अजूनकाही
आजकाल इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांची कुणाला आठवण होत नाही (३१ डिसेंबर रोजी त्यांचा ९० वा स्मृतिदिन होता.), पण राजवाड्यांनी करून ठेवलेल्या संशोधनाची, केलेल्या लेखनाची आठवण महाराष्ट्राला करावीच लागेल. त्याशिवाय तरणोपाय नाही इतके मोठे काम त्यांनी करून ठेवलेय. १९१३ साली राजवाड्यांनी ‘महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या लोकांची मोजदाद’ करणारा लेख लिहिला होता. तळेगाव दाभाडे इथून प्रकाशित होणाऱ्या ‘लोकशिक्षण’ या मासिकामध्ये हा लेख त्याच वर्षी प्रकाशित झाला. त्यानंतर तो ‘राजवाडे लेखसंग्रहा’च्या तिसऱ्या भागात १९३२ साली पुनर्प्रकाशित करण्यात आला. या लेखात सुरुवातीलाच राजवाडे यांनी म्हटले आहे – “विचार सामाजिक आहे. तेव्हा कोणत्याही प्रकारे समाजाच्या हिताला ज्यांनी थोडा किंवा फार हातभार लाविला अशाच व्यक्तींचा तेवढा या मोजदादींत समावेश होतो. एखादा माणूस मोठा बुद्धिमान किंवा प्रतिभावान असला, परंतु समाजाच्या उपयोगी तो यत्किंचितही पडला नाही, तर त्याची गणना समाजहितेच्छुंच्या मोजदादींत करता येत नाही.”
राजवाडे यांनी १८१७ ते १९१३ या काळातील या ९७ वर्षांतील महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या १५० लोकांची लोकांची मोजदाद या लेखात केली. त्यातून चिरस्थायी व भरीव कामगिरी करणाऱ्या ४३ लोकांची निवड केली. त्यातून २३ लोकांची अंतिम निवड केली. त्यातील ३ लोक प्रतिभासंपन्न आणि २० लोक बुद्धिमान असल्याचा निर्वाळा दिला.
राजवाड्यांची ४३ व्यक्तींची यादी
१. श्रीमंत सयाजीराव गायकवाड, २. विष्णूशास्त्री चिपळोणकर, ३. महादेव गोविंद रानडे, ४. शंकर पांडुरंग पंडित, ५. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, ६. शांताराम अनंत देसाई, ७. काशिनाथ त्रिंबक तेलंग, ८. भाऊ दाजी लाड, ९. बाळ गंगाधर टिळक, १०. काका जोशी, ११. शंकर बाळकृष्ण दीक्षित, १२. जावजी दादाजी, १३. विनायक कोंडदेव देव, १४. महादेव मोरेश्वर कुंटे, १५. गणपतराव जोशी (नट), १६. वासुदेवशास्त्री खरे, १७. दत्तात्रय बळवंत पारसनीस, १८. धोंडोपंत कर्वे, १९. रमाबाई रानडे, २०. विठ्ठल रामजी शिंदे, २१. रघुनाथशास्त्री गोडबोले, २२. ह.ना. आपटे, २३. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, २४. गोपाळ गणेश आगरकर, २५. कृ. प्र. खाडिलकर, २६. काशिनाथ नारायण साने, २७. विठोबा अण्णा दफ्तरदार, २८. अण्णा किर्लोस्कर, २९. गोपाळराव गोखले, ३०. विष्णुबोवा ब्रह्मचारी, ३१ सर टी. माधवराव, ३२. शंकर तुकाराम शाळिग्राम, ३३. भिकाजीपंत हर्डीकर, ३४. शिवराम हरि साठे, ३५. महादेव चिमणाजी आपटे, ३६. गोपाळराव देवधर, ३७. शि. म. परांजपे, ३८. न. चिं. केळकर, ३९. विष्णू गोविंद विजापूरकर, ४०. कृष्णशास्त्री चिपळोणकर, ४१. पैसाफंड काळे, ४२. नटेश अप्पाजी द्रविड, ४३. शंकर श्रीकृष्ण देव.
“ब्रिटिशसमाजात व मराठा समाजात गेल्या १०० वर्षांत बुद्धिमत्तेचे प्रमाण ४०:१ असे निघते” असे राजवाड्यांनी या लेखात म्हटले आहे. ते पुढे म्हणतात – “महाराष्ट्रात बुद्धि व प्रतिभा ह्यांचा ऱ्हास गेल्या १०० वर्षांत १०० वर्षांत बेसुमार झाला.” असो. आपण राजवाड्यांनी केलेल्या चिकित्सेत जायला नको. तो वेगळा विषय आहे. मात्र राजवाड्यांच्या अंतिम ४३ नावांच्या यादीबाबतही मतभेद शक्य आहेत. महात्मा फुले यांचे नाव १९व्या शतकातील असूनही ते राजवाड्यांच्या यादीत नाही.
राजवाड्यांची ही यादी समोर ठेवून त्यानंतरच्या अशाच ‘महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या लोकांची मोजदाद’ करण्याचा प्रयत्न काही वर्षांपूर्वी पुण्याच्या गंधर्ववेद प्रकाशनाने केला. राजवाड्यांच्या ४३ व्यक्तींच्या यादीतील २८ व्यक्ती निवडून त्यात विसाव्या शतकातील तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तींची भर घालून ६० व्यक्तींची या प्रकाशनाने चरित्रे प्रकाशित केली. गंधर्ववेद प्रकाशनाच्या यादीतील १०-१२ नावांबाबत मतभेद शक्य आहेत आणि आणखी १०-१२ नावे त्यात नव्यानेही सामील करता येण्यासारखी आहेत. त्यांनी हयात नसलेल्या व्यक्तीच घ्यायचे ठरवले. संख्येची आणि पर्यायाने भांडवलाची मर्यादाही त्यांना होतीच. तरीही त्यांच्या यादीचे महत्त्व नाकारता येत नाही.
या यादीत विसाव्या शतकातील व्यक्ती आहेत. त्या अशा –
१. जगन्नाथ शंकरशेठ, २. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, ३. दादोबा पांडुरंग तर्खडकर, ४. ‘लोकहितवादी’ गोपाळ हरि देशमुख, ५. महात्मा फुले, ६. वि. का. राजवाडे, ७. ‘रियासत’कार देसाई, ८. छत्रपती शाहू महाराज, ९. रँग्लर परांजपे, १०. प्रा. धर्मानंद कोसंबी, ११. गाडगे महाराज, १२. पां.वा.काणे, १३. माधव श्रीहरी अणे, १४. सेनापती बापट, १५. गुलाबराव महाराज, १६. र. धों. कर्वे, १७. वि. दा. सावरकर, १८. श्री. व्यं. केतकर, १९. डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर, २०. श्री. म. माटे, २१. कर्मवीर भाऊराव पाटील, २२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, २३. शं. द. जावडेकर, २४. विनोबा भावे, २५. विठ्ठलराव विखे-पाटील, २६. आचार्य अत्रे, २७. पंजाबराव देशमुख, २८. श्री. अ. डांगे, २९. साने गुरुजी, ३०. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ३१. डॉ. ध. रा. गाडगीळ, ३२. शंतनूराव किर्लोस्कर, ३३. स्वामी रामानंद तीर्थ, ३४. इरावती कर्वे, ३५. गोळवळकर गुरुजी, ३६. डी.डी. कोसंबी, ३७. तुकडोजी महाराज, ३८. बाबा आमटे, ३९. यशवंतराव चव्हाण, ४०. बाळशास्त्री हरदास, ४१. पांडुरंगशास्त्री आठवले, ४२. नरहर कुरुंदकर
राजवाडे यांनी ‘महाराष्ट्रातील बुद्धि व प्रतिभा यांचा ऱ्हास, त्याची कारणे व उपाय’ या नावाने ‘महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या लोकांची मोजदाद’ या लेखाचा उत्तरार्धही लिहायला घेतला होता. पण तो त्यांच्याकडून पूर्ण झाला नाही. तो पुढे इतिहासकार शेजवलकर यांनी ‘महाराष्ट्राच्या मानगुटीचा समंध’ (१९४०) आणि ‘बुद्धिवादी आणि सुशिक्षित समाजाची नीतीमत्ता’ (१९६२) हे दोन लेख लिहून काही प्रमाणात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यात अलीकडच्या काळात सुहास पळशीकर यांचा ‘आखूड लोकांचा प्रदेश’ आणि विनय हर्डीकर यांचा ‘सुमारांची सद्दी’ या दोन लेखांनी मोलाची भर घातली आहे. असो. राजवाडे, शेजवलकर, पळशीकर, हर्डीकर यांनी केलेल्या चिकित्सेत इथे जाण्याचे कारण नाही. मात्र इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी ‘सामाजिक नीतीमत्ते’ची फार साधी, सोपी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, “समाजहितासाठी आपल्या आवडीनिवडी, स्वार्थ आणि अहंकार यांना कात्री लावणे” यालाच सामाजिक नीतीमत्ता म्हणतात. गेल्या ५०-६० वर्षांत महाराष्ट्रातील सुशिक्षित आणि बुद्धिजीवी वर्गाची शेजवलकरांच्या निकषानुसार टक्केवारी काढायची ठरवली तर ती किती असेल? फाजिल आणि अर्धसत्य इतिहासाचा दंभ, तशाच फाजिल व फिजूल अस्मितांचा बागुलबोवा आणि भौतिक सुखाच्या मागे धावण्याची जीवघेणी चढाओढ हेच जर महाराष्ट्रातील सुशिक्षितांचे प्राधान्यक्रम असतील तर एकविसाव्या शतकातील महाराष्ट्राचे चित्र समजून घ्यायला, सारासार विचार करणाऱ्या कुणालाही फारसे प्रयास पडणार नाहीत.
१९४० साली लिहिलेल्या दुसऱ्या एका लेखात शेजवलकरांनी म्हटले आहे, महाराष्ट्राच्या मानगुटीला इतिहासाचे भूत बाधत आहे. ते अजूनही उतरलेले नाहीच, पण आता त्यात आणखी एका नव्या भुताची भर पडली आहे. त्याचे नाव आहे, अस्मिता. आत्ममग्न सुमारांच्या धाडसी फौजांचा महाराष्ट्रात सुकाळ होतो आहे. हिटलरचे एक वाक्य प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, “सतत चाललेल्या युद्धांमुळेच मानवसमाज उन्नतावस्थेला पोहोचला आहे. चिरकालीन शांततेमुळे मानवसमाज रसातळालाच जाईल.” महाराष्ट्रातील हिटलरचे वारसदार हाच कित्ता गिरवत आहेत. त्यांनाही हिटलरच्या या भूतबाधेने पछाडलेले आहे. त्यामुळेच ते पोरकट प्रश्नांना जीवन-मरणाचे प्रश्न बनवू पाहात आहेत. आणि त्यात महाराष्ट्रातील सुशिक्षित आणि बुद्धिजीवी समाज रममाण होत आहे. त्यामुळे अशा समाजाकडून उज्ज्वल वर्तमानाची आणि भविष्याची अपेक्षा करणे भाबडेपणाचे आहे.
काही वर्षांपूर्वी एक अनिवासी भारतीयांनी (खरं तर महाराष्ट्रीय) महाराष्ट्राच्या समस्या आणि प्रश्नांवर एक तोडगा सुचवला होता. तो म्हणजे नक्षलवादी मंडळींना बोलावून महाराष्ट्रातील सर्व राजकीय पुढाऱ्यांना हिसका दाखवणे. केवळ हे उद्योजकच नव्हे तर जवळपास प्रत्येक अनिवासी महाराष्ट्रीय अशाच पद्धतीचे अघोरी, अन्याय्य आणि पोरकट तोडगे सुचवत असतो. त्याचे कारण या लोकांचे महाराष्ट्राची परंपरा, आदर्श आणि इतिहास यांबाबत प्रचंड अज्ञान तर आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे लोक ते राहत असलेल्या देशाची आणि भारताची (महाराष्ट्राची) तुलना करत असतात. तिकडचे सगळे सिद्धान्त आणि प्रयोग आपल्याकडे राबवले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. नुसत्या आदर्शांची आयात-निर्यात करून समाज बदलत नसतो, हे या लोकांना सांगूनही पटत नाही. असो. राजकीय पढाऱ्यांबाबतचा तिरस्कार फक्त अनिवासी महाराष्ट्रीयांमध्येच आहे असे नाही तर तो सुशिक्षित, उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य जनतेमध्येही आहे. त्याचे प्रमाण कमी-जास्त आहे इतकेच.
१९१७ साली जन्मलेल्या व्यक्तींपासून आजपर्यंत म्हणजे २०१७पर्यंत, असा १०० वर्षांचा कालखंड घेतला तर राजवाडे यांच्यासारखीच यादी करता येईल. ही यादी गंधर्ववेद प्रकाशनाने निवडलेल्या व्यक्तींशिवायची आहे. शिवाय ही यादी करताना हयात व हयात नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींचा समावेश केला आहे. शिवाय प्रस्तुत लेख समाजकार्य, साहित्य आणि पत्रकारिता या क्षेत्रांशी संबंधित असल्याने त्या क्षेत्रातील व्यक्तींची निवड जास्त प्रमाणात केली गेली आहे, ही या यादीची एक मूलभूत मर्यादा आहे. पृथ्वीचा आकार जसा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा असतो, तसा आकलनाचा आकारही त्याच्या त्याच्या वकुबाएवढाच असतो. त्यामुळे ही यादी अर्धकच्ची आहे, यात अजून बरीच भर घातली जाऊ शकते. यातील काही नावांबाबत अनेकांना विविध कारणांनी आक्षेपही असू शकतात. त्यामुळे हे स्पष्ट करतो की, ही यादी केवळ नमुन्यादाखल आहे. वाचकांनी त्यात भर घातली तर ती पूर्ण होऊ शकेल. मग १०० व्यक्तींची अंतिम यादी तयार करता येईल. नंतर त्याविषयी सविस्तर लिहिता येईल.
तेव्हा ‘महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या लोकांची मोजदाद’ करू पाहणाऱ्या क्रमांकाने तिसऱ्या पण अर्ध्याकच्च्या यादीसाठी काही नमुन्यादाखल नावे…
पत्रकारिता : गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर (निधन), कुमार केतकर, सुरेश द्वादशीवार, विनय हर्डीकर, निखिल वागळे, दिलीप पाडगावकर (निधन), राजदीप सरदेसाई, अनंत भालेराव (निधन)
साहित्य, प्रकाशन व्यवसाय व संपादन : मिलिंद बोकील, नारायण सुर्वे (निधन), सतीश आळेकर, भालचंद्र नेमाडे, मंगेश पाडगावकर (निधन), नामदेव ढसाळ (निधन), कवी ग्रेस (निधन), महेश एलकुंचवार, पु.ल.देशपांडे (निधन), विंदा करंदीकर (निधन), विजय तेंडुलकर (निधन), कुसुमाग्रज (निधन), दिलीप माजगावकर, आ. ह. साळुंखे, सदानंद मोरे, शेषराव मोरे, अच्युत गोडबोले, श्री. ग. माजगावकर (निधन), अशोक शहाणे, श्री. पु. भागवत (निधन), राम पटवर्धन (निधन), श्याम मनोहर, बाबासाहेब पुरंदरे, अरुण कोलटकर
समाजकार्य : बाबा आढाव, अण्णा हजारे, कुमार सप्तर्षि, नरेंद्र दाभोलकर (निधन), लीला पाटील, प्रकाश आमटे, अभय बंग, हिंमत बावस्कर, द्वारकानाथ लोहिया, अप्पासाहेब सा.रे. पाटील (निधन), एन.डी.पाटील, मेधा पाटकर, मृणाल गोरे (निधन), शरद जोशी (निधन)
संशोधन व अर्थकारण : भालचंद्र मुणगेकर, नरेंद्र जाधव, आनंद कर्वे, अनिल काकोडकर, जयंत नारळीकर, प्रियदर्शिनी कर्वे, सुरेश तेंडुलकर (निधन), रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, आतिश दाभोलकर, आशुतोष कोतवाल, विजय केळकर
खेळ : सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, हर्षा भोगले, सुनील गावस्कर
राजकारण : बाळासाहेब ठाकरे (निधन), शरद पवार
शिक्षण : शिवाजीराव भोसले (निधन)
वैचारिक : वसंत पळशीकर (निधन), रा. चिं. ढेरे (निधन), अशोक केळकर (निधन), राम बापट (निधन), मे. पुं. रेगे
आरोग्य : डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रवी बापट
लष्कर : जन. अरुणकुमार वैद्य (निधन)
गायक-चित्रकार-अभिनेते\त्री : किशोरी अमोणकर, एम.एफ. हुसेन (निधन), सुभाष अवचट, प्रभाकर कोलते, भरत दाभोळकर, आशुतोष गोवारीकर, सुलोचना चव्हाण, विठ्ठल उमप (निधन), लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, भीमसेन जोशी (निधन), जगदीश खेबुडकर (निधन), अशोक सराफ, श्रीराम लागू, निळूभाऊ फुले (निधन), अतुल कुलकर्णी, दीनानाथ दलाल (निधन), चंद्रमोहन कुलकर्णी, दादा कोंडके (निधन), माधुरी दीक्षित, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, स्मिता पाटील (निधन), वसंत सरवटे (निधन), विजया मेहता, भानू अथय्या
प्रशासन : माधव गोडबोले
ही यादी पाहून प्रस्तुत लेखकाने पात्रता नसताना ही नस्ती उठाठेव करण्याचा शहाणपणा केला आहे, असे कुणाला वाटल्यास ते साहजिकच म्हणावे लागेल. कारण या आरोपांत भरपूर तथ्य आहे. मात्र अशा प्रकारच्या कामाची गरज आहे, त्याचा उपयोग आहे. त्याला केवळ चालना मिळावी एवढीच प्रस्तुत लेखकाची अपेक्षा आहे.
लेखक अध्यापनाच्या क्षेत्रात आहेत.
mandavgane.rajan@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment