अजूनकाही
राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) या कायद्यांवरून देशात मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. या दोन्ही कायद्यांविरोधात गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन चालू आहे. काहींच्या मते हे कायदे भारतीय संविधानाच्या मूळ गाभ्याला कमकुवत करण्याचा एक डाव आहे, तर काहींना हे घुसखोरांना रोखण्याचे एक प्रभावी शस्त्र वाटत आहे. या दोन्ही कायद्यांमुळे देशातील अल्पसंख्य समजल्या जाणाऱ्या मुस्लीम समाजाला आपले नागरिकत्व गमवावे लागणार आहे, असेही मानले जात आहे. परंतु हिंदू, शीख, बौद्ध, जैन या अल्पसंख्य समाजातील लोकांना नागरिकत्व दिले जाणार आहे.
मोदी सरकारने आपल्या सर्व मंत्र्यांना राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) नेमका काय आहे, हे आपल्या लोकांना समजावून सांगण्याची जबाबदारी दिली आहे. त्यासाठी भाजपचा प्रत्येक नेता, खासदार, आमदार जोमाने कामाला लागला आहे.
२२ डिसेंबर २०१९ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या संविधान चौकात एक मोठी सभा घेतली. त्यात त्यांनी लोकांना या कायद्याचे कसे चांगले परिणाम होतील, याची माहिती दिली. त्या वेळी या कायद्याला फक्त राजकारणासाठी विरोध केला जात आहे असे वक्तव्य केले. या भाषणादरम्यान ते म्हणाले, “मी ९९ नव्हे तर १०१ टक्के चड्डीवाला आहे. संघ विचारधारा हीच माझी विचारधारा आहे. संघाने आम्हाला कधीही मुस्लिमांप्रती द्वेष व्यक्त करण्यास शिकवले नाही.”
गडकरी यांची ही विधाने ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल. कारण संघ विचारधारा नेहमी मुस्लीम आणि ख्रिश्चन द्वेष बाळगत आलेली संघटना आहे. हे समजून घेण्याकरता संघाचे पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या ग्रंथांकडे थोडे बारकाईने पाहावे लागेल.
गोळवलकर गुरुजी यांनी १९३९मध्ये ‘वी ऑर अवर नेशनहूड डिफाईन्ड’ नावाचे एक छोटेखानी पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी ६८ ते ७३ पानांवर शिवाजी महाराजांनी जयसिंग यांना पाठवलेले एक पत्र दिले आहे. त्यात मुस्लीम विरोधातली अनेक विधाने आहेत. उदा- "...हिंदू धर्माच्या शत्रूंवर हल्ला करून इस्लामचे जडमूळ खोदून टाक.”, "...सर्व दक्षिण देशांच्या पटावरून इस्लामचे नाव किंवा चिन्ह धुवून टाकीन.”, “...मूठभर मुसलमानांनी आमच्या एवढ्या देशावर प्रभुत्व गाजवावे ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. पण हे प्रभुत्व त्यांच्या पराक्रमाचे फळ नव्हे.”
एवढेच नव्हे तर गोळवलकर गुरुजी आपल्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकातील भाग दोनमध्ये सोळाव्या अध्यायाअंतर्गत ‘धोका’ या नावाचा एक दीर्घ अध्याय आहे. त्यात ते मुस्लीम आणि ख्रिश्चनांना या देशातील क्रमांक एक आणि दोनचे शत्रू संबोधतात. त्यात ते मुस्लिमांविषयी म्हणतात, “आजही अनेक लोक आता कोणतीही मुस्लीम समस्या नाही असे म्हणताना दिसतात. ज्यांनी पाकिस्तान निर्मितीला सहाय्य केले अशी सर्व दंगेखोर तत्त्वे, शेवटी त्यांना स्थलांतरित होण्यासाठी अन्य कोणतेही स्थान नसल्याने आणि त्यांना पाकिस्तानशी एकनिष्ठ राहणे आवश्यक असल्याने एकदाची कायमची देशाबाहेर निघून गेली आहेत असेच त्यांना वाटते. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर एका रात्रीतून ही तत्त्वे देशभक्त झाली आहेत, असा विश्वास करून आम्ही स्वतःला भ्रमात ठेवू नये. याविपरीत पाकिस्तानच्या निर्मितीनंतर मुस्लिमांचा धोका शतपटीने वाढला असून भविष्यात या देशावर आक्रमणाची योजना आखण्यासाठी पाकिस्तानची निर्मिती पुढे झेप घेण्याच्या दृष्टीने त्यांना सहायक ठरणार आहे.”
याच्या पुढे जाऊन गोळवलकर लिहितात, “देशांतर्गत मुस्लिमांचे अनेक लहान लहान गट विखुरलेले आहेत आणि प्रत्येक गट पाकिस्तानची छोटी प्रतिकृती म्हणूनच अस्तित्वात आहे. आणि येथे देशाचा सामान्य कायदा सौम्य करूनच लागू करणे शक्य होते. एवढेच नव्हे तर तेथे समाज विघातक तत्त्वांची मर्जीच अंतिमरित्या निर्णायक ठरते. याची स्वीकृती मग ती अप्रत्यक्ष असली तरी, ज्याच्या आधारावर आमचे राष्ट्रीय जीवन पूर्णतः उदध्वस्त होण्याची शक्यता बळावते, अशा धोकादायक सिद्धांताला जन्म देते. हे लहान लहान गट नि:संशय या देशात पाकिस्तान समर्थक तत्त्वांचे जाळे विणण्याची केंद्रे झाली आहेत. याचा निष्कर्ष असा की जवळपास प्रत्येक स्थानी मुस्लिमांचे अस्तित्व असून हे लोक संदेश प्रक्षेपकाच्या माध्यमातून सतत पाकिस्तान संपर्कात असतात.”
स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या परिस्थितीबद्दल गोळवलकर लिहितात, “दिल्ली ते रामपूर आणि लखनऊपर्यंत मुसलमानांनी भयानक योजना तयार करण्यास सुरुवात केली आहे. ते संघटित होत आहेत आणि आपल्या लोकांना प्रेरित करत आहेत. ते त्यावेळेस आघात करू शकतात, ज्यावेळेस पाकिस्तान आपल्यावर आक्रमण करेल.”
सोबतच मुसलमानांच्या देशभक्तीवर शंका घेताना गोळवलकर लिहितात, “मुसलमान उच्च पदावर असोत वा नसोत, ते मोठ्या उमेदीने राष्ट्रविरोधी संमेलनात सहभागी होतात.”
गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात फार मोठे स्थान आहे आणि त्यांचे वाक्य, साहित्य हे संघासाठी पाळावयाचे अंतिम आदेश आहेत. ‘स्पॉटलाईट’ (प्रकाशझोत) या नावाचे पुस्तक हे गोळवलकर गुरुजींच्या विचारांचे संकलन आहे. त्यात त्यांचे एक विधान आहे, “हिंदू आणि मुस्लीम यांच्यात तणाव असण्याचे मुख्य कारण असे आहे की, भारतातील मुस्लिमांनी अजूनही स्वतःला भारताशी, येथील लोकांशी, येथील संस्कृतीशी एकरूप केले नाही. मुस्लिमांनी यावे आणि म्हणावे की हा आमचा देश आहे, हे आमचे लोक आहेत, आणि याचा परिणाम समस्या समाप्त होण्यात होईल. ही समस्या मानसिक परिवर्तनाची समस्या आहे.”
एवढेच नव्हे तर पुढे ते म्हणतात, “मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार आपल्या मातृभूमीसाठी अधिक शत्रू निर्माण करतो.”
गोळवलकर गुरुजींच्या या मुस्लीमविषयक दृष्टिकोनावर नजर टाकली असता, आपणास लक्षात येते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिमांप्रती असणारा दृष्टिकोन संशयास्पद आणि त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा आहे.
तरीही नितीन गडकरी म्हणतात की, “संघाने आम्हाला मुस्लिमांप्रती द्वेष करण्यास शिकवले नाही.” तेव्हा त्याचा अर्थ काय होतो किंवा असतो?
.............................................................................................................................................
लेखक अमित इंदुरकर पत्रकार आहेत.
mr.amitindurkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Satish Bendigiri.
Fri , 27 December 2019
अमित यांनी फार मोठे संशोधन केले आहे असा आव आणला आहे. गडकरी म्हणाले ते चुकीचे काय आहे कारण अब्बास नक्वी यांच्याबरोबर त्यांची उठबस असतेच. आणि सगळेच मुसलमान वाईट असतात असं कुठे आहे? शारिया कायदा लागू करणारेच वाईट असतात त्यांच्या बद्दल गुरुजी लिहीत आहेत. ज्यांना शरिया कायदा नको आहे असे बरेच मुस्लिम आहेत त्यांचा द्वेष गडकरी करत नाहीत आणि त्यांचा द्वेष करू नका असे गुरुजी म्हणत. शिवाय गडकरी यांनी गुरुजींची पुस्तके कोळून प्या ली असतील. त्यामुळे गडकरींच्या विधाना बाबत शंका घेण्याचे काहीच कारण नाही.
Gamma Pailvan
Thu , 26 December 2019
अमित इंदूरकर,
आयशप्पत, मुसलमान आपापसांत इतका पराकोटीचा द्वेष बाळगून आहेत की संघासारख्या क्षुल्लक हिंदू संघटनेस तो बाळगायची गरजंच काय मुळातून?
तरीपण आपण धरून चालूया की संघ मुस्लिमांचा द्वेष करतो. तर यामागचं कारण शोधायला हवं. ते कारण असंय की पाकिस्तानातल्या मुसलमानांनी वेगळा देश मागितलेला नसतांना पाकिस्तान ओरबाडून वेगळा काढला. तेच विघटनवादी मुसलमान आजही भारतात आहेत. शिवाय फाळणीच्या वेळेस असंख्य हिंदूंवर भीषण अत्याचार केले. पाकड्यांनी भारतावर पाच युद्धं लादली. काश्मीरातून हिंदूंचा वंशसंहार केला. मग त्यांच्याकडे संशयाने पहायलाच हवं. गोळवलकरांनी समर्पक निरिक्षणं नोंदवली आहेत. त्यास तुम्ही द्वेष म्हणंत असाल तर असा द्वेष करणं भारताच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.
बाकी, 'हिंदू धर्म सोडून कोणी इस्लाम वा ख्रिस्ती पंथ स्वीकारतो तेव्हा भारताच्या शत्रूत एकाने वाढ होते', हे विवेकानंदांचं विधान आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान