‘द अनएक्सपेक्टेड मॅन’ : मानवी जगण्यातला अपरिहार्य एकटेपणा, माणसामाणसांतील नातेसंबंध वगैरे
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘द अनएक्सपेक्टेड मॅन’मधील दोन प्रसंग
  • Sat , 28 December 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe द अनएक्सपेक्टेड मॅन The Unexpected Man यास्मिना रेझा Yasmina Reza पद्मा दामोदरन Padma Damodaran नावेद अस्लम Naved Aslam

पाश्चात्य रंगभूमीवर आशय आणि सादरीकरणात भरपूर वैविध्य आढळतं. हे त्या रंगभूमीचं वैभव आहे. म्हणूनच तिथं निरनिराळ्याया देशांतील, निरनिराळा आशय असलेली नाटकं सतत रसिकांसमोर येत असतात. अलिकडेच बघितलेलं ‘द अनएक्सपेक्टेड मॅन’ हे सुमारे दीड तास चालणारं इंग्रजी नाटक असंच आशयाच्या व सादरीकरणाच्या पातळीवर वेगळं ठरतं.

यास्मिना रेझा (जन्म - १९५९) या फ्रेंच नाटककार, निबंधकार, रंगकर्मी आहेत. ‘आर्ट’ व ‘गॉड ऑफ कार्नेज’ ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांच्या नाटकावर आधारित ‘कार्नेज’ हा सिनेमा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोमन पोलान्स्की यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘द अनएक्सपेक्टेड मॅन’ हे नाटक रेझा यांनी १९९५ साली लिहिलेलं आहे. या नाटकाचं इंग्रजी रूपांतर ख्रिस्तोफर हॅम्टन यांनी केलं आहे.

या नाटकाचे मुंबईत प्रयोग ‘रेड अर्थ स्टोरीज’ या नाट्यसंस्थेतर्फे सादर करण्यात आले होते. या नवी मुंबईस्थित नाट्यसंस्थेचा आगळ्या प्रकारची नाटकं करणारी संस्था म्हणून सार्थ लौकीक आहे. पद्मा दामोदरन आणि सादिया सिद्दिकी या दोन महिला रंगकर्मींनी ही नाट्यसंस्था सुरू केली आहे.

‘द अनएक्सपेक्टेड मॅन’ या नाटकात दोन पात्रं असून हे नाटक एक ट्रेनच्या प्रवासात घडतं. ही आगगाडी पॅरिस ते फ्रँकफर्ट दरम्यान धावत असते. पार्स्की हा मध्यमवयीन पुरुष आणि मार्था ही एक मध्यमवयीन स्त्री यांच्या प्रवासादरम्यान झालेल्या, पण प्रत्यक्षात न झालेल्या संवादातून नाटक आकाराला येतं. पार्स्की प्रसिद्ध लेखक असतो. नाटकाची सुरुवात होते, तेव्हा तो गाडीच्या डब्यात बसलेला असतो व स्वतःशीच बोलत असतो. तो जगण्यातल्या अनेक गोष्टींवर वैतागलेला असतो. ही भावना व्यक्त करणारी दोन-तीन प्रदीर्घ स्वगतं बोलून झाल्यावर मार्था डब्यात चढते. ती लेखकाच्या समोरच्या सिटवर बसते. मात्र सबंध प्रवासादरम्यान ते एकमेकांशी एक शब्दही बोलत नाहीत. ती लेखकाला ओळखते. पार्स्की हा तिचा आवडता लेखक असतो. एवढंच नव्हे तर तिच्या हातात त्याचं ताजं ‘द अनएक्सपेटेड मॅन’ हे पुस्तकही असतं.

हे पारंपरिक स्वरूपाचं नाटक नाही. यात मानवी जगण्यातला अपरिहार्य एकटेपणा, माणसामाणसांतील नातेसंबंध वगैरेंची चर्चा आहे. हे नाटक १९९५ साली लिहिलेलं आहे, हे लक्षात घेतलं म्हणजे मग त्याचा आशय कोणत्या दिशेनं जाईल, याचा अंदाज करता येतो.

‘आगगाडीचा प्रवास’ ही मध्यवर्ती घटना समोर ठेवून अनेक कलाकृती निर्माण झालेल्या आहेत. शेरलॉक होम्सच्या अनेक कथा आगगाडीच्या प्रवासातच घडतात. अॅगाथा ख्रिस्तीची ‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस’ ही रहस्यकथा, त्याचप्रमाणे थॉमस हार्डीची ‘अ पेअर ऑफ ब्लू आईज’ या कादंबरीत ट्रेनचा प्रवास हा महत्त्वाचा घटक आहे. ‘ग्रेट ट्रेन रॉबरी’, ‘द फाईव्ह मेन आर्मी’ हे हॉलिवुडचे चित्रपट, तर आपल्याकडे येऊन गेलेला ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटांतही ट्रेनचा प्रवास महत्त्वाचा आहे. या यादीत हिचकॉकच्या ‘स्पेलबाऊंड’चा उल्लेखही करायला हवा.

या सर्व कलाकृतींमध्ये ‘ट्रेनचा प्रवास’ हा महत्त्वाचे घटक आहेत, तर काही ठिकाणी ‘ट्रेन’ हे महत्त्वाचं पात्र ठरतं. नाट्यशास्त्रात ज्याला ‘internal monologues’ म्हणतात, त्या पद्धतीनं ही पात्रं प्रेक्षकांना त्यांच्या मनातील विचार व भावना सांगतात. मार्थाला लेखकाशी बोलण्याची फार इच्छा असते. ती एक-दोनदा तसा प्रयत्नही करून बघते. पण स्वतःच्याच विश्वात गुरफटलेला लेखक तिच्या प्रयत्नांची दखलही घेत नाही. नंतर तिच्या लक्षात येतं की, हा बोलत नाही हे एक प्रकारे चांगलंच आहे. बोलला असता, गप्पा केल्या असत्या तर कदाचित याची जी आपल्या मनात प्रतिमा आहे, ती भंग पावली असती. असा काहीसा प्रकार संजय दत्त-माधुरी दीक्षितच्या ‘साजन’ चित्रपटात होतो.

या प्रकारचं नाटक लिहायला एक वेगळ्याच प्रकारची हिंमत लागते. पात्रं एकमेकांशी न बोलता नाट्य निर्माण होऊ शकतं, हे दाखवून दिलाबद्दल यास्मिना रेझा यांचं खास अभिनंदन.

पार्स्की हा लेखक जरी मार्थाला ओळखत नसला तरी ती लेखकाला ओळखते असते. व्यक्तिगत पातळीवर नाही तर लेखक म्हणून. एका प्रसंगी ती म्हणतेसुद्धा “I have spent my life with you, Mr. Parsky,”. इथं नाटककार मानवी जीवनातल्या ‘संवाद’ या प्रक्रियेवर काही प्रश्न उपस्थित करते. खरोखरच संवाद शक्य आहे का? आपण एकमेकांशी बोलतो म्हणजे नेमकं काय करतो? बोलून काय मिळतं? न बोलता जगणं शक्य आहे का? असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात येतात.

काही समीक्षकांनी नमूद केल्याप्रमाणे हे ‘वाचायचं’ नाटक आहे. याचा प्रयोग जर व्यवस्थित वठला नाही तर कंटाळवाणा होऊ शकतो. कारण या नाटकात पारंपरिक प्रकारचं ‘नाट्य’ फारसं नाही. पण जर ही संहिता योग्य दिग्दर्शक, नट आणि रंगकर्मींच्या हाती लागली तर मात्र जबरदस्त प्रयोग बघितल्याचा अनुभव येऊ शकतो. पद्मा दामोदरननं दिग्दर्शित केलेला प्रयोग प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पद्मा (मार्था) व नावेद अस्लम (पार्स्की) या दोघांचा अप्रतिम व परस्परांना पूरक अभिनय. पद्माने मार्थाची घालमेल व्यवस्थित व्यक्त केली आहे. मार्थाच्या भावविश्वातील सर्व बदल पद्मा दामोदरनने फार उत्तम प्रकारे व्यक्त केले आहेत. त्या तुलनेत पार्स्की सादर करणं कमी आव्हानात्मक आहे. पार्स्की लेखक दाखवल्यामुळे तो आत्ममग्न असणं, स्वतःच्याच जगात असणं अगदी स्वाभाविक ठरतं.

नेपथ्य प्रसाद वालावलकरांचं आहे. त्यांनी मिनिमलिस्ट पद्धत वापरून ट्रेनचा डबा उभा केला आहे, ज्यात दोन पात्रं समोरासमोर बसलेली आहेत व काही प्रसंगात उठतात व डब्यातच इकडेतिकडे चालतात. मात्र एक बाब खटकल्याशिवाय राहत नाही. प्रसाद वालावलकरांचा डबा बार्शी लाईट ट्रेनचा डबा वाटतो. या नाटकात प्रकाश योजनेला फारसा वाव नाही. ही जबाबदारी राहुल जोगळेकरांनी सांभाळली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक वेगळा पण खिळवून ठेवणारा प्रयोग!

.............................................................................................................................................

या नाटकाच्या एका वेगळ्या प्रयोगाचा हा ट्रेलर

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......