नोव्हेंबर-डिसेंबर : सर्वाधिक वाचल्या गेलेल्या १० लेखांची झलक
संकीर्ण - वर्षाखेर विशेष
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 30 December 2019
  • संकीर्ण वर्षाखेर विशेष

नोव्हेंबर २०१९

१) ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही आता शरद पवारांची जबाबदारी आहे! - अमेय तिरोडकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3786

याक्षणी महाराष्ट्र शरद पवारांसोबत आहे. आणि ही शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस अशी तडजोड व्हावी ही महाराष्ट्राची इच्छा आहे. पवारांच्या चाणाक्ष मनाने ही इच्छा ओळखलीय आणि म्हणूनच बात इतनी दूर गयी है. 

या सगळ्या तडजोडीचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्र हा निव्वळ भौगोलिक प्रदेश नाही. तर वेळोवेळी आपली जबाबदारी ओळखून देशाच्या हितासाठी सर्वात पुढे उभा राहणारा आणि परिवर्तनाचा विचार कृतीतून देणारा हा प्रदेश आहे. हा या भूमीचा इतिहास जसा आहे, तशी ती जबाबदारी, कर्तव्यसुद्धा आहे. 

मुजोरांच्या विरोधात सर्वस्व पणाला लावून उभं राहण्याची जोखीम उचलणं आणि इतरांना त्यासाठी प्रेरणा देणं हे काम महाराष्ट्र काल आज नाही, तर या पेशावर ते चित्तगाव आणि इटानगर ते सोमनाथपर्यंत पसरलेल्या भूमीवर मागची तब्बल दोन हजार वर्षं करत आलाय. आज पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र येऊन तेच करायची वेळ आलीय. शरद पवार या सगळ्या घडामोडींचे कर्ते करविते आहेत. आज संपूर्ण देशात ज्या क्षमतेने पवार उभे राहिलेत आणि ज्या तडफेनं त्यांनी लढावं कसं हे दाखवून दिलंय त्याचं कौतुक आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं हे राजकारण जमलं पाहिजे, वाढलं आणि बहरलं पाहिजे. ती या देशाची आता सर्वात महत्त्वाची गरज आहे!! 

देशाच्या गरजेला धावून जाणं हाच महाराष्ट्र धर्म आहे! याक्षणी शरद पवार ही या महाराष्ट्र धर्माची आयडेंटिटी आहेत!!! 

२) ‘शिवाजी कोण होता?’प्रमाणे ‘असा होता टिपू सुलतान’ घराघरात पोहचवायला हवे! - शीतल चव्हाण

https://www.aksharnama.com/client/article_detail/3788

इतिहासाचं आणि महापुरुषांच्या चरित्राचं विकृतीकरण करून धार्मिक ध्रुवीकरण करत भावनेचं राजकारण केलं जात आहे. अशा काळात सरफराज अहमद यांचं टिपू सुलतानाचा खरा इतिहास मांडून सांस्कृतिक दहशतवादाला सुरुंग लावणारं ‘असा होता टिपू सुलतान’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं, ही मोठी आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवरायांना ‘मुसलमानांविरुद्ध लढणारा हिंदू राजा’ अशा प्रतिमेत अडकवून त्यांची रयतेच्या कल्याणकारी स्वराज्याची व्यापक संकल्पना झाकली गेली. तद्वतच टिपूलाही हिंदूद्वेष्टा, माथेफिरू अन मूलतत्त्ववादी ठरवून बदनाम केलं गेलं.

टिपूचं मूळ धर्मसहिष्णू, अभ्यासू, इंग्रजी वसाहतवादाचे भयानक परिणाम ओळखून त्याला भारतातून हुसकावून लावण्यासाठी पराक्रमाची पराकाष्टा करणारं, शोषणावर आधारित इंग्रजी व्यापार व उत्पादनपद्धतीला पर्याय म्हणून सहकारी - समाजवादी तत्त्वावर आधारित अन तंत्रज्ञानाची जोड असलेली नवी उत्पादन व्यववस्था आणणारं, शिक्षण - शेती अन उद्योगधंदे याबाबत कमालीची दूरदृष्टी असणारं, जगातील अनेक प्रकारच्या प्रशासकीय व्यवस्थेचा अभ्यास करून लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था उभी करणारं, शेती क्षेत्राला मुबलक सिंचन व्यवस्था पुरवून शेती क्षेत्राला पूरक व्यवसाय/ व्यापाराला चालना देणारं व्यक्तिमत्त्व झाकून ठेवण्यात आलं.

३) ‘अयोध्या निकाल’ हा हिंदुत्ववाद्यांची दुष्कृत्ये उघड करणारा निकाल आहे! - अभिजित देशपांडे

https://www.aksharnama.com/client/article_detail/3787

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच, ९ नोव्हेंबर २०१९ रोजी बाबरी मशीद-रामजन्मभूमी प्रकरणातील जमिनीचा वादंग या खटल्यावरील आपला ऐतिहासिक निर्णय दिला.

या निकालाला एका बाजूला कायदेशीरपणाची किचकट पार्श्वभूमी आहे, दुसऱ्या बाजूला काही सिद्ध होऊ शकणारा नि बराचसा सिद्ध होण्याच्या पलीकडचा इतिहास आहे. धार्मिक श्रद्धांचे अतार्किक दावे आहेत. आणि धार्मिक व राजकीय चढाओढीचे गटातटांचे, पक्षोपक्षांचे राजकीय आखाडे आहेत. याविषयी आपले काही जाणते मत बनवायचे तर हे मूळातून समजावून घेणे अगत्याचे आहे.

सर्वोच्च न्यायालयातील प्रस्तुत खटल्याची चौकट जमिनीचा वादंग एवढीच असली, तरी न्यायालयाने त्याही पलीकडे जाऊन प्रसंगी खटल्याच्या परिघाबाहेरचे मुद्दे व वरील सर्व गुंतागुंत लक्षात घेऊन याविषयीचा निकाल दिला असल्याचे दिसते. (परिणामी काही गंभीर चुका व त्रुटीही या निकालात झाल्या आहेत.) तरीही हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने व्यापक समाजहित डोळ्यासमोर ठेवून निकाल दिल्याचे दिसते. अंतिमत: त्यातून समन्वयाची भूमिकाच न्यायालयाने अधोरेखित केली आहे.

४) नक्षलग्रस्त भागातील १७व्या लोकसभा निवडणुकीचा प्रत्यक्ष अनुभव - चेतन शेलोटकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3753

आज आपल्या देशासमोर आतंकवाद, नक्षलवाद, उग्रवाद, प्रांतवाद, अस्मितावाद, टोकाची धर्मांधता आणि जातीयवाद अशी बरीच धगधगती आव्हाने असताना के‌वळ ‘मी आणि माझे बरे’ असे म्हणत आपण संकुचित झालोय का? विशेषत: आजची तरुण पिढी ज्यांच्यासाठी ‘मंडे टू सॅटरडे’ फक्त नोकरी आणि विकेंडला नुसती करमणूक एवढेच जीवनाचे समीकरण झालेय. त्यापलीकडे त्यांना विचार करण्याची इच्छाच होत नाही. मला आश्चर्य वाटते की, थेट प्रश्नाला कुणीच का हात घालत नाही? आपले समाजभान कुठे आहे? वास्तविकता काय आहे? असे विविध प्रश्न पडतात. खरेच आपल्यातली संवेदनशीलता कमी होत चालली आहे? देशाची आंतरिक सुरक्षा, आतंकवाद, नक्षलवाद आणि इतर ज्वलंत आव्हाने जाणून घेणे एक सजग आणि जागरूक नागरीक म्हणून आपले कर्तव्य आहे.

देशाच्या आंतरिक सुरक्षेसाठी काम करताना बरीच बंधने येतात. एक जबाबदार अधिकारी म्हणून खूप सावध राहावे लागते. अतिदुर्गम भागात सदैव तत्पर राहावे लागते. पदोपदी तीव्र जोखीम, खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी असल्याने प्रचंड तणाव असतो. एक न संपणारा संघर्ष चालू असतो. हे सगळे पेलत स्वत:ला कलावंत जिवंत ठेवण्याची तगमग, धडपड चालू असते. आतापर्यंतच्या प्रवास प्रत्येक वळणाने मला एक नवे आयुष्य दिले, नवी वाट दाखवली. खूप काही करण्याच्या उमेदीने आयुष्य श्रीमंत झाल्यासारखं वाटते!

५) RCEP या मुक्त व्यापार कराराला होणारा विरोध का? तो किती योग्य वा अयोग्य आहे? - सागर वाघमारे

https://www.aksharnama.com/client/article_detail/3768

८०-९०च्या दशकात जपानमध्ये उत्पादित वस्तूंची आवक अमेरिकेत मोठ्या प्रमाणात होत होती, तेव्हा विरोध करणारे जे युक्तिवाद करत होते, तेच युक्तिवाद आज आरसेपला विरोध करणारे करत आहेत. चिनी वस्तूंनी गेल्या २० वर्षांत अमेरिकेसारखी मोठी बाजारपेठ काबीज केली. आज अमेरिकन राजकारणी मुक्त व्यापाराविरोधात तेच युक्तीवाद देत आहेत, जे युक्तीवाद ते जपानी वस्तूंची आवक अमेरिकेत वाढत होती त्यावेळी करत होते. तात्पर्य- मुक्त व्यापार करारातील स्पर्धेमुळे आपले उद्योगधंदे बंद पडतील, बेरोजागी वाढेल वगैरे जे भीतियुक्त युक्तीवाद केले जात आहेत, त्यावर विश्वास ठेवण्यास कोणताही ठोस पुरावा नाही. मुक्त व्यापारामुळे एका क्षेत्रात झालेला तोटा देशातील इतर क्षेत्रांना झालेल्या फायद्याने भरून काढता येतो. आरसेपमुळे होणाऱ्या तोट्यांपेक्षा फायदेच जास्त आहेत, फक्त भावनिक राजकारण करणाऱ्यांपासून आपण सावध राहिले पाहिजे!

अर्थशास्त्राचा जनक अॅडम स्मिथने ‘Wealth of Nations’ या आपल्या जगप्रसिद्ध ग्रंथात मुक्त व्यापारामध्ये  ग्राहक, व्यापारी, उद्योजक या सगळ्यांचाच आर्थिक फायदा होतो आणि सगळ्यांचेच राहणीमान उंचावते असे म्हटलेले आहे. त्यामुळे सर्वसमावेशक हितासाठी आरसेपसारख्या मुक्त व्यापार करारांना समर्थन देणे गरजेचे आहे.

.............................................................................................................................................

डिसेंबर २०१९

) पा रंजित  : ‘आंबेडकरवादाला सिनेमात आणणारा कलाकार - मिलिंद कांबळे

https://www.aksharnama.com/client/article_detail/3855

‘कास्टलेस कलेक्टिव्ह’ हे पा रंजितचं सर्वांत महत्त्वाचं योगदान आहे असं मी मानतो. अमेरिकेत जी क्रांती झाली, तिथं संगीतानं महत्त्वाचा रोल निभावला. आपल्या महाराष्ट्रातही तेच झालं. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी, समतेची गाणी यामुळे बरंच प्रबोधन झालं आहे.) तामिळनाडूमध्ये कास्टलेस कलेक्टिव्ह या मुसिकल बँड तयार झाला. हे नाव तामिळनाडूमधल्या एका जुन्या जातीविरहित चळवळ ‘जाती इलाधा तामीझारगल’पासून प्रेरित आहे. या चळवळीत दलितांना त्याची नोंदणी करताना जात काढून टाकायचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याचीच पुढची आवृत्ती म्हणजे कास्टलेस कलेक्टिव्ह! या वर्षी जानेवारीमध्ये त्याचा एक पॉवरपॅक शो झाला. जबरदस्त प्रतिसाद होता त्यासाठी. काल-परवा एका पुरस्कार सोहळ्यामध्येसुद्धा त्यांनी परफॉर्म केलं. या उपक्रमातील कलाकार उत्तर मद्रासमधील कष्टकरी, कामगार शोषित, दलित अशा वर्गातून आलेले आहेत. ‘कास्टलेस कलेक्टिव्ह’ पुढे जाऊन खूप मोठा उपक्रम होणार आहे, यात वाद नाही.

२) सध्या तरी मी निखिलचा नंबर ‘‘निखिल ‘मन्नत’ महाजन’’ म्हणून सेव्ह केलाय! - अमोल उदगीरकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3850

निखिल या इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्षं आहे, पण तो अजूनही या ‘परिवारा’चा भाग नाही. हे किती अवघड असतं हे इथं काम करणारा कुणी पण सांगू शकेल. ‘पुणे ५२’ ज्याने डायरेक्ट केला आहे, त्या माणसाला प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या unapologetic व्यावसायिक सिनेमाबद्दल प्रचंड जिव्हाळा आहे.

एरवी प्रचंड कुल असणारा माणूस कधीकधी खूप क्रूर आणि कठोर होऊ शकतो. एखाद्याला धुळीस मिळवायचं ठरवलं तर निखिल ते करतोच. एखाद्यावर शाब्दिक चढ चढ चढणारा निखिल बघितला तर तुमच्या पायातली हवा जाऊ शकते. मला निखिलच्या या बाजूची जाम भीती वाटते. पण असंही वाटतं की, एकाच वेळेस अनेक निर्मितीच्या वेळेस डिपार्टमेंट  सांभाळताना, शेकडो लोकांची पीपल मॅनेजमेंट करताना माणसाला काही प्रमाणात आक्रमक असणं भागच असावं. त्याशिवाय हा जगन्नाथाचा रथ हलवणं अवघड असावं.

३) डॉ. श्रीराम लागू आणि विजय तेंडुलकर : दोन दिग्गज, एक सामना - राम जगताप

https://www.aksharnama.com/client/article_detail/3878

डॉ. श्रीराम लागू आणि विजय तेंडुलकर. एक प्रख्यात रंगकर्मी, चित्रपट अभिनेते आणि बुद्धिप्रामाण्यवादी; तर दुसरे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटककार, चित्रपट-कथा-पटकथाकार. दोघेही आपापल्या क्षेत्रातले दिग्गज. त्याचबरोबर सामाजिक संघटना, चळवळीमध्ये हिरिरीने भाग घेणारे, पुढाकार घेणारे, आपल्याला पटलेल्या, योग्य वाटलेल्या भूमिका ठोसपणे मांडणारे, त्याविषयी परखडपणे बोलणारे. त्यामुळे कर्तृत्वाबरोबरच आपल्या वक्तृत्वानेही सतत चर्चेत राहिलेले, राहत आलेले…

डॉ. लागू आणि तेंडुलकर एकाच क्षेत्रात कार्यरत असले, तरी त्यांच्या मूळ भूमिका पूर्णपणे भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यात काही प्रश्नांबाबत मतभेद असणे साहजिक आहे. तेंडुलकर जगण्यावर प्रेम करतात. ‘लिहिण्यापेक्षा जगणं महत्त्वाचं आहे’ असं म्हणतात. जगण्याविषयीची उत्कट ओढ त्यांना हेलावून टाकते. त्यामुळे ते माणूस, त्याचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या जगण्याचे बारीकसारीक पापुद्रे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतात. डॉ. लागूंचे तसे नाही. ते माणसाकडे बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीने पाहतात. माणसाने सतत उत्क्रांत होत राहिले पाहिजे, प्रगत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे म्हणतात. त्यासाठी त्याने बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी झाले पाहिजे असे सांगतात. त्यासाठीच ते ‘परमेश्वराला रिटायर’ करायला सांगतात. कारण ‘तोपर्यंत आपण समाज म्हणून उभे राहू शकणार नाही’ असे त्यांना वाटते.

४) देवेंद्र फडणवीसांचे ‘अधिक’ आणि ‘उणे’ - प्रवीण बर्दापूरकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3849

तेव्हा मंत्री असलेल्या गणेश नाईक यांनी शिवसेना सोडताना केलेल्या टीकेला उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ‘जे कालपर्यंत प्रेम करत होते, पाया पडत होते, ते माझा आज एवढा तिरस्कार का करू लागले?’, असा प्रश्न विचारला होता, याचं स्मरण सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी तुफान टीका आणि पक्षांतर्गत कथित उठाव पाहून आठवला. महिना-सव्वा महिनाभरापूर्वीपर्यंत ज्यांच्यावर ‘महाराष्ट्र भाजपचा आधारस्तंभ’ म्हणून स्तुतीसुमने उधळली जात होती, ज्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रभावी नेतृत्व म्हणून पहिलं जात होतं, त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आत्ताच्या घडीला जोरदार टीकेची राळ उठली आहे, समाजमाध्यमांवर तर अत्यंत तिरस्करणीय भाष्यं केली जात आहेत. महाराष्ट्राचा ‘अयशस्वी मुख्यमंत्री’ असा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असं जे म्हटलं जातं, ते हेच आहे. 

५) ‘नागरिकत्व (संशोधन) विधेयक’ पारित होवो-न होवो, ईशान्येकडील परिस्थिती अधिकाधिक स्फोटक होण्याची चिन्हे आहेत. NRCमध्ये समावेश न झालेल्यांचे भवितव्य अधांतरी आहे - परिमल माया सुधारकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3840

प्रस्तावित नागरिकत्व (संशोधन) विधेयक पारित होवो अथवा न होवो, आसाम व ईशान्येकडील राज्यांतील परिस्थिती अधिकाधिक स्फोटक होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीपत्रात अद्याप समावेश न झालेल्या व्यक्तींचे भवितव्य अधांतरी लोंबकळलेले आहे. अशा व्यक्तींना लवकरात लवकर त्यांच्या मूळ देशात, म्हणजे बांगलादेशात, पाठवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सक्त निर्देश आहेत. मात्र, यापैकी सर्वांना बांगलादेशने आपल्या देशांत स्वीकारण्याची शक्यता जवळपास नाही. जरी ओळख पटलेल्या घुसखोरांना बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया किमान मागील दीड दशकांपासून अव्याहतपणे सुरू आहे, तरी एवढ्या मोठ्या संख्येने या लोकांना स्वीकारणे  बांगलादेशसाठी अशक्यप्राय काम आहे. या दृष्टीने भारत सरकारने अद्याप बांगलादेशशी अधिकृत बोलणीसुद्धा सुरू केलेली नाही. एका मोठ्या मूलभूत मानवी अधिकाराच्या समस्येकडे आपण वाटचाल करतो आहे, ज्याचे परिणाम दूरगामी होणार आहेत.

प्रस्तावित विधेयकाच्या माध्यमातून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला बांगलादेशातून आलेल्या मुस्लिमांना आणि ज्यांची भारतीयत्वाची ओळख राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीपत्राच्या प्रक्रियेत फेटाळण्यात आली आहे, अशा मुस्लिमांना (ते बांगला देशातून आलेले नसतीलही) राष्ट्र-राज्य विहीन करायचे आहे. इस्त्राईलने जे फिलीस्तीनी मुस्लिमांसोबत केले, म्यांमारने जे रोहिंग्या मुस्लिमांसोबत केले तशीच प्रक्रिया भाजपाला आसाम, बंगाल व ईशान्येकडील मुस्लिमांसोबत (त्यात बांगलादेशातून आलेले व न आलेले या दोन्ही प्रकारचे मुस्लीम असतील) करायची आहे, हे स्पष्ट होते आहे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......