स्थलांतर, धर्म आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा
पडघम - देशकारण
माधव दातार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 19 December 2019
  • पडघम देशकारण नागरिकत्व संशोधन विधेयक Citizenship Amendment Bill कॅब CAB नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स National Register of Citizens एनआरसी NRC नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP अमित शहा Amit Shah हिंदू-मुस्लीम Hindu-Muslim

आपल्या निवडणूक वचननाम्यात नमूद केल्याप्रमाणे भाजपने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकास संसदेची मान्यता प्राप्त करून घेतल्यानंतर लगेचच आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्यांत अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झाला. यातून नागरिकत्व दुरुस्ती कायदा (नादुका) आणि सध्या आसाममध्ये अंमलबजावणी सुरू असलेले राष्ट्रीय नागरिक नोंदणी पत्रक (National Citizen Register) यांचा परस्परसंबंध स्पष्ट होतो. आता असंतोष इतरत्रही पसरल्याने नादुकाशी निगडित नागरिकत्व, धर्म आणि स्थलांतर या तीन घटकांचा विचार करणे योग्य ठरेल.

स्थलांतर 

आदिम कालापासून माणसांचे समूह स्थलांतर करत आले आहेत. एखाद्या ठिकाणी राहणे कठीण झाले की, नवी सोयीस्कर जागा शोधली जाई. आता मानवी समूहांची लक्षणीय प्रगती झाली असली तरी स्थलांतराची मूल प्रेरणा कायम आहे. उपजीविकेच्या सरस साधनासाठी व्यक्तिश: किंवा सामूहिकरित्या आजही स्थलांतरे होतातच. राज्य-राष्ट्रे उदयाला आल्यानंतर ‘स्थलांतर राष्ट्रीय का आंतरराष्ट्रीय?’ ही बाब कायदेशीर महत्त्वाची बनली. पण चांगल्या जीवनमानाच्या शोधाची मूल प्रेरणा आंतरराष्ट्रीय सीमा निर्माण झाल्याने बदलत नाही. समुद्र, डोंगर असे अडथळे असतील तर सीमोल्लंघन तुलनेत त्रासदायक व म्हणून मर्यादेत राहू शकते. आधुनिक राष्ट्र-राज्ये देशी आणि विदेशी नागरिकांच्या सीमा पार करण्यावर निर्बंध आणतात, पण उपजीविकेच्या शोधात होणारी स्थलांतरे असे निर्बंध किंवा नैसर्गिक अडथळे यामुळे थांबत नाहीत, हा जागतिक अनुभव आहे. सुपीक जमिनीच्या शोधात पूर्वी मानवी समूह भटकले असतील तर आधुनिक काळात मुख्यत: चांगल्या रोजगाराच्या शोधात श्रमिक सीमापार जातात, कायदेशीररित्या किंवा जरूर पडली तर कायद्याची तमा न बाळगताही.

रोजगाराच्या शोधात आलेले स्थलांतरित कमी वेतनावर मुकाटपणे काम करण्यास तयार असतात. त्याचे लाभ त्यांचे मालक आणि यजमान राष्ट्राची अर्थव्यवस्था यांना मिळतात. संयुक्त अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांची उभारणी स्थलांतरितांनी केली, एवढेच नव्हे तर तिथले मूल रहिवासी आता जवळ जवळ नष्ट झाले आहेत!

जास्त प्रमाणात झालेले स्थलांतरण यजमान देशाच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनावर दूरगामी परिणाम करत असल्याने स्थलांतराचे काही लाभ अनुभवास आले तरी स्थलांतरितांबाबत स्थानिकांच्या मनात आशंका, भीती आणि प्रसंगी विरोध असतो.

सामान्यत: देशांतर्गत स्थलांतरावर कायदेशीर बंधने नसतात आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतरावर निर्बंध असले तरी त्यातून ‘पळवाटा’ शोधत होणारे स्थलांतर थांबवणे कठीण असते. डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकन सीमेवर भिंत बांधण्याची घोषणा केली होती, पण त्याचा खर्च मेक्सिकोने द्यावा, या त्यांच्या मागणीतून स्थलांतर रोखण्याचे प्रयत्न किती खर्चिक असतात हे स्पष्ट होते.   

स्थलांतरीत, निर्वासित आणि घुसखोर

नागरिकत्व कायद्याच्या संदर्भातील चर्चेत सत्ताधारी पक्षाने वारंवार ‘घुसखोर’ हा शब्द वापरला आहे. निर्वासित आणि घुसखोर यांत फरक केला पाहिजे असेही प्रतिपादन या संदर्भात केले जाते. हे अर्थात स्थलांतराचेच विविध प्रकार आहेत. निर्वासितांचे स्थलांतर स्वखुशीने केलेले नसते, तर युद्ध किंवा दंगली अशा स्थितीत ‘निरुपायाने काढलेला पळ’ असे स्वरूप त्यास येते. ज्यू लोकांचे जर्मनीतून पलायन किंवा पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीत सीरिया,  इराण,  अफगाणिस्तानमधील लोकांनी शेजारच्या राष्ट्रात घेतलेला आश्रय, १९४७मध्ये पाकिस्तानमधून भारतात आणि भारतातून पाकिस्तानात झालेले मोठे स्थलांतर किंवा १९७१ साली पूर्व पाकिस्तानातून भारतात आलेले १ कोटी निर्वासित ही स्थलांतराची नक्कीच वेगळी उदाहरणे आहेत.

साहजिकच मानवतेच्या दृष्टीने अशा निर्वासितांना आसरा द्यायचा का नाही हा प्रश्न विविध देशांसमोर उत्पन्न होतो. ‘घुसखोर’ या शब्दप्रयोगातून कायद्याचे उल्लंघन करून प्रवेश केलेल्या आणि तेथेच कायम राहणाऱ्या राहू इच्छिणाऱ्या लोकांचा निर्देश होतो. पण या लोकांचा यजमान देशाच्या अर्थव्यवहारात सहभागी होऊन आपले पोट भरणे एवढाच उद्देश असतो. उपजीविकेच्या शोधात आलेल्या या स्थलांतरितांना ‘घुसखोर’ म्हणायचे तर ज्या देशात प्रवेश करायचा, तेथे हिंसाचार व अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने आलेल्या घुसखोरांना काय म्हणायचे, ते ठरवावे लागेल.     

राजीखुशीने रोजीरोटी कमावण्याच्या उद्देशाने आलेले स्थलांतरित, जीव वाचवण्यासाठी मायदेश सोडण्यास बाध्य झालेले निर्वासित आणि यजमान देशात हिंसाचार करून अव्यवस्था व गोंधळ निर्माण करण्याचा उद्देश असलेले दहशतवादी, यांचा निर्देश कोणत्या शब्दप्रयोगाने करावा, यावर मतैक्य न झाले तरी पहिल्या दोन प्रकारातील व्यक्ती यजमान देशांत दीर्घ रहिवास आणि कालांतराने नागरिकत्व मिळण्याची विनंती, अपेक्षा आणि मागणी करतात; तर तिसऱ्या प्रकारातील लोकांना कायम वास्तव्याची किंवा नागरिकत्वाची अपेक्षा नसते. असलीच तर हौतात्म्याची आस असते! पहिल्या दोन प्रकारातील लोकांना नागरिकत्व द्यायचे किंवा नाही, द्यायचे असल्यास कशा पद्धतीने द्यायचे? मानवतेच्या दृष्टीने निर्वासितांना निराळा निकष असावा का, इत्यादी बाबी हा नागरिकत्व कायद्याशी सबंधित बाबी आहेत. निर्वासितांना मानवतावादी दृष्टीने आसरा द्यावा, पण रोजगारासाठी आलेल्या श्रमिकांना फक्त कामाची अनुमती द्यावी, पण नागरिकत्वाचे अधिकार देऊ नयेत किंवा या आर्थिक स्थलांतरास पूर्णत: बंदी असावी, अशा विविध भूमिका घेणे शक्य आहे. पण नादुकाद्वारे असे बदल झालेले नाहीत. 

नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९   

९५५च्या नागरिकता कायद्यात आजवर अनेकदा दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. आजवरच्या कोणत्याच दुरुस्त्यात ‘धर्म’ हा मुद्दा उपस्थित झाला नव्हता. भारताचे नागरिकत्व कोणास मिळेल, याबाबतच्या नियमांत नागरिक किंवा संभाव्य नागरिक कोणत्या धर्माचा आहे, हा प्रश्न आजवर गैरलागू ठरला होता. नादुकात प्रथमच विशिष्ट देश (पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिस्थान) आणि धर्म (हिंदू, जैन, शीख, बुद्ध, पारसी, ख्रिश्चन) यांचा उल्लेख नागरिकत्वाच्या संदर्भात केला आहे. नमूद केलेले देश मुस्लीम बहुसंख्येचे आहेत आणि नमूद केलेल्या धर्मात इस्लामचा उल्लेख केलेला नाही, ही बाब लक्षणीय आहे.

नादुका २०१९ अन्वये निर्देशित तीन देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात प्रवेश केलेल्या निर्देशित धर्माच्या व्यक्तीना सुलभतेने भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल. भाजपच्या निवडणूक वचनपत्रात ‘निर्देशित देशातील छळापासून बचाव करण्यासाठी भारतात प्रवेश केलेल्या धार्मिक अल्पसंख्य समूहाच्या व्यक्ती’ असा शब्दप्रयोग आहे, पण नादुकात ‘छळ’ हा शब्दप्रयोग नाही. प्रत्यक्ष व्यवहारात संबंधित – हिंदू, शीख, जैन, पारसी, ख्रिश्चन – स्थलांतरितांना आपला छळ होत होता असे सिद्ध करावे लागणार नाही. त्यामुळे ही सवलत हिंदू, शीख, इत्यादी समूहांना मिळत आहे. भाजप जाहीरनाम्यात असेही नमूद केले होते की, या कायद्याबाबत साशंक असणाऱ्या पूर्वोत्तर राज्यातील नागरिकांना याबाबतची वस्तुस्थिती समजावून सांगण्याचे सर्व प्रयत्न करण्यात येतील. प्रत्यक्षात असे प्रयत्न झाल्याची काही चिन्हे दिसली नाहीत आणि असे प्रयत्न झाले असले तरी अयशस्वी ठरले असे दिसते.

नादुकात तीन देशांचा उल्लेख असला तरी मुख्य मुद्दा बांगलादेशाबाबत आहे, कारण मोठे स्थलांतर या देशातून झाले/होत आहे. आपल्या देशात अल्पसंख्याकांचा छळ होतो, असे या विधेयकातून सूचित होत असल्याबाबत बांगलादेशाने नाराजीही व्यक्त केली आहे. पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिस्तान हे इस्लामी देश असल्याने तेथील सर्व अल्पसंख्य स्थलांतरित छळग्रस्त ठरवले जातात. बांगलादेशात अल्पसंख्याकांचा कधीच छळ झाला /होत नाही, असे म्हणणे शक्य नाहीच, पण तेथील सर्व स्थलांतरित छळग्रस्त ठरवणेही अयोग्य आहे. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील हिंदू-मुस्लीम स्थलांतरित देशाच्या भिन्न प्रदेशात जातात. बांगला देशातून प. बंगाल, आसाम या भारतीय राज्यात होणारे स्थलांतर त्यापेक्षा फार भिन्न नाही. पण नादुकामुळे बिगर मुस्लीम बांगलादेशीय स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व सहजी मिळणार आहे. ही बाब धर्माच्या आधारे केलेला भेदभाव व म्हणून घटनेतील कलम १४च्या विरुद्ध ठरते का, हा नुसता घटनेचा अर्थ लावण्याचा तात्त्विक/कायद्याचा मुद्दा नाही. कायद्याचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात नेला जाईलच. त्यावर सर्वोच्च न्यायालय याबाबत काय भूमिका घेते, ही बाब कालौघातच स्पष्ट होईल.

पण नादुकात मुस्लीम समूहाला ‘भिन्न’ वागणूक मिळण्याची सुरुवात इतर क्षेत्रांतही पसरण्याची भीती मुस्लीम समूहांना वाटली, तर त्यात आश्चर्य नाही. भारतीय घटनेत समूह आणि त्यांचा निराळा विचार फक्त सामाजिकदृष्ट्या मागास गटांबाबत (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास) केला आहे. धर्माच्या आधारे समूह कल्पना मान्य करणे आणि त्यांना खास सवलत/अधिकार देणे, ही बाब प्रथमच घडत आहे. यांचे परिणाम दूरगामी होतील.

इस्लामी देशांत मुसलमानांचाही छळ होऊ शकतो (शिया-सुनी किंवा अहमदिया यांना प्रथम गैर इस्लामिक घोषित करून मग त्यांचा छळ होतो! पण भारतीय कायद्यानं या प्रकारास मान्यता द्यावी का?). आणि ‘वसुधैव कुटुंब’ मानणाऱ्या भारत सरकारने छळ होणाऱ्या पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिस्तान या देशांतील स्थलांतरितांत मानवतेच्या दृष्टीने मुसलमान आणि बिगर मुसलमान असा भेद भाव का करावा हा प्रश्न आहे.

भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांचा समावेश का केला नाही हा प्रश्नही अनुत्तरित आहे. पाकिस्तानात सफाई काम करणाऱ्या दलितांना लाभ होईल असे भाजप समर्थकांचे म्हणणे आहे. पण या सफाई कामगारांना भारतात पर्यायी चांगले काम आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळेल याची हमी कोण देऊ शकेल? मुद्दा फक्त धर्म या घटकाधारे भारतीय कायद्यानं व्यक्तींना भिन्न वर्तणूक द्यावी का असा आहे. हा फक्त तात्त्विक मुद्दा नाही; आसाममध्ये आज उफाळलेला असंतोष याच मुद्द्याशी संबंधित आहे. 

नागरिकांचे राष्ट्रीय नोंदणीपत्र

बांगला देश/पूर्व पाकिस्तान या दाट वस्तीच्या प्रदेशातून विरळ वस्तीच्या पूर्वोत्तर भारतात स्थलांतराची प्रक्रिया स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. फाळणीच्या वेळी मोठ्या प्रमाणात-मुख्यत: हिंदू निर्वासित- आले ते आसामप्रमाणे बंगालमध्येही स्थायिक झाले. त्यानंतरही ही प्रक्रिया संथ पण सातत्याने चालू राहिली. त्यात हिंदू आणि मुसलमान असे दोन्ही गट होते. या स्थलांतराचा मोठा दृश्य भार/परिणाम पश्चिम बंगाल आणि कलकत्ता शहरावर झाला. तेथे हे निर्वासित बांगला जीवनपद्धतीवरील आक्रमण या स्वरूपात पाहिले गेले नाहीत, मात्र आसामी लोकांत हे बाहेरचे लोक मोठ्या संख्येने आल्याने देशी जीवनपद्धती आणि संस्कृती धोक्यात आली, अशी भावना निर्माण होऊन विद्यार्थी संघटनांच्या पुढाकाराने प्रदीर्घ, हिंसक आंदोलन झाले.

या प्रसंगी १९८५ साली जो करार झाला, त्यानुसार २४ मार्च १९७१पर्यंत प्रवेश केलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्व देऊन केंद्र सरकार आसाममधील नागरिकांचे एक नोंदणीपत्र (National Register of Citizen) तयार करेल, ही मागणी मान्य झाली. अर्थातच २४ मार्च १९७१ नंतर प्रवेश केलेल्या नागरिकांचे स्थान निराळे असणार होते. पण हे नोंदणीचे काम रेंगाळत राहून अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे आणि त्याच्या देखरेखीखाली पूर्ण होऊन नागरिकांची  जी अंतिम यादी नुकतीच तयार झाली, त्यात १९ लाख लोकांचा समावेश होऊ शकला नाही.

ही प्रक्रिया चालू असताना आपले नागरिकत्व कागदोपत्री पुराव्याने सिद्ध करण्यातील अडचणी आणि समावेश न झाल्यास होणारे दुष्परिणाम यांचा सामना मोठ्या संख्येस सहन करावा लागला. १९ लाख बिगर नागरिकांची जी यादी बनली, त्यात अनेक नामवंतांचा (सरकारी/लष्करी अधिकारी) समावेश असल्याने या प्रक्रियेत त्रुटी राहिल्या हे तर स्पष्ट झालेच. शिवाय नागरिक नोंदणीपत्राच्या समर्थकांच्या मते बिगर नागरिकांची १९ लाख ही संख्या खूप कमी असल्याने त्यांनाही ही यादी अपुरी वाटते.

नादुका कायदा ३१ डिसेंबर २०१४पर्यंत भारतात प्रवेश केलेल्या बिगर मुस्लीम स्थलांतरितांना नागरिकत्व बहाल करत असल्याने आसाममध्ये असंतोष का निर्माण झाला आहे, याचा उलगडा होऊ शकतो. एकतर १९७१ ते २०१४ या मोठ्या कालावधीतील स्थलांतरित नागरिकत्व प्राप्त करू शकतात आणि बिगर मुसलमान स्थलांतरितांना नागरिकत्व मिळणे सोपे बनले आहे.

आसामी आंदोलकांचा मुद्दा सर्व स्थलांतर आणि स्थलांतरित यांना विरोध असा होता; त्यांचा विरोध फक्त मुस्लीम स्थलांतरितांपुरता मर्यादित नव्हता. नादुका आणि नागरिक नोंदणीपत्र या दोन स्वतंत्र पण परस्पर संबधित घटकांचा एकत्रित परिणाम स्फोटक ठरला आहे. नागरिक नोंदणीपत्र सर्व देशभर लागू करण्याचा केंद्र सरकारचा मानस प्रत्यक्षात आला, तर तेथेही नादुकाचे परिणाम तात्त्विक मुद्द्यापुरते मर्यादित राहणार नाहीत. नादुका २०१९द्वारे नागरिकत्वाच्या कल्पनेत बहुसंख्याकवादाची कल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. तो यशस्वी झाला तर त्याचा प्रभाव दूरगामी ठरेल.

.............................................................................................................................................

याच विषयावरील इतर लेख

१) मोदी सरकारने मोहम्मद अली जीनांची मांडणी कशी योग्य होती, हे सिद्ध करण्याची जणू मनाशी गाठ बांधली आहे! - परिमल माया सुधाकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3877

२) भारत ‘हिंदू राष्ट्र’ नाही, पण ते आता धार्मिकतेच्या आधारे लोकांना वगळून, कायद्याच्या आधारे संविधान न बदलता ‘हिंदू राष्ट्र’ होत आहे! - ख्रिस्तोफ जेफ्फरलॉट, शरीक लालीवाला

https://www.aksharnama.com/client/article_detail/3874

३) ‘नागरिकता सुधारणा विधेयका’ची प्रेरणा ‘धर्मनिरपेक्षते’कडून ‘धर्मसापेक्षते’कडे वाटचाल करणारी आहे! - आर. एस. खनके

https://www.aksharnama.com/client/article_detail/3873

४) ‘नागरिकत्व संशोधन विधेयक २०१९’ धर्मा-धर्मांत भेदभाव करणारे आहे? - प्रदीप दंदे

https://www.aksharnama.com/client/article_detail/3856

५) नागरिकत्व (संशोधन) विधेयक पारित होवो-न होवो, ईशान्येकडील परिस्थिती अधिकाधिक स्फोटक होण्याची चिन्हे आहेत. NRCमध्ये समावेश न झालेल्यांचे भवितव्य अधांतरी आहे. - परिमल माया सुधाकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3840

.............................................................................................................................................

साभार - https://madhavdatar.blogspot.com/2019/12/blog-post_17.html

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......