अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक : काही निरीक्षणे
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
सुभाष नाईक
  • हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प
  • Sun , 23 October 2016
  • सुभाष नाईक Subhash Naik हिलरी क्लिंटन डोनाल्ड ट्रम्प Hillary Clinton Donald Trump

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. ८ नोव्हेंबरला त्यासाठी अमेरिकेच्या सर्व पन्नास राज्यांमध्ये एकाच दिवशी अंतिम मतदान होणार आहे. त्यामुळे आता प्रचार अगदी शिगेला पोचला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात प्रामुख्याने ही चुरस आहे. दोन्ही पक्षांची अधिकृत उमेदवारी जाहीर होईपर्यंत अंतर्गत बंडाळी माजली होतीच, पण ती अजूनही शमलेली नाही. ट्रम्प यांनी अकरा वर्षांपूर्वी महिलांविषयी अत्यंत गलिच्छ उद्गार काढल्याची ध्वनिफीत अगदी काल परवाच उघडकीस आली आणि पुन्हा त्यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतले गेले. पण ट्रम्प यांनी त्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली असली तरी उमेदवारी मागे घेण्यास ठाम नकार दिला आहे. ट्रम्प हे त्यांच्या बेताल आणि बेलगाम वाचाळतेबद्दल आधीपासूनच प्रसिद्ध आहेत. बेफाम बडबड करून त्यांनी अनेकदा लोकांची नाराजी ओढवून घेतली आहे.

अध्यक्षपदाच्या यंदाच्या या निवडणुकीत प्रचारानं अगदी हीन पातळी गाठली आहे. वर्तमानपत्रं आणि अन्य प्रसारमाध्यमंदेखील यात मागे नाहीत. त्यांच्यात सरळ सरळ  दोन तट पडले आहेत. समतोल आणि सद्सद्विवेक यांना त्यांनी केव्हाच सोडचिट्ठी दिली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात ते तसूभरही मागे नाहीत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन या तर मुरब्बी राजकारणी. त्याचे पती बिल क्लिंटन अध्यक्ष होते, तेव्हाच त्यांना फर्स्ट लेडीचा मान मिळालेला होता. आता अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळवायचा आहे. पण सरकारी ई मेलचा गैरवापर केल्याचं प्रकरण त्यांच्या चांगलंच अंगाशी येणार असं दिसत होतं. सुदैवानं त्या प्रकरणात त्यांना क्लीन चिट मिळाली. त्यांच्या वयाचा आणि आजारपणाचा मुद्दा विरोधक अधूनमधून वर उकरून काढतातच. मात्र अजून तरी त्या या सर्वांना पुरून उरल्या आहेत.

अध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांच्या थेट आमनेसामने चर्चेतही हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर कुरघोडी केल्याचं चित्र दिसलं. उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांमधील थेट चर्चेतही ट्रम्प यांचे साथीदार पेन्स फिके पडले. परंतु असं असलं तरी क्लिंटन सहज विजयी होतील, असं आताच सांगणं चुकीचं ठरेल.

हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता अजिबात घटलेली नाही. हिलरी क्लिंटन या राजकारणात मुरलेल्या असल्या तरी धुतल्या तांदळाइतक्या स्वच्छ नाहीत. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावरही होत असतात. क्लिंटन प्रतिष्ठानने भरपूर माया जमवल्याचं बोललं जातं. हिलरी यांच्या प्रांजलपणाविषयी लोक साशंक आहेत. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा मुळातच राजकारणाशी काहीही संबंध नाही. ते मूळचे उद्योगपती. रिपब्लिकन पक्षासाठी निधी संकलनाच्या निमित्तानं त्यांचा राजकारणाशी संबंध आला. पक्षानं त्यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली यावरून त्यांच्याच पक्षात प्रचंड नाराजी आहे. रिपब्लिकन पक्षात ते आजही 'बाहेरचे' समजले जातात. ते अब्जाधीश असले तरी ही सर्व संपत्ती त्यांनी स्वकर्तृत्वाने आणि सचोटीने कष्टपूर्वक मिळवलेली नाही. वाडवडिलांच्या संपत्तीच्या जोरावर त्यांनी आणखी मालमत्ता जमवली. कंपन्या उभारल्या आणि अनेकदा दिवाळखोरीही जाहीर केली. रिअल इस्टेटच्या उद्योगात मात्र त्यांनी जम बसवला आणि अनेक आलिशान इमारती, कॅसिनो उभारले.

विचार कॉन्झर्वेटिव्ह असले तरी 'अमेरिकेला पुन्हा आपण गतवैभव प्राप्त करून देऊया' असं सांगत ट्रम्प यांनी अफाट लोकप्रियता मिळवली आहे. अमेरिकेतील शहरी सुशिक्षित, पदवीधर उच्च मध्यमवर्गीयांचा हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा असल्याचं दिसतं. या उलट डोनाल्ड ट्रम्प यांनी कृष्णवर्णीय, मेक्सिकन, एशियन, मुस्लीम तसेच महिलावर्गाला दूषणं देणारी वक्तव्यं करून त्या वर्गाची कायमची नाराजी ओढवून घेतली आहे. बाहेरच्या देशांतून रोजगारासाठी अमेरिकेत येऊन तिथंच स्थायिक होणाऱ्या लोकांविरुद्ध ट्रम्प यांनी आवाज उठवला आणि स्थानिक अमेरिकन जनतेमध्ये त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. जागतिकीकरणाच्या विरोधात ट्रम्प अगदी तावातावानं बोलतात.

अमेरिकेनं आजवर केलेले व्यापारी करार रद्द करावेत, असं त्यांचं ठाम मत आहे. व्यापारी करारांमुळे अमेरिकेत बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे, असं त्यांना वाटतं. परदेशी नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घालावी, मेक्सिकोतून येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत बांधावी, अशी आणि यासारखी टोकाची वादग्रस्त विधानं करून ट्रम्प अमेरिकन जनतेत खळबळ माजवत आहेत. दूरचित्रवाहिन्यांनी त्यांना अमाप प्रसिद्धी दिल्यामुळे ट्रम्प हेच अध्यक्ष होणार असंही अनेकांना वाटतं.

वर्तमानपत्रं आणि अन्य प्रसारमाध्यमांप्रमाणेच इंटरनेट आणि सोशल मीडिया यांचा वापर या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर चालू आहे. फेसबुक, ट्विटर यासारख्या साईट्सवर खुली चर्चा वाचायला मिळते. भारतातील सार्वत्रिक निवडणुकीतील प्रचाराची आठवण व्हावी असा प्रचार इथंही दिसून आला. यंदा या प्रचारानं हीन पातळी गाठली आहे. मध्यंतरी अनेक प्रमुख शहरांमध्ये ट्रम्प यांची नग्न छायाचित्रं असलेली पोस्टर्स लागली होती. ट्रम्प यांनी तर क्लिंटन यांना गोळ्या घालून ठार केलं पाहिजे अशी चिथावणीखोर भाषणं केली. अमेरिकन लोकशाहीलादेखील त्यामुळे हिंसेचं आणि बीभत्सतेचं गालबोट लागलं, असं म्हणावं लागेल.

 डोनाल्ड ट्रम्प या निवडणुकीत विजयी झाले तर, या शंकेनं अमेरिकेतील भारतीय, आशियाई व अन्य परदेशी तरुण धास्तावले आहेत. ट्रम्प निवडून आले तर एच १ बी व्हिसावर निर्बंध आणू शकतील, अशी भीती त्यांना वाटते. व्यापारी करार रद्द झाले तर आंतरराष्ट्रीय संबंध कसे राहतील, भारत- अमेरिका संबंध कसे असतील, भारत- पाकिस्तान संघर्षात ट्रम्प काय भूमिका घेतील असे अनेक प्रश्न भारतीयांच्या मनात आहेत. हिलरी क्लिंटन यांच्याबाबतही काही ठामपणे सांगता येत नाही. तेव्हा काहीही होवो, आपण सतर्क राहिलं पाहिजे.

 

लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.
subhashn50@gmail.com     

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......