पंचवीस डिसेंबरला ख्रिसमस आणि एक जानेवारीला नववर्ष का साजरं केलं जातं?
पडघम - सांस्कृतिक
अलका गाडगीळ
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 31 December 2019
  • पडघम सांस्कृतिक ख्रिसमस Christmas हॅपी ख्रिसमस Happy Christmas मेरी ख्रिसमस Merry Christmas हॅपी न्यू इयर Happy New Year न्यू इयर New Year

१.

‘बायबल’मध्ये जीझसचा जन्म पंचवीस डिसेंबरला झाला असा उल्लेख नाही. माता मेरीने कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात येशूला जन्म दिला, याचाही उल्लेख ‘बायबल’सहित त्या काळातील इतर स्त्रोतात मिळत नाही. पुरातन काळात येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ख्रिश्‍चन साजरा करत नव्हते.

पंचवीस डिसेंबरला ख्रिसमस का साजरा केला जातो, ही प्रथा कधीपासून सुरू झाली, यासंबंधीचे वेगवेगळे दावे समोर येतात. www.religionfacts.com या संकेतस्थळावर ख्रिसमससंबंधातील वेगवेगळे दावे आणि त्या काळच्या उपलब्ध स्त्रोतातून पुढे आलेली माहितीही मिळते.

ज्ञात इतिहासानुसार सन २००मध्ये सहा जानेवारी या दिवशी ख्रिस्तजन्म प्रथम साजरा केला गेला. सहा जानेवारी का? उत्तर मिळत नाही. सहा एप्रिल रोजी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवलं गेलं. थोर पुरुषांचा त्यांच्या जन्मतारखेलाच मृत्यू होतो, असा समज त्या काळी प्रचलित होता, हे कारण असू शकतं.

चौथ्या शतकाच्या मध्यावर पंचवीस डिसेंबरला ख्रिसमस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. हा निर्णय कोणी घेतला? काही वृतान्तानुसार पोप यांनी हा निर्णय घेतला असं नोंदवलं आहे. पण इतर काही नोंदींमध्ये हा उल्लेख सापडत नाही.

प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ जेम्स जॉर्ज फ्रेझर यांच्या ‘The Golden Bough’ या पुस्तकात ख्रिसमस पंचवीस डिसेंबरला का साजरा केला जातो, या विषयीची रोचक माहिती मिळते. हे पुस्तक १८९० साली प्रकाशित झालं. दोन वर्षांनंतर त्याची नवी आवृत्ती ‘The Golden Bough : A Study in Magic and Religion’ या नावाने प्रसिद्ध झाली. हे पुस्तक म्हणजे धर्म आणि मानववंशशास्त्र यांचा तुलनात्मक अभ्यास आहे. ज्ञात परंपरांचा सांस्कृतिक अंगाने यात मागोवा घेतला आहे.

१९२० सालच्या आवृत्तीत फ्रेझर म्हणतात- ‘ख्रिस्त धर्मातील अनेक सण पेगन (खुल्या धर्मातील) परंपरेतील आहेत. इस्लामपूर्व सिरिया आणि इजिप्तमध्ये पंचवीस डिसेंबरला सूर्यजन्माचा सण साजरा केला जात असे. म्हणून सहा जानेवारी या ख्रिसमसच्या तिथीमध्ये बदल करून ती पंचवीस डिसेंबर करण्यात आली असावी. सूर्यजयंतीच्या दिवशी घराघरांत आणि सार्वजनिक स्थानांवरही दिव्यांची रोषणार्इ केली जायची. गावभर जत्रेसारखं वातावरण असायचं. ख्रिस्ती लोकही या सणात हिरिरीने भाग घेत असत. चर्चने याची दखल घेतली आणि पंचवीस डिसेंबरला ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्याचा पायंडा पाडला.’

सहा जानेवारी हा दिवस ‘एपिफनी’ साजरा करण्यासाठी निश्‍चित करण्यात आला. बाळख्रिस्ताला नजराणे आणणारे तीन मागी (पुजारी) सहा जानेवारी रोजी त्यांना भेटले, तो दिवस म्हणजे ‘एपिफनी’. नंतर सूर्यजयंती ते सहा जानेवारी या बारा दिवसाच्या कालावधीत ख्रिसमस साजरा केला जाऊ लागला.

‘पंचवीस डिसेंबरचा पवित्र दिवस पेगन लोकांसारखी मौजमजा जरूर करा, पण ती सूर्यदेवासाठी न करता ख्रिस्तासाठी करा’, असं सेंट ऑगस्टीन यांनी लिहून ठेवलं आहे. ऑगस्टीन हे चौथ्या शतकातील निओप्लॅटोनिक ख्रिश्‍चन धर्मअभ्यासक होते. ख्रिस्तजन्मापूर्वीच्या चौथ्या शतकातील ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोच्या संकल्पनांचा प्रभाव पुढे अनेक शतकं कायम राहिला.

जगभरातील कालगणनेच्या संज्ञेत बदल करण्यात आला आहे. इसवीसन पूर्व आणि इसवीसनोत्तर असं म्हणण्याऐवजी आता Before Common Era – BCE (सार्वजनिक कालगणनेपूर्वी) आणि Common Era – CE (सार्वजनिक कालगणना) या संज्ञा वापरल्या जातात. ख्रिश्चॅनिटीला केंद्रस्थानी ठेवून केल्या जाणाऱ्या कालगणनेला अनेकांचा विरोध होता.

‘नवसूर्याच्या जन्मामुळे ख्रिसमसला चैतन्य मिळतं’ या त्या काळच्या समजुतीला खिस्ती धर्मप्रमुखांनी आक्षेप घेतला होता. ख्रिस्त हाच खरा सूर्य आहे असं चौथ्या शतकात फादर आंब्रोज यांनी लिहून ठेवलं आहे. आरंभीच्या काळातील ख्रिश्‍चन धर्मपीठं सनावळ्या आणि तारखांमध्ये गुंतलेले नव्हते. पण सूर्यजन्माचा सण म्हणजे देवाने पेगन देवतांना नाकारून जीझसची निवड केली आहे, अशी मांडणी केली जाऊ लागली. तसंच पंचवीस डिसेंबरच्या सूर्यजयंतीच्या सणाचं रूप बदलून तो नीतीमान आणि सदाचरणी सूर्य दुसरा-तिसरा कोणी नसून जीझसच आहे, ही समजूत रूढ करण्यात चर्चला यश आलं.

पण फ्रेझर म्हणतात- ‘पेगन परंपरांकडून कोणतेही सण उसने घेतलेले नाहीत असा सूर चौथ्या शतकातील दस्तावेजांमधून दिसून येतो. पण बाराव्या शतकांत यासंबंधीचा अभ्यास सुरू झाला आणि त्या काळात लिहिलेल्या दस्तावेजांत पेगन लोकांच्या सणाची आणि ख्रिस्तजन्माच्या  तारखेच्या दुव्याची नोंद घेतली गेली.’

दुसऱ्या शतकांतही ख्रिस्तजन्माची तारीख निश्चित करण्यात रस होता, पण त्यासंबंधात एकवाक्यता होत नव्हती. चौथ्या शतकातील ख्रिसमसच्या दोन नोंदी सापडतात. रोमन साम्राज्यात ख्रिसमस पंचवीस डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला आणि आशिया मायनरमध्ये सहा जानेवारीला. उत्तरोत्तर पंचवीस डिसेंबर हा दिवस रूढ होऊ लागला आणि सहा जानेवारीला ‘फीस्ट ऑफ एपिफेनी’चा सण म्हटलं गेलं.

आर्मिनियातील चर्च मात्र आजही ख्रिसमस सहा जानेवारीलाच साजरा करतं. पंचवीस डिसेंबर आणि सहा जानेवारी या दोन तारखांमधील १२ दिवसांचा काळ ‘बारा दिवसांचा ख्रिसमस’ म्हणून तिथे साजरा केला जातो.

चौथ्या शतकातील रोमन सनावळ्यांत वेगवेगळ्या ख्रिश्‍चन धर्मगुरूंचे मृत्युदिन नोंदवले गेले आहेत आणि त्यासोबत पंचवीस डिसेंबर ही तारीख जीझसचा जन्मदिवस म्हणून नोंदवली गेली आहे. ख्रिस्तजन्माच्या तीनशे वर्षांनंतर त्याचा जन्मदिवस साजरा केल्याची नोंद झाली.

२.

ख्रिसमस आला की, सांताक्लॉजची आठवण आल्याशिवाय राहात नाही. ‘सेंट निकोलस सेंटर’ या वेबसाईटवरील ‘डिस्कव्हरींग द ट्रूथ अबाउट सांताक्लॉज’ या विभागात त्याच्यासंबंधातील दंतकथा सापडतात. सांतांचं मूळ नाव निकोलस होतं. काळ तिसऱ्या शतकातला आणि प्रदेश ग्रीस-तुर्कस्थानच्या सीमेवरचा. या सीमावर्ती भागातील ‘पटारा’ या खेड्यात निकोलस राहत होते. त्याचे आई-वडील तो लहान असतानाच वारले, काकाने त्याचा सांभाळ केला. काकांची सर्व संपत्ती निकोलसला मिळाली. नंतर त्याने ख्रिश्‍चन धर्माची दीक्षा घेतली आणि आपली संपत्ती गरजूंना दान करण्यास सुरुवात केली. आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या निराधार मुलांना आधार आणि आसरा दिला.

त्या काळातील ख्रिश्‍चन जनतेला धार्मिक छळाला तोंड द्यावं लागत होतं. ‘आशिया मायनर’वर रोमन सम्राटांचं आधिपत्य होतं. त्यांनी ख्रिश्‍चॅनिटीच्या प्रसाराला कडवा विरोध केला होता. अनेक धर्मगुरूंना रोमन साम्राज्याने फासावर चढवलं. नव धर्मांतरितांवर अत्याचार केले. पण लवकरच म्हणजे सन ३१३मध्ये रोमन सम्राटांनी ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला आणि जनतेचंही धर्मांतर झालं. ख्रिश्‍चॅनिटी हा रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म झाला.

रोमन अधिकाऱ्यांनी निकोलसचाही छळ केला होता. आत्यंतिक हिंसेमुळे त्यांचा मृत्यू झाला असं बोललं जातं. त्यांचं शरीर एका चर्चच्या आवारात पुरलं गेलं. काही दिवसांनी त्यांच्या कबरीवर ‘जादूचा’ दगड निर्माण झाला, इच्छापूर्ती करणारा दगड.

पण निकोलसचं लाल सूट, पांढरी दाढी आणि फर कॅपमधील ‘सांताक्लॉज’मध्ये रूपांतर कसं झालं? ‘सेंट निकोलस सेंटर’नुसार युरोपात त्यांचा संत निकोलस म्हणून गौरव होत राहीला. युरोपातून, विशेषत: नेदरलँडमधील काही निर्वासित अमेरिका खंडात स्थलांतर करू लागले. त्यांनी सेंट निकोलसच्या दंतकथा आपल्यासोबत नेल्या. नवीन खंडात स्थायिक झाल्यावर त्यांनी बांधलेलं पहिलं चर्च सेंट निकोलसला समर्पित केलं. त्यासाठी मूर्तिकारांकडून सेंट निकोलसची मूर्ती घडवून घेतली. अशा प्रकारे सेंट निकोलसचं अमेरिकन रूप अस्तित्वात आलं. चर्चच्या चिमणीवरून निकोलस अनेक भेटवस्तू घेऊन उतरतो आहे, असं चित्र आणि शिल्प चितारण्यात आलं होतं. 

१८२१मध्ये उडणाऱ्या रेनडियरच्या गाडीतून ‘चिल्ड्रेन्स फ्रेंड सांताक्लॉज’ येत आहे, असं चित्र अमेरिकेतील पहिल्या लिथोग्राफिक पुस्तकात चितारण्यात आलं होतं. या सांताक्लॉजकडे असंख्य भेटवस्तू होत्या. छपाई तंत्राचं सार्वत्रीकरण झाल्यानंतर निकोलस उर्फ सांताक्लॉजची कहाणी आणि चित्रं घरोघरी पोचली आणि ‘सांताक्लॉज’ या आधुनिक दंतकथेची निर्मिती झाली. पुढे अमेरिकन मार्केटिंग मशिनरीमुळे सांताक्लॉजची दंतकथा आणि त्यासोबतची उत्पादनं जगभर पोचली.

३.

खिसमस संपल्यावर नववर्ष सुरू होतं आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला नवीन वर्ष सुरू होतं. पण हे कोणी ठरवलं? प्राचीन रोमन संस्कृतीत याचं उत्तर सापडतं. एक जानेवारीला नववर्ष मानण्याची परंपरा रोममध्ये होती. जानेवारी या नावाचं मूळ जॅनस या रोमन देवतेमध्ये सापडतं. जॅनसला दोन तोंडं होती. मागील तोंडाने तो मागे म्हणजे भूतकाळात पाहतो आणि पुढील तोंडाने तो भविष्याकडे पाहतो, असं मानलं जातं.

सन ४५ या वर्षी एक जानेवारीपासून वर्ष सुरू होण्याची अधिकृत पद्धत रोमन साम्राज्यात रूढ झाली. पण जगभरात ॠतूमानाप्रमाणे कालगणना करण्याची परंपरा होती. उत्तर गोलार्धातील देशांसाठी एक जानेवारी योग्य दिवस होता, कारण त्या तारखेपासून उत्तर गोलार्धात दिवस मोठा होत जातो.

भारतीय उपखंडातील वर्षं वसंत ॠतूत सुरू होतं. पर्शिया आणि इजिप्तमध्ये वीस सप्टेंबरला वर्ष सुरू होत असे, कारण त्या भागात रात्र आणि दिवस समान असण्याचा तो दिवस होता.

जागतिक पातळीवरील व्यवहारांसाठी जानेवारी हा वर्षाचा पहिला महिना मानला जाण्याचा प्रघात वसाहतवादामुळे सोळाव्या शतकांत सार्वत्रिक झाला.

धर्म, धर्मांतरं, वसाहतवाद, आधुनिक मार्केटिंग आणि जनसंपर्क-जाहिरात तंत्रांमुळे कालगणना, संस्कृती, परंपरा आणि सण साजरे करण्याच्या पद्धतीतही मोठा फरक पडत आहे.

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 01 January 2020

माहितीपूर्ण लेख! धन्यवाद !!
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......