‘कॉन्स्टॅलेशन्स’ : नाटकाला स्वतःचा असा वेग आहे, जो प्रसंगी जीवघेणा ठरू शकतो!
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘कॉन्स्टॅलेशन्स’मधील एक दृश्य
  • Sat , 14 December 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe कॉन्स्टॅलेशन्स Constellations एनसीपीए NCPA

एखादे नाटक असे असते की, जे नाट्यगृहातून बाहेर पडल्यानंतरही आपला पिच्छा सोडत नाही. अलीकडेच ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस’ला सादर झालेले ‘कॉन्स्टॅलेशन्स’ हे इंग्रजी नाटक असेच होते. मुंबर्इस्थित या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे. त्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे हा प्रयोग.

‘कॉन्स्टॅलेशन्स’ या नाटकाची निर्मिती एनसीपीएनेच केली आहे, तर दिग्दर्शन ब्रुस गुथरे (जन्म १९६३) या ब्रिटिश रंगकर्मीने. ब्रुस यांनी अलीकडेच एनसीपीएच्या रंगभूमी आणि चित्रपट विभागाची जबाबदारी स्वीकारली आहे. भारतात नाटकाचे दिग्दर्शन करण्याची ही त्यांची कदाचित पहिलीच वेळ असावी. ‘कॉन्स्टॅलेशन्स’ हे इंग्रजी नाटक निक पेन (जन्म १९८४) या तरुण नाटककाराचे आहे. सुमारे ८० मिनिटे चालणारे हे नाटक बघताना आपण अक्षरशः थक्क होतो. यात जसा नाटकाच्या अफाट सादरीकरणाचा वाटा आहे, तसाच जबरदस्त संहितेचाही.

नाटक सुरू होते तेव्हा रंगमंचावर लटकलेल्या अवस्थेतील भरपूर दिवे दिसतात. शिवाय पार्श्वभूमीवर एक आकाशी रंगाचा पडदा. त्यामुळे नाटक प्रत्यक्ष सुरू होण्याअगोदरच आपण विशाल आकाशगंगेचा भाग आहोत आणि विश्वाच्या या अवाढव्य पसाऱ्यात नगण्य आहोत, असा आपल्याला भास होतो. पुढे हे दिवे प्रसंनानुसार कमी-जास्त प्रकाश टाकतात.

या नाटकातच दोनच पात्रं आहेत, रोलँड आणि मरीएन. दोघेही तरुण आहेत. ज्या प्रकारचे नाट्य पुढे घडत जाते, त्यावरून ते आदाम व र्इव्हसारखे आदिम युगूल वाटायला लागतात. कारण ते ज्या समस्यांची चर्चा करतात किंवा त्यांच्या जीवनात ज्या समस्या येतात, त्या सर्व एक प्रकारे कालातीत आहेत. हे सर्व एका विशाल अंतहीन आकाशाखाली घडते. त्यामुळे या कथानकाला आपोआपच सार्वत्रिकता प्राप्त होते. यातच नाटकाचे अर्धे यश दडलेले आहे.

रोलंड आणि मरीएन यांची ओळख होते. ती पदार्थविज्ञान या विषयात संशोधन करत असते, तर तो मधमाशा पाळण्याचा व्यवसाय करत असतो. त्यांची ओळख वाढत जाते. दोघांमध्ये वादावादी, थोडे प्रेम, थोडी तणातणी होत राहते. सुरुवातीची काही मिनिटे दोघांच्या गप्पांत जातात. तेव्हा वाटायला लागते की, नाटक आता विशिष्ट दिशेने जार्इल आणि नेहमीच्या स्त्री-पुरुष संबंधांवरील नाटक असेल. पण अचानक रोलंड व मरीएन आपापल्या तात्त्विक भूमिका बदलतात. जी भूमिका रोलंड काही मिनिटांपूर्वी मांडत होता, तीच भूमिका आता मरीएन तेवढ्याच जोरकसपणे मांडते. हा प्रकार नंतर सतत होत राहतो. परिणामी प्रेक्षकांना एखाद्या स्थितीला किती आयाम असतात, याचा हळूहळू अंदाज यायला लागतो. ते एकत्र राहायला लागतात, लग्न करतात, यथावकाश घटस्फोट घेतात. पण या दरम्यान त्यांच्या परस्परांबद्दलच्या भावना व परिस्थिती किती तरी बदलत असते!

