अजूनकाही
१. आपल्या लोकांना पैसा कसा घ्यायचा ते कळत नाही. ते कुठेही सह्या करतात. : महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे
ताई, बरीच माणसं साधी असतात. त्यांना पैसे कसे घ्यायचे, हे तर सोडाच; साधी चिक्की कशी खायची हेही माहिती नसतं. चिक्की दिसते साधी, पण कधी कधी चिवट असते. दाताला चिकटते. दातखीळ बसवते. व्यवस्थित चिक्की खाणं हे येरागबाळ्याचं काम नोहे- तुम्ही कार्यशाळा घ्या आपल्या माणसांच्या आणि शिकवा त्यांना- चिक्की खायला हो! तुम्हाला काय वाटलं?
…………………….…………………….
२. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकामध्ये परत आलेल्या जुन्या नोटांची मोजणी अजूनही पूर्ण झालेली नाही. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर, जुन्या नोटांच्या स्वरूपात किती रक्कम जमा झाली, हे जाहीर केले जाईल, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे.
ही घोषणाही पंतप्रधानच करणार आहेत का राष्ट्राला उद्देशून? बँकांनी नोटा नुसत्या मोजूनच नाही, तर कोणी किती नोटा दिल्या हे कागदपत्रं वगैरे तपासून नोंदवून घेतलं होतं, तर तेव्हाच जमा झालेल्या नोटांची टॅली झाली नाही? नोटा परत परत का मोजाव्या लागतायत? की केंद्र सरकारने दिलेलं 'टार्गेट' पूर्ण न झाल्यामुळे धांदल उडाली आहे?
…………………….…………………….
३. महाराष्ट्रासह देशभरात फोटो काढण्यापुरते हातात झाडू घेणाऱ्या समाजसेवकांची कमी नाही. पण असे समाजसेवक हे थोबाडीत मारण्याच्या लायकीचे असतात. : मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस
मराठीत निव्वळ मोठमोठ्या बाता मारण्यासाठी किंवा काहीतरी सनसनाटी बोलण्यासाठी माइकसमोर येणाऱ्या साहित्यिकांचीही कमतरता नाही; त्यांच्यावर कसला प्रयोग करायचा सबनीससाहेब? इथे आधीच लोक आपल्याला चूक वाटलं ते चूक, असे रामशास्त्री छाप निकाल देऊन हिंस्त्र सांस्कृतिक कारवाया करत फिरतात; त्यांना चिथावण्या कसल्या देताय? त्यापेक्षा आपण हातात झाडू घेऊन आदर्श घालून द्या.
…………………….…………………….
४. नोटाबंदीमुळे बँकेतील पैसे आता बेनामी राहिलेले नाही. पैसे कोणाचे आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
मग आता भारतरत्न घेताय का विभागून? पैसे कोणाचे आहेत हे स्पष्ट होण्यासाठी हा आटापिटा केला होता? त्यातून काय साध्य झालं? किती काळा पैसा उघडकीला आला. देशाने खर्चाची आणि जनतेने मनस्तापाची किंमत मोजली, त्या प्रमाणात यश आलं का या मोहिमेला? त्याबद्दल काही न बोलता पैसे कोणाचे आहेत हे स्पष्ट झाल्याबद्दल पाठ कसली थोपटून घेताय?
…………………….…………………….
५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे महिला आणि मुलांच्या तस्करीचे प्रमाण कमी झाले : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी
तुम्हालाही मुंबईच्या त्याच वर्तमानपत्राचा बातमीदार भेटतो का हो खबरी द्यायला, जो कोणातरी अनाम पोलिस अधिकाऱ्याने चहा पिता पिता मारलेल्या बिना आकडेवारीच्या गप्पांच्या बातम्या करून 'नोटाबंदीमुळे थंडीत वाढ' छापाच्या बातम्या देतो? नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलं म्हणून आम्ही नाचत होतो, तेव्हा नक्षलवाद्यांनी ६०-७० बसगाड्या जाळल्या आणि अतिरेकी कारवाया थंडावल्या म्हणून आनंदलो, तर गेल्या वर्षात सर्वांत जास्त जवान शहीद झाले अशा कारवायांमध्ये. म्हणून विचारलं.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment