अजूनकाही
‘आटपाडी नाईट्स’च्या सुरुवातीला एक विस्तृत सूचना येते. त्यातल्या दोन ओळीत म्हटल्याप्रमाणे ‘भारतात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमांचा समावेश केला गेलेला आहे. परंतु लैंगिक शिक्षण हे अभावानेच शिकवले जाते. आजही लैंगिक शिक्षणावर बोलणे लाजिरवाणी कृत्य मानलं जातं.’ या वाक्यातून ध्वनीत होणारा अर्थ या सिनेमाचा गाभा आहे. वैवाहिक जीवनात लैंगिक गैरसमजामुळे निर्माण होणारी अनागोंदी कुटुंबाबरोबर सामाजिक रचनेला कशी घातक आहे, याचं अत्यंत मिश्किलपणे चित्रण दिग्दर्शकानं उभं केलं आहे. लैंगिक गैरसमजावर आधारलेल्या गोष्टींचा तरुणांच्या एकूण आयुष्यावर होणारा परिणाम सामाजिक विकृतीला जन्मला घालतो, अशाच एका घटनेची ही कथा आहे.
आटपाडी नावाच्या गावात बापूसाहेब (संजय कुलकर्णी) आणि लक्ष्मी (छाया कदम) या दाम्पत्याची दोन मुलं राहतात. मोठा मुलगा विलास (समीर खांडेकर) याचं मनिषाशी (आरती वडगबाळकर) लग्न झालेलं असतं. आता वसंतचं (प्रणव रावराणे) लग्न लावून देण्यासाठी बापूसाहेब धडपड करत असतात. त्यात वसंत हा शारीरिकदृष्ट्या साधारण शरीरयष्टीचा असल्यामुळे आठ मुलींनी त्याला नकार दिलेला असतो. परिणामी मानसिक न्यूनगंडाने वसंत बेचैन होतो. त्याच्या अशा शरीरयष्टीमुळे मित्रांपासून ते गावातल्या बायकांपर्यत तो चेष्टाचा विषय होतो. अखेर नानाविध प्रकारे प्रयत्न करून त्याचं प्रियाशी (सायली संजीव) लग्न ठरतं. त्यानंतर आपण आपल्या पत्नीला लैंगिक सुख देऊ शकत नाही, अशी चिंता त्याला वाटू लागते. आबा (योगेश इरतकर) हा त्याचा मित्र यावर त्याला एक अपायकारक उपाय सांगतो. त्यामुळे वसंतच्या आयुष्यात वादळ निर्माण होतं. आणि सिनेमा इथेच लैंगिक समस्येसारख्या महत्त्वाच्या विषयाला पुढे संयमाने हाताळतो. यासाठी दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत आणि कलाकारांचा उत्तम अभिनय सिनेमाला उंचीवर घेऊन जातो.
सिनेमाचा पूर्वार्ध विनोदाने भरलेला आहे. ग्रामीण भागात लग्न जुळवताना नवऱ्या मुलांबद्दल कसा विचार केला जातो, याचं चित्रण उभं करताना सिनेमात वापरलेली संवाद जुळून आले आहेत. एका दृश्यात वसंत मुलगी पाहायला जातो. तेव्हा मुलीची आजी वसंतकडे पाहून म्हणते, ‘नवरदेव लईच बारीक दिसतोय, काही खातो पितो की नाही?’ यासारखे संवाद पूर्वार्धात खिळवून ठेवतात. उत्तरार्ध याउलट गंभीर सूर पकडतो. इथं लैंगिक शिक्षणाच्या अभावाला अधोरेखित करण्यासाठी ‘व्हायग्रा’सारखी औषध घेणारा वसंत ते ‘बंगाली बाबा’कडे जाण्याचा सल्ला देणारा मित्र, अशी मांडणी सिनेमात येते. पती आणि पत्नी यांच्यातलं नातं दुरावताना कुटुंब प्रमुखाची भूमिका आणि त्यात स्त्रियांची होणारी घुसमट, अशा परिघावर कथानक फिरत राहतं.
गावात मान-सन्मान मिळावा म्हणून खर्चिक लग्न सोहळा करणारे बापूसाहेब लग्नपत्रिकेत अख्या गावाची नावं लिहितात. तेव्हा जणू काही जनगणना सुरू आहे असं वातावरण निर्माण होतं. सामाजिक पातळीवर मान-सन्मानाची अपेक्षा करणारे बापूसाहेब घरात मात्र बायकांवर सतत अरेरावी करतात. तेव्हा दिग्दर्शक अशा परस्परविरोधी कृत्यातून कौटुंबिक स्तरावर चालणाऱ्या पुरुषाच्या वर्चस्वाला पडद्यावर रंगवतो.
तर दुसरीकडे प्रियाच्या मैत्रिणीतल्या संवादातून स्त्रियांच्या मानसिकतेला अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो. एका दृश्यात प्रियाची मैत्रीण म्हणते, ‘पोरांना लिपस्टीक लावणाऱ्या आणि जीन्स पॅट घालणाऱ्या पोरी सेक्सी वाटतात.’ अशा स्त्री-पुरुषातील संवादातून लेखक आणि दिग्दर्शक एकाच वेळी दोन्ही बाजूंचा फोलपणा उघडा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सिनेमा प्रभाव टाकून जातो. आणि हे सर्व इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने घडत राहतं की, त्यात प्रसन्नता आणि उत्सुकता टिकून ठेवण्यात सिनेमा यशस्वी होतो.
तांत्रिक बाबी उत्तम आहेत. कॅमेऱ्याचा वापर नाविन्यपूर्ण पद्धतीने केला आहे. संवाद जुळून आले आहेत. ग्रामीण बोलीभाषेतील शब्दप्रयोग ग्रामीण लहेजा सोडत नाहीत. प्रणव आणि सायलीने भूमिकेला न्याय दिला आहे. संजय कुलकर्णी मात्र संपूर्ण सिनेमात भाव खाऊन जातात. त्यांच्या हावभावावरून नकळर विनोद घडून येतात. छाया कदम यांनी आव्हान बखूबी पेललं आहे. योगेश इरतकर, विठ्ठल काळे, जतीन इनामदार या त्रिकुटाने आपल्या विनोदी भूमिकांना न्याय दिला आहे. सुबोध भावेची छोटी भूमिका आहे.
दिग्दर्शक नितीन सुपेकरांनी साधारण शरीरयष्टीचा पुरुष विरुद्ध धडधाकट शरीरयष्टीचा पुरुष यांच्याबाबत समाजात असलेल्या लैंगिक गैरसमजाला या सिनेमातून छेद देण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हे करताना लैंगिक शेरेबाजीचा आणि द्विअर्थी भडक व उथळ संवादाचा वापर टाळला आहे.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment