अजूनकाही
प्रख्यात रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू आणि प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर… अनेक वर्षे ही दोन नावं महाराष्ट्राच्या अवकाशात सतत तळपत राहिली. पण दोघेही कधी एका व्यासपीठावर येऊन एकमेकांशी वादी किंवा संवादी झालेले नव्हते. २००७ साली दोघंनीही वयाच्या ऐंशीव्या वर्षांत पर्दापण केले होते. म्हणजे ते सहस्त्रचंद्रदर्शनाचा सोहळा अनुभवत होते. हा योग साधून पुण्यातील ‘अक्षर मानव’ या संस्थेने या दोन दिग्गजांना ३० मार्च २००७ रोजी एकत्र आणले. त्यांच्यामध्ये वाद-संवादाचा जाहीर कार्यक्रम घडवून आणला. दै. ‘महानगर’चे संपादक निखिल वागळे यांनी त्यांना बोलते केले. महाराष्ट्रभरातल्या रसिक जाणकारांमध्ये प्रचंड औत्सुक्य निर्माण केलेल्या आणि अलोट गर्दीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचा त्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून लिहिलेला हा वृत्तान्त पुनर्मुद्रित स्वरूपात…
.............................................................................................................................................
डॉ. श्रीराम लागू आणि विजय तेंडुलकर. एक प्रख्यात रंगकर्मी, चित्रपट अभिनेते आणि बुद्धिप्रामाण्यवादी; तर दुसरे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटककार, चित्रपट-कथा-पटकथाकार. दोघेही आपापल्या क्षेत्रातले दिग्गज. त्याचबरोबर सामाजिक संघटना, चळवळीमध्ये हिरिरीने भाग घेणारे, पुढाकार घेणारे, आपल्याला पटलेल्या, योग्य वाटलेल्या भूमिका ठोसपणे मांडणारे, त्याविषयी परखडपणे बोलणारे. त्यामुळे कर्तृत्वाबरोबरच आपल्या वक्तृत्वानेही सतत चर्चेत राहिलेले, राहत आलेले…
डॉ. लागू आणि तेंडुलकर एकाच क्षेत्रात कार्यरत असले, तरी त्यांच्या मूळ भूमिका पूर्णपणे भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यात काही प्रश्नांबाबत मतभेद असणे साहजिक आहे. तेंडुलकर जगण्यावर प्रेम करतात. ‘लिहिण्यापेक्षा जगणं महत्त्वाचं आहे’ असं म्हणतात. जगण्याविषयीची उत्कट ओढ त्यांना हेलावून टाकते. त्यामुळे ते माणूस, त्याचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या जगण्याचे बारीकसारीक पापुद्रे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतात. डॉ. लागूंचे तसे नाही. ते माणसाकडे बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीने पाहतात. माणसाने सतत उत्क्रांत होत राहिले पाहिजे, प्रगत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे म्हणतात. त्यासाठी त्याने बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी झाले पाहिजे असे सांगतात. त्यासाठीच ते ‘परमेश्वराला रिटायर’ करायला सांगतात. कारण ‘तोपर्यंत आपण समाज म्हणून उभे राहू शकणार नाही’ असे त्यांना वाटते.
आणि इथेच डॉ. लागू आणि तेंडुलकर यांच्या भूमिकांमधला फरक लक्षात येतो. तेंडुलकर जगण्याबाबतच्या अनेक शक्यता गृहित धरतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकांमध्ये कधी कधी अंतर्विरोध जाणवतो. बऱ्याचदा त्यांची मते परस्परविरोधी वाटतात. मात्र डॉ. लागूंचे तसे होत नाही. प्रत्येक गोष्टीकडे ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतात. त्यांची भूमिका बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी असल्याने त्यात एक प्रकारची सुसंगती जाणवते.
पण मुळात आपल्या समाजाकडे समंजस दृष्टी व तारतम्यपूर्ण विचार या दोन्हींचा अभाव असल्याने या दोन्ही दिग्गजांच्या भूमिकांकडे, त्यांच्या वक्तव्याकडे निर्विष पद्धतीने पाहिले गेले नाही. किंबहुना आताही जात नाही. हल्लीची प्रसारमाध्यमे आपल्याला हवी तशी आणि सोयीस्कर अशी पत्रकारिता करत असल्याने लागू-तेंडुलकरांच्या अनेक विधानांबाबत त्यांनी आततायीपणा केला, हेही या कार्यक्रमात पुन्हा एकदा सिद्ध झाले.
त्यामुळे लागू-तेंडुलकर कायम वादग्रस्त विधानं करत असतात, असा एक गैरसमज महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. प्रस्तुत कार्यक्रमातही त्यांनी केलेल्या परखड व रोखठोक विश्लेषणावरून तसे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र वस्तुस्थिती तशी नाही, हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. त्यांच्या भूमिका तपशिलासह समजून घेतल्या पाहिजेत. तशा त्या घेतल्या तर कुठेही प्रक्षिप्त वाटणार नाहीत. ‘परमेश्वराला रिटायर करा’ या डॉ. लागूंच्या विधानावरून बरीच कळबळ उडाली होती. पण परमेश्वराला का रिटायर करावे, याची मीमांसा करणारा जो लेख लागूंनी लिहिला आहे, तो वाचला तर सारासार विचार करणारा कोणताही माणूस त्यांच्याशी सहमत होईल!
तेंडुलकरांबाबतही थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. त्यांच्या अनेक नाटकांवरून वाद निर्माण झाले. त्यामुळे तेंडुलकर स्वत:हूनच वाद निर्माण करतात, असे त्यांच्याविषयी म्हटले जाते! या संदर्भात त्यांना निखिल वागळे यांनी छेडले असता, त्यांनी जे सांगितले ते फारच वेगळे होते. ते म्हणाले, “ ‘मी नरेंद्र मोदींना गोळ्या घालीन’ हे विधान मी दापोलीच्या एका शालेय कार्यक्रमात एका मुलीच्या प्रश्नाला उत्तर देताना केले होते. पण त्यानंतर मी प्राप्त परिस्थितीत ते कसे शक्य नाही, असे बोललो होतो. पण प्रसारमाध्यमांनी ते ध्यानात न घेता आधीच्या विधानाचीच बातमी केली.” यावरून प्रसारमाध्यमांचा आततायीपणा काय करू शकतो हे लक्षात येते!
प्रस्तुत कार्यक्रमात निखिल वागळे यांनी लागू-तेंडुलकर यांना स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती, आणीबाणी, बाळासाहेब ठाकरे-शरद पवार, प्रसारमाध्यमे, परमेश्वर, नियती आणि जागतिकीकरण अशा अनेक विषयांवर बोलतं केलं आणि दोघांनीही त्याविषयी आपापली परखड मतं व्यक्त केली. अर्थात ती परखड असली तरी एकमेकांच्या मतांना छेद देणारीच होती असं नाही. बऱ्याचदा ती फक्त भिन्न राहिली. काही वेळा परस्परपूरक राहिली. परमेश्वर, नियती या मुद्द्यांवर मात्र दोघांत चांगली खडाजंगी झाली. पण, शेवटी ‘नियती’विषयीची दोघांतला सामना अनिर्णितच राहिला. त्यामुळे या कार्यक्रमाचं ‘डॉ. लागू आणि तेंडुलकर यांच्यातील वाद-संवाद’ असंच स्वरूप राहिलं.
प्रत्येक पिढी ही पुढच्या पिढीला दोषी ठरवत असते आणि अपयशाचं खापर तिच्या माथ्यावर फोडण्याचं काम करतं. कारण तसं करणं त्यांच्या दृष्टीनं सोयीचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे स्वत:च्या पिढीचं मूल्यमापन\परीक्षण करण्याचा खटाटोप करण्याची वेळ येत नाही, पण डॉ. लागूंनी स्वातंत्र्यानंतरच्या परिस्थितीचं मूल्यमापन करण्यात, ती समजून घेण्यात आम्ही कमी पडलो. त्याबाबत आमची पिढी गाफील राहिली, असं नि:संदिग्धपणे सांगितलं. ते म्हणाले, “ब्रिटिशांना हाकलून दिलं की, आपला देश सर्वार्थानं सुखी होईल, असं त्या काळी आमच्या मनावर बिंबवलं गेलं. पण, ते पूर्णत: चुकीचं होतं. स्वातंत्र्यपूर्वकाळात पुण्यात येणाऱ्या पुढाऱ्यांनी ब्रिटिश गेल्यानंतर देशासमोरील सर्व प्रश्न दूर होतील, असं सांगितलं. त्यामुळे १९७५पर्यंत आम्ही गाफील राहिलो. आणीबाणीनंतर मात्र खाडकन आमचे डोळे उघडले आणि आजची स्थिती तर वर्णन करण्यापलीकडील आहे.”
तर याच प्रश्नावर तेंडुलकर म्हणाले, “हा देश कधी होता, हेच मी शोधतो आहे. स्वातंत्र्यापूर्वी हा देश होता काय? तो आहे असं गृहित धरून आपण प्रवास केला. मात्र आज अनेक अर्थांनी आपली परिस्थिती बिघडलेली आहे. विघटनाची प्रक्रिया पराकोटीला गेली आहे. जागतिकीकरणानं या देशाची वाताहत केली आहे.”
आणीबाणीसंदर्भातही दोघांच्या भूमिका समानच राहिल्या. डॉ. लागूंनी प्रारंभी आम्ही गाफील राहिल्यामुळे सुरुवातीला आणीबाणीचं स्वागत केल्याचं मान्य केलं. देशातील अराजकसदृश स्थितीत शिस्तीचा बडगा म्हणून त्यांना आणीबाणी आवश्यक वाटत होती खरं, परंतु दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्यांना तुरुंगात डांबल्यावर आम्ही जागे झालो, आणीबाणीचे भयंकर पैलू आमच्यासमोर आले, असं त्यांनी सांगितलं. नंतर नाटकाद्वारे त्यासंदर्भात जनजागृतीही केली; तर तेंडुलकरांनी आणीबाणीच्या काळात आम्ही तुरुंगात गेलेल्यांना बाहेरून मदत करत होतो, असं स्वत:च्या सहभागाविषयी सांगून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात ते म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही कधीच वापरलं नाही. हे स्वातंत्र्य वापरलं जाण्याची परंपरा मराठीत नाही. वृत्तपत्राच्या संपादकांनीही अग्रलेखाच्या जागा कोऱ्या सोडून हे स्वातंत्र्य वापरायचं नाकारलं.”
जागतिकीकरणामुळे आपल्याकडे सध्या दोन विचारप्रवाह निर्माण झाले आहेत. एक त्याला विरोध करणारा आणि दुसरा त्याचं स्वागत करणारा. जागतिकीकरणामुळे भारताला नजीकच्या काळात महासत्ता बनण्याचा मार्ग खुला होऊ शकतो, असं या मंडळींचं म्हणणं असतं. ही मंडळी आपल्या पायाखाली काय जळतंय ते पाहतात का, असा सवाल करून तेंडुलकर म्हणाले, “या देशातील तीन चतुर्थांश वास्तव विसरून ही मंडळी बोलत आहेत. आज दारिद्रयरेषेखालील लोकांची संख्या वाढत चालली आहे. या लोकांसाठी एकसंधपणे लढणारा पक्ष वा संघटना आज मला दिसत नाही. अमेरिकेच्या दडपणाखाली आपण काम करीत आहोत. अमेरिका आज गलिच्छ प्रकारचं राजकारण करत आहे. तिने सद्दामला फाशी दिली. पण बुशला दहा वेळा फाशी देण्याची गरज आहे.”
तर डॉ. लागूंनी राजकीय पक्षांना जागतिकीकरणाबाबत काही देणं-घेणं नसून त्यासाठी लढणाऱ्या छोट्या-मोठ्या संघटनांना पाठिंबा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “मेधा पाटकर यांच्यासारखं मी आंदोलन करू शकत नाही की, शिवसेनेसारखी गुंडगिरी करू शकत नाही. त्यामुळे आपण स्वत: काय करू शकतो हे प्रत्येकानं पाहणं आवश्यक आहे. आपण स्वत:ची उन्नती करत राहिलो तर सामाजिक उन्नतीला हातभार लागेल. त्यामुळे ही जबाबदारी प्रत्येकानं उचलायला हवी.”
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी बोलताना मात्र दोघांनीही थेट भाष्य करणं टाळलं. डॉ. लागू म्हणाले, “ही दोन्ही माणसं विश्लेषणाच्या पलीकडील आहेत. हे दोघं तसे आहेत, कारण आपण अडाणी आहोत. हे दोघं समाजाचेच ‘प्रॉडक्ट’ आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल नुसतं हवेत बोलण्यात अर्थ नाही.”तर तेंडुलकरांनी सांगितलं की, “या दोघांविषयी एकांगी विचार करता येणं अवघड आहे. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अंतर्विरोध आहे. राजकीय विश्लेषणाच्या बाबतीत ते सर्व ‘संपादकां’चे बाप ठरतील, पण एका ‘विशिष्ट’ जागेवर पोचले, की त्यांचं वेगळं रूप सामोरं येतं.”
प्रसारमाध्यमांवर मात्र दोघांनीही थेटपणे टीका केली. डॉ. लागू म्हणाले, “माध्यमांची आजची अवस्था मला माहीत नाही. कारण मी त्यांच्यापासून दूर गेलो आहे. ‘मीडिया’ हा शब्द हल्ली शिवीसारखा वाटतो. जाहिराती मिळवण्यासाठी वृत्तपत्रं सध्या छापली जातात अन टीव्हीवर असंख्य जाहिराती दाखवून एखाद्या कार्यक्रमाला पायदळी तुडवलं जातं.” तर तेंडुलकरांनी सांगितलं की, “वृत्तपत्रांसाठी वाचक आणि दूरचित्रवाणीसाठी दर्शक हे केवळ खपाचे आकडे झाले असून, त्यामध्ये सर्वसामान्य एखाद्या सोंगटीसारखा भरडला जात आहे. कुणीही वस्तुस्थितीदर्शक लिहीत नाही.”
परमेश्वराचं अस्तित्व व नियती यावरून डॉ. लागू आणि तेंडुलकरांमध्ये काहीशी खडाजंगी झाली. “आयुष्यानं खूप त्रास दिला. पण त्याचा प्रत्येक वेळी फायदा होत गेला. कुणीतरी मला बोट धरून पुढे नेत राहिलं. आता याला नियती म्हणायचं की आणखी काय, हे तुम्ही ठरवा”, असं मत तेंडुलकरांनी व्यक्त केलं. त्यावर “नियती ही माणसानं निर्माण केलेली सुंदर सबब आहे. पराभव विसर्जित करण्यासाठी तयार केलेलं कुंड आहे”, असं डॉ. लागूंनी प्रत्युत्तर केलं.
हा वाद अंधश्रद्धेकडे गेला तसे दोघांमधले मतभेद जाहीर झाले. “अनेक प्रश्नांची उत्तरं माणसाला सापडत नाहीत. तेव्हा त्याला प्रसंगी अंधश्रद्धेचा आधार घ्यावा लागतो,” असं विधान तेंडुलकरांनी करताच, “हे म्हणजे चोरी ही गरज आहे, असं सांगण्यासारखं आहे. अंधश्रद्धेचा आधार घ्यावा लागत असेल, तर विवेकशक्तीचा पराभव आहे,” असं डॉ. लागूंनी सुनावलं. त्यावर ‘‘माणूस जेव्हा छोटा असतो, त्याच्याकडे जगण्याची साधनं मर्यादित असतात, तेव्हा विवेकबुद्धी त्याला आधार देत नाही,’’ असं तेंडुलकरांनी सांगून ‘नियती’वरील सामन्याचा त्यांच्या बाजूनं शेवट केला.
मात्र अशी काहीशी झाकोळलेली परिस्थिती असली तरी जीवन अखंड सुरू राहील, असा उत्कट आशावाद व्यक्त करून दोघांनी कार्यक्रमाचा शेवट केला.
आशावाद हीच अनेक समस्यांची-प्रश्नांची गुरुकिल्ली असते. काळ हा सर्वांत मोठा शिक्षक असतो खरा, पण त्या काळाचीही उलटतपासणी घेणारा ‘आशावाद’च असतो!
.............................................................................................................................................
डॉ. श्रीराम लागू यांच्या ‘लमाण’ या आत्मचरित्राच्या आणि ‘रूपवेध’ या लेखसंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
.............................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment