अजूनकाही
डॉ. श्रीराम लागू यांनी आयुष्यभर ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ जोपासला, अंगी बाणवला आणि त्याचा प्रचार-प्रसारही केला. ‘परमेश्वराला रिटायर करा’ हे त्यांचे विधान ही केवळ चूष नव्हती. ती त्यांनी विचारांती स्वीकारलेली भूमिका होती. ती अधिक स्पष्ट करण्यासाठी डॉ. लागूंनी काही लेखही लिहिले. जमेल तेव्हा आपल्या भाषणांतूनही आपली भूमिका समजावून दिली. २०१३ साली डॉ. लागूंचे लेख, अनुवाद आणि मुलाखती यांचा ‘रूपवेध’ या नावाने एक संग्रह पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला. त्यातून हा लेख संपादित स्वरूपात घेतला आहे. मूळ लेख १९९३ साली लिहिलेला आहे.
.............................................................................................................................................
मी सुद्धा भारतीय आहे. भारतीय संस्कृतीत वाढलेला आहे. एका कर्मठ कुटुंबात वाढलेला आहे. तरीसुद्धा लहानपणापासून नास्तिक झालो आहे. का झालो हे आपण सोडून देऊ या. परंतु माझ्या नास्तिक होण्याचं स्वरूप सांगतो. परमेश्वर म्हणजे, मी माझ्या मनाला समाधान लाभावं म्हणून एक आधार घेतलेली संकल्पना आणि अशा संकल्पनेचा आधार घेतल्यामुळं माझ्या मनाला एक स्ट्रेंग्थ मिळते. असा परमेश्वर माझ्या मनामध्ये नाही.
परमेश्वर म्हणजे एक अतिमानवी अशी शक्ती आहे, तिनं विश्वाची निर्मिती केलेली नाही, तरी विश्वाचं नियंत्रण करणारी ती शक्ती आहे आणि त्या शक्तीला मी शरण गेलं पाहिजे, त्या शक्तीचा जर कोप झाला तर माझ्यावर दुर्दैवाचा प्रसंग कोसळेल आणि ती शक्ती जर प्रसन्न झाली तर माझ्या आयुष्याचं कल्याण होईल - ही परमेश्वराविषयी जी संकल्पना आहे; अशा परमेश्वराशी माझं भांडण आहे. ही संकल्पना सामान्य माणसाची असते. एखाद्या ज्ञानेश्वराची संकल्पना ही आध्यात्मिक स्वरूपाची असते. स्वत:च्या आत्म्याला मोक्ष आणि मुक्ती मिळावी म्हणून त्या शक्तीचं ध्यान करावं, नामस्मरण करावं आणि त्यामुळं मनाला शांती मिळावी हा त्यामागं हेतू असतो. अशा संकल्पनेशी माझं भांडण नाही. भांडण नाही एवढ्याचकरिता की, ती त्या त्या माणसापुरती असते, समाजाला त्याचा काही त्रास नाही. अगोदर सांगितलेली संकल्पना मात्र अतिशय उपद्रवी आहे.
ही संकल्पना निर्माण कशी झाली याचा विचार करताना असं लक्षात येतं की, परमेश्वर नावाच्या शक्तीचा कसलाही पुरावा गेल्या पाच हजार वर्षांत माणसाला देता आलेला नाही. त्या संकल्पनेवर माणसाचा दृढविश्वास कसा बसला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
तर परमेश्वर या संकल्पनेचा उगम कसा झाला असेल ते पाहू या. अगदी पुरातन काळ म्हणजे मी पाच हजार वर्षं म्हणतोय ते अगदी मोजून घ्यायचं नाही. आपला वैदिक काळ साधारण पाच हजार वर्षांपूर्वीचा म्हणतात, त्या अर्थानं घ्यायचं तर पाच हजार वर्षांपूर्वी माणूस बौद्धिकदृष्ट्या एका सामान्य पातळीवर होता, हे अगदी निर्विवाद आहे. म्हणजे त्याला साध्या-साध्या नैसर्गिक घटनांचा अर्थ कळत नव्हता. म्हणजे पाऊस कसा पडतो, भूकंप कसा होतो, ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो, हे त्याला कळत नव्हतं आणि त्याच वेळेला, वेळच्या वेळी पाऊस पडला तर शेती कशी चांगली होते, हे त्याला दिसत होतं. आकाशात वीज कडाडताना पाहून सौंदर्याचा अनुभव मिळत होता. त्याच वेळेला तीच वीज खाली जमिनीवर पडली की, जो हाहाकार माजतो त्यानं तो गांगरूनही जात होता. तो या सगळ्या गोष्टींचा असा अर्थ लावत होता की, या सगळ्या शक्तीचं नियंत्रण करणारी एक अतिमानवी शक्ती आहे. ही नियंत्रण करणारी एक फार मोठी जबरदस्त ताकद आहे आणि ही आभाळात कुठंतरी आहे. त्या माणसानं अशी धारणा करून घेणं हे त्याच्या अल्पबुद्धीचं लक्षण होतं, यात काही वाद नाही. परंतु त्या शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा आपण शोधून काढावा, हे त्या माणूस नावाच्या प्राण्याला गेल्या पाच हजार वर्षांत सुचलं नसेल का? तर त्याचं उत्तर म्हणजे, त्याला नक्कीच सुचलं असेल. ही शक्ती शोधून काढायचा त्यानं नक्की प्रयत्न केला असेल.
काही व्यक्तींना साक्षात्कार झालेले आहेत आणि त्यावरून काहींनी असं म्हटलं की, ज्ञानेश्वरांना साक्षात्कार झाला, साक्षात देव दिसला. तुकाराममहाराजांना साक्षात विठोबा दिसला. अशा साक्षात्काराच्या बातम्या ऐकताना माणसाची बरीच शक्ती खर्च झाली. ही साक्षात्कार झालेली माणसं भोंदू नाहीत, प्रामाणिक आहेत, सामाजिक काहीतरी तळमळीनं काम करणारी आहेत. त्यांना साक्षात्कार झाले असतीलही. पण मला साक्षात्कार होत नाही, याचा अर्थ मी पापी माणूस आहे. तुकाराम-ज्ञानेश्वर यांच्या लेव्हलवर जात नाही, अशी समजूत त्यांनी करून घेतली आणि याला पहिला धक्का बसला विज्ञानाच्या उदयानं.
विज्ञानाची सुरुवात झाली चारशे वर्षांपूर्वी. कोपर्निकस या शास्त्रज्ञानं पहिला धक्का दिला. त्यानं सांगितलं की, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नाही, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ‘बायबल’मध्ये सांगितलं होतं की, पृथ्वी ही विश्वाचा केंद्रबिंदू आहे आणि सगळे तारे-ग्रह तिच्याभोवती फिरतात. धर्मगुरूंनी जाहीर केलं की, हा माणूस पाखंडी आहे. कोपर्निकस काही परमेश्वराच्या वा धर्माच्या विरुद्ध निघालेला नव्हता. तो सत्याच्या शोधात निघालेला होता. त्याला अनुभव व प्रयत्नांनी सत्य दिसलं ते असं की, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे; आणि हे सत्य मांडण्याचं धैर्य त्यानं दाखवलं आणि या विज्ञाननिष्ठ माणसाला प्राण गमवावे लागले. कारण धर्मविरोधी मत मांडलं होतं. इतकं ते माणसाच्या डोक्यात तीन हजार वर्षं घट्ट बसलं होतं.
कोपर्निकसचं संशोधन पकडून पुढं दुसऱ्या शास्त्रज्ञांनी काम केलं. विशेषत: गॅलिलिओला त्याच्या दुर्बिणीच्या शोधामुळं जवळपास हेच भोगावं लागलं. त्यानं माफी मागितल्यामुळे तो सुटला. पण त्याच्या दुर्बिणीतून त्यानं सिद्ध करून दाखवलं की, पृथ्वी सूर्याभोवतीच कशी फिरत आहे ते. मात्र माणसाच्या मनात ही परमेश्वराची संकल्पना एवढी घट्ट बसली होती की, तिचा त्याग करण्यास तो सहजासहजी तयार होत नव्हता. तो त्याग केल्याशिवाय माणसाला घरेलू वृत्तीच्या आयुष्यात सुख नांदेल असं दिसत नाही. कारण माणसानं परमेश्वर या संकल्पनेचा पाच हजार वर्षांत एवढा उदो उदो केला आहे - तो विश्वाचा पालनकर्ता आहे, अत्यंत दयाळू अशी ती शक्ती आहे, भक्तानं बोलावल्याबरोबर तो धावून जातो वगैरे वगैरे विधानं त्यानं केली आहेत. याच्यावर विश्वास ठेवणं आलं. तरीसुद्धा परमेश्वराच्या दृष्टीनं एकापाठोपाठ एक धर्म स्थापन झाले. प्रथम फक्त हिंदू धर्म होता. नंतर ख्रिश्चॅनिटी आली आणि बाराशे वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्थापन झाला. या सर्व धर्मांमध्ये परमेश्वराचं अधिष्ठान ही एकच कॉमन गोष्ट आहे. अशी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या अस्तित्वाचा कुठलाही पुरावा आतापर्यंत माणसाला मिळालेला नाही, अगदी इस्लाम धर्म स्थापन होईपर्यंत आणि हे सर्व धर्म विज्ञानाच्या उदयाच्या अगोदरचे आहेत. त्या नैसर्गिक प्रश्नांची उत्तरं माणसाला सापडत नव्हती. म्हणून एका परमेश्वर या संकल्पनेची कल्पना केली गेली.
आज या बहुतेक प्रश्नांचा उलगडा विज्ञानानं केला. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं विज्ञानाला सापडली असा विज्ञानाचा दावा नाही. विज्ञानाचा हा दावा प्रामाणिकपणाचा आहे. नम्रतेचा आहे. विज्ञानानं काही शोध लावलेले आहेत. काही शोध लागताहेत आणि पुढेही लागतील. विज्ञान उद्धटपणे असं सांगत नाही की, माझ्याकडं सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, जसं ‘गीता’ वा ‘कुराण’ वा ‘बायबल’ या धर्मग्रंथांमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत असं सांगितलं जातं. असं उद्धटपण विज्ञानाकडं नाही. हे विश्व कुणी निर्माण केलं हे आता नाही सांगू शकत; पण आणखी काही वर्षांनी त्याचा शोध लागेल, अशी चिन्हं दिसत आहेत. या चारशे वर्षांत धडाधडा इतक्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत की, आणखी चारशे वर्षं गेली की, याही प्रश्नांची उत्तरं ते देईल असं दिसतंय.
परंतु आता प्रश्न असा आहे की, आज अस्तित्वात असलेले सर्व धर्म विज्ञानाच्या उदयापूर्वीचे असल्यामुळं ते सर्व कालबाह्य झालेले आहेत. ते सर्व रद्दबातल केले पाहिजेत. या सर्व धर्मांची ‘सर्वधर्मसमभाव’ ही भोंगळ संकल्पना आहे. म्हणजे सर्व धर्म सारखे आहेत. परंतु हे खरं नाही, हे मला उघड दिसत आहे. सर्व धर्म एकमेकांहून वेगळे आहेत म्हणूनच ते एकमेकांशी भांडताहेत. हे धर्म स्थापन झाल्यापासून धर्माधर्मात कलह चालू आहेत आणि त्यांनी पृथ्वीवर एवढा रक्तपात केलाय की, रक्तपात होण्याचे जे दुसरे अनेक मार्ग आहेत, म्हणजे रोगराई, दैवी-प्रकोप यांच्यामुळे जेवढी माणसं मारली जातात, त्याहून कितीतरी अधिक माणसं धर्माधर्मात जे कलह झाले, जी युद्धे झाली त्यांमध्ये मारली गेली आहेत. उदाहरणं द्यायची झाल्यास ख्रिश्चनांची बूचर्डस म्हणा, मुसलमानांचे जिहाद म्हणा किंवा आपल्या सहिष्णू अशा हिंदू धर्मातही वर्णव्यवस्थेखाली उच्चवर्णीयांनी नीचवर्णीयांची केलेली कत्तर म्हणा, हाल म्हणा किंवा अगदी अलीकडील १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखधर्मीयांची दिल्लीत झालेली भयानक कत्तल- अशा कत्तलींमध्ये माणसांचं इतकं रक्त सांडलं गेलंय की, धर्म शांतिप्रेमाचा संदेश देतात असं म्हणतात त्याचा अर्थ मला कळत नाही.
धर्मग्रंथांत हे सगळं प्रेमाबद्दल असतं, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण पाहतो, पाच हजार वर्षांचे व्यवहार पाहतो, तेव्हा असं दिसतं की, हे धर्म एकमेकांशी भांडत आहेत. हे धर्म कालबाह्य झाले आहेत म्हणून ते सर्व रिटायर केले पाहिजेत. परमेश्वराला रिटायर करण्याचा अर्थ हा की, ही संकल्पना तुमच्या डोक्यातून काढून टाकल्याशिवाय निधर्मीपणाची संकल्पना तुमच्या डोक्यात घुसणार नाही. सर्व मानवाचा एक धर्म केला पाहिजे. त्यात परमेश्वराचं अधिष्ठान नाही. त्यात केवळ नीतिमत्तेचं अधिष्ठान असेल. त्यात केवळ शास्त्रीय-वैज्ञानिक दृष्टिकोन असेल. त्यात सौंदर्यदृष्टीचं अधिष्ठान असेल. असा सबंध मानवजातीला कवेत घेऊ शकेल असा एक धर्म (‘धर्म’ हा शब्द वापरायचा असेल तर) असेल. ‘समाजाची धारणा करतो तो धर्म’, या अर्थानं हा शब्द मी वापरतो आहे. मात्र समाजाचे काही नीतिनियम हे पाळलेच पाहिजेत.
तर सर्व धर्म बाद करायचे असतील, तर आपल्या डोक्यातील परमेश्वर ही संकल्पना नाहीशी केली पाहिजे, तर मानवतेच्या एका प्लॅटफॉर्मवर आपण जगाला काही देऊ शकू. ‘विश्वधर्मा’ची कल्पना अनेक लोकांनी मांडली आहे. विवेकानंदांनी मांडली आहे. त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, बुद्ध हा सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय? त्यानं आपला हिंदू धर्म सोडून स्वत:चा बौद्ध धर्म स्थापन केला. तो सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ हिंदू आहे. इतकं भोंगळ विधान विवेकानंद करूच शकत नाहीत. त्याचा अर्थ असा असावा की, जो लोककल्याणाकरिता सातत्यानं कर्मयोग आचारणात आणतो तो खरा हिंदू. मग त्याचा धर्म कुठलाही असेल. हिंदू धर्माची व्याख्या त्यांनी इतकी व्यापक केली आहे, असं मला वाटतं. बुद्धाला त्यांनी खरा कर्मयोगी अशाकरिता म्हटलं की, तो सातत्यानं लोककल्याणाकरता झटला. तो कुठल्या धर्माचा हे विचारत राहिला नाही आणि इतकी ‘वाईट’ व्याख्याच जर तुम्हाला हिंदू धर्माची वा कुठल्याही धर्माची करायची असेल तर ती आम्हाला मान्य आहे.
मला सांगा, परमेश्वराचं अस्तित्व तुम्ही पाच हजार वर्षं सांगत आहात ते कशाच्या आधारावर? त्याचा पुरावा जोपर्यंत तुम्ही देत नाही, तोपर्यंत ते शक्य नाही असं मी मानणार. नास्तिक लोकांचं मी समजू शकतो, पण आस्तिक लोकांचं मला समजत नाही. ते कशाच्या जोरावर आस्तिक राहिले आहेत? त्या गोष्टीच्या अस्तित्वाचा कसलाही पुरावा नाही. तुमचं जर म्हणणं आहे की, परमेश्वर नावाची गोष्ट आहे, तर ती सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची नाही का?
श्रद्धा या सगळ्या आंधळ्या असतात. डोळस श्रद्धा आणि आंधळ्या श्रद्धा असं नसतं. आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो त्याला ‘श्रद्धा’ म्हणतात. विश्वास आणि श्रद्धा यांमध्ये फार मोठा फरक आहे. माझा कुसुमाग्रजांवर विश्वास आहे, गांधींवर विश्वास आहे, असं मी म्हणू शकतो. पण मी गांधींवर श्रद्धा आहे असं म्हणतो, तेव्हा त्यांनी जे जे केलं ते ते बरोबरच असलं पाहिजे किंवा गांधी एक कर्तुम अकर्तुम शक्ती आहे असं मी मानत असतो, असा अर्थ होतो. मी परमेश्वरावर श्रद्धा किंवा विश्वास कशाच्या आधारावर ठेवणार? तो मला डोळे झाकूनच ठेवावा लागतो. प्रथम परमेश्वर या संकल्पनेवर विश्वास ठेवावा लागतो आणि मग त्याला पूर्ण शरण जावं लागतं.
मी स्वत:ला बुद्धिप्रामाण्यवादी माणूस मानतो. रसेलनी एके ठिकाणी असं म्हटलं की, बुद्धिवाद ही साधी सोपी गोष्ट नाही. फार कठीण असा तो वसा आहे. जर तुम्ही बुद्धिप्रामाण्यवाद एका प्रश्नाला लावायचा ठरवलात तर विश्लेषण करता करता जिथपर्यंत तुम्हाला फरफटत घेऊन जाईल तिथपर्यंत जायची तयारी पाहिजे. ज्या उत्तराशी आणून सोडेल ते उत्तर स्वीकारायची तयारी पाहिजे. तर मी ‘परमेश्वर नाही’, या निष्कर्षापर्यंत गेलो, तेव्हा तो माझ्या सगळ्या ऑर्ग्युमेंटचा एक भाग असतो.
.............................................................................................................................................
डॉ. श्रीराम लागू यांच्या ‘लमाण’ या आत्मचरित्राच्या आणि ‘रूपवेध’ या लेखसंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Fri , 20 December 2019
वाचकहो,
डॉक्टर श्रीराम लागू आता हयात नाहीत. त्यामुळे त्यांना उद्देशून प्रतिसाद देता येणार नाही. मात्र सदर लेखातल्या त्यांच्या विचारांवर भाष्य करेन म्हणतो.
१.
हे अत्यंत विपर्यस्त विधान आहे. Intelligent Design चे अनेक पुरावे आहेत. माणसाचं शरीर हाच मुळी एक भरभक्कम पुरावा आहे.
२.
हे निर्विवाद कशावरून? तरीपण समजा गृहीत धरूया. तरी ही जी काही सामान्य पातळी आहे ती सर्वसामान्य माणसांची आहे. बुद्धिमान पुरुष या पातळीच्या वर असू शकतात ना? पाच हजार वर्षांपूर्वीचं कशाला पाहिजे, आजचं उदाहरण घेऊया. आज काय मोठी पातळी गाठलीये माणसाने? तरीपण डॉक्टर लागूंसारखे बुद्धिमान पुरुष निपजलेंच ना?
३.
हे डॉक्टर लागू कशाच्या आधारे म्हणतात?
४.
हे धादांत असत्य विधान आहे. शिवतांडवस्तोत्रात रावण 'नवीन मेघांत कोंडलेल्या विजेप्रमाणे' अशी उपमा वापरतो. आजही भारतात ढगांत विजा चमकतात त्या प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीस म्हणजे ढग नवीन असतात तेव्हा. रावणाला विजेची निश्चितंच माहिती होती. उत्खननात अगस्त्यघट नावे विजेची बॅटरीही सापडली आहे. प्राचीन भारतीयांनी धातुशास्त्रात बरीच प्रगती केली होती. किमया व रसायनशास्त्र हे देखील प्राचीन भारतीयांना अवगत होतं.
विज्ञानाच्या बाबतीत डॉक्टर लागू यांचं आकलन मर्यादित आहे.
५.
आर्यभट्टाने हेच सत्य कितीतरी शतकं अगोदर सांगितलं होतं.
६.
भारताशी संबंधित नसलेल्या वाळवंटी पुस्तकांचे दाखले देऊन प्राचीन भारतीयांना मागासलेले ठरवू नका कृपया.
७.
वाळवंटी पंथ असेच विज्ञानविरोधी असतात. याउलट हिंदू धर्मात मात्र विज्ञान व तंत्रज्ञान धर्माच्या हातात हात घालून जातात. म्हणूनंच हिंदू धर्म महान आहे.
८.
हे विधान वाळवंटी पंथांच्या बाबतीत खरं असेल. पण ते हिंदू धर्मास लागू पडंत नाही.
९.
विज्ञान काहीही सांगंत नाही वा कसलाही दावा करीत नाही. हां, डॉक्टर लागू सांगतात, गामा पैलवान सांगतो, आदि शंकराचार्य सांगतात, बुद्ध सांगतो, श्रीकृष्ण सांगतो, श्रीराम सांगतो, अगदी राहुल गांधीही काहीतरी सांगतो. पण विज्ञान किंवा शास्त्र काहीही सांगंत नसतं.
१०.
कोण बोलतो असं? मी तरी कोणाचा असला भन्नाट दावा ऐकला नाहीये.
११.
डॉक्टर लागूंना एक सांगावंसं वाटतं की आधुनिक विज्ञानामुळे जितक्या प्रश्नांची धडाधडा उत्तरं मिळाली, त्यापेक्षा जास्त प्रश्न उत्पन्न झालेत. किंबहुना आधुनिक विज्ञानांत प्रश्न काय विचारावा हेच कळेनासं झालंय.
डॉक्टर लागूंना आधुनिक विज्ञानाची जरा म्हणजे जराशीही ओळख नाही. जर असती तर उपरोक्त विधान केलंच नसतं.
१२.
धर्म भांडंत नसून माणसं भांडताहेत. मात्र असं असलं तरीही सर्व धर्म एकमेकांहून वेगळे आहेत हे मान्य.
१३.
हे विधान खरंय. मात्र हे भांडखोर धर्म वा पंथ वाळवंटी आहेत. हिंदू धर्माशी याचा काडीमात्र संबंध नाही. शिवाय देवधर्म न मानणारे कम्युनिस्ट आहेत त्यांनीही भयाण कत्तली केल्या आहेत. त्यांची बिलं कुणाच्या नावावर फाडायची? विवेकाच्या, तर्कवादाच्या नावावर फाडलेली चालतील का? अणुध्वंमुळे हिरोशिमा व नागासाकी इथे झालेला भीषण संहार विज्ञानाच्या नावावर खपवायचा का?
१४.
कत्तल? कसली कत्तल? हिंदू उच्चवर्णीयांनी अन्यवर्णीयांची कसलीही कत्तल केलेली नाही. आणि हाल म्हणाल तर अशी कुठलीही मोहीम राबवल्याचं ऐकिवात नाही.
१५.
हिचा हिंदूंशी कसलाही संबंध नाही. कत्तल करणारे काँग्रेसी म्हणजे सेक्युलर होते.
१६.
निधर्मामुळे कुणाचाही कसलाही फायदा झाला नाही व भविष्यातही होईल याची चिन्हं नाहीत. नकोच मग निधर्मी बकवास. काही गरज नाही परमेश्वराला रिटायर करायची. त्यापेक्षा त्याची भक्ती करावी.
१७.
परमेश्वराशिवाय नीति वगैरेच्या गप्पा मारणे ही निरर्थक बडबड आहे.
१८.
शास्त्रीय नावाचा कोणताही दृष्टीकोन अस्तित्वात नाही. हां, पण प्रत्येक माणसाचा आपापला स्वतंत्र दृष्टीकोन मात्र अस्तित्वात आहे. अशा बहुविध समाजाची धारणा करायची असेल तर समाजाला एकत्र बांधून ठेवणारं सूत्र शोधावं लागेल. हे जे एकीकरणाचं तत्त्व असतं त्याला समाजपुरुष म्हणतात. तोच सामाजिक परमेश्वर आहे. एका परमेश्वरास रिटायर करताकरता डॉक्टर लागू नवा परमेश्वर जन्माला घालताहेत.
१९.
असं असेल तर मग परमेश्वराला रिटायर करायची गरजंच काय मुळातून?
२०.
मी सांगतो कशाच्या आधारावर ते. त्याचं काय आहे की मी किनई वरून दररोज अन्न गिळ गिळ गिळतो आणि दुसऱ्या दिवशी खालून बदाबदा टाकतो. हे नाही केलं तर माझ्या देहाचा मुडदा होईल. माझ्या बापाने हेच केलं. आणि त्याच्याही बापाने हेच केलं. माझ्या यच्चयावत बापजाद्यांनी हेच केलं. आपण सर्वांनी आणि आपल्या सर्वांच्या बापजाद्यांनीही गेले ५००० वर्षं अव्याहतपणे हेच केलं. ही जी अखंड परंपरा आहे ना, हीच परमेश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा आहे.
दगडाला पुनरुत्पादित उपदगड होतो का? मोटारीला पुनरुत्पादित उपमोटार होते का? कारखान्याला पुनरुत्पादित कारखाना होतो का? खुर्चीस पुनरुत्पादित उपखुर्ची होते का? नाही ना? मग माणसाला बरा उपमाणूस होतो!
बरं. पचन आणि पुनरुत्पादन या इतक्या किचकट प्रक्रिया आहेत की यांच्या अनैच्छिक प्रक्रियाखंडांचा कोणीतरी नियंता मानावाच लागतो. यालाच आम्ही परमेश्वर म्हणतो.
२१.
पुरावे दिले तरी बघणार कोण? झोपलेल्याला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही.
२२.
हे खरं धरलं तर मग या आंधळ्या श्रद्धेस डोळस परिमाण प्राप्त करवून देणं हे बुद्धीचं काम आहे.
२३.
हे डॉक्टर लागूंचं मत आहे. श्रद्धा हा शब्द श्रत् म्हणजे ऐकलेलं आणि धा म्हणजे धारण करायची शक्ती असा बनला आहे. तर श्रद्धा म्हणजे अनुभवलेलं धारण करायची मनाची शक्ती. डोळे झाकून विश्वास ठेवणे याला बावळटपण म्हणतात. याचा श्रद्धेशी सुतराम संबंध नाही.
२४.
इथे डॉक्टर लागूंनी श्रद्धेचा पूर्णपणे विपरीत अर्थ लावला आहे. गांधींवर श्रद्धा ठेवूनही गांधींची उलटतपासणी घेता येते. तशी कोणी घेतली नाही ही गांधींची शोकांतिका आहे.
२५.
शरण कसं जायचं ते सद्गुरू दाखवतात. तस्मात सद्गुरू शोधणं आणि शोध लागल्यावर त्यांना शरण जाणं हे मानवी जिवाचं परम कर्तव्य आहे.
२६.
केवळ पोकळ युक्तिवाद नको. परमेश्वर नसल्याचा प्रत्यक्ष अनुभव हवा.
असो.
डॉक्टर लागूंना आधुनिक विज्ञानाची जराही माहिती नाही. त्यांचं विज्ञान आजूनही १९ व्या शतकात अडकून पडलंय. त्यामुळे त्यांनी भोंगळ विधानं केली आहेत.
आपला नम्र,
-गामा पैलवान
dhaygude ganesh
Wed , 18 December 2019