‘चैत’, ‘फोर सीझन्स’, ‘लेखकाची गोष्ट’ आणि प्रदीप कर्णिक... कधी कधी पुरस्कारार्थींमुळे पुरस्काराचाच सन्मान वाढतो!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
नीतीन वैद्य
  • ‘चैत’, ‘फोर सीझन्स’, ‘लेखकाची गोष्ट’ आणि प्रदीप कर्णिक
  • Sat , 14 December 2019
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो चैत Chait द. तु. पाटील D. T. Patil फोर सीझन्स Four Seasons शर्मिला फडके Sharmila Phadke लेखकाची गोष्ट Lekhakachi Gosht विश्राम गुप्ते Vishram Gupte प्रदीप कर्णिक Pradip Karnik

यंदाचे सोलापूरचे ‘लोकमंगल साहित्य पुरस्कार’ आज समारंभपूर्वक दिले जात आहेत. या वर्षीच्या पुरस्कारप्राप्त तीन पुस्तकांची आणि एका पुरस्कारार्थीची ओळख करून देणारा हा लेख...

............................................................................................................................................

चैत - प्रा. द. तु. पाटील

प्रा. द. तु पाटील यांची पहिलीच कादंबरी ‘चैत’ ही बदलांच्या वादळातही कष्टानं भरलेल्या, संघर्षपूर्ण तरी जुन्या सत्त्वशील जगण्यातलं ‘असतेपण’ जपू पाहणाऱ्या ग्रामजीवनाची कथा आहे.

मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात अंदाजे बारा हजार वर्षांपूर्वी त्याआधीचं हजारो वर्षांचं भटकेपण त्यागून स्थिरावण्याच्या प्रयत्नांतून कृषीसंस्कृती निर्माण झाली. त्या काळातले आयुष्य अस्तित्वाच्या प्रश्नांनी भरलेले, संघर्षपूर्ण होते, त्यात एकमेकांना धरून असणे, एकमेकांच्या मदतीने निभावून नेणे (यात माणसांबरोबरच आसपासची मानवेतर सृष्टीही आली) बहुतांश संकटांचा मिळून सामना करणे असे सगळेच होते. गेल्या पाच-सहाशे वर्षांत विज्ञानयुग येत गेले, तसं शेतीचं मानवी जीवनातलं स्थान दुय्यम होत गेलं. आपण विराट निसर्गाचा भाग आहोत याचं भान ठेवत पोटापुरतं मिळवण्यातलं समाधानी असणं संपलं हळूहळू. खेड्यांमधून जगण्याच्या, अधिक संधींच्या शोधात शहरांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतरं झाली. अलिकडे तर हा बदल भोवंडून जायला होईल इतक्या वेगानं झाला.

‘चैत’मधला काळ हा हे बदल वेगानं होत असण्याच्या सुरुवातीचा, तिठ्यावरचा काळ आहे. खेडोपाडी वडापनं कधीही, कुठंही वेगवान प्रवास सुरू झाल्यानंतरचा, कॉईन बॉक्सवरून संपर्क सामान्यांच्या आवाक्यात आल्यावेळचा साधारण पंचवीसेक वर्षांपूर्वीचा काळ.

गुढीपाडव्यापासून दोन दिवसांचा ‘चैत’ (स्थानिक ग्रामदेवता बाळकोबाचा उरूस/जत्रा) संपतो, त्या साधारण महिनाभराच्या काळाचं तपशीलातलं हे चित्रण. कुठल्याही नाटकी, भडक घटना प्रसंग नसूनही महिनाभरातल्या संपत चालल्याची चाहूल लागलेल्या, तरी अजून शिल्लक असलेल्या ग्रामजीवनाचा दस्तऐवज.

............................................................................................................................................

फोर सीझन्स - शर्मिला फडके

‘देर्दा’, ‘स्कायस्क्रेपर्स’सारख्या वेगळ्या धर्तीच्या तुर्की कादंबऱ्यांचे अनुवाद, ‘ये शहर बडा पुराना है’, ‘आयो बसंत’सारख्या अप्रतिम कथांमधून जीवनानुभवांची रेखाटनं केल्यावर (जणू वॉर्मअप घेतल्यासारखी) शर्मिला फडकेंनी केलेले पहिले मोठे लॅंडस्केप आहे, ‘फोर सीझन्स’. अनेक छोट्या-मोठ्या, छळणाऱ्या आठवणी मागे सोडणाऱ्या, अनघड पायवाटांमधून आत्मभानाच्या रस्त्यापर्यंतचा हा प्रवास वाचकालाही समृद्ध करतो.

आपल्या असण्याचं भान वेगवेगळ्या संदर्भात, विविधांगांनी देणाऱ्या चार ऋतुंमधला हा प्रवास, प्रत्यक्षातला तसाच प्रतीकात्मकही. पानगळीतली उब न देऊ शकणारी निष्प्राण उन्हं, स्थिरावलेल्या थंडीतली वसंताची चाहूल, कहर उन्हाळ्यातली रंगांची उधळण असं सगळं अनुभवत, त्याला मागच्या अनुभवांशी, आठवणींशी जोडत सुंदरबनच्या पाणथळी जंगलातल्या धुवाँधार पावसात विरामणं… इतक्या दिवसांत मनात साठलेले सल, अस्थिर करणारे वैचारिक गोंधळ संपवून, थांबवून ‘विस्थापन - यात्रा अटळ आहे’ या समेवर येत पुन्हा ‘ग्रासलॅण्ड डेज’कडे, पण आता पूर्वीचं परिघावरचं राहणं नाही तर थेट प्रवाहात उतरणं… आतल्या, बाहेरच्या कोलाहलाला, आतला आवाज ऐकत, थेट भिडणं…

याला पार्श्वभूमी आहे ती पर्यावरण प्रश्नाची, भवतालाच्या विनाशाची, त्याबद्दलच्या आपल्या कमालीच्या बेफिकिरीची, ‘इकोफ्रेंडली’ नावाखाली खपवला जातो, त्या दांभिकपणाची. ज्यांना फिकीर आहे त्यांच्या हतबलतेची, त्यातून येणाऱ्या नैराश्याची.

करिअर, नैतिकता, आतला आवाज यात काही नातं असतं, असू शकतं का? यात संघर्ष होईल तेव्हा महत्त्वाचं काय असणार आपल्यासाठी, हे ठरवता येतं का? असेही काही सनातन प्रश्न यात येतात, आपापल्यापुरता कौल‌ लावावा असे.

....................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4855/Four-Seasons

............................................................................................................................................

लेखकाची गोष्ट - विश्राम गुप्ते

‘लेखकाची गोष्ट’मध्ये ‘लेखकीय आयुष्य’ हेचं ज्याचं ‘जगणं’ असे विश्राम गुप्ते इतक्या वर्षानंतर त्याचा लेखाजोखा मांडताना त्याची वाचनात असलेली मुळं, लेखनातले तीव्र असमाधान, त्यामागची कारणपरंपरा ताटस्थ्याचा तोल राखत तपासतात. हा लेखकाच्याच शब्दांत आपल्या अस्मितेच्या शोधाचा प्रबंध आहे. पटो न पटो पण वाचणं आणि लिहिणं हे ज्यांचं जगणं आहे, त्या सर्वांनी एकदा तरी स्वतःशी कौल लावून पाहावा, असा.

या पुस्तकांचा पूर्वार्ध लेखक होणेच अपरिहार्य कसे होते त्या प्रवासाचा आहे, वाचनानुभवांचा आहे, जगभरच्या अभिजात कृतींच्या प्रभाव उलगडून पाहण्याचा, त्याला आपल्या अनुभवांशी जोडून पाहण्याच्या प्रयत्नांचा आहे. तर उत्तरार्ध लेखक होण्याच्या धडपडीचा, त्यातल्या यशापशांचा आहे.
वाचनात आलेल्या अभिजात, असामान्य कृतींमुळे नकळत स्वतःच्या लेखनाची या कृतींशी, त्याच्या आपल्यावर झालेल्या परिणामांशी तुलना होत असावी, परिणामी लेखनाबद्दलचे तीव्र असमाधानही जाणवते.

जगणं म्हणजे जगाला समजून घेणं, हे आपल्यापुरते नकळत करून गेल्यावर जगभरच्या वाचनातून जे समजले, तसे आपले, भोवतालचे जग नाही याचा पडताळाही अटळ होतो. मग आपले जग तरी तसे उभारावे या तीव्र असोशीतून लेखकाचा जन्म, तोही पुन्हा सततच्या असमाधानासाठीच.

‘अ सर्व्हायवल गाईड फॉर मराठी रायटर्स’ असे उपशीर्षक या पुस्तकाला आहे खरे, पण ते तेवढ्यापुरतेच. पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे इथे खरे नाही. प्रत्येकाचा लेखक होण्याचा प्रवास आपला आपला, दरवेळी नवी आव्हानं, नवं ठेचकाळणं, नव्यानं घायाळ होणं… तरी लेखक होण्याची, आपले जग नव्याने रचण्याची असोशी अनुभवावीच, लेखक असणाऱ्याने\होऊ इच्छिणाऱ्याने तसेच नसणाऱ्यांनीही... व्यक्त होण्याची ही तळमळ आहे, ती शब्द वापरणाऱ्यांपुरतीच थोडीच असते?

............................................................................................................................................

प्रदीप कर्णिक

‘साहित्यविषयक काम’ यासाठी दिलेल्या जाणाऱ्या विशेष पुरस्काराचे विजेते डॉ. प्रदीप कर्णिक मुंबईतील विख्यात रूपारेल महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल असून सध्या ‘मराठी संशोधन मंडळा’चे सचिव आणि मंडळाचे प्रकाशन ‘मराठी संशोधन पत्रिके’चे संपादक आहेत. ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’स्थित असलेल्या दादर नायगाव परिसरावर असलेला सांस्कृतिक प्रभाव’ हा त्यांच्या मुंबई विद्यापीठातून घेतलेल्या पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय आहे. यावरूनही त्यांच्या अभ्यासाचा परीघ आणि वेगळेपण लक्षात यावे.

स्वतंत्र कथात्म साहित्यही त्यांच्या नावावर आहे, काही नाटकं आहेत, सध्या एका त्रिखंडात्मक कादंबरीही ते लिहीत आहेत. ‘ग्रंथालयशास्त्र’ या विषयातील विद्यापीठीय अभ्यासाची पुस्तकंही त्यांनी कर्तव्यबुद्धीनं लिहिली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ‘ज्ञानगंगोत्री’ या त्रैमासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलं.

तरी कर्णिकांचा जीव रमला तो पुस्तकांत, त्यांनी दिलेला आनंद पोचवण्यात. ‘ग्रंथ, ग्रंथालय ग्रंथसंस्कृती’, ‘जावे ग्रंथांच्या गावा’, ‘ग्रंथपुण्यसंपत्ती’, ‘ग्रंथसामर्थ्य’ ही त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची नावंच ते सांगणारी आहेत. या पुस्तकांतील लेख सदररूपात विविध वृत्तपत्रांतून सतत दहा वर्षे प्रकाशित होत होते. नंतर त्याहीपुढे जात त्यांनी दुर्मीळ, अनुपलब्ध, मौलिक साहित्याचा शोध घेणे, त्यांचं पुनःप्रकाशन करून त्यांचा उद्धार करणे, यातही मोठे काम केले. ‘भिवंडीचे वाचनमंदिर आणि त्यांच्या संग्रहातील दोलामुद्रिते’, ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील मराठी हस्तलिखिते’, ‘मराठी प्रकाशकांचे कॅटलॉग - वाङमयेतिहासाचे एक साधन’ आदि संशोधन पत्रिकेत प्रकाशित झालेले त्यांचे यासंबंधातले दीर्घलेख जिज्ञासूंनी आवर्जून पाहावेत.

संतसाहित्य, त्याच्या वेगवेगळ्या काळात उपलब्ध झालेल्या आवृत्त्यांमधील पाठभेद अभ्यासून त्यांच्या चिकित्सक आवृत्त्या सिद्ध करण्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मराठी संशोधन मंडळाचे संचालक, त्याचं मुखपत्र ‘मराठी संशोधन पत्रिके’चे संपादक म्हणून या दोन्ही संस्थांची प्रकाशनं अधिकाधिक वाचकाभिमुख करण्याचा कसोशीने प्रयत्न तर त्यांनी केलाच, पण अनेक जुनी हस्तलिखितं, दुर्मीळ पण महत्त्वाच्या पुस्तिका मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्याचं श्रेयही त्यांच्या नावावर आहे.

सततच्या अतिवाचनानं एक डोळा गमावलेला प्रदीप कर्णिक हा त्यांच्या कामाइतकाच दुर्मीळ ग्रंथप्रेमी आपल्या उरलेल्या नजरेनं धोका पत्करूनही वाचतो आहे… मौलिक, दुर्मीळ अक्षरधन टिकावे, पोचवावे यासाठी धडपडतो आहे... काही वेळा विजेत्यांच्या रूपानं पुरस्काराचाच सन्मान होतो, तसा हा प्रसंग आहे...

............................................................................................................................................

लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......