उघड्या आकाशाखाली कथानक घडत असल्यामुळे येथे आशयाच्या अनेक शक्यता सूचित होतात. या सर्व शक्यतांपैकी कोणतीही शक्यता प्रत्यक्षात येऊ शकते, जर रोलंड आणि मरीएन दोघांनी ठरवले तर. याचा अर्थ असा की, माणसाच्या निवडीनुसार त्याचे भविष्य घडते, घडत जाते. या प्रकारे कोणतीही निवड केली की, जीवनाचा प्रवाह खळाळत पुढे सरकत जातो. अर्थात जे निवडले आहे आणि जे निवडले नाही त्या सर्वांचा नाटककार निक पेन यांनी विचार केला आहेच, शिवाय ते रंगमंचावर कसे आणायचे हेसुद्धा दाखवले आहे. एका प्रसंगी मरीएन म्हणते- ‘We are part of a multiverse. At any given moment, several outcomes can coexist simultaneously.’

अशी मानवी अस्तित्वाची, व्यक्तीने केलेल्या निवडीची चर्चा सुरू असताना समजते की, मरीएनला काही तरी असाध्य रोग जडला आहे. यामुळे आतापर्यंत एका प्रकारे तात्त्विक पातळीवर सुरू असलेली चर्चा भूतलावर येते. क्षणभंगुर मानवी अस्तित्व आणि वर पसरलेले अफाट व अमर आकाश यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होते? या अफाट विश्वात माणसाचे स्थान काय आहे? असे प्रश्न आपोआपच वातावरणात फिरायला लागतात. हे प्रश्न अधिकच भीषण होतात, जेव्हा आपले लक्ष सतत मागे लटकत असलेल्या दिव्यांकडे जाते. या दिव्यांचा प्रकाश दिग्दर्शकाने प्रसंगानुरूप कमी जास्त केला आहे. परिणामी बघता बघता ते लटकत असलेले दिवे एखाद्या ग्रीक शोकनाट्यातील कोरससारखे वाटायला लागतात. या अफाट पसाऱ्यात मानवाचे स्थान काय वगैरे प्रश्न मनात येत होते. नाटक बघताना मराठीतील प्रसिद्ध कथाकार जी. ए. कुलकर्णींच्या दोन कथासंग्रहाच्या सुरुवातीला दिलेल्या इंग्रजी कविता मला आठवत होत्या.

No. No. Why further should we roam?

Since every road man journeys by

Ends on a hillside far from Home

Under an alien sky

ही Walter de la Mare यांची ‘रमलखुणा’च्या सुरुवातीला दिलेली कविता आणि

Over these unremembered marble columns

Birds glide their old remembered way

Dive in the red-gold setting tide

And write dark alphabet on the evening sky

Whether an epitaph, chorus, or strange augury

Little man, you only hope to know

ही कविता ‘सांजशकुन’च्या सुरुवातीला दिलेली कविता.

या तशा छोटेखानी नाटकात दोन्ही नटांनी अभिनयाची बहार उडवली आहे. जीम सर्भ (रोलंड) आणि मानसी मुलतानी (मरीएन) हे दोन्ही नट तोडीस तोड आहेत. नाटक बघताना सतत जाणवत होते की, यातील एकही नट जर जरासुद्धा कमी दर्जाचा असता तर प्रयोगाला ही उंची गाठता आली नसती. त्यांची देहबोली व शरीरातून उसळत असलेली ऊर्जा थक्क करते.

नाटकाला स्वतःचा असा वेग आहे, जो प्रसंगी जीवघेणा ठरू शकतो. शिवाय विंगेत जाणे व त्यातून नव्या प्रसंगाचे सूचन करणे वगैरे प्रकार येथे नाही. रंगमंचावर फक्त काही सेकंदांसाठी केलेल्या अंधारातून बाहेर यायचे व नव्या भूमीकेत शिरायचे! हे सोपे नाही. या नाटकात दोन्ही पात्रे त्याच कपड्यांत नाटकभर वावरतात. म्हणजे एकदा नाटक सुरू झाले की, दोन्ही नटांना एका क्षणाची उसंत मिळत नाही. अशा भूमिका पेलून नेणे किती आव्हानात्मक असते! या दोन्ही नटांनी अभिनयाची कामल केली आहे. त्यांच्या अभिनयामुळे आपल्याला खिळल्यासारखे होते.

या नाटकाचे नेपथ्य आंद्रेज गोल्डिंग यांचे आहे, तर प्रकाशयोजना अक्षय खूबचंदानी यांची आहे. प्रकाश योजना व नेपथ्यात ते लटकत असलेले असंख्य दिवे किती महत्त्वाचे आहेत, हे नाटक बघितल्याशिवाय कळणार नाही. हे सर्व नाट्यघटक व्यवस्थित वापरून दीर्घ काळ लक्षात राहील असा प्रयोग सादर केल्याबद्दल दिग्दर्शक ब्रुस गुथरे यांचे त्रिवार अभिनंदन!!!

.............................................................................................................................................

‘कॉन्स्टॅलेशन्स’ या नाटकाच्या एका वेगळ्या प्रयोगाचा हा व्हिडिओ -

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......