पहिला ब्रेक, पहिले अनुभव : काही गोड, काही आंबट
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • नवाजुद्दिन सिदिक्की, इरफान खान, शाहरुख खान किंवा अक्षय कुमार
  • Sat , 07 January 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar अनुराग कश्यप Anurag Kashyap उमेश मेहरा Umesh Mehra नवाजुद्दिन सिदिक्की Nawazuddin Siddiqui इरफान खान Irrfan Khan शाहरुख खान Shahrukh khan अक्षय कुमार Akshay Kumar

चित्रपट लेखक ही जमात कायमच उपेक्षित आणि अन्यायग्रस्त समजली जाते. (सलीम-जावेदचा सन्माननीय अपवाद वगळता). त्यांचा पहिला ब्रेक मिळवण्याचा संघर्ष तर अजूनच भयानक असतो. पण या लेखकांचं स्वतःचं एक जग असतं. ही जमात बहुसंख्येनं स्ट्रगलरांचं आश्रयस्थान असलेल्या वर्सोव्यात राहते. तिथून त्यांना पुढची झेप सरळ हायप्रोफाईल वांद्रयात घ्यायची असते. नोकरदार माणसांकडे हे लेखक तुच्छतेनं बघतात आणि नोकरदार माणसं यांच्याकडे ‘झू’मध्ये ठेवलेल्या प्राण्यांकडे बघावं तसं कुतूहलानं. हे लोकांकडून उधार मागून सिगारेट फुकतात. घरमालकाला भाडं देताना यांची तारांबळ उडते. ‘आराम नगर’मधल्या बारमध्ये बसून स्वस्त दारू पिताना हे लोक शंभर कोटी कमावणारी फिल्म बनवून ‘बॉलिवुड पे छा जाने के’ बेत आखत असतात. आज खिसा फाटका असला आणि बूट चावत असला, तरी ‘आने वाला कल’ आपलाच असेल, असा आत्मविश्वास त्यांना असतो. मात्र त्यांना काम मिळवण्यासाठी किंवा पहिला ब्रेक मिळवण्यासाठी काय काय यातायात करावी लागते हे त्यांचं त्यांनाच माहीत. 

मी स्वतः चित्रपटलेखक आहे. अनुराग कश्यपच्या फँटम फिल्म्ससोबत मी पटकथा लेखक म्हणून काम करतो. पण इथपर्यंत येण्यासाठी तब्बल चार वर्षं मी बराच स्ट्रगल केला. बऱ्याच स्टुडियोचे उंबरठे झिजवले. अनेक निर्माता-दिग्दर्शकांना भेटलो. यादरम्यान अनेक वेगवेगळे अनुभव मिळाले. मी यापूर्वी कार्पोरेट क्षेत्रात होतो. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांची अनेकदा रोचक तुलना मनात होते. तर माझ्या पहिला ब्रेक मिळवण्याच्या यात्रेत वेगवेगळ्या लोकांना भेटून अनेक रोचक अनुभव गाठीशी बांधले. फिल्म इंडस्ट्रीत काम न करणाऱ्या लोकांना ते नक्की वेगळे वाटतील. मला आलेले हे काही रोचक अनुभव.   

मी एका बड्या प्रॉडक्शन हाऊसच्या ऑफिसमध्ये मिटिंगसाठी गेलो होतो. तिथल्या क्रिएटिव्ह हेडच्या केबिनमध्ये आमची मिटिंग चालू होती. मध्येच त्याला एक महत्त्वाचा कॉल आला आणि  तो काही वेळासाठी बाहेर गेला. आता मी केबिनमध्ये एकटाच. तिथं कार्डबोर्डवर एक कसलीशी एक्सेल शीट खोचून ठेवली होती. रिकामचोट चाळा म्हणून सहज ती लिस्ट चाळायला घेतली. कुणाचे ऑफिशियल डॉक्युमेंट्स असं वाचणं योग्य का अयोग्य असा प्रश्न त्यावेळेस डोक्यातही आला नाही हे कबूल. त्या एक्सेल शीटमध्ये एक यादी होती. वरवर निरुपद्रवी वाटणाऱ्या त्या यादीत स्फोटक दारूगोळा होता. निदान माझ्यासाठी तरी. त्यात जे काही होतं, ते वाचून मी नखशिखांत हादरलो. त्यात प्रत्येक स्टारपुत्र आणि स्टारपुत्री यांच्या नावाचे उल्लेख होते. त्यांच्या नावासमोर त्यांचं वय, आवडीनिवडी, त्यांच्या जमेच्या बाजू वगैरे लिहिलेलं होतं आणि एका रकान्यात ही मंडळी कुठल्या वर्षी लाँच करता येतील त्या सालाचा उल्लेख होता. हजारो उमेदवार रोज इथं घासत आहेत आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या या मंडळींसाठी लाँचपॅड  अगोदरच तयार आहे. त्यांच्यासाठी स्क्रिप्ट्स तयार केल्या जात आहेत. हे सगळं भयावह आहे. आपल्या माथी कोणकोणते नट-नट्या मारल्या जाणार आहेत याची यादी आणि टाईमटेबल अगोदरच तयार आहे. सावध ऐका पुढल्या हाका. ही घटना दोन वर्षापूर्वीची. मी त्या यादीत वाचलेली काही नावं इंडस्ट्रीमध्ये आली आहेत.  त्यामुळे एखादा नवाजुद्दिन सिदिक्की, इरफान खान, शाहरुख खान किंवा अक्षय कुमार याचं इथं असणं आणि टिकून राहणं किती अवघड आहे आणि महत्त्वाचं आहे हे यावरून कळतं. घराणेशाही आपल्या नसानसांत आहे. कितीही स्टुडियोज येवोत, कितीही परकीय गुंतवणूक येवो, आपण भारतीय पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेले आपले गुण बदलू शकत नाही हेच खरं. 

पुढचा किस्सा थोडासा हळुवार आणि थोडासा धक्कादायक आहे. तुम्ही एखादा जुना वैभवशाली पडका वाडा बघितला आहे का? मी पाहिलाय. वाडा पडका असला तरी जुन्या वैभवाच्या खुणा जपून असतो. अट्टाहासाने. आपला वैभवशाली काळ निघून गेला आहे हे मान्य करण्याची त्याची तयारी नसतेच. पण एखादं इरसाल पोरगं येतं आणि ‘बंडू लवज पुजा’ असं काहीतरी लिहून जातं आणि वाड्यावर मळभ साचतं. मी अशाच एका वाड्याला भेट दिली होती काही वर्षांपूर्वी. फक्त तो सजीव होता. मी त्याच्या खारमधल्या ऑफिसला भेट दिली तेव्हा मी जाम टेन्शनमध्ये होतो. माणूसच तसा होता तो.  'अक्षय कुमार' ला 'अक्षय कुमार' त्यानंच तर बनवलं होत. 'खिलाडी' सिरीज अक्षय कुमारच्या कारकिर्दीत आली नसती तर त्याचं काय झालं असत? हा माणूस इतका मोठा की, शाहरूख खान त्याच्या घरी गेला होता की, 'अशोका'मध्ये माझ्या सम्राट बापाचा रोल कर म्हणून. आता तो कालबाह्य  झाला म्हणून काय झालं? सिंह सिंहच असतो. चित्रपटाचा इतिहास तोंडपाठ असणाऱ्या मला तर तो भव्यदिव्यच वाटतो अजूनही.

एकेकाळी अक्षय आणि शाहरूखसारखे स्टार जिथं पडीक असायचे, त्या ऑफिसमध्ये आज आम्ही तिघंच होतो. तो, मी आणि ऑफिस बॉय. विशीतला ऑफिस बॉय माझ्याकडे हे पोरगं इथं काय करत आहे या नजरेनं बघत होता. त्या पोटार्थी ऑफिस बॉयला 'तो' उर्फ त्याचा सध्याचा मालक काय चीज आहे हे माहीत असण्याची शक्यता फार कमी होती. 'तो' ला मस्त पांढरीशुभ्र दाढी होती. मृदुभाषी. माझी आस्थेनं विचारपूस केली. नंतर 'चलो, show me the stuff' त्याने ऑर्डर दिली. मी माझ्या बॅगेतून स्क्रिप्ट काढली आणि नरेशन द्यायला सुरुवात केली. पण मला थोड्याच वेळात लक्षात आलं की, त्याला रस नाहीये माझ्या कथेत आणि मला झरकन क्लिक झालं. एखादा उदयोन्मुख माणूस समोर असणं ही त्याची या पडत्या काळात गरज आहे. आताशा कथा घेऊन त्याला कोणी अँप्रोच होत नसावं. मग माझा पण त्या प्रकारातला रस संपला. मी खूप गोष्टी गाळून माझं नरेशन संपवलं. तो डोळे मिटून बसला होता. मग एकदमच तो त्याच्या 'गोल्डन पिरियड'बद्दल सांगायला लागला. 'दिलीप साब को कमबॅक  करना था तो उन्हे मैं याद आया. मैंने की वो फिल्म. ममता कुलकर्णी तो घर आके  मैं और मेरी बीवी के लिये अलग अलग डिश बनाती थी. रोल चाहिये था ना." आणि बरंच काही. मध्येच म्हणाला, "कितने सीन है तुम्हारे स्क्रिप्ट मे? ९५? I am old school guy. मेरी फिल्म मे कम से कम ३०० सीन होते है. और पानी डालो जरा." वगैरे सूचना केल्या. इतक्यात त्याचा फोन वाजला. फोनचा आवाज अतिस्पष्ट असल्यामुळे थोडं थोडं माझ्याही कानावर पडलं. त्याचा 'एक चेक बाउन्स झाला होता आणि समोरचा माणूस त्याची खरडपट्टी काढत होता. त्याचे केविलवाण्या आवाजातले स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न वाया जात होते. समोरचा अजून वरच्या पट्टीत बोलत होता. मग्रूरपणे. मला त्या ऑफिसमधलं वातावरण सहन होईना. मी तसाच बाहेर पडलो. स्क्रिप्ट तशीच टेबलावर ठेवून. मला कुणी बोलवायलाही आलं नाही. तो जाम ओशाळला असणार. नंतर इतर अनेकांसोबत खूप मिटिंग झाल्या, पण ही मिटिंग कधी विसरणार नाही. माणसाचं कालबाह्य असणं किती क्रूर असतं याची जाणीव करून देणारी. तुम्ही एखादा जुना वैभवशाली पडीक वाडा बघितला आहे का? मी पाहिलाय. त्याचं नाव उमेश मेहरा.

आता सध्या मी अनुराग कश्यप सोबत काम करत आहे. तो एक जगावेगळा अनुभव आहे. मी मिल्लत नगरच्या ऑफिसमध्ये गेटमधून एंट्री करतो तेव्हा अनेकदा अनुराग कश्यप तिथेच हातात मोबाईल घेऊन अस्वस्थपणे येऱ्याझाऱ्या घालत फिरत असतो. एका हातात पेटलेली सिगरेट. मला बघतो, उजवा हात माझ्या गळ्यात घालून मला केबिनकडे घेऊन जातो. मग मलाही त्याच्यासोबत बिनसाखरेची बेचव ब्लॅक कॉफी पाजतो. फोनवरचा सुखसंवाद तसाच चालू. बहुतेक समोरच्याला सल्ला देत असतो किंवा त्याची चूक सुधारत असतो. एवढा अस्वस्थ, ऊर्जावान इसम अजून माझ्या बघण्यात नाही. जगातल्या कुठल्याच लेखक-दिग्दर्शकाची जोडी एवढी बेमेल नसेल. मी विचार केल्याशिवाय एकही शब्द बाहेर न काढणारा, शांत (अनेक वेळा आत्मविश्वासाअभावी ), मला बोलण्यापेक्षा समोरच्याबद्दल ऐकून घ्यायला जास्त आवडतं. अनुरागला फक्त बोलायलाच आवडतं. त्याला विषयाचं बंधन नाही. नेहरूंचं अर्थनीती मॉडेल, नामदेव ढसाळ ते बिडी कशी प्यावी अशा कुठल्याही विषयावर तो बोलू शकतो. अनुराग सतत बोलत आहे आणि समोर चार लोक भक्तिभावानं श्रवणभक्ती करत आहेत, हे दृश्य नेहमीचंच. अनुरागची बाहेर इमेज सटकू अशी आहे, पण फँटमच्या ऑफिसमधला अनुराग एकदम वेगळा असतो. त्याचे असिस्टंट डायरेक्टर, इतकंच काय तिथले इंटर्न्स पण त्याचे पाय खेचतात. त्याची मजा उडवतात. स्वतःवर झालेल्या जोक्सवर अनुराग जोरजोरात हसतो. एकाच विषयाच्या बाबतीत तो हळवा आहे. बॉम्बे वेलवेट. ती त्याची हळवी, दुखरी बाजू आहे . बॉम्बे वेलवेट'मुळे इंडस्ट्रीच जे नुकसान झालं आहे (सुमारे १२० कोटी रुपये) ते भरून काढण्याची प्रतिज्ञा त्याने केली आहे. आता या अस्वस्थ, अव्यवहारी माणसाला कोण समजावून सांगणार की, सलमान खानच्या चित्रपटाला दोन दिवसांत शंभर कोटी रुपये मिळवून देणारा हा देश त्याच्या चित्रपटांच्या बाबतीत प्रचंड उदासीन आहे. दोष त्याच्या चित्रपटांचा नाहीये, अजून प्रेक्षकच तयार नाहीये त्याच्या चित्रपटांसाठी. 

असे बरेच अनुभव आले. काही कडू, काही गोड. काही अपमान, काही सन्मान. पण कुठलं क्षेत्र याला अपवाद आहे? माझं फिल्म इंडस्ट्रीबद्दल एक निरीक्षण आहे. इंडस्ट्रीच्या बाहेरच्या लोकांचे फिल्म इंडस्ट्रीबद्दल अनेक समज आहेत. उदाहरणार्थ या इंडस्ट्रीमधले लोक रोज पार्ट्या करतात, रोज नवीन लोकांसोबत झोपतात किंवा नीतीमूल्यांशी यांचं काही देणंघेणं नाही वगैरे वगैरे. मी कार्पोरेट क्षेत्रात पण काम केलं आहे आणि आता या ग्लॅमरस क्षेत्रात पण काम करत आहे. माझं असं मत बनलं आहे की, दोन्ही क्षेत्रांत काम करणारी माणसं सारखीच असतात. काही अधिपतित, काही समाजाच्या नीतिनियमांच्या चौकटीत न बसणारी माणसं ही प्रत्येक क्षेत्रात असतात. बॉलिवुडमधल्या अशा घटनांना प्रसारमाध्यमं जास्त प्रसिद्धी देतात इतकंच. त्यामुळे तुमच्या घरातला एखादा तरुण मुलगा फिल्म्समध्ये जायचं म्हणत असेल तर घाबरू नका. ही इंडस्ट्री त्याला इतर क्षेत्रांसारखेच आंबट-गोड अनुभव देईल. शेवटी स्वतःमध्ये सामावून घेईल हे नक्की. 

 

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

Post Comment

patil saheb

Thu , 25 June 2020

searching for this after SSR's death gharane shahi


Bhagyashree Bhagwat

Sat , 11 February 2017

interesting!


Anand Patre

Sat , 07 January 2017

अक्षय कुमार आणि शाहरुख खानची पोरं पण आयतं लॉन्चपॅड वापरतीलच... शाहरुखने स्वतः इंडस्ट्रीतल्या पोरांना लॉन्च केलं (आलीया भट्ट, वरुण धवन - स्टुडंट ऑफ द इयर) :D


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......