राजकीय प्रचाराचे राक्षसीकरण कोण करतंय? कशासाठी करतंय?
पडघम - तंत्रनामा
योगेश बोराटे
  • वेगवेगळी फेसबुक व पोर्टल पेजेस
  • Tue , 10 December 2019
  • पडघम तंत्रनामा राजकीय प्रचार आघाडी-बिघाडी सोशल मीडिया फेसबुक पेज डिजिटल प्रचार

सोशल मीडियावर सकाळच्या ‘गुड मॉर्निंग’पासून ते ‘गुड नाईट’पर्यंतच्या मेसेजने सर्वच स्मार्टफोनधारकांचे मोबाईल ओसांडून जात असतात. वेगवेगळे मिम्स, जोक्स, काही माहिती, दुर्मीळ फोटो, उपयुक्त माहिती असे याचे स्वरूप असते. मात्र गेले काही महिने या सगळ्याच्या केंद्रस्थानी राजकारण आले. अगदी राजकारणाचा पिंड नसलेल्या व्यक्तीसुद्धा सोशल मीडियावरील भरमसाठ पोस्ट्समुळे व्यक्त होऊ लागल्या. त्यालाच जोडून राजकारणासाठीच्या जाहिरातींना वाहिलेल्या फेजबुक पेजच्या चर्चाही झाल्या. यातूनच सोशल मीडिया किती प्रभावी आहे आणि राजकारणात त्याचा कसा वापर झाला, याची झलक आपल्याला दिसली. सोशल मीडियाच्या आधाराने रंगलेल्या अशाच राजकीय प्रचाराच्या सद्धस्थितीचे हे अंतरंग.

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने फेसबुकवर खास राजकीय जाहिरातींसाठी म्हणून चाललेल्या ‘आघाडी- बिघाडी’सारख्या पेजची माहिती अनेकांना झाली. पेजवरचा विखारी प्रचार अनेकांनी लाईक व शेअरही केला. पेजवरच्या मिम्स आणि व्यंगचित्रांनी काहींची निखळ करमणूकसुद्धा केली. पेजला मिळत असलेल्या प्रतिसादाच्या चर्चा रंगल्या नि रंगवल्याही गेल्या. नंतरच्या काळात त्या पेजचं काय झालं, हे कोणाला जाहीरपणे समजल्याचे मात्र ऐकिवात नाही. हे पेज aghadibighadi.com  नावाच्या एका वेबसाईटच्या आधाराने चालल्याचे म्हणतात. म्हणजे, तशी माहिती त्या वेळी फेसबुकवर उपलब्ध जाहीरनाम्यामध्ये, अर्थात ‘डिस्क्लेमर’मध्ये दिली जात होती. निवडणुकांनंतरच्या काळात लागोलाग ही वेबसाईट बंद झाली. आता पेजवरच्या जाहिराती ‘इनॅक्टिव्ह मोड’वर गेल्या नि चर्चाही थंडावल्या आहेत. डिजिटल प्रचारनीतीमधला हा एक नियोजनबद्ध प्रकार ठरला. आपल्याकडील निवडणुका संपल्या म्हणून प्रचाराचा हा प्रकार थंडावला आहे, असे नाही. फेसबुकच्या आधाराने, वेबसाइटचा डिस्क्लेमर देत, विरोधकांवर अगदी जहरी टीका करत चालणारा, हा प्रचार तितक्याच प्रभावीपणे सुरू आहे. हिमाचल प्रदेश असूद्यात की मग पश्चिम बंगाल, झारखंड असूद्यात की मग आता लवकरच निवडणुका येऊ घातलेलं दिल्ली, हा राक्षसी प्रचार तितक्याच आक्रस्ताळेपणे सुरू आहे.

सारखेपणा, सुसूत्रता की निव्वळ योगायोग

अशा प्रकारच्या फेसबुक पेजवर अनेक बाबतींमध्ये सारखेपणा अनुभवायला मिळतो आहे. विशिष्ट वेबसाइटच्या नावाचे डिस्क्लेमर देत फेसबुकवर ही पेजेस सुरू होत आहेत. उदाहरणादाखल पश्चिम बंगालच्या निवडणुकांशी संबंधित ‘निर्ममता’ ही वेबसाइट व त्याच नावाचे फेसबुक पेज, thefrustratedbengali.com ही वेबसाइट नि त्याच नावाचे फेसबुक पेज किंवा मग झारखंडमधील निवडणुकीच्या संदर्भाने चालणारे ‘ठग्स ऑफ झारखंड’ हे फेसबुक पेज व त्यासाठीची jharkhand2019.com ही वेबसाइट घेता येईल. फेसबुक पेज व त्याच्याशी संबंधित वेबसाइट ही माहिती पेज चालवणाऱ्यांनीच फेसबुककडे दिली आहे. या वेबसाइट्सही एका विशिष्ट पद्धतीनेच तयार केल्याचे स्पष्ट होते. मोजक्या तीन जाहिराती दर्शवणारे होम पेज, जबाबदारी झटकून टाकण्यासाठी म्हणून लिहिलेला मजकूर उपलब्ध करून देणारे ‘डिस्क्लेमर’ नि ‘प्रायव्हसी पॉलिसी’ हे या वेबसाइट्सचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते. त्या व्यतिरिक्त उपलब्ध फेसबुक टॅब आपल्याला पुन्हा संबंधित फेसबुक पेजवर नेऊन ठेवतो. वेबसाइटसाठीच्या वा त्यावरील आशयासाठीच्या रंगसंगतीमधील सारखेपणा तर सर्वसामान्यांनाही सहज लक्षात येईल अशाच प्रकारचा आहे. किंबहुना अशा सर्वच मुद्द्यांमधील सारखेपणा आणि त्यामधील बारकावे आपल्याला या सर्वच वेबसाइट्स नि त्यावरील प्रचारसाहित्य, हे एका विशिष्ट धोरणाचा भाग म्हणून तर विकसित करण्यात आलेले नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यास भाग पाडते आहे. 

जाहिरातींवरील खर्चाच्या बाबतीत ही पेजेस यादीमधील पहिल्या काही नावांमध्येच सापडतात. अगदी पहिल्या दहामध्येही दिसतात. ज्या राज्यात निवडणूक येऊ घातली आहे, सुरू आहे किंवा नुकतीच होऊन गेली आहे, त्या संबंधाने ही पेजेस आहेत. त्या अनुषंगाने प्रचारखर्चाचे मोठे आकडे ही पेजेस दाखवतात. व्यंग्यचित्र वा विरोधकांचे थेट प्रतिमाहनन करणारा आशय घेऊन या पेजचा दर्शनी भाग सजवला जातो. सुरुवातीच्या काळात ‘लाईक करा- शेअर करा’च्या कृतीआधारित आवाहनाद्वारे (कॉल टू अॅक्शन) पाठिराख्यांना पेजवर येण्याचे आवाहन केले जाते. त्यानंतरच्या काळात खऱ्या अर्थाने या प्रचाराची काळी जादू अनुभवायला मिळते. टप्प्याटप्प्याने आणि मोठ्या संख्येने उपलब्ध होत जाणाऱ्या जाहिराती व व्हिडिओ, विरोधकांचे प्रतिमाहनन हेच उद्दिष्ट घेत विकसित झालेल्या आशयाचे भडक सादरीकरण आणि पर्यायाने विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठीचे प्रयत्न हे या काळ्या जादूचे घटक ठरतात. 

प्रचाराचा विस्तार आणि खोली  

डिजिटल माध्यमांची प्रगती ही केवळ माध्यमांमधील आशयाच्या प्रसाराचा वेग वा वापरण्यामधील सुलभतेपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. याच जोडीने मोठ्या संख्येने आशयाची निर्मिती करण्यामध्ये आलेली सुलभता आणि त्यासाठी दिवसेंदिवस अत्यल्प होत जाणारा खर्च हाही या माध्यमांच्या वैशिष्ट्यांचाच भाग बनला आहे. त्यामुळे अगदी मोजक्या काळामध्ये आणि मोजक्या खर्चामध्ये सर्वदूर सर्वत्र पोहोचवण्यासाठीचे प्रचारकी साहित्य तयार करणेही शक्य झाले आहे. यंदाच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये अशा सर्व मुद्द्यांची झलक आपण अनुभवली आहे. त्याचीच प्रचिती या वेबसाइट्सच्या आधाराने निर्माण झालेल्या फेसबुक पेजेसवरून आपल्याला घेता येते. या पेजेसच्या आधाराने ‘अॅक्टिव्ह’ नि ‘इनॅक्टिव्ह’ प्रकारातील अक्षरशः हजारो जाहिराती आपण सध्या अनुभवू शकतो. म्हटलं तर कधीही नि कुठेही अगदी एका क्लिकवर उपलब्ध असणाऱ्या या डिजिटल जाहिराती आहेत. सोशल मीडियाच्या वापरामुळे त्यांच्या प्रसाराचा वेग हा पारंपरिक जाहिरातींच्या प्रसाराच्या वेगाच्या शेकडो पट अधिक ठरतो आहे. पारंपरिक जाहिरात म्हटलं की, पूर्वी प्रेक्षक वा वाचकांनी ती जाहिरात वाचणं, पाहणं, ऐकण्याला मोठं महत्त्व होतं. डिजिटल वा सोशल मीडियावरील जाहिरातींच्या बाबतीत ते केवळ अनुभवण्यापुरतं मर्यादित राहिलं नसून, तुम्ही- आम्ही त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवणं, लाईक- शेअर करणं, हवा तसा शेरा देणंही अपेक्षित आहे. त्यायोगे या जाहिरातींचा प्रसार वाढतच राहावा अशी सोय, त्यासाठी आयतेच तयार असणारे अल्गोरिदम्स हे डिजिटल प्रचाराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते. अशा सर्व आधुनिक तांत्रिक आयुधांनिशी सज्ज असलेल्या या राजकीय जाहिरातींचा एकत्रितपणे विचार करावयाचा झाल्यास, पारंपरिक प्रचाराच्या तुलनेत सध्याच्या राजकीय प्रचाराचा विस्तार आणि खोलीही वाढली आहे, असे म्हणावे लागते.

राक्षसी प्रचार

प्रचाराचे हे राक्षसीकरण केवळ संख्या वा प्रसारापुरतेही मर्यादित राहिलेले नाही. विरोधकांना निष्प्रभ करण्यासाठी त्यांचे प्रतिमाहनन, त्यासाठी वापरलेल्या आशयामधील बटबटीतपणा, व्यंग्यात्मक मात्र अत्यंत खालच्या पातळीवरून केले जाणारे विनोद, विरोधी नेते मंडळींना दिलेल्या चोर, डाकू, ठग, लुटेरे अशा उपमा आदींच्या आधाराने विरोधकांची एक विकृत, नकारात्मक राक्षसी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न अशा जाहिरातींमधून दिसून येतो आहे. त्यासाठी वापरली जाणारी रंगसंगती ही प्रामुख्याने गडद, संबंधित नेतेमंडळींच्या प्रतिमांच्या भोवती संशयाचे धुके दाट करणारी ठरावी अशीच भासते आहे. गडद काळा, लाल, पिवळा रंग वापरून तयार झालेला हा आशय आपल्या मोबाईलच्या स्क्रिनवरही थेट नजरेत भरेल इतक्या प्रभावीपणे तयार केला जात आहे. हा राक्षसी प्रचार अपेक्षित लक्ष्यगटापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या तंत्राच्या आधारे विशिष्ट भौगोलिक सीमेपुरता मर्यादित, विशिष्ट राज्यामध्ये, विशिष्ट वयोगटासमोर हा प्रचार मांडला जात आहे. केवळ वयोगटच नव्हे, तर संबंधित नागरिकांची विशिष्ट मानसिकताही त्या दृष्टीने वापरून घेतली जात आहे.

फेसबुकसारख्या सोशल मीडिया व्यासपीठांचा वापर करणाऱ्या भारतीय जनतेमध्ये बहुसंख्य जनता ही समोर आलेला आशय हा खराच आहे, त्यामध्ये दिलेली माहिती खोटी नाही, फेसबुक वा विशिष्ट पेजवरून आलेला आशय हा कसा खराच असतो, हे सांगणारी, त्याचे पाठराखण करणारी अशीच ठरते. सोशल मीडियावरील आशयावर अजिबातही विश्वास न ठेवणारी जनता ही माध्यमे किती बकवास आहेत, हे सांगत आपण या माध्यमांपासून दूरच भले हे मानणारी आहे. तर उपलब्ध आशयाविषयी तर्कसंगत विचार करू शकणारी जनता, राजकीय आशयाबाबत तुलनेने साशंक असल्याने त्याविषयी कोणतीही क्रिया- प्रतिक्रिया वा कृती न देणाऱ्या गटात जाऊन बसते. पण याचा अर्थ राजकीय जाहिरातींच्या दृष्टीने आपण उपलब्ध सर्वसामान्य जनतेचा विचार करूच नये, असा होत नाही. लोकशाहीच्या दृष्टीने त्यांच्या मोठ्या संख्येमधील व्यापक हित लक्षात घेत, अशा सर्वसामान्य नागरिकांच्या गटांसमोर या जाहिराती मांडण्यातच व्यापक हित आहे, हे आता जाहिरातविषयक धोरणकर्त्यांना चांगलेच पटले आहे. परिणामी अशा जनतेच्या मोबाईल स्क्रीन्स सध्या या राक्षसी प्रचाराने व्यापल्या जात आहेत.   

मुद्दा मानसिकतेचा

हे सर्व नकारात्मक चित्र पाहता, एखाद्याला प्रचारामधील कल्पकता संपली की काय, असा प्रश्न पडू शकतो. मात्र असे अजिबातही नाही, याची ग्वाही हा राजकीय प्रचारच देतो आहे. ‘आघाडी- बिघाडी’सारखे नाव असो किंवा मग ‘पलटू आदमी पार्टी’ अर्थात ‘पाप’सारखे नाव, मोजक्या शब्दांमधील विरोधी घोषणा, चित्रांचा- व्यंगचित्रांचा वापर, रंग-संगती असे सारेच कल्पक प्रयोग एका वेगळ्या पद्धतीने सर्वसामान्यांसमोर मांडले जात आहेत. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा तितकाच प्रभावी वापरही करून घेतला जात आहे. त्यामुळे प्रचारामधील कल्पकता संपली म्हणून असा वेगळ्या प्रकारचा राक्षसी प्रचार सुरू झाला असे आपल्याला म्हणता येत नाही. प्रचारापाठीमागची बदलती मानसिकता आणि त्या अनुषंगाने सर्वसामान्यांमध्ये एक नवी मानसिकता विकसित करण्याचे प्रयत्न म्हणूनही या विशिष्ट पद्धतीच्या प्रचाराचा देशभरात वापर सुरू झाला आहे, असे आपण म्हणू शकतो. या प्रकारचा प्रचार किती तारक-मारक याचे उत्तर खरं तर काळच देणार आहे. निव्वळ व्यावसायिक हित लक्षात घेत पुढे आलेला हा प्रयत्न असेल, तर कदाचित या पुढील काळात व्यावसायिकतेच्या हिशेबाने त्यामध्ये बदल होत जातील. मात्र, राजकीय पटलावरचे बदलते व्यवहार विचारात घेत अशा प्रकारच्या प्रचाराचा विचार होणार असेल, तर तो एक घातक व्यवहार ठरू शकतो. याचे कारणही डिजिटल प्रचाराच्या वैशिष्ट्यांमध्येच दडलेले आहे.

राजकारणामध्ये कोणीही कायमचा विरोधक नसतो, असे मानले जाते. मात्र, डिजिटल फूटप्रिंट्सचा विचार करता सध्याच्या राजकीय जाहिरातींचे अस्तित्त्व हे तसे कायमस्वरुपीचे ठरणार आहे. या जाहिरातींमध्ये केले जाणारे विरोधकांचे चित्रण हे जन्मजन्माचे वैरी याच पद्धतीचे आहे. समजा,  राजकीय वैरभाव संपुष्टात आलाच, तर मात्र या वैरी विरोधकाचे ते चित्रण सध्याच्या मित्रासाठी त्रासदायक ठरू शकते. मित्रांच्या मानहानीकारक जाहिराती जनतेसमोर सातत्याने येत राहणे, हे राजकारण्यांसाठीही तसे हितावह नसते. त्यामुळे सध्या विरोधी मानसिकता विकसित करणे तुलनेने सोपे जात असले, तरी ती राजकारण्यांच्या मित्रत्त्वाच्या गतीने दूर करणे वाटते तितके साधेही नाही. म्हणूनच, अशा राक्षसी प्रचारामागची मानसिकता तपासून पाहणे, तंत्रज्ञान व आशयातील बारकावे आणि त्याचा जनमतावरील परिणाम यांचा गांभीर्याने विचार करणे, त्या आधारे प्रचारतंत्राची आखणी करणे ही या पुढील काळात एक वाढती गरज ठरणार आहे.            

.............................................................................................................................................

लेखक योगेश बोराटे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामध्ये सहायक प्राध्यापक आहेत.

borateys@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......