समाजावर मोठा प्रभाव आहे आणि रामायण, महाभारत हा आपला वारसा आहे असे सनातनी संस्कृतिरक्षकही अवाजवी मोठ्या आवाजात सांगत असतात हे लक्षात घेऊया. हे पाल्हाळ इथे यासाठीही लावले की, उन्मुक्त समाज फक्त पाश्चात्त्य देशातच असतो हा जाणीवपूर्वक रुजवलेला आणि जोपासलेला समज. हा समज इतका घट्ट करून ठेवला आहे की, त्यामुळे आपण आपल्याचपाशी असणार्‍या भल्याबुर्‍या संचिताकडे मोकळेपणाने पाहत नाही. तसे पाहू नये यासाठीही अनेक व्यूह रचले गेले आहेत. पातिव्रत्याच्या, एकपत्नीव्रताच्या, लैंगिक दमनाच्या, ब्रह्मचर्याच्या, वीर्यनाशाच्या, पापपुण्याच्या अशा डोके भ्रमित करून टाकणार्‍या गोष्टींची चर्चा मोठ्या खुबीने घडवून आणली गेली आहे आणि त्या कल्पनांत गुरफटवून माणसांची साचलेली, कुंथणारी, कुजकट डबकी बनवली गेलीत.

या कथा नुसत्या पुराणातल्या पोपटपंचीप्रमाणे ऐकल्या, तर त्यातून हाती फक्त ‘गर्व से कहो’ची फोलपटेच लागतील. या फोलपटांमुळे भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण गेली तीन दशके भयानक गढूळ झालेले आहे. पण डोळे उघडून जर या कहाण्या पाहिल्या, तर असे लक्षात येईल की, भारतात सर्व प्रकारचे प्रवाह होते. स्त्री-पुरुष लिंगभाव ओलांडण्याच्या गोष्टी आज एकविसाव्या शतकात आपण जेव्हा करतो, तेव्हा आजही ज्वलंत होऊ शकणार्‍या अनेक बाबी या कहाण्यांच्या आसपास सहजपणे फिरताना दिसतात. अगदी गंगेची गोष्ट घेतली तरीही. माझी मर्जी आहे तोवरच मी तुझ्यापाशी राहेन असे ती प्रियकराला सांगू शकतेय. हे सर्व काल्पनिक असले, तर मग तर अधिकच अभ्यासावे असे आहे.

लैंगिक इच्छा, ऐच्छिक शरीरसंबंध यावरून पुढारलेल्या समजल्या जाणार्‍या आजच्या काळातही संबंधित व्यक्तींना, विशेषतः स्त्रियांना ज्या प्रकारची मानहानी, निंदा यांना सामोरे जावे लागते, ज्या प्रकारे आपल्या या इच्छा बहुधा मरेपर्यंत दाबून ठेवाव्या लागतात, सन्मानाने जगणे जाऊच दे परंतु सरळसाधे जगणेही त्यांना शक्य होणार नाही.

आपण जेंडर बायनरीज पार करण्याबाबत बोलतो. पांडवांचा जन्म हा बायनरी पार करून झाला आहे. आपण हे लक्षात घेऊया की भारतीय वारसा या सर्व लोकांना मोकळ्या मनाने मोकळी जागा देतो. तिथे अर्जुन बृहन्नडा, म्हणजे तृतीयपंथी बनतो. म्हणजे केवळ स्त्री-पुरुष यापलीकडे जाऊन तृतीयपंथही तिथे दिसतो. किन्नर हा शब्द आपल्याला या संचितात आढळतो, जो आपण आज एलजीबीटी संदर्भात एका वर्गवारीसाठी वापरतो. तो असे म्हणत नाही की, आपण येथे येऊ नये, असे सांगत नाही की आपण हे करू नका; तो असे म्हणत नाही की आपली ती जागा नाही. आपण या मार्गाने समजून घेत असाल तर ही संस्कृती सर्व प्रकारच्या लोकांना त्यांची स्वतःची जागा बनवू देते. आणि याच कारणास्तव, कदाचित आपल्या देशात दीड हजार वर्षांपूर्वी वात्सायन यांनी ‘कामसूत्र’ लिहिले होते. ते वाचल्यानंतर आजही बर्‍याच लोकांच्या शरीरात शहारे येतात आणि प्रश्न पडतो की हे कसे लिहिले आहे, या गोष्टी लिहिणार्‍या व्यक्तीला लाज कशी वाटत नाही? अशा गोष्टी बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला खूप भेटतील. खजुराहोसारखी लैंगिक क्रिया, समागम, रतिक्रीडा यांचे चित्रण करणारी लेणी आपल्याकडे आहेत. खरे तर आज जी मंडळी ‘आमची संस्कृती पाश्चात्त्यांसारखी शरीराचे चोचले पुरवणारे नाही’ असे बोलत आहेत, त्यातील एक टक्का लोकांनीही वात्स्यायनाचे ‘कामसूत्र’ वाचले नसेल. जर त्यांनी ते वाचले असते, आपला देश आणि त्यातील समाजजीवन घडत जाताना घडलेल्या गोष्टी समजून घेतल्या असत्या, कर्मठपणाच्या आहारी न जाता एक स्वच्छ आणि मोकळा दृष्टिकोन अवलंबला असता, तर मुलींना पबमध्ये प्रवेश करू देणार नाही असे म्हणत त्यांनी मारहाण केली नसती. ते वाचले असते तर मुलींना कोणते कपडे घालावे यावरून त्रास दिला नसता. प्रेमीयुगुलांना बागेत घुसून झोडपून काढले नसते. हे करू नका, तसे करू नका, असे म्हणू नका हे उपदेश दिले नसते.

काही आकडेवारी आपल्यापाशी आहे. महत्त्वाची माहिती आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो, गुन्हेगारीची आकडेवारी संपूर्ण देशातून, सर्व राज्यांतून गोळा करून राष्ट्रीय सरासरी केंद्रित करते. त्यांचे म्हणणे आहे की, दररोज भारतात ९३ महिलांवर बलात्कार होतो. आपल्या सर्वांना हे माहीत आहे, की असंख्य स्त्रिया हिंसा, छेडछाड, भेदभावाच्या बळी असतात. हिंसाचाराच्या बळी ठरतात. बव्हंश स्त्रिया अपमानाकडे दुर्लक्ष करतात आणि खचलेल्या मनस्थितीत आयुष्य ढकलतात. पोर्नोग्रफी बघणाऱ्यांत भारत देश आज अव्वल स्थानावर आहे. पॉर्न हा खरे तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. परंतु इथे त्याचा उल्लेख करणे यासाठी आवश्यक आहे की, पॉर्न प्रेक्षकांमधले आपले अव्वल स्थान हे सेक्सकडे मोकळ्या दृष्टीने पाहण्याचे निदर्शन नसून उलट तो कोंडलेल्या भावनांचा विकृत निचरा आहे. भारतीय समाज स्त्रियांबाबत असहिष्णू आहे, पुरुषांबाबत पोकळ अहंकाराच्या अधीन गेलेला आहे आणि स्त्री-पुरुष संबंधांबाबत प्रचंड दांभिक आहे. वर उल्लेख केलेल्या ब्रह्मचर्य, पातिव्रत्य, एकपत्नीव्रत अशा चौकटींमध्ये हा समाज राहू पाहतो आणि ते न जमल्याने किंवा न झेपल्याने होणारी कुचंबणा विकृत मार्गांनी बाहेर काढतो.

सनातन म्हणजे काय? सनातन म्हणजे जे शाश्वत आहे आणि जे मूल्यांच्या आधारे उभे राहिले आहे. मूल्ये काय आहेत? मूल्ये अशी आहेत की कोणीही कुणाचेही शोषण करू नये. मूल्ये अशी आहेत की एखाद्याने दुसर्‍याचा आदर केला पाहिजे. मूल्ये अशी आहेत की आपल्याला आपल्या श्रमाची किंवा आपल्या बुद्धिमत्तेची किंवा आपण जे काही देऊ करतो त्याची योग्य भरपाई मिळावी. ही मूल्ये योग्य प्रकारे जपत जो चांगुलपणा निर्माण होतो तो महत्त्वाचा. समता, बंधुत्व, स्वातंत्र्य हे मूल्य आहे, हे चिरंतन मूल्य आहे. सूर्य सर्वांना सारखा प्रकाश देतो हे सनातन सत्य आहे. पृथ्वी सर्वांची आहे हे सनातन सत्य आहे. मनुष्याला भावनिक साहचर्याची आणि भूक मिटवण्याची गरज आहे, हे सनातन सत्य आहे. शेत नांगरले तरच पीक मिळेल हे सनातन सत्य आहे. प्रत्येक घटिताला कार्यकारणभाव आहे हे सनातन सत्य आहे. सनातन काय म्हणते की लोक काळे आहेत, ते गोरे आहेत की पुरुष, की ते तरुण असो की म्हातारे, तो आफ्रिकन किंवा भारतीय आहे, तो अमेरिकन किंवा युरोपियन आहे, तो चिनी आहे किंवा ऑस्ट्रेलियन... हे लक्षात न घेता, वारा जो आपले कार्य करत राहतो तो चिरंतन आहे. भारतीय संस्कृतीत पंचतत्त्व म्हणतात. पाच मुख्य घटक म्हणजे शाश्वत घटक जो कोणत्याही लिंगाशिवाय, कोणत्याही लिंगभावाशिवाय आपल्या आपल्याशी समान वागणूक देतात.

जर आपण अर्थशास्त्राचे तज्ज्ञ असाल तर समाज- विज्ञानदेखील अभ्यासले पाहिजे. आज आपल्या बाबतीत असे घडले आहे, की आम्ही एका विषयाचे तज्ज्ञ आहोत. परंतु आम्हाला दुसर्‍या विषयाबद्दल काही माहिती नाही. हा सुपर स्पेशलायझेशनचा काळ आहे. तो आपले विचार बदलत आहे आणि काहीतरी वेगळ्या विचारात आहे, पण त्याने कोणाशी संपर्क साधला पाहिजे, हे त्याला समजत नाही. भारतीय समाजाचे प्रवाहित्व विविध कारणांमुळे बाधित झालेले आहे. खरे तर समाज, संस्कृती एखाद्या प्रवाहासारखी, झर्‍यासारखी खळाळत पुढे पुढे जात राहिली पाहिजे. पण हा झरा पुढे सरकताना दिसत नाही. त्यावर कर्मकांडांचा, पूर्वाग्रहांचा, कट्टरतेचा बर्फ साचला आहे. तो झरा गोठला आहे. ते वाहत नाही. काही त्रुटी आहेत. जातिव्यवस्था आहे. स्त्रियांसाठी, तृतीयपंथीयांसाठी, दुबळ्यांसाठी, अपंगांसाठी दुय्यम समाजरचना आहे. लक्षात घ्या- भारतीय जातव्यवस्था समान रेषेवर आडवी (हॉरिझॉन्टल) नाही, ती उभी (व्हर्टिकल) आहे. यामध्ये काही खाली आहेत, काही मध्यभागी आहेत, काही वर आहेत. यातही शिडीवर एक एक करून जे आहेत, ते एकजण दुसर्‍याला खालचा समजते, दुसरा तिसर्‍याला आणि जो शेवटी आहे, तो त्याच्या खालच्या व्यक्तीला शूद्र समजतो. सर्वोच्च असण्याची भावना सर्वच स्तरांवर दिसते. त्यात आनंद नाही, हेवा आहे. मी कसा श्रेष्ठ आहे हे दर्शवण्याची इच्छा आहे.

बर्‍याच लोकांनी हा समाजाच्या पृष्ठभागावरचा बर्फ फोडण्याचे काम केले आहे. पेरियार रामस्वामी नायकर, चक्रधरस्वामी, बसवेश्वर, कबीर, गुरूनानक, म. जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, र. धों. कर्वे... बरेच लोक आहेत. या सर्व लोकांना अशी संस्कृती तयार केली गेली, जी खुल्या मनाने इतिहासाचे वाचन करेल, विज्ञानाच्या कसोटीवर गोष्टी ताडून पाहील, व्यक्तीचा सन्मान करेल, न्यायाची बूज राखेल, विषमतेला थारा देणार नाही. हा पुरोगामी विचार आहे. मात्र आजकाल पुरोगामी असणे ही जणू शिवीगाळ झाली आहे. बोलण्याच्या, व्यक्त होण्याच्या जागा कमी कमी होत चालल्या आहेत. आधीच पुराणांची पोपटपंची केलेल्या कर्मठ लोकांनी बव्हंश समूहांची डोकी अविचारांनी लिंपून टाकली आहेत आणि त्यात खुली विचारपीठे मावळत चालली आहेत, ही मोठी चिंतेची बाब आहे. केरळमध्ये शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून झालेले रण हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आणि त्याच वेळी विचार करणारी मंडळीही वाटा शोधताना दिसत आहेत. ‘हॅप्पी टू ब्लीड’ असे मोठ्या आवाजात, ठळक अक्षरांत स्त्रियाही म्हणत आहेत आणि पुरुषही त्यात त्यांच्यासोबत आहेत. स्त्री-पुरुष लिंगभावाच्या मर्यादा तोडण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघेही, खरे तर या दोन लिंगांपलीकडे असलेल्यांनीही आधी एक व्यक्ती म्हणून समर्थपणे स्थापित होणे गरजेचे आहे. हा व्यक्ती म्हणून स्थापित होण्याचा लढा निश्‍चितच सोपा नाही. मात्र तो लढण्याशिवाय पर्यायही नाही.

(‘पुरुष स्पंदनं’च्या २०१९च्या दिवाळी अंकातून साभार)

.............................................................................................................................................

लेखिका प्रतिमा जोशी ज्येष्ठ पत्रकार व कथाकार आहेत.

pratimajk@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Sachin Shinde

Fri , 03 January 2020

khup chan mahitipurn lekh aahe.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......