साहित्यनिर्मिती ही झपाटणारी सुखद क्रिया आहे. पण ती बाळंतपणासारखी वेदनादायीदेखील आहे! लिहिताना मी एक स्त्री, माता होण्याचा अनुभव घेतो!
पडघम - साहित्यिक
भालचंद्र नेमाडे
  • भालचंद्र नेमाडे आणि ज्ञानरंजन
  • Tue , 31 December 2019
  • पडघम साहित्यिक भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade ज्ञानरंजन Gyanranjan अमर उजाला Amar Ujala आकाशदीप सन्मान Akashdeep Sanman

‘अमर उजाला’ वृत्तपत्र समूहाच्या वतीने मुंबईत शनिवारी, २८ डिसेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे आणि हिंदीतले ज्येष्ठ कथाकार ज्ञानरंजन यांना २०१९चा ‘आकाशदीप सन्मान’ देऊन कविश्रेष्ठ गुलज़ार यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. नेमाडे यांनी केलेल्या भाषणाचं हे शब्दांकन...

.............................................................................................................................................

मित्रहो...

आजच्या या समारंभाचे अध्यक्ष, माझे तसेच आपल्या सर्वांचे आवडते मित्र गुलज़ारजी, अमर उजाला परिवाराचे प्रबंध निदेशक राहुल चौधरीजी, यशवंत व्यासजी, ‘अमर उजाला’ परिवाराचे सर्व सदस्य, हिंदीतले वरिष्ठ कथाकार आणि माझे ‘मावसभाऊ’ ज्ञानरंजनजी (हिंदी-मराठी भाषिक बंधुभाव हा चुकीचा वाक्प्रयोग आहे. ‘भाषिक भगिनीभाव’ असा शब्दप्रयोग असला पाहिजे!) आकाशदीप पुरस्काराच्या निवड समितीचे सर्व सदस्य, अनामिकाजी, अरुण कमलजी, नंदकिशोर आचार्यजी, अब्दुल बिसमिलजी आणि ज्योती जोशीजी. इथे उपस्थित माझे वाचक आणि श्रोते मित्रहो..! मी आपणा सर्वांना नमस्कार करतो.

सर्वांत आधी मी आयोजकांचे विशेष आभार मानतो. ते यासाठी की, त्यांनी हा कार्यक्रम माझ्या गावात - मुंबईत आयोजित केला. हिंदीतील निवडक साहित्यिकांची आम्हा मुंबईतील साहित्यप्रेमींशी भेट व्हावी ही माझ्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची अशी घटना आहे.

साहित्य, फिल्म, गीत, कथा, कविता, पटकथा, भाषांतर, चित्रपटनिर्मिती अशा अनेक क्षेत्रांत काम करणाऱ्या आणि सतत सृजनशील राहणाऱ्या गुलज़ार यांच्यासारख्या कलावंताच्या हस्ते हा समारंभ होत आहे, हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग आहे. ‘बंदिनी’पासून त्यांची आमची सोबत होती, पण आता प्रत्यक्ष भेट झाली.

माझ्या आधी गेल्या वर्षी आकाशदीप सन्मान स्वर्गीय नामवरसिंहजी आणि स्वर्गीय गिरीश कार्नाड यांना प्राप्त झाला होता. ते दोघेही भारतीय साहित्याचे दीपस्तंभ तसेच माझे स्नेही होते. या दोघांचं मी अत्यंत श्रद्धेनं स्मरण करतो. त्यांनी जिवंत ठेवलेल्या निर्भयतेच्या परंपरेत मी काम करीन, असा तुमच्या सर्वांच्या साक्षीनं निश्चय करतो.

माझ्यासाठी ही अत्यंत सुखद घटना आहे की, ‘अमर उजाला’ परिवार भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या भाषांमधील साहित्यिकांचा सन्मान करून एक आदर्श प्रस्थापित करत आहे. भाषावार प्रांतरचनेमुळे बंदिस्त झालेल्या भाषा खुल्या होण्याची ही कृती आहे. मला हिंदी कधीच परकी भाषा वाटली नाही. आपण हिंदी बोलतो तेव्हा ६० टक्के शब्द मराठीच असतात. माझ्या साहित्याची सर्वाधिक भाषांतरं हिंदीत आणि त्या खालोखाल कन्नड भाषेत झाली आहेत.

१९६० च्या सुमारास मी मराठी लघुपत्रिका लिटिल मॅगझिन्समधून लेखनास प्रारंभ केला. या काळात हिंदीतही लघुपत्रिका जोरात होत्या. त्यातही माझ्या साहित्याचे अनुवाद होत होते. ‘आवेश’, ‘लहर’, ‘गवाह’, ‘आश्वस्त’, ‘पल-प्रतिपल’ आणि नंतर ‘पूर्वाग्रह’, ‘आलोचना’, ‘बहुवचन’, ‘समीक्षा’ इत्यादी. तेव्हापासून हिंदी वाचकांशी माझी दोस्ती पक्की झाली आहे. हिंदी असो, मराठी असो, सर्व भारतीय भाषांची मध्यमा (विचार करण्याची शक्ती) एकसारखी असते. मराठीतले संत नामदेव-तुकारामांपासून विनोबा भावे, गजानन माधव मुक्तिबोध यांच्यापर्यंत मोठमोठ्या साहित्यिकांनी हिंदी ही आपलीच भाषा मानली आहे. संत तुलसीदास आणि संत एकनाथ काशीमध्ये एकाच पाठशाळेत शिकत होते. दोघांनीही नंतर लोकप्रिय रामायणं लिहिली. (माझ्या पुढच्या कादंबरीत हे दोघे हॉस्टेलमध्ये एकमेकांच्या कशा खोड्या काढतात, याच्यावर एक उतारा आहे. ‘तुला काही येत नाही रामायण, मला येतं’, असं दोघंही एकमेकांना म्हणत होते!) माझ्या एका विद्यार्थ्याला पीएच.डी.साठी एकनाथ आणि तुलसीदास यांच्या रामायणातील साम्य शोधण्याचे काम मी दिले होते.

माझ्यासाठी साहित्यनिर्मिती ही अत्यंत झपाटणारी सुखद क्रिया आहे. पण ती बाळंतपणासारखी वेदनादायीदेखील आहे! लिहिताना मी एक स्त्री, माता होण्याचा अनुभव घेतो. आम्हा पुरुषांच्या वांझ जीवनात सृजनाची वेदना, जन्म देतानाच्या वेणा अनुभवण्याचा कुठलाही योग येत नाही. हां, नंतर कधीतरी आपल्या मुलांचं जसं कोणी कौतुक करतं, तसाच काहीसा अनुभव मला ‘अमर उजाला’ परिवारातर्फे होणाऱ्या या सन्मानप्रसंगी येत आहे. अशा प्रसंगी मला आपल्या आई असण्याचा गर्व जाणवतो. प्रत्यक्ष लिहिताना माझ्यासमोर जो वाचक असतो, तो ग्रामीण, पाहिजे त्या सोयी-सवलती न मिळणारा, कष्टाळू, असहाय तरी जगण्यावर प्रेम असणारा थरथरत्या मनाचा, असा समाजातल्या खालच्या स्तरातला असतो. असा वाचक माझ्यासमोर नेहमी लिहिताना असतो. खालच्या स्तरावर नेहमीच ओलावा असतो... नमी असते खाली... जिवंतपणा असतो... जसं जसं उंचीवर जावं तसं वास्तव विरळ होत जातं... वातावरण ओसाड आणि खडकाळ होत जातं... कधी कधी तर बर्फही असतो पूर्ण... उंचीवर ऑक्सिजन कमी होतोच... जीवसृष्टी, वनस्पती विरळ होत जातात. खालच्या स्तरावरच वृक्षवेली, प्राणी, माणसं-त्यांच्या वस्त्या मुबलक आढळतात. इथेच जगण्याची विविधता खऱ्या अर्थानं नांदते. अशा हजारो वाचकांबरोबर मी माझा दर्द वाटून घेत आलो, ही मी माझ्या आयुष्यातली खरी कमाई समजतो.

आपले पाकिस्तानात गेलेले महान कवी फैज़ अहमद फैज़ म्हणतात तसेच...

दोस्तों को भी मिले दर्द की दौलत यारब,

मेरा अपना ही भला हो, मुझे मंजूर नहीं।

आता आणखी एका विषयावर मी आपल्याशी थोडक्यात संवाद करू इच्छितो. आम्ही नेहमी ‘बंबईया हिंदी’ बोलतो. खरं तर मुंबईची हिंदी हीच राष्ट्रभाषा व्हायला पाहिजे, या मताचा मी आहे. याचं कारण या भाषेत कोणीही कधीही चूक करू शकत नाही. अशीच राष्ट्रभाषा होणं आवश्यक आहे. खरी राष्ट्रभाषा यामुळेच ओळखली जाते.

जगात कुठेही सापडणार नाही अशी भाषिक विविधता या आपल्या हिंदुस्तान उपखंडात आहे. भाषाशास्त्राचा प्राध्यापक असल्याने मी हे सांगू शकतो. संपूर्ण भारतात १६५२ स्वतंत्र भाषा आज बोलल्या जातात. इंग्लंडमध्ये किती आहेत? दोन तरी आहे की नाहीत, याची मला शंका वाटते. अमेरिकेत पूर्वी ३० होत्या, आता दोन-तीन उरल्या आहेत. इंग्रजी त्यातली महत्त्वाची. माझी अशी सूचना आहे की, संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या मानवाधिकार सर्वेक्षणात प्रत्येक देशात गेल्या १०० वर्षांत किती भाषा मारल्या याचा उल्लेख केला पाहिजे. १०० वर्षांपूर्वी किती भाषा बोलल्या जात होत्या आणि आज किती बोलल्या जातात, याचं एक रेकॉर्ड सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. हा कलम टाकण्यासाठी आपण सगळ्यांनी हट्ट धरला पाहिजे. जगात जेवढ्या काही छोट्या-छोट्या भाषा आहेत, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन असतो. ही भाषा जीवनदृष्टी उत्क्रांत होत विकसित होत असते. भाषा बोलणाऱ्यांच्या पिढ्यांनी हा दृष्टिकोन अनेक पिढ्यांपासून जोपासत आणलेला असतो. प्रत्येक भाषेतला जीवन दृष्टिकोन नाहीसा होणे बरोबर नाही. कदाचित मराठीचा चुकेल, इंग्रजीचा चुकीचा दृष्टिकोन असू शकतो, पण भिल्ली भाषेचा योग्य असू शकतो. छोट्या-छोट्या गटांमध्ये जास्त चांगली जीवनदृष्टी असते, असं आपल्याला सिद्ध करता येईल.

हे सांगताना मला लाजही वाटते आहे. माझ्याच देशात खेडोपाडी आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचे धोरण आणि प्रस्थ दोन्ही पसरत आहे. या भाषा जगात इतर अनेक भाषांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या आहेत. उदा. आपल्या देशात भिल्ली भाषा बोलणाऱ्यांची संख्या नेदरलँड्ससारख्या देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. अशी भाषा नाहीशी होणे याचा अर्थ असे अनेक देश नाहीसे होण्यासारखे आहे. तरीही, संस्कृतीसंरक्षक म्हणवणारी सरकारंसुद्धा इंग्रजीला प्रोत्साहन देतात. भारतीय संस्कृतीचं भांडवल करणाऱ्या पक्षांनाही स्वभाषेचं प्रेम नाही, हे आता सिद्ध झालं आहे.

इंग्रजी मातृभाषा नसलेल्या जगातल्या कोणत्याही सुधारलेल्या देशात इंग्रजी वापरत नाही. (सुधारलेल्या देशात मी म्हणतो) मागासलेल्या देशात इंग्रजी वापरतात. जर्मनी, फ्रान्स आणि इटली हे देश सोडा चीन, जपान, कोरिया अशा कुठल्याही सुधारलेल्या देशात इंग्रजीत व्यवहार होत नाही. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानेच वास्तवाचं पूर्ण ज्ञान होतं, या मताचा मी आहे. आपल्याकडे ज्ञान नाहीच. इंग्रजीतून ज्ञान मिळत नाही, मिळते फक्त माहिती. महात्मा गांधी यांनी १९०७ साली ‘हिंद स्वराज’ पुस्तकात लिहिलं आहे की, इंग्रजी शिक्षणानं हिंदुस्थानी प्रजेला गुलाम केलं आहे. आज २०२०पर्यंतदेखील आम्ही इंग्रजीचे गुलाम आहोत. इंग्रजी शिक्षणामुळे आपण कोणत्याच क्षेत्रात उत्तमता मिळवू शकलेलो नाही. इंग्रजी माध्यमांच्या युनिव्हर्सिट्यांमध्येही नाही!

इंग्रजी भारतात येण्याआधी म्हणजे १८१८च्या आधी म्हणजे इंग्रजांचे राज्य येण्यापूर्वी हिंदुस्थानी संस्कृती एक उच्चमूल्यीय संस्कृती म्हणून गणली जात होती. आज इंग्रजी शिक्षणामुळे ती एक निम्नमूल्यीय संस्कृती समजली जाते. एकच भूगोल, एकच इतिहास असलेल्या या उपखंडात सर्व भाषांमधून सर्वसमावेशक हिंदुस्थानी संस्कृतीची महाव्यवस्था हजारो वर्षांपासून विकसित होत आली आहे. मोठमोठ्या साहित्य परंपरा, अनेक अक्षरग्रंथ, अनेक महाकवी श्रीमंत शंकरदेव, अमीर खुसरो, तुलसीदास, कबीर, तुकाराम, मिर्झा गालिब... असे शंभर तरी!

परंतु इंग्रजी वसाहतवादाने निर्माण केलेल्या फाळण्या, धर्मांध चळवळी, असहिष्णू मूल्ये, युद्धखोरी, राष्ट्रवाद आणि प्रवाही लवचीक जातिव्यवस्थेचं जनगणनेद्वारे म्हणजेच खानेसुमारीद्वारे अपरिवर्तनीय कोंडवाडे तयार झाले. या सर्व संस्कृती विनाशक प्रवृत्तींमुळे आपल्या उपखंडाची विशाल महाव्यवस्था खंडीत होत आली आहे. अशा वसाहतवादाच्या वाताहतीनंतर आपण पुन्हा जागतिकीकरणाच्या राक्षसी यंत्रात सापडलो आहोत.

जागतिकीकरण हा युरोपीय वसाहतवादाचा नवा अवतार आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. जागतिकीकरणामुळे युरोप-अमेरिकन पद्धतीची, त्यांनाच परवडेल अशी एकाच प्रकारची आर्थिक, औद्योगिक व्यापारी जीवनशैली गरीब जगातल्या सर्व समूहांवर लादली जाते आहे. शेती हा पाया असलेली जीवनशैली त्यामुळे निश्चित मरणार आहे. शेतकऱ्यांच्या होत आत्महत्या हे त्याचे उदाहरण आहे. यानंतर आपण अनेक फायद्यांचा त्याग करत सांभाळत आणलेली बहुलता (प्युरॅलिझम) आणि विविधता (डायव्हर्सिटी) ही दोन मूल्ये या जागतिकीकरणाच्या लाटेत नष्ट होणार यात शंका नाही. हा विचार संकुचित आणि स्वार्थी मुळीच नाही, तर तो एकूण सृष्टीतल्या विविधतेचं आणि बहुलतेचं रक्षण करणारा आहे. सर्वांच्या कल्याणाचा आहे.

शब्दांकन - सुनील चव्हाण

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 01 January 2020

मस्तं भाषण! नेमाड्यांचा वैचारिक कंपू वेगळा असल्याने मतभेद जरी असले तरी या लेखाशी शंभर टक्के सहमत.
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......