ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या संग्रहाविषयी...
.............................................................................................................................................
स्त्रीनं लिहिलेली कविता ही आवाजी, विद्रोही आणि टोकाची स्त्रीवादीच असावी, या कल्पनेला पूर्णपणे छेद देणारी आणि स्त्रीला माणूस म्हणून सशक्तपणे मांडणारी संयत, प्रवाही आणि अर्थवाही कविता लिहिणाऱ्या अशी ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची ओळख आहे. आजवर त्यांचे ‘दिगंत’ (१९८१), ‘तरीही’ (१९८५), ‘दिवसेंदिवस’ (१९९२), ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ आणि ‘कदाचित अजूनही’ (२०१७) हे कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. सुमारे चार दशकांपासून काव्यलेखन करणाऱ्या या ज्येष्ठ कवयित्री अतिशय व्यामिश्र अशा समकालात स्त्रीकडे, स्त्रीजीवनाकडे आणि माणूस म्हणून होणाऱ्या तिच्या प्रवासाकडे कसे पाहतात, हे खूपच महत्त्वाचे आहे. बाई म्हणून जुळलेल्या नाळेने तिच्याशी जोडले गेल्याची भावना अनुराधा पाटील यांच्या कवितेमागे आहे आणि परस्परांशी बांधून ठेवणारा धागा आहे, सहवेदनेचा, सहअस्तित्वाचा, दुःखाचा, आंतरिक पीडेचा आणि या व्यवहारी जगात बाईच्या वाट्याला येणाऱ्या तुटलेपणाचा.
‘कदाचित अजूनही’ या संग्रहात एकूण ५१ कविता आहेत. या कविता स्त्रीच्या जगण्याचे ताणेबाणे आपल्यासमोर ठेवतात. त्यात नाईलाज आहे, अपरिहार्यता आहे, जगण्याचे दुःख, वेदना, करुणा, माणूस म्हणून वजा होत जाणं आहे, तसेच मानसिक थकवा, जोडले जाण्याची असोशी आणि ‘स्व’चा शोध आहे. व्हर्जीनिया वूल्फ यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘स्त्रीसाठी आयुष्य म्हणजे मोठमोठ्या दिव्यांची सरळ रेषेतली रांग नाहीय.’ तर जगताना सूक्ष्मतर स्तरावर येणारे जटील अनुभव तिच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. संवादहीनता, तुटलेपण, वगळलं जाणं, दुर्लक्षिलं जाणं तिच्या जगण्याचे संदर्भ बदलतात. सामाजिक आणि कौटुंबिक वर्तुळात स्वतःला व्यक्त करण्याच्या अवकाशाचा अभाव आणि त्याप्रती असंवेदनशील असणारा भवताल आणि समाज तिच्या जगण्याचा संकोच करतात. कितीही पुस्तकं समजून घेतली तरी माणूस तिच्या कक्षेबाहेरच राहिला आहे हेच खरं आणि त्यामुळेच पीळ सोडवत जगणं ही बाईच्या जगण्याची अपरिहार्यता आहे. मग तो पीळ आतला असेल, परिस्थितीचा असेल अथवा नात्याचा असेल. स्त्रीच्या जगण्याची ही दुखरी बाजू ही कविता अत्यंत ताकदीनं उजागर करते.
जगण्यासाठी करावयाच्या असंख्य तडजोडीत स्त्रीला आपला चेहरा बदललेला दिसतो आणि काळाचाही. मनातलं चेहऱ्यावर आणि वर्तमानात न येऊ देण्याची कसरत करताना आतली उलथापालथ गोठवत निःशब्द राहण्याची पातळी ती गाठते. वेगानं, बदलानं आणि व्यस्ततेनं भरलेल्या या जगात दिवसभर कामाला जुंपलेल्या आणि चाकोरीबद्धरीतीनं दिवसभर घरात कष्टणाऱ्या स्त्रीची सुन्न दुपार जगण्यातला विरोधाभास आपल्यासमोर ठेवते.
‘ती घरी परतली’, ‘या जन्मातलं’ आणि ‘भुकेला लाज नसते’ या कवितांतून स्त्रीच्या आयुष्याचं एकसुरी असणं समोर येतं. दुपारच्या सुन्नवेळी काहीच न सुचून चुपचाप बसलेल्या बायांच्या कानाशी अफवा हिंस्त्र कुजबुज करतात. स्त्री म्हणून चार भिंतीतलं हे यंत्रवत भासणारं, रटाळ आणि तोचतोपणा यांनी व्यापलेलं आयुष्य रेटत राहणं, ही आजही अनेकींच्या जीवनाची वास्तविकता आहे.
इतरांसाठी असणं याचाच नाईलाज होऊन जातो आणि मग त्या म्हणतात, ‘मांडवा मग इलाज नसलेला /तोच रडीचा डाव/ अडकून पडावं/ रिकाम्या रहाटगाडग्याच्या त्याच चक्रावर.’ हे चक्र तिला यंत्रवत बनवतं आणि मग ती नेमून दिलेली कामं विनातक्रार यंत्रवत करत राहते. परंपरेनं ठरवून दिलेलं पार पडताना केवळ सोशिक प्रतिसाद देते. स्त्रीच चुलीशी बांधलेलं आयुष्य हे युगानुयुगे चालत आलेलं असं मानवी समाजाचं वास्तव आहे. ‘भूकेला लाज नसते/अन बाईच्या चामड्याला /जात म्हणत /तू वावरलीस मुकाट /गायीच्या करुण डोळ्यांनी/ हयातभर/ जिथं चुलीतल्या जाळाच्या/ उजेडात दिसेल/ तेवढंच तुझं जग होतं.’ यातून तिचं केवळ चुलीपुरतंच सीमित होणं आणि इतर जगातून वजा होत जाणं अस्वस्थ करतं.
मुलगी म्हणून, जोडीदार म्हणून, कुटुंबातली स्त्री म्हणून, समाजाची एक घटक म्हणून स्त्रियांकडे पुरुष कसे पाहतात, त्यांच्याबद्दल काय विचार करतात आणि त्यांना कसे वागवतात, याचे बहुपेडी संदर्भ अनुराधा पाटील यांच्या कवितेत आलेले आहेत. पुरुषांच्या मनातली बाई ही कायमच आदर्श आणि परिपूर्ण असते, हे ‘पुरुषाच्या कल्पनेत असते’ या कवितेतून त्या मांडतात. पुरुषांच्या कल्पनेतली बाई ही नवनवे देह असणारी, न कंटाळता वेगवेगळ्या चवीचा स्वयंपाक करणारी, बऱ्या-वाईट लहरींसह घर नेटकं सांभाळणारी आणि गजऱ्यासारखे प्रसन्न दिवस ठेवणारी अशी आहे. हे वर्णन तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षा आणि तिची तयार केलेली प्रतिमा पुरेशी स्पष्ट करतात.
पण कवयित्री त्या कल्पनेतल्या बाईला उद्देशून म्हणते की, कल्पनेतली असलीस तरीही तू ही बाईच आहेस; म्हणून ‘वावरतेस /जीव मुठीत धरून/जगावं लागणाऱ्याच्या/या जगात मुकाट्यानं.’ आणि जाणीव करून देते की तुला तरी माहीत हवं की आपले दिवस उगवतात-मावळतात नेहमी तिसऱ्या डोळ्याच्या अदृश्य धाकाखाली. हा धाक पुरुषांचा आहे, समाजाचा आहे, तिच्यावर दबाव ठेवून नियंत्रित करणाऱ्या सर्व घटकांचा आहे. अशा पद्धतीच्या स्त्री -पुरुष संबंधात समजूतदारपणाचा आणि संवादाचा अभाव दिसून येतो. असण्याची अपरिहार्यता, नात्यात असतानाची घालमेल, नात्याचं स्वरूप, स्नेहाचा अभाव, घुसमट, अपेक्षा आणि गृहीत धरणं, असे स्त्री-पुरुष नात्याचे विविधांगी संबंध कवितांमधून येतात. घराशी निगडित असणारे विविध संदर्भही या कवितांमधून व्यक्त झाले आहेत. माणसासाठी आणि विशेषतः स्त्रीसाठी घर म्हणजे जोडले जाण्याची भावना दृश स्वरूपात असणे आहे, हे या कवितेतून ठळकपणे जाणवते. घरातून वजा होत गेल्याने नात्याचे नकोसेपण आणि काहीच न मागण्याची आणि न नाकारण्याची निर्विकार अशी स्त्रीची अवस्था होते, ती विषण्ण करणारी आहे. चौकटीत आणि चौकटी बाहेर असण्याचा हा सगळा खेळ आहे, हे यातून अधोरेखित होते.
मुलींवर आणि स्त्रियांवर होणारे शारीरिक अत्याचार हे या बदलत्या समाजाचं विदारक वास्तव आहे. बदलत्या सामाजिक वास्तवात स्त्रीची अवस्था, येणारे अनुभव आणि त्याचे स्त्रीवर होणारे शारीरिक, भावनिक व मानसिक दृश्य अदृश्य परिणाम ‘रस्ता ओलांडतांना’, ‘सध्यातरी’, ‘कोण्या एके काळी’, ‘या जन्मातलं’, ‘भुकेला लाज नसते’ आणि ‘आणि पुसून जाईल’ या कवितांमधून ठळकपणे समोर येतात. भोवतालात असलेली अनिश्चितता तिला चिंतीत करते. येणारा नवा दिवस रोज आपल्या पुढ्यात नवे काही आणून ठेवतोय, ज्यात भरतीच्या लाटेसारखी वाढत गेलेली भीती, असुरक्षितता आणि पडझड आहे. प्रत्येक गोष्टीतून हद्दपार होण्याचे हे दिवस आहेत, याची टोचणी तिला लागून राहते.
इथं ती सगळ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. ओळखीच्या डोळ्यातील अनोळख आणि दबलेली हिंस्त्र चेतावणी यातून कागदावरही काही उमटवावं वाटू नये इतकी दहशत बाईच्या मनात निर्माण होते. असुरक्षिततेच्या अशा वातावरणात लहान मुलांची निरागसता आणि त्यातून विश्वासानं बोट धरणं यात मुलाच्या निरागस विश्वासानं तिचे डोळे भरून येतात. विनाशाचे संदर्भ त्या लहानग्याला ज्ञात नाहीत, पण कवयित्रीला आहेत. नाकारून जगणं, रणरणतं उन, भ्रम, आकांत असं सगळं तिच्या डोळ्यासमोर तरळून जातं. स्त्रीची आई होणं हे सुखकारक असलं तरी या बदलत्या जगात तिचं मन भीती आणि शंकेनं ग्रासतं. आज निरागस असणारं आपलं मूल उद्या अपरिचित पुरुषाच्या रूपात आपल्या समोर आल्यावर आईपणाची ओळखच पुसून जाईल, हे तिला तीव्रतेनं शंकित करतं. आज निरागसतेनं आईच्या दुखऱ्या कपाळावर जादू करणारे हात उद्या एखाद्या कोवळ्या नव्हाळीचा गळा आवळतील का? या विचारानेच ती अस्वस्थ होते.
सामाजिक हिंसेबरोबरच स्त्रीला सामोरं जावं लागतं ते कौटुंबिक हिंसेला. हुंड्यापायी जाळलेल्या आपल्या मुलीच्या आठवणीनं गळ्यातला गहिवर आवरणारे मास्तर असहायतेची जाणीव करून देतात. अतिशय गुंतागुंतीच्या आणि वेगानं बदलणाऱ्या या भवतालात वर्तमान प्रभावित झालंच आहे, परंतु येणाऱ्या भविष्यावर ही प्रश्नचिन्ह उमटवलं आहे. आणि अशा या काळाचं आव्हान माणूस म्हणून आपल्याला पेलायचं आहे.
निरर्थ कोलाहलात स्त्रीच्या अबाधित दुःखाचा उद्गार ही कविता करते. स्त्रीला माणूस म्हणून, स्त्री म्हणून, परिस्थिती म्हणून भोगावं लागणारं असं विविध प्रकारचं दुःख ‘नव्या जन्मात’, ‘आता एक तर’, आणि ‘तसं तर’ या कवितेतून व्यक्त झालं आहे.
चुकीच्या पत्त्यावर पाठवलेल्या पत्रासारखी इथून-तिथं हरवण्याची अवस्था कवितेत शब्दबद्ध झाली आहे. गुंत्यातला पाय सोडवावा वाटतो आणि हा काथ्याकूट थांबवावा वाटतो. पण या घालमेलीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे हे बाईसाठी सोपं नाही याची तिला जाणीव आहे. अस्तित्व टिकवण्याच्या महामार्गावर नेणारा रस्ता आपण चालू शकत नाही आणि मग शाबूत राहण्यासाठी वळचण महत्त्वाची वाटते. स्त्रीच्या या आदिम दुःखाचा उद्गार ही कविता करते. शारीरिक कष्ट, समजूतदार नात्याचा आणि अनुकूल परिस्थितीचा अभाव, नाकारलेपण, तुटलेपण यासह ही दुःखं स्त्रिया सोसतात. त्यातून जगण्यासाठी मार्ग काढताना दिसतात, पण यात कुठेही निराशा नाही तर परिस्थितीशी झगडणं, प्रसंगी स्वीकार करणं, नमतं घेणं, वाट पाहणं आणि प्रयत्न करत राहणं, असा सूर या कवितांमधून उमटला आहे.
‘स्व’चा शोध घेणं ही माणसाची मूळ प्रेरणा राहिली आहे. या कवितेतील स्त्रियादेखील ‘स्व’चा शोध घेताना दिसतात. जगणं अर्थपूर्ण व्हावं म्हणून हा ‘स्व’च्या अवकाशाचा अथक शोध आहे. स्वतःच असं काही सापडवण्याची आस. पण हे कठीण आहे. त्यामुळेच खिडकीमधून तो तुकडा दिसेल तेवढा आणि तितकाच आहे, हे वास्तव कवितेत पाठोपाठ व्यक्त होते. ती शोधत राहते मातीचा वास येणाऱ्या आतल्या काळोखात स्वतःलाच भेटण्याची एखादी जागा, जिथं स्वतःला पेरणं आहे आणि पुन्हा उगवून येण्याची वाट पाहणं आहे. बाहेरच्या बेगडी जगात ती वावरतेय, स्वतःला सिद्ध करू पाहते.
कवितेत अभिनय क्षेत्रात – नाटकात काम करणारी स्त्री कवितेत प्रातिनिधिक स्वरूपात येते. मेकअप उतरवणं, चेहऱ्यावरचे चित्रविचित्र रंग पुसणं, खोट्या पापण्या, उसनी निमुळती नखं काढून ठेवणं, या गोष्टी बेगडी दुनियेतल्या खोटेपणाकडे निर्देश करतात. तिला ते नकोय. त्या जगातला चिमूटभर स्नेह ती नाकारतेय. नाटकात काय किंवा आयुष्यात काय बाहेर तिला अंधारच दिसतो आणि ती म्हणते, ‘निदान उद्याच्या दिवसावर तरी/पडलेली नसो /कोणत्याच पुरुषाची सावली/न घरच्या ना दारच्या.’
स्त्री खऱ्या अर्थानं मुक्त झालीय का? हा प्रश्न उभा राहतो. स्त्रीची मुक्ती हा केवळ एक भ्रमाचा भोपळा आहे असं कवयित्री म्हणतात. नितांत ओळखीची बाई जाहिरातीत जाऊन बसणं आणि बिनचेहऱ्याच्या बाईनं कुंकवाशी जखडलेलं व्रत उजळून घेत बसणं कवयित्रीला या सत्याची जाणीव करून देतं. आतली त्वचा तर एकच असते आपली, या संवेदनेचा विसर पडणं आणि कल्पनेतल्या कल्पवृक्षाची हिरवी पानं झाडून जाणं हे वास्तव आहे. पण तरीही तिच्या संवेदनशील मनाला यांच्याबरोबर चालत राहावं वाटतं. दुखऱ्या डोळ्यांना हलकेच स्नेहाचा स्पर्श करावा वाटतो उदास गल्लीतल्या काळोखात त्या गायब होण्यापूर्वी आणि वास्तवाच्या या जाणिवेतूनच ती दुसऱ्याला (त्याला/पुरुषाला) आणि स्वतःला ही इच्छेच्या बंधनातून मुक्त करते. इथं ती घेणारी, मागणारी नाहीय तर देणारी, काही एक ठरवणारी आहे. त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या निकडीतून स्वतःची मुक्तता केल्यावर तिच्यावर झालेले अक्षम्य निर्दयपणाचे वार हलके हलके होत जातात. हे स्वतःला सोडवणं सोपं, सहजसाध्य नाहीय. यासाठी ती स्वतःबरोबरच झगडते, पण तिला खंत आहे ती सावल्यांच्या या जगात आपण हरवत चाललो आहेत याची.
स्त्री म्हणून जगताना येणाऱ्या अनुभवांची, अडचणींची कल्पनाही नसलेलं, पण परिस्थितीनं दुःखाला सामोरं झालेलं असं मुलींचं जग आणि एक स्त्री म्हणून जीवनाच्या वास्तवाला सामोरं गेल्यावर मुलींबद्दल वाटणारी चिंता ‘दूर क्षितीजाच्या’, ‘एवढं कर’, ‘हे आयुष्य’ आणि ‘मी उभी असते’ या कवितांमधून व्यक्त झाली आहे. प्रत्येक स्त्रीच्या मनात असणारी एक मुलगी असते. ती फुलासारखी आहे, जी झिमझिम उन्हात चालत असते आणि विसरू पाहते जेसीबी मशीनचे घरापर्यंत पोहोचलेले अक्राळविक्राळ हात. रुक्ष आणि कठोर वास्तव तिच्या निरागसतेचा विरोधाभास आहे.
कवितेत लहान भावाला कडेवर घेऊन कुडाच्या भिंतीला टेकून उभी असणारी निराधार मुलगी आहे. ती जगण्याच्या नितांत निकडीत हरवून गेली आहे कधीपासून. जगणं हे एक असं जीवघेणं सत्य आहे ज्यात अभावाचं, परिस्थितीचं ग्रहण तिला तिचं बालपण जगू देत नाही. ‘बगळ्या बगळ्या कवडी दे’ असं म्हणत अद्भुताची कास धरणारी मुलगी, चुपचाप डोळे पुसणारी आणि डोळ्यातल्या थेंबभर तळ्यात अवघा कल्लोळ बुडवणारी सासुरवाशीण आणि आदिमायेचा चेहरा असणारी एक जर्जर कुडी या तीनही अवस्था स्त्री जीवनाची स्थित्यंतरं कवितेतून आपल्या समोर ठेवतात. यामुळेच ‘एवढं कर’ या कवितेतून कवयित्री थोरल्या भावाला आवाहन करते की, बाया निंदणी खुरपणी करण्यात मग्न असलेल चित्र तुझ्या डोळ्यात आहे आणि उजेड मागायला आलेली अश्राप पोरगी भेदरून दिशाहीन पळत सुटलीय. तेव्हा आता गवत, वारा, चंद्र, सूर्य या सर्वांच्या व्याख्या नव्यानं करावयाची गरज आहे.
त्या म्हणतात, ‘शिकव तिला/प पाण्याचा आणि/ भ भाकरीचाच असला तरी/भूक आणि भय यांना/सामोरं जाण्याची रीत.’ तिच्या आत मुक्तीच्या लाटेवर स्वार होण्याची इच्छा आहे, पण हे जग बेनाम भणंगाचं आहे, तेव्हा ही नवी वर्णमाला तिला तिची अकरावी दिशा सापडायला सहाय्यभूत होईल, असा विश्वास कवयित्रीला आहे.
रूढार्थानं ही कविता स्त्रीवादी नाही. ती स्त्रियांचा यातनामय संघर्ष, स्त्रियांच्या जगण्यातील सूक्ष्म व जटील अनुभव, त्यांची दुःखे सिद्धान्ताच्या कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय मांडते. कोणत्याही विद्रोहाचा रस्ता ही कविता चालत नाही. या असंवेदनशील भवतालात ती त्यांना खुणावणाऱ्या क्षितीजांचा वेध घेते, दुःख आणि यातना या बरोबरच मातृत्वाच्या नात्यातून स्त्रीला लाभणाऱ्या जिव्हार नात्याच्या सुखासारखे उत्कट आनंदाचे क्षण मांडते. तिला सहवेदनेची, भगिनीभावाची, स्नेहाची, सहअस्तित्वाची आणि साहचर्याची आस आहे.
स्त्री-पुरुष नात्याला, स्त्रीच्या स्त्रीशी असणाऱ्या नात्याला, मनातील सूक्ष्म अतिसूक्ष आंदोलनांना-कल्लोळांना, जाणीव नेणिवेच्या पातळीवर घडणाऱ्या प्रत्येक अनुभवाला आणि जीवनाला ही कविता अतिशय तरलतेने आणि समग्रतेने आपल्यासमोर ठेवते. ह्या कविता म्हणजे जीवनानुभवाचे आत्मचिंतन आहे ज्याला उबदार समजुतीची एक निरीच्छ किनार आहे. स्त्रीला माणूसपणाच्या अधिक जवळ घेऊन जाणारी कवयित्रीची कृती म्हणजे ही कविता आहे, हे ‘म्हणून’सारख्या कवितेतून कवयित्रीने मांडले आहे. आपला आवाज नोंदवण्यासाठी स्त्रीने लिहिणे, स्त्रीबद्दल लिहिणे आणि स्त्रीला माणूस समजणे ह्या कवयित्रीला अभिप्रेत असणाऱ्या गोष्टीच तर शेवटी स्त्रीवादात अनुस्यूत आहेत हे ही खरे आहे. ‘म्हणून’ या कवितेत म्हटल्याप्रमाणे, ‘हजारो वर्षांपासून/ आपण मागतो आहोत सुईच्या अग्रावर मावेल/एवढी तरी भूमी/पाय टेकण्यापुरती/पण हरणाऱ्यांच्या/बाबतीत तर इतिहासही निर्दय असतो कायम/ म्हणून /मी कविता लिहिते/तेव्हा कृतीच करत असते /माणूसपणाच्या /अधिकाधिक जवळ जाणारी.’
.............................................................................................................................................
‘कदाचित अजूनही’ या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4612/Kadachit-ajunahi
.............................................................................................................................................
लेखिका योगिनी सातारकर–पांडे या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड इथं इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत.
yoginisatarkarpande@rediffmail.com
............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment