अजूनकाही
२०१४-१९चा मोदी सरकारचा कारभार, धोरणे, घडलेल्या घटना, त्यांचे झालेले परिणाम पाहून २०१९च्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रासह देशभरातल्या विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, धर्मनिरपेक्ष संविधानाधिन संसदीय लोकशाही या भूमिकांवर ठाम अशा काही समाजचिंतक, विचारवंत, अभ्यासक, कलावंत, साहित्यिक यांनी निवडणुकीत मतदान करताना पाच वर्षांतील अनुभवांच्या आधारे अशा राजवटी देश कुठे नेऊ शकतात आणि देशाचे संविधान व लोकशाही कशी बासनात गुंडाळली जाईल, याचे सूतोवाच करत मतदारांना विवेक जागृत ठेवून मतदान करा, असे आवाहन केले होते.
यात नाव घेऊन सत्ताधारी पक्षाविरोधात मतदान करा, असे आवाहन नव्हते, ना कुणाला मतदान करा, याचे आवाहन होते. मतदार म्हणून देशापुढे काय आव्हान आहे, हे संयतपणे सांगितले होते. महाराष्ट्रातील शे-दोनशे लोकांनी हे आवाहन केले होते. देशभरही अशी आवाहने केली गेली होती.
असे आवाहन करणाऱ्यांत साहित्यिक, कलावंत अधिक संख्येने होते. त्यांना सत्ताधारी पक्ष व त्यांचे समर्थक ‘तुकडे तुकडे गॅंग’, ‘पुरस्कार वापसी गॅंग’ म्हणून आजही हिणवतात.
गेली अनेक वर्षे पुण्यात पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेइतकीच लोकप्रिय स्पर्धा म्हणजे फिरोदिया करंडक. हा काही एकांकिका स्पर्धेचा करंडक नाही. तो विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम वा स्पर्धा आहे. एका सूत्राभोवती गुंफलेले विविध गुणदर्शन साधारण तासाभरात सादर करायचे. यात निवेदन, नाट्य, संगीत यासह चित्र, शिल्पकला ते नृत्य ते मल्लखांब वगैरेही चालते. त्यामुळे एकांकिकेसारखे एकाच विषयाचे गोळीबंद सादरीकरण इथे अपेक्षितच नसते. सूत्र महत्त्वाचे!
इतक्या विविध कलाप्रकारांतून सामाजिक-राजकीय भूमिकांपेक्षा सांस्कृतिक किंवा विविध भावछटांभोवतीच सहसा सूत्र ठेवले जात आलेय. त्यामुळे आजागायत निकालावरची एखाद-दुसरी खदखद वगळता या स्पर्धेतून राजकीय-सामाजिक मतमतांतराचा गलबला झाला नाही. त्यामुळेच या वर्षी एकदम विषय व नियमावली आल्यावर प्रथमच फिरोदिया करंडक राजकीय आखाड्यात आला. स्पर्धक, कलाकॄती यापेक्षा संयोजकच स्पर्धा सुरू होण्याआधीच विवादात सापडावे, हेही आक्रितच!
संयोजकांनी सूत्र ठरवताना कुठले विषय वगळावेत याची जी सूची दिली, ती उघड उघड सरकारी धोरणे, सत्ताधारी पक्षाची विचारधारा अधोरेखित करणाऱ्या विषयांची होती. गंमत वाटते एका शहरातील २०-२५ महाविद्यालयांतील १०००-१२०० मुलामुलींनी विचार केला तर काय, याची भीती बलाढ्य, बहुमतातील सत्ताधारी पक्षाला वाटावी!
यावर लगेचच रंगकर्मींच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नापसंती इतकी वाढली की, विषय सूची मागे घ्यावी लागली. पण संहिता सेन्सॉर संमत करून घेण्याची अट घालण्यात आली. तशी ती असतेच. पण इथे सरकारने न सांगता सेन्सॉर बोर्डाच्या खांद्यावर बंदूक ठेवली!
मूळात पुण्याच्या अनेक महाविद्यालयात अभाविपचे प्राबल्य आहे, कारण संस्था, संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक यांचे उघड उत्तेजन असते. जवळपास प्रत्येक महाविद्यालयात अभाविपचा पदाधिकारी, प्राध्यापक सक्रिय असतो. असे असताना ही एवढी भीती?
हा झाला पुण्याचा नाट्यविषय, पण गेले काही महिने देशातील अनेक प्रमुख विद्यापीठांत विविध आंदोलने सुरू आहेत. आता नागरिकता दुरुस्ती विधेयक मंजुरीनंतर तर ही आंदोलने पोलिसी दडपशाही, दहशत आणि बेगुमानपणा यांचा वापर करून चिरडली जाताहेत. त्यातून हिंसाचार भडकलाय, पण सरकार आपल्याच अजेंड्याला कुरवाळत बसलेय.
मोदी सरकार पर्व एक आणि दोन यात जेएनयू, अलिगड, जामिया मिलिया विद्यापीठ कायम सरकारच्या तिरस्काराची केंद्रे राहिलीत. यात डावी विचारधारा व मुस्लीम हे निशाण्यावर.
याआधीही पुण्यात एका नाट्य ग्रुपवर अशाच लॉजवर जाऊन धाडी घातल्या होत्या. अनेक साहित्यिक, कलावंत यांना न मागता जवळपास सक्तीचे पोलिसी संरक्षण दिले गेलेय. हे संरक्षण आजही सुरू आहे. २०१४ पासून हे वेगळे पर्व सुरू झालेय. त्याविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले गेले होते. आजही केले गेलेय.
२०१९च्या निवडणुकीत हे आवाहन प्रसिद्ध होताच, सरकार व सत्ताधारी पक्षाचे समर्थन करणारे एक पत्रक जवळपास सातशे ते नऊशे कलाकार, साहित्यिक, विचारवंतानी प्रसिद्ध केले!
अशा प्रकारे हुकूमशाहीसदृश्य, सनातनी, सामाजिक ध्रुवीकरणास प्रोत्साहन देणाऱ्या विचारधारेस प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने उघडपणे समर्थन दिले गेले. आश्चर्य म्हणजे यातले अनेक जण १९७७च्या आणीबाणी विरोधात होते!
आता हे सर्व घडत असताना, विशेषत: कला क्षेत्रात जे घडवले जात आहे, त्यावर या सातशे ते नऊशे देशभक्तांचे काय म्हणणे आहे?
त्यांना याबाबत काही भूमिका घ्यावीशी वाटणार की नाही. मध्यंतरी एका मराठी वृतवाहिनीवर काही मराठी कलावंतांची कलम ३७०बाबतची अज्ञ बालिश बडबड ऐकली होती. ती ऐकून त्यांच्यासारख्याच त्या सातशे ते नऊशे लोकांची देशभक्ती किती उथळ व प्रचारकी आहे, याचा अंदाज त्यांच्या सोशल मीडियावरील बडबडीतूनही येतो.
आता आवाहन नाही, आव्हान आहे, या सातशे ते नऊशे जणांना. आता उघडा तोंड. करा समर्थन.
९२ वर्षाच्या नटसम्राटाला आदरांजली वाहताना यातीलच अनेकांनी उमाळे काढले असतील. त्यांनी एकदा त्यांचे स्मरण करताना त्यांच्या राखेतूनही शिल्लक राहिलेला कणा नीट पाहून घ्यावा आणि विचारांचा कणा आत्म्याहून दहा हजारपट अमर असतो, हे लक्षात घ्यावे!
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment