सप्टेंबर-ऑक्टोबर : सर्वाधिक वाचल्या गेलेल्या १० लेखांची झलक
संकीर्ण - वर्षाखेर विशेष
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 30 December 2019
  • संकीर्ण वर्षाखेर विशेष

सप्टेंबर २०१९

१) तू अशी गेलीस, त्यासाठी तुला कधीच माफ करणार नाही! - दिशा महाजन

https://www.aksharnama.com/client/article_detail/3659

तू मला निर्णयक्षम बनवलंस, पण मृत्यूच दु:ख कसं सहन करायचं हे नाही शिकवलं. तू मला सांगत गेलीस की, तू गेल्यानंतर काय practically आणि legally करायचं, पण तीन-चार महिन्यांनंतर एकटेपणाचं काय करावं हे कोण सांगणार? रोज रात्री घरी आल्यावर माझी पांचट बडबड कोण ऐकणार? माझी वर्गमित्रांशी होणारी भांडणं कोण ऐकणार आणि फुकटचा उपदेश कोण करणार?

माझ्या आयुष्यात पुढे येणारे खूप मोठे milestone तू मिस करणार आहेस. मला दिलेली वचनं तू मोडत आहेस आणि मी तुला केलेली प्रॉमिसेस पूर्ण करण्याची संधीपण गमावली आहेस. लोकांना जळी-स्थळी-काष्ठी देव दिसतो, तसं मला किस्से आणि घटनांमध्ये तू दिसतेस आणि विरून जातेस. तू अशी गेलीस त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. पण तू मला दिलेल्या निर्णयक्षमतेच्या ताकदीसाठी तुला ही एक चूक माफ.

२) इम्तियाज जलील स्वत:च्या हिमतीवर ‘राजकीय नेता’ झाला... उसने कर दिखाया! - भक्ती चपळगावकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3618

औरंगाबादचे नवे खासदार ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील हे मूळचे पत्रकार. एनडीटीव्हीसाठी ते काम करायचे. ते पत्रकारिता करत असताना प्रस्तुत लेखिकाही औरंगाबादमध्ये पत्रकारिता करत होती. नंतर जलील कामानिमित्त पुण्याला गेले, तर लेखिका मुंबईला. त्यानंतर बराच काळ त्यांचा काही संपर्क नव्हता. काही दिवसांपूर्वी औरंगाबादला गेल्यावर लेखिकनं आपल्या या जुन्या मित्राची मुद्दाम भेट घेतली. तेव्हा त्यांना काय जाणवलं? खासदारकीचा डामाडौल? की लोकांसाठी काम करणारा तळमळीचा खासदार? सर्वसाधारण आमदार, खासदार यांचं वागणं, बोलणं जगणं आणि जलील यांचं वागणं, बोलणं, जगणं यात त्यांना कमालीचा फरक जाणवला. त्यांच्या त्या भेटीची हकिकत...

३) हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणाचा दुर्लक्षित इतिहास - कलीम अजीम

https://www.aksharnama.com/client/article_detail/3627

रझाकारांच्या अत्याचारांवर भरभरून लिहिले गेले. पण त्याच वेळी हिंदूंनी मुसलमानांवर केलेल्या हल्ल्याचा इतिहास पडद्याआड राहिला. आजही या घटना स्मरून अनेक वृद्धांच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर भीती दाटून येते. आजही ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. न्याय मिळण्याच्या आशेत ते आपले हुंदके रोखून बसले आहेत.

गेल्या ७० वर्षांपासून मुस्लीमद्वेषाच्या चाऱ्यावर सत्ताधारी वर्ग निवडणुकांतील मतांची पीककापणी करत आहे. प्रतिगामी व कथित पुरोगामी म्हणवणारे राजकीय पक्षदेखील मुस्लिमांच्या मृतदेहाची पायरी करून त्यावर सत्तेचं शिखर सर करत आहेत. पोटापाण्याची भूक भागवण्यासाठी धडपडत असलेल्या मुसलमानांच्या शत्रूकरणासाठी इतिहासपुरुषांना वापरले जात आहे. जो सामान्य माणूस या रचित इतिहासाचा कधीही भाग नव्हता, तो आणखी किती दिवस इतिहासातील कथित पात्रामुळे छळला जाणार आहे?

४) लांडग्याचा ‘कुत्रा’ झाला, तो कुत्रा ‘माणसाळला’, त्याचा माणसाला प्रचंड ‘फायदा’ झाला, त्या गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट! - सौरभ नानिवडेकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3598

‘कुत्रा’ सगळ्यात पहिला माणसाळलेला प्राणी, माणसाळलेला एकमेव मोठा मांसभक्षक, माणसाचा सगळ्यात चांगला मित्र.

आत्ता अस्तित्वात असणारा लांडगा (grey wolf, canis lupas) हा आत्ताचा आपल्या कुत्र्याचा सगळ्यात जवळचा भाईबंद. इतका की दोन्ही मिळून healthy offspring तयार करू शकतात. काही शास्त्रज्ञांच्या मते कुत्रा हा लांडग्यापासूनच उत्क्रांत झाला. एक विचार असाही आहे की, लांडगा आणि कुत्रा हे दोन्ही एकाच पुरातन पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत. लांडग्याचं कुत्र्यात रूपांतर होण्याचा तो माणसाळण्याचा काळ ३०,०००-१५,००० इतक्या वर्षांपूर्वीच्या कालखंडातला असावा.

५) कविता महाजन प्रथम स्मृतिदिन विशेषांकाच्या निमित्ताने… - संपादक अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/3660

किरकोळ आजाराचं निमित्त झालं आणि आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली कविता हे जग सोडून गेली. सगळं इतकं अचानक झालं होतं की, बराच काळ बधीरपणातच गेला. घडलंय ते खरंच आहे, हे स्वतःला समजावण्यात बरीच मानसिक शक्ती खर्च करावी लागली. दुःखाचा पहिला भर ओसरल्यावर कविताची मुलगी - दिशाबरोबर आवराआवर करताना कविताच्या अनेक नोंदी, मनातल्या लेखनाचे कच्चे खर्डे, पूर्वी निमित्ता-कारणानं केलेली भाषणं, मुलाखती अशी बरीचशी मौल्यवान संपत्ती हाती लागली… त्या शब्दांमध्ये सांत्वन, आनंद, जिद्द, समजूत, गांभीर्य अशा अनेक भावभावनांचा कल्लोळ होता.

तोपर्यंत कविताचं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य सगळ्यांनी वाचलं होतंच. साहित्याच्या क्षेत्रात कविता, कादंबरी, अनुवाद, संपादन अशी चौफेर भटकंती तिनं केली होती. ‘बदलापूरची बखर’, ‘ग्राफिटी वॉल’, ‘घुमक्कडी’ अशी सदरलेखनं, फेसबुकवर या समाजमाध्यमातली तिची लोकप्रियता आणि सर्व प्रकारच्या सामाजिक चळवळींना ती देत असलेला सक्रिय पाठिंबा, यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू सगळ्यांना माहिती होतेच. पण एक लेखिका म्हणून ती साहित्यव्यवहाराकडे किती गांभीर्यानं बघत होती; कविता, कादंबरी, अनुवाद यांसारख्या साहित्यप्रकारांविषयी तिची काय मतं होती, हे संकलित करणं अत्यंत आवश्यक होतं.

.............................................................................................................................................

ऑक्टोबर २०१९

१) आमच्या ‘उत्कट’ जगण्याला बाबांच्या ‘उत्तुंगते’ची किनार आहे! - भक्ती चपळगावकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3741

आम्ही चौघेजण घराबाहेर पडलो असलो तरी या त्यांच्या मुलाबाळांमुळे त्यांना ‘एम्टी नेस्ट सिंड्रोम’ आला नाही. बाबांसारखंच आमचं औरंगाबादचं घर हवी तेव्हा थंडगार आणि हवी तेव्हा उबदार सावली देणाऱ्या वृक्षासारखं झालं आहे. वर्षाकाठी दीड-दोन दिवसांसाठी मी त्या सावलीत राहायला जाते. बाबा सारखे विचारतात- अजून का रहात नाहीस, पण माझ्या मागे असंख्य (अनावश्यक) कटकटी असतात. त्या मला दोन दिवसांपेक्षा जास्त काळ तिथं राहू देत नाहीत. माझा जाण्याचा दिवस उजाडतो. मला निरोप द्यायला आई-बाबा सकाळी सकाळी घराबाहेर येतात. आई थोडी मागे उभी राहते. बाबा दोन पावलं पुढे येऊन उभे राहतात. मी ते दृश्य डोळाभर साठवते. मुंबईतल्या माझ्या गोंधळात ते दृश्य मला सोबत करतं. रोज सकाळी आईचा फोन येतो. बाबांचा फोन कधी तरी येतो. आता मी चाळीशी पार केली आहे आणि बाबांनी वयाची ऐंशी वर्षं पार केली आहेत. पण त्यांचा आवाज ऐकला की, मी पुन्हा अडीच वर्षांची मुलगी होते. गोवरातल्या फणफणलेल्या अंगाला पंख्याचा वारा लागावा इतका त्यांचा आवाज मुलायम असतो आणि माझ्या सगळ्या anxieties अचानक दूर होतात. दिवसभरात झालेल्या गंमतीजमती आम्ही एकमेकांना सांगू लागतो. चाळीस वर्षांपूर्वी बीडच्या घराच्या दारासमोर उमललेला तो गुलाबी गुलाब मला समोर दिसतो. माझं जगणं सुगंधीत होतं!  

२) जातीयवादाच्या उलट्या बोंबा : वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने - दीपक कसाळे | दयानंद कनकदंडे

https://www.aksharnama.com/client/article_detail/3688

भारतातल्या जातीवादाचे स्वरूप भलतेच कमालीचे असे आहे. सरकारी आस्थापना असोत की, खाजगी कंपन्या, जातउतरंडीत वरच्या मानल्या गेलेल्या ब्राह्मणादी जाती आपल्या जात बांधवांची शिफारस करतात, मोक्याच्या जागा जातभाईनांच मिळतील याची खबरदारी घेतात, बँक भांडवलही जात भांडवलासारखे वापरले जाते. उच्चजातीय भूदेवांचा असा व्यवहार जातीयवादी म्हणून कधीच अधोरेखित होत नाही. परंतु, जातीव्यवस्था निर्मूलनाचे समतावादी ध्येय बाळगून राजकीय व्यवहार करणारे किंवा लिहिणारे, कलावंत आदी मंडळी मात्र जातीयवादी ठरवली जातात. शोषित-पीडित जाती शोषणाच्या विरोधात सामाजिक समतेसाठी जात नावाने संघटित व्हायला लागल्या की, त्या पहिल्या फटक्यातच जातीवादी ठरवल्या जातात. आधुनिक प्रकारच्या संघटनेत संघटित होण्याचा अवकाश नसणे वगैरे बाबींमुळे दलित-मागासवर्गीय समाज जात म्हणून संघटित होतो. जात या गोष्टीकडे तो संघटन म्हणून पाहतो. त्या आधाराने तो आपले मुद्दे पुढे मांडण्याचा प्रयत्न करत जातो.

३) विपरीत परिस्थितीत शरद पवार ज्या दुर्दम्य इच्छाशक्तीने लढत आहेत आणि सत्ताधार्‍यांना शिंगावर घेत आहेत, ते वाखाणण्याजोगे आहे! - परिमल माया सुधाकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3672

महाराष्ट्रात अगदी अलीकडच्या काळापर्यंत शरद पवार म्हणजे ‘राजकीय पॉवर’ हे समीकरण रूढ होते. आज शरद पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार आणि स्वत:च्या पक्षातील घरभेदी यांच्या अभद्र युतीच्या विरोधात एकटेच लढत आहेत. त्यांच्यासाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई झाली आहे. त्यांच्या जागी इतर कुणीही असता तरी त्याची ‘दयनीय’ अशी प्रतिमा उभी राहिली असती. मात्र, सर्व विपरीत परिस्थितीत पवार ज्या दुर्दम्य इच्छाशक्तीने लढत आहेत आणि सत्ताधार्‍यांना शिंगावर घेत आहेत, ते वाखाणण्याजोगे आहे. महाराष्ट्रातील विरोधकांच्या जवळपास ढासळलेल्या किल्ल्यांत शरद पवार नावाचा बुरुज आज अधिकच बुलंद दिसतो आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी पवार राज्यातील सर्वाधिक सक्रिय नेते आहेत. त्यांनी केवळ स्वत:चे राजकीय महत्त्व अबाधित राखलेले नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा येत्या विधानसभेत एकहाती विजयप्राप्तीबाबतचा आत्मविश्वास त्यांनी डगमळीत केला आहे.

राज्यात सप्टेंबर महिन्यात तीन वेगवेगळ्या संस्था/माध्यमांनी केलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजप युती न करतासुद्धा बहुमत प्राप्त करू शकतो किंवा बहुमताच्या अगदी जवळ पोहोचू शकतो, असे निष्पन्न झाले असतानाही फडणवीस शिवसेनेशी काडीमोड घेण्याच्या मन:स्थितीत नाही. यामागील मुख्य कारण पवारांनी डावपेच लढवणे सोडलेले नाही, हे आहे.   

४) हा देश केवळ मतदारांच्या सर्वाधिक संख्येमुळे जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून मिरवतो, हे हास्यास्पद आहे. निवडणूक हे इथलं सर्वांत लोकप्रिय आणि खर्चिक असं प्रहसन आहे! - प्रविण अक्कानवरु

https://www.aksharnama.com/client/article_detail/3715

एक तरुण मतदार म्हणून प्रत्येक निवडणुकीआधी मी अशा अनेक संभ्रमांशी झुंज देतो. बहुतेक वेळा समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत. समग्र राजकीय वर्तुळाची अपरिपक्व राजकीय इच्छाशक्ती आणि स्वपलीकडे न पाहता येण्याची वृत्ती कमालीची अचंबित करते. देशातील जनता आणि मतदार म्हणून आपण अत्यंत बेजबाबदार आहोत हे - जीवन-मरणाचे प्रश्न विसरून - बेगडी, उथळ देशभक्ती दाखवत आणि स्वतःचं मत कवडीमोलानं विकून आपण सिद्ध करत असतो! आपल्या या वर्तमानातील घोडचुका येणाऱ्या पिढ्यांच्या उत्कर्षाला गालबोट लावणाऱ्या ठरतील, नव्हे ठरतच आहेत. स्वतःच्या विवेकाधीन राहून मतदान करत आणि एक जबाबदार नागरिक म्हणून निवडून आलेल्या उमेदवारास वेळोवेळी आवश्यक ते प्रश्न विचारत त्याच्या/तिच्या कर्तव्याची जाणीव करून देत राहिलो तरच आपण एका परिपक्व लोकशाहीच्या दिशेनं पावलं टाकू. आणि हे आपल्यालाच करायचं आहे.

एक डोळा महाराष्ट्रातील निवडणुकांवर ठेवून अमेरिकेत माननीय पंतप्रधानांनी तिथं जमलेल्या हजारो सुखवस्तू अनिवासी भारतीयांसमोर ‘सगळं काही छान आहे’ ही हाळी दिली, तेव्हा इथल्या बेरोजगार तरुणांना, निसर्गानं नागवलेल्या शेतकऱ्यांना, पीडित स्त्रियांना, कुपोषित बालकांना सणसणीत चपराक लगावल्यागत वाटलं असेल, नाही?

५) पिसाटलेली पत्रकारिता! - प्रवीण बर्दापूरकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3687

प्रसारमाध्यमांत आणि त्यातही विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांत लाईव्ह प्रसारणाचं आलेलं फॅड म्हणजे कोणतंही तारतम्य नसलेली, पिसाटलेली आणि अक्षरश: उबग आणणारी पत्रकारिता आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) न आलेल्या समन्सवरून देशातील ज्येष्ठतम नेते शरद पवार यांनी जो राजकीय इव्हेंट उभा केला, त्यात माध्यमं आणि त्यातही विशेषत: प्रकाश वृत्तवाहिन्या अलगद अडकल्यानं माध्यमांच्या विश्वासाहर्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उमटलं आहे.

गायक त्याच्या गायकीतून, साहित्यिक त्याच्या निर्मितीतून, मूर्तीकार-चित्रकार त्यांच्या कलाकृतींतून ओळखला जातो; तसंच पत्रकार त्याच्या बातमीतून, लेखनातून ओळखला जावा अशी अपेक्षा असते. स्पर्धेमुळे प्रकाश वृत्तवाहिन्या (न्यूज चॅनेल्स), तसंच वेब पत्रकारितेत ‘ब्रेकिंग न्यूज’ आणि ‘लाईव्ह’चा धुमाकूळ सुरू असून त्यात मुद्रित माध्यमांचीही ससेहोलपट होत असल्यानं सर्वच माध्यमांच्या वृत्तसंकलनात एक प्रकारचा ‘लोडेड’ पिसाटलेपणा आलाय. त्यामुळे माध्यमांचा तोल बिघडला आहे. अभ्यास करून, नीट माहिती घेऊन नेमके प्रश्न विचारणं, सत्य लोकांसमोर आणणं आणि बातम्या चूक ठरणार नाहीत, याची दक्षता घेणं पत्रकार/संपादक विसरले आहेत, असं सध्याचं चिंताजनक चित्र आहे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......