अजूनकाही
१. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांना न्यायालयाची नव्हे तर, मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे, अशी कडक टीका केली आहे.
चांगला मानसोपचारतज्ज्ञ सुचवा अण्णांना, असं आपण बंटीभाऊंना म्हणू शकत नाही… त्यांना तरी अजून कुठे सापडलाय तसा.
………………………………
२. महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी सुरत रेल्वे स्थानकाचा प्रशस्त आणि शांत असा चार नंबरचा प्लॅटफॉर्म लग्न समारंभ, पार्टी, कॉर्पोरेट इव्हेंट यांच्या आयोजनासाठी देता येईल, कल्पना रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यापुढे मांडली आहे.
लग्न, मुंजी, बारसं, सत्यनारायण, रेल्वे अपघातात मरण पावलेल्यांचं श्राद्ध, बारावं, तेरावं, एखाद्या कोपऱ्यात अंत्यसंस्कार अशा सगळ्याच सोहळ्यांसाठी ही जागा खुली ठेवायला हरकत काय? शिवाय आपले बारमाही सणही आहेतच. सगळ्याच ठिकाणी हा उपक्रम सुरू झाला तर लवकरच गजबजलेले प्लॅटफॉर्मही शांत-निवांत होतील आणि रेल्वेकडे जागाच जागा उपलब्ध होईल अशा उपक्रमांसाठी.
………………………………
३. बिहारमध्ये नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यातील मतभेदाची दरी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांना मंचावर न बसवता प्रेक्षकांच्या रांगेत बसवल्याने राष्ट्रीय जनता दलाने नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय जनता दलाने त्वरित मुंबईत प्रतिनिधी पाठवून सरकारमध्ये राहूनही रोज सकाळी उठल्यापासून पहिल्या घासाला खवट काजू खाल्ल्याप्रमाणे सरकारच्या नावाने कडाकडा बोटं कशी मोडत राहायचं, याचा क्रॅश कोर्स करून घ्यावा. हमखास उपयोगी ठरेल. भेटा अथवा लिहा : शिवसेना भवन अथवा मातोश्री, मुंबई.
………………………………
४. मोदी गडी बोलायला फार हुशार आहे. माझे बोट धरून राजकारणात आल्याचे त्यांनी सांगितले. हे ऐकून मी मेलोच ना. : शरद पवार
आमचे पवारसाहेब मोदींपेक्षा हुशार. मोदींनी धडधडीत खोटं विधान केल्याचं त्यांनी बाणेदार, परखडपणे सांगून टाकलं… ताबडतोब नाही हो, त्या समारंभाला महिना उलटून गेल्यानंतर. तिकडे मोदीही खूष, इकडे अनुयायीही.
………………………………
५. मध्यप्रदेशात काही शेतकऱ्यांना महात्मा गांधींची प्रतिमा नसलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्याने खळबळ उडाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून शेतकऱ्यांना या सदोष नोटा मिळाल्या होत्या. बँकेने या नोटा परत घेतल्या आहेत.
बनावट नव्हे हो, खऱ्याच नोटा आल्या होत्या त्यांच्या हातात. हळूहळू सगळ्याच नोटांवरून बापूजींची प्रतिमा हटवण्याआधी एक ट्रायल तर घ्यायला नको का? फारच गडबड झाली, तर सगळेच राष्ट्रपुरुष घ्या नोटेवर अशी ठिणगी टाकायला कितीसा वेळ लागतो. शिवाय राष्ट्रपुरुष तर इथे दर गल्लीत दोन आहेत.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment