मार्च २०१९
१) मुलाबाळांची चिंता करणारे मोदींना काय हरवणार? - निखिल वागळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/3085
काही प्रश्न. काही उत्तरं.
‘मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली आहे काय?’
‘होय.’
‘मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत काय?’
‘होय.’
‘मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्याला उत्पादन खर्चाहून पन्नास टक्के अधिक हमीभाव मिळाला काय?’
‘नाही.’
‘मोदी सरकारच्या काळात मुस्लीम, दलित, आदिवासी अधिक असुरक्षित झाले आहेत काय?’
‘होय.’
‘मोदी सरकारच्या काळात सामाजिक सलोख्याला तडा गेला काय?’
‘होय.’
‘मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था कमकुवत झाली काय?’
‘होय.’
‘मोदी सरकारच्या काळात स्वायत्त संस्थांचं खच्चीकरण झालं काय?’
‘होय.’
‘मोदी सरकारच्या काळात अच्छे दिन आले काय?’
‘नाही.’
प्रश्नांची ही मालिका अशीच वाढवता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं अपयश सांगायला हे मुद्दे पुरेसे आहेत.
२) पवार नावाचा करिष्मा आणि महिमा! - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/3092
कर्तृत्व, अनुभव, अफाट लोकसंग्रह (दंतकथा वाटावा असा) राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्र जपण्याचा दुर्मीळ गुण, भविष्याचा वेध घेणारी दृष्टी, धाक, वचक, जरब अशा अनेक गुणांचे मिश्रण असणारे पवार गेल्या सहा-एक दशकापासून राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाहीच. राज्यातील अनेक चांगल्या आणि वाईट कामगिरीचे पवार धनी ठरले आणि ठरवलेही गेलेले आहेत. (पवारांचे ट्रोल्सही फारच कडवे आहेत आणि त्याचा अनुभव प्रस्तुत लेखकाला आलेला आहे!) पवार यांच्या बेभरवंशाच्या म्हणा की, इतरांना चकवा देत पवार करत असलेल्या राजकारणावर टीका करणारे अनेक आहेत, पण ते टीकाकारही पवार याचे बहुपेडी व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या बाकीच्या गुणांवर लुब्ध असतात.
थोडक्यात, महाराष्ट्राच्या राजकारण, प्रशासन, कृषी, साहित्य, क्रीडा, अशा विविध क्षेत्रावर पवार नावाचा करिष्मा गेल्या अनेक दशकांपासून दाट पसरलेला आहे. राज्यात सत्ता कोणत्याहीही पक्षाची असो, मुख्यमंत्री कोणीही असो, पवार हेच कायम केंद्रस्थानी असतात असा तो करिष्मा आणि त्यांचा तो अनन्यसाधारण महिमा आहे.
३) देशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी - निखिल वागळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/3059
राष्ट्रभक्तीचा थयथयाट करून आपलं अपयश झाकण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शेतीची दुरवस्था, बेरोजगारी, सामाजिक अशांतता, आर्थिक अधोगती अशा अनेक आघाड्यांवर त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. पुलवामा हल्ल्याअगोदर झालेल्या अनेक सर्व्हेंमध्ये मोदींची लोकप्रियता घसरल्याचं दिसत होतं. २०१४च्या निवडणुकीत भाजपला लोकसभेच्या २८२ जागा मिळाल्या होत्या. या जागा किमान ८० ते १००ने कमी होतील असा तज्ज्ञांचा अंदाज होता. पण आता युद्धज्वरामुळे भाजप नेत्यांत नवी आशा निर्माण झाली आहे. अमित शहांपासून येदुरप्पांपर्यंत नेते दहशतवाद्यांच्या मृतदेहांबरोबरच वाढणाऱ्या जागांचा आकडाही मोजत आहेत.
४) मोदींची ‘शक्ती’ आणि राहुलचा ‘न्याय’! - निखिल वागळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/3139
कोणत्याही प्रसंगाचा ‘इव्हेंट’ करणं ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जुनी सवय आहे. तसाच तो त्यांनी या क्षेपणास्त्र चाचणीचाही केला. जणू काही आपण स्वत:च ही चाचणी केली आहे, अशा अविर्भावात मोदींनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. सर्वसाधारणपणे अशा कामगिरीची घोषणा इस्त्रो किंवा डीआरडीओचा प्रमुख करतो आणि पंतप्रधान त्यांच्या अभिनंदनाचा संदेश देतात. २००८ साली भारतानं चंद्रयान १ सोडलं, तेव्हा इस्त्रोचे प्रमुख माधवन नायर यांनी ती घोषणा केली होती. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यानंतर शास्त्रज्ञांचं अभिनंदन करणारा संदेश दिला होता. पण मोदी सगळ्याच परंपरा मोडीत काढतात. त्याप्रमाणे त्यांनी यावेळी इस्त्रोच्या प्रमुखांना किंवा शास्त्रज्ञांना अजिबात संधी दिली नाही. आपल्या भाषणापूर्वी पुरेसा सस्पेन्स निर्माण करायलाही ते विसरले नाहीत. पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारणार की दाऊद इब्राहिम- मसुद अझरला परत आणणार इथपर्यंत चर्चा लोकांनी केली. त्यानंतर झालेली क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा म्हणजे जनतेच्या दृष्टीनं अँटी क्लायमॅक्सच होता. पण या निमित्तानं चर्चेत राहण्याचा मोदींचा हेतू मात्र साध्य झाला.
५) चौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही! - निखिल वागळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/3112
गेल्या आठवड्यात मोदींनी आपली ही प्रतिमा सोशल मीडियावर व्हायरल करण्याची नवी मोहीम सुरू केली. ‘मैं भी चौकीदार’ हा या मोहिमेचा हॅशटॅग आहे. मोदींनी ट्विट केलं, ‘तुमचा चौकीदार कणखर आहे आणि देशाची सेवा करतो आहे. पण तो एकटा नाही. जो जो भ्रष्टाचाराविरुद्ध, सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढतोय तो तो चौकीदार आहे. देशाच्या विकासासाठी झटणारा प्रत्येक जण चौकीदार आहे.’
त्यानंतर भाजपच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी, पाठीराख्यांनी हाच हॅशटॅग वापरून एक ‘ट्विटर स्टॉर्म’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मोदींसकट या प्रत्येकानं स्वत:च्या नावाच्या आधी ‘चौकीदार’ ही उपाधी वापरली. ही मोहीम पहिल्या तीन-चार दिवसांतच कोट्यवधी लोकांपर्यंत पोचली असं भाजपचे नेते सांगू लागले. ही एक लोकचळवळ असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रत्यक्षात ही चळवळ वगैरे काही नसून नरेंद्र मोदींनी रचलेला एक सापळा आहे.
.............................................................................................................................................
एप्रिल २०१९
१) राज ठाकरेंच्या सभा ‘लढाई’पूर्वीची ‘अंगडाई’ ठरणार?, ‘वंबआ’ची ‘तेलही गेले नि तूपही गेले’ अशी गत होणार? - प्रज्वला तट्टे
https://www.aksharnama.com/client/article_detail/3175
राज ठाकरेंच्या गुढीपाडव्या निमित्ताने शिवाजी पार्कवर झालेल्या भाषणाने इतिहास घडवला! हे भाषण सुरू होते, त्या वेळेला ‘रामायण’, ‘महाभारत’ आणि ‘बुनियाद’ या टीव्ही मालिकांचे दिवस आठवले! या मालिकांचे दूरदर्शनवर प्रक्षेपण सुरू असताना गल्लीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणाऱ्या व्यक्तीच्या कानावर फक्त तोच एक आवाज यायचा. राज ठाकरेंचे भाषण सुरू असतानाही अख्ख्या महाराष्ट्रात त्या थेट प्रक्षेपणाच्या काळात फक्त त्यांचाच आवाज ऐकायला येत होता. साम आणि TV9 ला तर या भाषणाने टीआरपी मिळवून दिलाच, पण आज यूट्यूबवरही सर्वांत अधिक बघितला गेलेला तोच व्हिडिओ आहे. दोन दिवस उलटून गेल्यावरही मराठी चर्चाविश्वात त्याच भाषणाची चर्चा होते आहे. बीबीसी हिंदी आणि एनडीटीव्हीनेही या भाषणाची दखल घेतली. या निमित्ताने राज ठाकरेंनी थेट देश पातळीवर झेप घेतली आहे. येणाऱ्या दिवसांत निवडणुका संपेपर्यंत ते आणखी दौरे करणार आहेत असे त्यांनी सांगितले. जिथे जिथे त्यांचे भाषण होईल, तिथला भाजप-शिवसेनेचा उमेदवार पडेल असे आजच बोलले जात आहे. हिंदी समजू शकणाऱ्या विदर्भात जर एखादे भाषण त्यांनी हिंदीत दिले तर (‘गोदी मीडिया’चा भाग नसलेल्या) राष्ट्रीय हिंदी टीव्ही वाहिन्यांमध्ये त्याच्या प्रक्षेपणासाठी चढाओढ लागेल, इतके आर्थिक मूल्य राज ठाकरेंच्या भाषणाला आले आहे.
२) राज ठाकरेंचं तुफान - निखिल वागळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/3209
महाराष्ट्रातली यंदाची लोकसभा निवडणूक रंगतदार करण्याचं संपूर्ण श्रेय राज ठाकरेंना दिलं पाहिजे. त्यांचा पक्ष एकही जागा लढवत नसताना त्यांनी आपल्या भाषणांनी राज्यभरात एक जबरदस्त तुफान निर्माण केलं आहे. १९७७पासून आजपर्यंत लोकसभा, विधानसभा आणि सर्व छोट्या-मोठ्या निवडणुकांचा मी साक्षीदार आहे. पण ज्यांचा एकही उमेदवार रिंगणात नाही, अशा पक्षाच्या नेत्यानं मैदान गाजवल्याची एकही घटना मला आठवत नाही.
एका दृष्टीनं राज ठाकरेंचा सध्याचा अवतार हा त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अभूतपूर्व म्हटला पाहिजे. ते उत्तम वक्ते तर पूर्वीपासूनच आहेत, पण या वेळी त्यांच्या वक्तृत्वात मुद्देसूदपणा आणि अभ्यासू वृत्ती दिसते आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजवर कधीही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा दिला नव्हता. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव हे त्यांचं लक्ष्य आहे, पण त्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस-राष्ट्रवादीला मत द्यायला ते सांगत आहेत. मोदी-शहा जायला हवेत, त्यासाठी राहुल गांधी पंतप्रधान झाले तरी हरकत काय, हा त्यांचा आपल्या सभेला येणाऱ्या लाखो श्रोत्यांना थेट संदेश आहे.
३) राज ठाकरेंच्या तोफा आणि माध्यमांची ‘मोदी बचाव’ चौकीदारी! - संजय पवार
https://www.aksharnama.com/client/article_detail/3179
थेट चॅनेलला धमकी देणारा पंतप्रधान, वृत्तवाहिनी मुकाट स्वीकारते, तेव्हा दारुड्या नवऱ्याचा मार मुकाट खाणारी महिला डोळ्यासमोर येते! राज ठाकरेंनी दारूगोळा ठासून भरून तोफा मैदानात आणल्यात. पण ‘मोदी बचाव’ म्हणून चौकीदारी करणारा पगारी मीडिया तो दारूगोळा वाया घालवणार! आता जनतेनेच मोदी आणि लाचार मीडिया यांना त्यांची ‘जागा’ दाखवायला हवी. राज ठाकरेंना साथ द्यायला हवी.
४) ‘राज ठाकरे पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस!’ - जयदेव डोळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/3182
महाराष्ट्रात अशा वेळी ‘राज ठाकरे पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस’ सुरू झाली, ही नक्कीच आशादायी, स्वागतार्ह आणि अनिवार्य अशी गोष्ट झाली! त्यांच्या भाषणात बातमी, अग्रलेख, व्यंगचित्र, भाष्य, दृश्यात्मक पुरावे, संवाद आणि निवेदन, निरीक्षण, प्रत्यक्ष भेट आणि निष्कर्षही असतो. म्हणजे ‘ट्राय’च्या नव्या नियमांनुसार कोणत्याही वाहिनीचे प्रक्षेपण आम्ही पाहिले तरी त्यांत जे मिळणार नाही, ते ठाकरे यांच्या प्रसारणात आम्हाला मिळते!
पत्रकारांनी कॅमेरापर्सनला घेऊन जे दाखवायचे, ते आता चक्क एक राजकीय पुढारी करू लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणांची पोकळ स्थिती, सरकारी कार्यक्रमांचा बोजवारा, अशा अनेक गोष्टी पत्रकारांनी दाखवायच्या असतात. त्यांनी हे काम करणे कधीचेच सोडून दिल्याने राज ठाकरे यांना आपली स्वत:ची एक ‘वार्ता-विश्लेषण सेवा’ सुरू करावी लागली आहे.
५) लाट? कुठेय मोदींची लाट? आकडे काय सांगतात! - निखिल वागळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/3187
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या फेरीला आज सुरुवात झाली आहे. ही निवडणूक ऐतिहासिक आहे, देशातल्या लोकशाहीचं भवितव्य ठरवणारी आहे, हे गेला महिनाभर आपण वारंवार ऐकतो आहोत. आता मतदारांनी आपला हक्क बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नव्वद कोटी मतदार असलेला भारतासारखा देश जगाच्या पाठीवर दुसरा नाही. इथली विविधता तर डोळे दिपवून टाकणारी आहे. ती नष्ट करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांत पद्धतशीरपणे झाला आहे. पण भारतीय मतदाराच्या सुज्ञपणावर माझा कायम विश्वास आहे. राजकीय पंडित काहीही म्हणत असले तरी मतदार अत्यंत स्वतंत्रपणे आपला निर्णय घेतो. त्याला खात्री असते की, मतदान केंद्रात आपल्यावर कुणी दबाव आणणार नाही. त्यामुळे तो बाहेर पत्रकारांना चकवा देतो आणि आपला अधिकार शांतपणे बजावतो. मतदाराच्या मनाचा शंभर टक्के थांगपत्ता अजून कोणत्याही पत्रकाराला, सेफॉलॉजिस्टला किंवा आकडेतज्ज्ञाला लागलेला नाही. या देशात निवडणुकीचं विश्लेषण लोकप्रिय करणारे ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रणव रॉय यांनी दोराब सुपारीवाला यांच्याबरोबर लिहिलेल्या ‘द व्हर्डिक्ट’ या ताज्या पुस्तकात मतदारांच्या या राजेपणाचं नेमकं विश्लेषण केलं आहे.
.............................................................................................................................................
मे २०१९
१) नरेंद्र मोदीच पुन्हा केवळ निवडून नाही, तर पुन्हा जिंकून येवोत! - श्रीकांत आगवणे
https://www.aksharnama.com/client/article_detail/3247
मोदी जिंकून यावेत! घसघशीत मतांनी निवडून येवोत!! माझ्या हातात नील चीझमन आणि ब्रिअन क्लास या प्रोफेसर दुकलीनं लिहिलेलं ‘How To Rig An Elction’ची प्रत आहे. निवडणूक आधी जिंकायची असते आणि मग निवडणुकीला उभं राहायचं असतं, अशा उदाहरणांनी या पुस्तकाची पानं भरली आहेत. सध्या लोकशाही हा जगभरातल्या हुकूमशहांना सत्तेवर येण्याचा ‘सरधोपट राजमार्ग’ आहे! उगाच का अमेरिका-युरोप ‘तेल’ देशांना ‘बऱ्याबोलानं वागा, नाहीतर लोकशाही निर्यात करू‘ अशी धमकी देतात!!
सिंगापूरच्या च्युइंगमवर बंदीचं कौतुक असलेल्या आणि तरीही त्या मुर्दाड हुकूमशाहीला पाहू न शकणाऱ्या भारतीयांसाठी मोदींनी परत यायला हवं! पाकिस्तानच्या इमरान खाननं मोदींची जाहीर चुम्माचाटी करूनही ज्यांना अणुबॉम्ब वापरायची खुमखुमी आहे, त्यांच्यासाठी ‘राजे, तुम्ही परत या’च्या चालीवर ‘मोदी, तुम्ही परत या!!’
२) इम्तियाज जलील निवडून आल्यामुळे सर्वांचे चेहरे उतरले आहेत? - जीवन नवगिरे
https://www.aksharnama.com/client/article_detail/3311
इम्तियाज जलील मुस्लीम आहेत, हा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर त्याला तुमची पूर्वग्रहदूषित विचारधारा जबाबदार आहे. मुसलमान म्हटले की, आपल्यात अस्वस्थतेची भावना निर्माण होत असेल तर त्याला आपला मुस्लीमद्वेष जबाबदार आहे. मुस्लीम असल्याने त्यांच्या देशभक्तीवर शंका घेणे, ते हिंदूविरोधीच असतील असा विचार करणे, हे आततायीपणाचे लक्षण आहे. ही पूर्वग्रहदूषित नजर बदलणे गरजेचे आहे. वैयक्तिक पूर्वग्रह नेहमी सत्य अस्पष्ट करून टाकतात!
३) आंबेडकर विरुद्ध आंबेडकर? - प्रज्वला तट्टे
https://www.aksharnama.com/client/article_detail/3296
१५ मे रोजी नागपुरात अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पूर्व-निष्ठावंतांनी पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या भाजप-संघाला मदत करण्याच्या ऐतिहासिक चुकीत ते सहभागी नसल्याचा खुलासा केला आहे. वर्तमानपत्रांनी या पत्रपरिषदेला चांगली प्रसिद्धी दिली.
या परिषदेत प्रसारित केलेल्या पत्रकात लिहिले आहे की, ‘बाळासाहेब आंबेडकरी जनतेला सत्ता स्थापनेचे स्वप्न दाखवून फक्त स्वहितासाठी त्यांची मते कुजवण्याचे काम करत आहेत.’ अॅड. आंबेडकरांचे हे कारस्थान वर्षभरापासून लक्षात आल्यामुळे ही पूर्वीची निष्ठावंत मंडळी अस्वस्थ होती व आपसात चर्चा करत होती. एका प्रश्नाच्या उत्तरात मिलिंद पखाले - जे पत्रकावर सही करणाऱ्यांपैकी एक आहेत – यांनी सांगितले की, “आमच्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नुकसान झाले असे असा कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून आज १५ मे रोजी, लोकसभेच्या मतदानाच्या बहुतांश फेऱ्या संपल्यावर आम्ही आमची अस्वस्थता उघड करत आहोत.”
४) २०१९च्या निवडणुकीत मीही हरलो आहे का? - रवीश कुमार
https://www.aksharnama.com/client/article_detail/3318
२०१९चा जनादेश माझ्याविरुद्ध कसा गेला? मी गेली पाच वर्षं जे लिहिलं, बोललो ते कसोटीला लागलं होतं? ज्या लाखो लोकांचं दु:ख आम्ही दाखवलं ते चुकीचं होतं? मला माहीत होतं की, तरुण, शेतकरी आणि बँकांमध्ये गुलामासारखं काम करणारे लोक भाजपचे समर्थक आहेत. तेही कधी माझ्याशी खोटं बोलले नाहीत. सर्वांनी सुरुवातीला किंवा नंतर कबूल केलं होतं की, ते नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत. पण त्यामुळे मी त्यांच्या समस्या दाखवणं बंद केलं नाही. उलट त्यांची समस्या वास्तव असल्यामुळेच दाखवली. आज एक खासदार म्हणू शकत नाही की, त्यानं ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना नोकरीचं नियुक्तीपत्र दिलंय. माझ्या ‘नोकरी सीरिज’मुळे दिल्लीपासून बिहारपर्यंतच्या अनेक लोकांना नियुक्तीपत्रं मिळाली आहेत. अनेक परीक्षांचे निकाल जाहीर झाले. त्यातील अनेकांनी शिव्या दिल्याबद्दल नियुक्तीपत्रं मिळाल्यावर माझी माफी मागितली. त्याची माझ्याकडे शेकडो पत्रं आणि मॅसेजेसचे स्क्रीनशॉट आहेत. त्यातील एकही जण हा पुरावा देऊ शकणार नाही की, मी कधी नरेंद्र मोदी यांना मत देऊ नका असं त्यांना सांगितलं होतं. हे जरूर सांगितलं होतं की, मत विचार करून द्या. मत दिल्यावर नागरिक व्हा!
५) ‘अॅड. आंबेडकरांच्या भाजपबरोबर वाटाघाटी झाल्या आहेत’ असं म्हणणं तर्कदृष्ट्या पटत नाही! - कॉ. भीमराव बनसोड
https://www.aksharnama.com/client/article_detail/3248
सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. त्यातील तीन टप्पे पूर्ण झाले असून बाकी टप्पे मे महिन्याच्या मध्यापर्यंत संपणार आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठिकठिकाणी सभांचे आयोजन, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मुलाखती तर मुद्रित माध्यमांतून लिखाण केले जात आहे. यातून निवडणुकातील विविध पक्ष, युत्या, आघाड्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातील सत्य-असत्य काय ते जनतेला ठरवावे लागते. बऱ्याचदा त्यांची दिशाभूलही होऊ शकते. अशापैकीच महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर केला जाणारा ‘त्यांनी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपशी डिलिंग केले आहे’ हा आरोप. या मूळ सूत्राला धरून जे ते कार्यकर्ते, राजकीय विरोधक, तथाकथित विचारवंत आपापल्या समजाप्रमाणे याबाबतच्या अफवा पसरवत आहेत. ज्यांची पोहोच वरील माध्यमांपर्यंत आहे, ते त्यामार्फत, तर उरलेले गप्पागोष्टींच्या स्वरूपात, काहीजण कुजबुजीच्या स्वरूपात तसा अपप्रचार करत आहेत.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment