१.
If you want to know your true nature
Follow the manifestation back to the source
the mother, and when you find the mother,
You will be free from suffering and sorrow.
- Lao Tsu.
ब्रह्मा देवानां पदवी: कवीनां, ऋषिर्विप्राणां महिषो मृगाणाम् |
श्येनो गृध्राणां स्वधितिर्वनानां, सोम: पवित्रमत्येति रेभन् || (ऋग्वेद ९.९६.६)
(देवांमध्ये ब्रह्मन्, कवींमध्ये मार्गदर्शक, विप्रांमध्ये ऋषी, प्राण्यांमध्ये तरुण वृषभ, पक्ष्यांमध्ये श्येन आणि हत्यारांमध्ये कुठार असा हा खळाळणारा ‘दशापवित्र’ संज्ञक गाळण्याप्रत जात आहे.)
शं नो भव हृद आ पीत इन्दो पिवेत सोमं सुनवे सुशेव: |
सखेव सख्य उरुशंस धीर: प्र ण आयुर्जीवसे सोम तारी: || (ऋग्वेद ८.४८.३)
(हे अमरत्वदायी अमर सोमा, तुझ्या कृपेने स्वर्लोकी जाऊन आम्ही देवसख्य प्राप्त करू, आणि दुष्ट शत्रूंपासून मुक्त होऊ.)
सोम: पवने जनिता मनीनां जनिता दिवो जनिता पृथिव्या: |
जानिताग्नेर्जनिता सूर्यस्य जनितेन्द्रस्य जनितोत विष्णोः || (ऋग्वेद ९.९६.५; सामवेद ५२७ / ९४३)
(सोमाने शुद्धिकरणासाठी मंत्र निर्माण केले, (सोमाने) स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, अग्नी आणि सूर्य निर्माण केले, (सोमानेच) इंद्र आणि विष्णू निर्माण केले.)
२.
मध्य आशिया म्हणजेच युरेशियात रशियाच्या दक्षिणी प्रांतात राहणाऱ्या समूहांनी आपल्या भावना, विचार, जगण्यातले अनुभव, निसर्गाचे निरीक्षण, सभोवतालचे वातावरण, काव्यरूपात व्यक्त करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान, आपल्या जगण्यात, समाजात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना, ऐतिहासिक घटना मौखिक आणि ऋचांच्या स्वरूपात निर्माण आणि जतन करण्याची परंपरा सुरू केली. ऋतु म्हणजे धर्मनियम, आणि त्यांना सूत्रात बांधणाऱ्या ऋचा, या ऋचांचा संकलनाला पुढे ऋग्वेद म्हटले गेले. प्रारंभीच्या काळात मूळ इंडो-युरोपियन भाषेत असलेल्या या ऋचा नवीन संस्कारित (म्हणून) संस्कृत भाषेत आणि पर्शियन भाषेत भाषेत नव्याने संकलित करून मांडण्यात आल्या. तरीसुद्धा ऋग्वेदातून तत्कालीन वैदिक आर्य आणि इंडो-युरोपियन समूहाची महत्त्वाची माहिती प्राप्त होते. ऋग्वेदातील नववे मंडल केवळ सोमावरील सूक्तांवर आधारित आहे तरयजुर्वेद तैतरिय संहितेत तीन खंडातील एकूण अकरा प्रकरणे सोमाशी संबंधित आहेत यावरून लक्षात येते सोम वैदिक-आर्य लोकांच्या धार्मिक आणि समाजजीवनात किती महत्त्वाचा घटक होता.
इंडो-इराणी संस्कृतीमध्ये, वैदिक-पारशी परंपरेततील कर्मकांडात सोम हे एक अत्यंत महत्त्वाचं पेय होतं. सोम प्राशनाचा प्रभाव उर्जा देणारा, उत्तेजना वाढविणारा आणि आध्यात्मिक ज्ञान देणारा समजला जाई. शत्रूंच्या नाशासाठी बळ देणारा, आरोग्यवर्धक असा सोम होता. सोमास ‘मोक्ष प्रदान करणारे औषध’ समजले जाई. सोम प्यायल्याने अमरत्व प्राप्त होते अशी ठाम धारणा वैदिककाळातील लोकांची होती. वैदिक सोम या संज्ञेसाठी झोरोष्ट्रीयन समाजात सुरुवातीच्या काळात ‘हओम’ आणि कालांतराने ‘होम’ असाही संज्ञा आढळते. नंतर ‘हॉर्न’ असाही अपभ्रंश झालेला दिसून येतो. पारशी धर्मात हओमापासून बनवल्या जाणाऱ्या पेयाला ‘पराहओम’ असे नाव आहे. वैदिक सोमाप्रमाणेच हओमाचे गुणधर्म आहेत. तरी परिणामांच्या बाबतीत वैदिक आणि पारशी पेयांत काही वेगळे गुणधर्मसुद्धा सांगितले आहेत. ‘हओम’ किंवा होम जागृत करणारा, चेतना वाढविणारा आणि जाणीव वाढवणारा मानला गेला आहे. वैदिक सोम आणि पर्शियन हओम प्रोटो-इंडो-इराणीयन सौमामधून व्युत्पन्न झालेले आहेत.
सोम वनस्पतीबद्दल, तिच्या मूळ स्वरूपाबद्दल आणि ओळखीबद्दल अनेक धारणा, मते आणि अनुमाने आहेत. ऋग्वेदात सोम वनस्पती आणि पेय एकसारखेच असल्याचे सांगितले आहे. सोम ही मनोत्तेजना वाढविणारी औषधी (Psycoactive drug) असल्याची धारणा आधुनिक काळातील, विशेषतः पाश्चात्य अभ्यासकांत अनेक वर्षं प्रचलित आहे. सोम वनस्पती पर्वतांवर आढळणारी वनस्पती असल्याचे अनेक दाखले ऋग्वेदात आहेत. ऋग्वेदाव्यतिरिक्तयजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि ब्राह्मणांमध्ये, सूत्रांमध्येही सोमाचे महत्त्व पुन्हापुन्हा सांगितलेले आढळते.
बायबलमध्ये सुद्धा सोम ही संकल्पना आहे मात्र ती वैदिक आणि झोरोष्ट्रीयन परंपरेपेक्षा अगदी वेगळी आहे. बायबलमध्ये सोमचा अर्थ आहे ‘शरीर’. असे शरीर जे माध्यमासारखे काम करते. देवाला जेव्हा मर्त्य लोकांसोबत संवाद साधायचा असतो तेव्हा माणसांतल्याच एकाद्या शरीराचा माध्यम म्हणून वापर करतात. त्याला सोम असे नाव आहे. तेव्हा बायबलमधील आणि ऋग्वेद-अवेस्तामधील सोम यांच्यात कोणत्याही प्रकारचे साम्य नाही. मुख्यत: सोम पेयाच्या संदर्भांमुळेच वैदिक-झोरोष्ट्रीयन समाज-संस्कृतीमध्ये धार्मिक आणि मिथकीय समानता असल्याचे दिसून आले आहे. सोमाला ऋग्वेदात आणि पारशी ग्रंथ अवेस्तात अनन्यसाधारण महत्त्व दिलेले असल्याने सोम वनस्पती काळातील भारतविद्या, धर्मशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, पुरातत्त्वीयवनस्पतीशास्त्र, वनस्पतीशास्त्र अशा अनेक आधुनिक ज्ञानशाखांत कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय बनलेली आहे. अर्थात सोमाचा प्राचीन काळी कितीही माहात्म्य वर्णन केलेले असले तरी अर्वाचीन काळात फक्त मंत्रापुरताच त्याचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे. आधुनिक काळात मात्र सोम वनस्पतीचा इतिहास वैदिक आर्यांच्या स्थलांतराचा इतिहाससुद्धा स्पष्ट करतो, म्हणून सोम पुन्हा चर्चेच्या आणि अभ्यासाच्या केंद्रस्थानी आला आहे. वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या प्रदेशात आपला प्राचीन पूर्वधर्म टिकवून ठेवण्यासाठी वैदिक आर्यांनी सोयीनुसार बदल केले आणि आपला धर्म अपभ्रंश स्वरूपात का असेना टिकवून ठेवला. या पार्श्वभूमीवर आर्यांनी स्थलांतरे का केली याचा विचार करण्याचा मार्ग प्रशस्त होईल.
भारतात वैदिक नेहमीच आपल्या वास्तवाला आणि वर्तमानाला अनुकूल असा सोयीस्कर इतिहास लिहित असल्यामुळे त्यांच्या वैदिक इतिहासात सातत्य आणि सलगता नसते. म्हणून आपल्या ठाम आणि निश्चित इतिहासाला ते पुराव्यानिशी सिद्धच करू शकत नाही. सातत्याने बदललेल्या इतिहासाच्या परिणामस्वरूप अनेक गोष्टींचे मूळ स्वरूप, अर्थ, ओळख लोप पावत गेले, आणि काही तर कायमस्वरूपी विलुप्त झाले. ऋग्वेदातीलच उदाहरण द्यायचे ठरविले तर सोम वनस्पती प्राप्त होणारी आर्जीक, कृत्व हे देश, पस्त्या ही नदी, पंचजन हा प्रदेश, अदार म्हणजे कोणता वृक्ष या गोष्टी कोणत्याच प्रकारे शोधून त्यांची ओळख कोणीच सांगू शकत नाही. तेव्हा आहे त्या भागातील गोष्टींनाच आपला इतिहास चिटकवून त्या स्थानिक गोष्टींचा मूळ इतिहास, अस्तित्व, ओळख पुसून टाकून त्या इतिहासावर आपल्या इतिहासाचे अतिक्रमण करतात. जेव्हा त्या इतिहासाचे सांधे जुळत नाही तेव्हा तो इतिहास दंतकथा किंवा मिथकांच्या आड दडविण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे सगळा गोंधळ निर्माण होतो. मात्र इतिहासाच्या अशा सोयीस्कर पुनर्वाचनामुळे आणि मांडणीमुळे एकूणच इतिहासाचा गळा घोटला जातो. सर्वात महत्त्वाचे तथ्य नष्ट होतात आणि वास्तव कायमचे हरवून बसते. तरी देखील या सर्वांच्या पलीकडे विज्ञानाच्या आधारे प्राप्त झालेल्या वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे काही एक वास्तव हाताशी येते का त्याचा प्रयत्न अभ्यासक आणि संशोधक करत असतात. त्यातून थोडीफार माहिती हाताशी येते.
३.
सोमाचा शोध घेत असताना सोमाबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आरंभीच स्पष्ट करायला हवा. तो म्हणजे सोम जरी उत्तेजना निर्माण करणारे, उत्साह निर्माण करणारे पेय होते तरी ते नशा आणणारे दारूसदृश पेय नव्हते. सोमात धुंदी निर्माण करणारे गुणधर्म असले तरी शुद्ध हरपून टाकणारे, गुंगी आणणारे किंवा भ्रम (hallucination) निर्माण करणारे गुणधर्म अजिबात नव्हते. नेमक्या प्रमाणात सेवन केल्यानंतर, ते एक प्रकारचे उर्जा निर्माण (energy drink) करणारे पेय होते. आज सोमरस म्हणजे दारू असा जो अर्थ प्राप्त झाला आहे तो केवळ चुकीचा आणि अज्ञानमूलक आहे. ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील एकशेएकोणीस क्रमांकाचे इंद्रपालुपदसूक्तातील सोम प्राशनानंतर होणाऱ्या परिणामांचे वर्णन केलेले आहे. त्यावरून सोम नशा देणारे पेय होते असा निष्कर्ष अनेक पाश्चात्य अभ्यासकांनी काढलेला आहे. तो अर्थातच चुकीचा आहे. आधुनिक काळात केलेल्या चुकीच्या, अनर्थकारी मांडणीमुळे आणि अनुवादांमुळे आकलनाचे गोंधळ निर्माण झालेले आहेत. सोम उत्तेजना निर्माण करणारे असू शकते मात्र दारूसारखे शुद्ध हरपणारे नाही.
इति वा इति मी मनो गामश्वं सनुयामिती | कुवित्सोमस्यापामिति ||
(भक्तांना धेनुअश्वांपैकी काय द्यावे याविषयी माझे मन संभ्रमित झाले आहे. कारण मी विपुल सोम प्राशिला आहे.)
प्र वाताइन दोधत उन्मा पीता अयंसत | कुवित्सोमस्यापामिति ||
(सोमप्राशनाने वायुकंपित वृक्षाप्रमाणे माझ्या झोकांड्या जात आहेत. कारण मी विपुल सोम प्राशिला आहे.)
उन्मा पीता अयंसत रथमश्वाइवाशव: | कुवित्सोमस्यापामिति ||
(रथप्रेरक अश्वाप्रमाणे सोम मला फरफटत नेत आहे. कारण मी विपुल सोम प्राशिला आहे.)
(ऋग्वेद १०.११९.१ /२ / ३)
या ऋचांचा अर्थ लावताना एखादा खूप दारू प्यालेला व्यक्ती बडबडतो त्यापद्धतीने बघून लावलेला आहे, हे स्पष्टच आहे. सोम धुंदी निर्माण करणारे पेय होते तसेच आधी म्हटल्याप्रमाणे उत्तेजना निर्माण करणारे पेय (stimulant) होते. तंद्री किंवा शुद्धी हरपणारे असे ऋग्वेदात वर्णन नाही. सोम बनविताना बहुतेक ऋचांमध्ये तो दही, दूध आणि पाणी यांच्यात मिसळून तयार केल्याचे वारंवार सांगितलेले आहे. आता दुध किंवा दही दारूसारखे पेय बनवण्यासाठी वापरत नाहीत. अफू/भांगमिश्रित थंडाई वगैरे बनविण्यासाठी दुध वापरतात. तेव्हा सोम आजच्या काळात भारताच्या उत्तरी भागात थंडाई किंवा भांग/अफूमिश्रित दूध बनवले जाते त्याप्रकारचे पेय असावे. किंवा अफूच्या वनस्पतीपासूनसुद्धा सोम बनत असावा. अफूच्या बोंडाचे, वनस्पतीचे वर्णनसुद्धा ऋग्वेदातील सोम वनस्पतीच्या वर्णनाशी मिळतेजुळते आहे. अफूचे बोंड छत्रीसारखे आणि एका उंच सरळ दांडीवर (एकपाद) उगवलेले असते.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा वैदिक साहित्य (विशेषतः भगवद्गीता) युरोपात पोहोचले तेव्हा सोम या वैदिक घटकाविषयी तेथील लोकांमध्ये आकर्षण वाढले. पुढे या संदर्भात अधिक चिकित्सा करण्यास कारणीभूत ऋग्वेदातील ‘सोम’ आणि झेंद-अवेस्तामधील ‘होम’ (हओम) वनस्पती ठरली. ऋग्वेद आणि अवेस्तामध्ये असणारे विलक्षण साम्य अनेक विषयांना उजागर करणारे ठरले. इंडो-युरोपियन अभ्यास शाखा त्यातून निर्माण झाली. आर्य या संकल्पनेचा उद्भवसुद्धा अशाच अभ्यासातून निर्माण झाला. सम-समूह अशी संकल्पना असताना आपलं वर्चस्व लादण्यासाठी आर्य-वंश कल्पना निर्माण करण्यात आली. इतिहासात कोणत्यातरी काळात एकत्रच असणारे समूह कालांतराने विभक्त होऊन पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात स्थायिक झाले आणि आपल्या मुळाशी असलेल्या काही रूढी, कल्पना, परंपरा जोपासत राहिले. भाषेच्या जीवाश्मात त्या समूहांचं कधीकाळी एकत्र असणं शिल्लक राहिलं, त्यातून भाषिक समानता टिकून राहिली. अठराव्या शतकात हे साम्य लक्षात यायला लागलं आणि आपल्या हरवलेल्या मुळांचा शोध नव्याने घ्यायला सुरुवात झाली. असा शोध घ्यायची गरज भाषेमुळे निर्माण झाली.
‘सोम’ आणि ‘होम’ या वनस्पतींची उकल करण्यासाठी आणि संदर्भ जोडण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या दीर्घकाळ संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनाच्या निष्कर्ष स्वरूप वनस्पतीशास्त्रज्ञ आणि सोम अभ्यासाशी निगडीत लोकांनी सोम वनस्पती म्हणजे नेमकी कोणती असू शकते याविषयी काही अनुमान निर्धारित केलेले आहेत. त्यानुसार सद्यस्थितीत एफेड्रा हे झुडूप आणि अमानिता मस्कारीया ही अळंबी या दोन घटकांनी ऋग्वेदात सांगितलेल्या सोम बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती असल्याबद्दलचा दावा केलेला आहे. मात्र आजच्या घडीला कोणत्याही वनस्पतीचे थेट सोम असे नाव नाही. सोमलता म्हणून एफेड्रा प्रजातीतील जिरार्डीआना ही वनस्पती ओळखली जाते, तर सार्कोस्टेमा ब्रेव्हिस्टीग्मा या वनस्पतीलासुद्धा पूर्वी बराच काळ सोमलता म्हणून ओळख होती.
४.
सोम किंवा हओम हा वैदिक आणि झोरोष्ट्रीयन समाजाचा बराच मोठा काळ सांस्कृतिक प्रतिनिधी होता. सोम म्हणजे सर्वप्रकारच्या मनोकामना पूर्ण करणारा देव होता. सोमाला दुसरे एक नाव इंदु असेही आहे. सोमाला अनेकदा कवी असेही म्हटले आहे. सोम हा विचारांचा रक्षक, ऋषी आणि दृष्टी देणारा देखील आहे. सोमकवी नव्या विचारांना चालना देतो, निर्माण करतो. सोम प्यायल्याने प्राशक रात्रभर जागृत राहू शकतो, त्यामुळे सोमाला ‘जाग्रवी’ असेही म्हटले आहे. त्याखेरीज अनेक वैदिक रूपकात या पेयाचा / वनस्पतीचा वापर केलेला आढळतो. ऋग्वेदातील सर्वांत महत्त्वाच्या देवतांपैकी एक देवता म्हणजे सोम. देवता, इंद्र-सोम, अग्नी-सोम, सोम-रुद्रा, सोम पुषान, वनस्पती, कृशानुचा गरुड, रस (द्रव्य), चंद्र या प्रकारे ऋग्वेदात सोमाचा संदर्भ आलेला आढळतो. हठयोगप्रदिपानुसार सोम अमर आयुष्याचं पेय आहे. योगिकसूत्रांनुसार केचरी-मुद्रा करून सोमरस सलग पंधरा दिवस पिल्यास मृत्यूवर आणि आजारावर मात करता येऊ शकते. योग परंपरेनुसार सोम काळोखाची पुनर्जीवित उर्जा असतो. म्हणून सोमाची ऊर्जा सोमासोबत जोडलेली आहे. असे असले तरी सोम एक दैवी, मादक, नशा निर्माण करणारी वनस्पती म्हणूनच अधिकतर ज्ञात आहे.
सोमाच्या शोधात पुढे जाण्याआधी इतक्या सगळ्या गोंधळ निर्माण करणाऱ्या संकल्पनांमधून एक संकल्पना निश्चित करावी लागेल की सोम नक्की काय आहे? तर सोम हे वनस्पतींसह इतर घटकांचा वापर करून विधिवत तयार केले जाणारे एक पेय आहे. एक महत्त्वाचे निरीक्षण असे की केवळ यज्ञ करतानाच सोम तयार केले जात असावे, कारण यज्ञाव्यतिरिक्त इतर वेळेस सोम तयार करण्याबाबत काहीच निश्चित माहिती मिळत नाही. किंबहुना यज्ञाव्यतिरिक्त सोम बनवणे निषिद्धच असावे. सोम पेयच होते असे निश्चिती करण्याला काही ठोस आधार आहेत, कारण सोम काही विशिष्ट वनस्पतीपासूनच तयार करायला हवा अशी अट नाही. यजुर्वेद संहितांत, शतपथ ब्राह्मणात, ऐतरेय ब्राह्मणात आणि श्रौतसूत्रांत इतर सोम बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मूळ वनस्पतीपेक्षा वेगळ्या पर्यायी वनस्पती सोम बनविण्यासाठी वापरल्या तरी चालतील असे म्हटले आहे. अर्थात अशा वनस्पती वापरायला सांगण्यामागे काही संयुक्तिक कारणे देखील आहेत.
आयुर्वेदातील दोन प्रमुख संहिता चरकसंहिता व सुश्रुतसंहिता यांमध्येसुद्धा सोम वनस्पतीचे वर्णन आलेले आहे. त्या वर्णनानुसार सोम वनस्पतीला फक्त पंधरा पाने असतात. चंद्राच्या कलेनुसार ती पाने उगवतात आणि झडतात. अमावास्या ते पौर्णिमा अशा काळात रोज एक पान उगवते तर पौर्णिमा ते अमावस्या या काळात रोज एक पान झडते. मात्र आजवर अशी कोणतीही वनस्पती प्रत्यक्षात आढळलेली नाही. सुश्रुतसंहितेत जवळपास चोवीस वेगवेगळ्या वनस्पती सोम द्रव्य बनवण्यासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे. तेव्हा सोम हे पेय काही विशिष्ट वनस्पतीपासून विधिवत तयार केले जाणारे पेय होते असे म्हणता येईल. आता हे पेय ज्या ‘सोम’वनस्पतीपासून बनवले जात होते त्या वनस्पतींचा शोध घेण्याचा प्रयत्न करता येईल.
ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाणे सोम वनस्पतीला पाने, फुले आणि मुळे नसतात. तिचा रस अंकुरातून किंवा देठातून काढत असत. सोम वनस्पतीच्या देठाचे वर्णन अझिर्यु (किरण), क्षिप (बोट), वक्षण (नळी), वन (वेत) अशा प्राकारे केले आहे. यावरून सोमाचा देठ लांब आणि बारीक असल्याचा अनुमान करता येतो. सोमाच्या खोडाला अंशु किंवा आकाशाचा खांब आणि त्याच्या छत्रीसारख्या टोपीला मूर्धन्य किंवा शीर्ष म्हटलेले आहे. ही वनस्पती पर्वतीय भागात उगवते, ती हिरवी, पिकल्यावर लालसर होत असून तिचा कच्चा रस पिवळसर हिरवा किंवा तपकिरी रंगाचा असतो. रस पिळण्याच्या प्रक्रियेला ऋग्वेदात दोहन असे म्हटले आहे. सोम वनस्पतीचा सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तिला गोडसर असा सुगंध असतो. ही वनस्पती पर्वतांवर उगवते. दिवसातून तीन वेळा सकाळ-दुपार-संध्याकाळ सोम गाळला व प्राशन केला जाऊ शकतो असे नमूद केले आहे. सोमाचा रस गाळण्याच्या दोन पद्धती होत्या. उखळात (उलुखल) आणि मुसळाने (मन्या) कांडून किंवा दोन दगडांनी ठेचून सोम गाळला जाई. ज्या दगडांनी सोम गाळला जाई त्याला अद्रि किंवा ग्रावा म्हणत. ऋग्वेदातील तीन ऋचा ग्रावनासंबंधी आहते. दगड ठेचताना त्यांचा जोरजोराने आवाज होईल अशा तऱ्हेने ते ठेचले जात. बहुधा हे दगड ठोकताना होणाऱ्या आवाजात एक ताल असला पाहिजे, त्या तालावर सोमाविषयक मंत्र उच्चारण्यात आणि लक्षात ठेवण्यात मदत होत असावी. नंतरच्या काळात अशा दगडांना, ग्रावनांना आवाज मोठा निघावा म्हणून छिद्रे पाडीत असत. अधिक रस मिळावा म्हणून सोम वनस्पती पाण्यात भिजवून ठेवत. इतर काही ठिकाणी जेव्हा सोमाचे देठ पिकते तेव्हा गडद लाल रंगाचे होते. सुरुवातीला हे गोलाकार असते, जेव्हा फुगून उंच व सरळ वाढते तेव्हा फुटून ते लाल रंगाचे होते, असे वर्णन आहे. (हे वर्णन आधी नमूद केल्याप्रमाणे अफूच्या वनस्पतीलाही लागू पडते.)
सोम वनस्पती तोडून आणल्यानंतर वापरण्याआधी काही वेळ (कधीकधी काही दिवस) त्या भिजत ठेवल्या जात, ज्यामुळे वनस्पतींचा रस वाढण्यास मदत होत असे. सोम वनस्पती जलसिंचीत असल्याचे किंवा जलामुळे वृद्धिंगत झाल्याच्या अनेक ऋचा ऋग्वेदात आहेत (ऋग्वेद ९.६२.४ / ९.६५.६ / ९.९५.२). सोम गाळण्याआधी त्याला काही वेळ तरी निश्चितच भिजवून ठेवत असावेत, मात्र त्यामुळे वनस्पतीचे कोणत्याही प्रकारचे किण्वन होण्याची शक्यता नाही. पाण्यात भिजवून ठेवल्याने सोम वनस्पती वाढते (फुगते) अशा अर्थाची एक ऋचा आहे.
यदद्भि: परिषिच्यसे मृज्यमानो गभस्त्यो: द्रुणा सहास्थमश्रुषे || (ऋग्वेद ९.६५.६)
(हे हस्तनिष्पादित, सोमपात्रप्राशित सोमा, जलसिंचन करताच तू श्रेष्ठ बनतोस.)
मृजन्ति त्वा समग्रुवोऽ वये जीरावधि ष्वणित रेभो यद्वज्यसे वने || (ऋग्वेद ९.६६.९)
(हे जलगर्जनाकारी, जलनिमज्जित सोमा, भक्तजन तुला स्वच्छ ‘दशपवित्रा’तून गाळतात.)
५.
सोम तयार करण्याची पद्धत : सोम बनवण्याबाबत अत्यंत कडक नियमांनी बांधलेली विधिवत पद्धत होती. पाण्यात भिजवलेली किंवा कोरडी होऊ नये म्हणून पाणी शिंपडीत असत. नंतर ती बैलाच्या कातड्याने झाकलेल्या दोन लाकडी फळ्यांवर कुटण्यासाठी ठेवीत. बैलाच्या कातड्याने झाकलेल्या या फळ्यांना अधिवषण म्हणत. ग्रावन म्हटल्या जाणाऱ्या चार दगडांनी ती कुटत आणि कुटत असताना त्याच्या होणाऱ्या आवाजाच्या तालावर मंत्रोच्चार करीत. कुटलेली सोम वनस्पती ‘आघवनीय’मध्ये (म्हणजे मातीचे किंवा धातुचे मोठे भांडे) घालून पाण्यात घुसळत. सोमरस पाण्यात मिसळल्यानंतर त्यातील चोथा (ऋषिज) काढून टाकत. नंतर दशपवित्र नावाच्या सुती किंवा मेंढीच्या लोकरीपासून बनविलेले कापडी गाळण्यातून तो सोम गाळीत असत. पिळलेला सोम द्रोण, आघवनीय आणि पूतभृत अशा तीन यज्ञात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांमध्ये गोळा करीत. सोम गाळण्यासाठी आणि पिण्यासाठी असलेल्या पात्रांची सविस्तर माहिती यजुर्वेद तैतरिय संहितेत पहिल्या खंडात एक संपूर्ण प्रकरणच दिलेले आहे. त्यात सोम पिण्याचे एकूण २२ प्रकारचे कप दिले आहेत. सोमामध्ये मिसळण्यासाठी सातूचे अथवा गव्हाचे पीठ, पाणी, मध, सुवर्णकण, तूप, दुध, दही असे पदार्थ मिसळीत असत. सोमात कोणते पदार्थ मिसळले आहेत त्यावरून सोमाला गवाशिर, यवाशिर, त्र्याशिर, दध्याशिर, मधुमत, मधु, पीयूष अशी नावे दिलेली आहेत.
यजुर्वेदात सोमयाग करताना सोम वनस्पती कशी प्राप्त करायची त्याची पद्धती सांगितली आहे. त्यात सोम विकत कसा घ्यायचा, तो मोजायचा कसा, बैलगाडीत कसा ठेवायचा, मंडपात कसा न्यायचा याबद्दलच्या सगळ्या काटेकोर विधी दिलेल्या आहेत. सोमायागासाठी सोम वनस्पती हवी असल्यास तिची किंमत म्हणून अध्वर्यूला (विकत घेणारा) दहा वस्तु द्याव्या लागत. गाय, नुकत्याच व्यालेल्या कालवडीसकट गाय, कालवड, खोंड, कामास उपयुक्त बैल, गाय-बैलाची जोडी, सोने, वस्त्र आणि शेळी. विक्रेत्याने त्याहून अधिक मागणी केल्यास म्हैस, घोडा अशा वस्तु दिल्या जात. दशपवित्र गाळण्यातून गाळलेल्या सोमाला ‘पवमान’ किंवा ‘पुनन’ म्हणत असत. सोमाचा रंग आणि वनस्पती सारख्याच रंगाचे असल्याचे म्हटलेले आहे. मुख्यत: सोमाचा रंग हरितवर्णीय असल्याचे उल्लेख असले तरी दुसऱ्या इतर रंगांचाही सोम असल्याचे उल्लेख आहेत. श्यामल किंवा कृष्णवर्णीय (ऋग्वेद ९.२.३ / ९.८.६ / ९.३०.५), आरक्तवर्णीय (ऋग्वेद ९.११.४), आरक्त-पिंगलवर्णीय (ऋग्वेद ९.६३.४ / ६) अशा वेगळ्या रंगांचे संदर्भ आहेत. शुद्ध सोमाला ‘शुक्र’ किंवा ‘शुची’ म्हणत. शुद्ध सोम इंद्र आणि वायुला अर्पण केला जात असे. सोम गाळण्याच्या पूर्ण पद्धतीत आणि प्रक्रियेत सोमातील घटकांचे किण्वन होण्याला संधी आणि वेळ मिळाल्याचे दिसत नाही. जर दिवसातून तीन वेळेस सोम गाळला जात होता तर याचा अर्थ या संपूर्ण विधीस लागणारा कालावधी काही तासांचाच असावा. तेव्हा सोम बनविताना किण्वनप्रक्रिया होतच नसल्याने सोम म्हणजे सुरा किंवा मद्य ही कल्पना आपोआपच रद्द होते.
६.
ऋग्वेदातील सोमाची ओळख निश्चित करण्यासाठी ऋग्वेदाचा आणि सोमाचा भौगोलिक परिसर निश्चित करावा लागेल म्हणजेच वैदिकांचे मूळनिवासस्थान निश्चित करावे लागेल. त्या स्थाननिश्चितीसाठी पुरातत्त्वीय संशोधनाचा, त्यातील पुराव्यांचा काही आधार घेऊन काही निष्कर्षाप्रत पोहोचता येते का याचा प्रयत्न काही संशोधकांनी केलेला आहे त्याचा आढावा घेता येईल. युरेशियन स्टेप्सच्या गवताळ प्रदेशातून वैदिक आर्यांच्या दोन प्रमुख समूह इराणच्या इलम भागात स्थिरावल्या नंतर पुढे त्यातील काही समूह इसपू २०००च्या आसपास अफगाणिस्तानमार्गे भारताच्या उत्तरी भागात यायला सुरुवात झाली. या दोन इंडो-युरोपियन समूहांमध्ये असणारे साम्य म्हणजे त्यांच्यात होणारे धार्मिक विधी, सोम आणि हओम. हे इंडो-युरोपियन आर्य-वैदिकांचे समूह सोम बनवण्यासाठी पर्वतीय वनस्पतीचा वापर करत. पर्वतातून ही वनस्पती प्राप्त करण्यासाठी श्येन पक्ष्याचा वापर करत असावेत. कारण ऋग्वेदात श्येन पक्ष्याने स्वर्गातून सोम आणला असे वर्णन आहे. मूळ कथेत कृशानु हा सोमाचे रक्षण करणारा रक्षक होता. हा कृशानु म्हणजे ऋग्वेदानुसार इंद्राचा सर्वात मोठा शत्रू आणि दासांचा किंवा असुरांचा सेनापती. तर या कृशानुच्या रक्षणाखाली असलेला सोम श्येन पक्ष्याने त्याला फसवून प्राप्त केला. म्हणून सोमाला ‘श्येनहृत’ असेदेखील एक नाव आहे. पुढील ऋग्वेदातील ऋचांमध्ये श्येनाने सोम कसा प्राप्त केला हे सांगितले आहे.
अव यच्छ्ये नो अस्वनीदध घोर्वि यद्यदि वात ऊहु: पुरंधिम् |
सृजद्यदस्मा अव ह क्षिपज्ज्यां कृशानुरस्ता मनसा भुरण्यन् || (ऋ. ४.२७.३)
(गर्भातून बाहेर पडणाऱ्या गर्जनाकारी श्येनरुपी वामदेवासमवेत जाऊ इच्छिणाऱ्या सोमाला सोमपर्णांनी अडवून ठेवले. मनोजव सोम्रक्षक कृशानुने धनुष्याची प्रत्यंचा खेचून श्येनावर बाण मारला.)
ऋजिप्य ईमिन्द्रावतो न भुज्युं श्येन्ये जभार बृहतो अधि ष्णो: |
अन्त: पतत्पत्र्यस्य पर्णमध यामनि प्रसितस्य तद्वे: || (ऋ. ४.२७.४)
(इंद्रभक्त भुज्यु तौग्र्याप्रमाणे सरळगामी श्येनाने सोमाला द्युलोकातून आणले. त्या युद्धात श्येनाचा पंख तुटून पडला.)
या संदर्भांवरून वरून एक गोष्ट निश्चित स्पष्ट होते, सोम हा मूळचा वैदिकांचा नव्हता तर तो नंतर त्यांनी इतर कोणाकडून तरी फसवून प्राप्त केला. श्येन पक्ष्याने सोम आणल्याबद्दलचे उल्लेख ऋग्वेदात पुढील ऋचांमध्ये आलेले आहेत. मं १.८०.२, ९३.६; मं ३.४३.७; मं ४.१८.१३, २६.४-७, २७.३-४, ३८.२; मं ५.४५.९, ६.२०.६, ४६.१३, ८.८२, १००.८; मं ९.६८.६, ७७.२, ८६.२४, ८७.६, ९३.६; मं १०.११.४, १४४.४-५. ऋग्वेदात आणि अवेस्तात सोमाबद्दल असणाऱ्या मिथक कथा एकसारख्याच आहेत. अवेस्तात कृशानुच्या जागी केरेसनी असे नाव आहे. जरी मिथकांचा अर्थ लक्षात घेतला नाही तरी सर्बिया, मंगोलिया, अफगाणिस्तान या देशांच्या काही भागात आजही ससाणा, गरुड असे शिकारी पक्षी शिकार करण्यासाठी वापरले जातात. मात्र त्यावरून ऋग्वेद काळातसुद्धा पक्ष्यांचा असा वापर केला जात होता असे म्हणता येत नाही. कदाचित श्येन विशिष्ट प्रकारचं वनस्पती ओळखण्याचं शिक्षण घेतलेले लोकं असतील, फक्त त्यांनाच अस्सल सोम कुठे उगवते ते माहीत असेल आणि ती वनस्पती प्राप्त करण्याचं ज्ञान व कसब त्यांच्यापुरताच सीमित झालेलं असेल.
ऋग्वेदात असलेली सोमाबद्दलची विभागणी पाहिल्यास ते स्पष्टपणे लक्षात येते. कारण अगदी सोम ठेचणाऱ्या लोकांनाही ‘ग्रावन’ असे नाव आढळते. हे सोम वनस्पतीचा रस कसा काढायचा यांचे प्रशिक्षण घेतलेले विशेष लोक असत, आणि केवळ त्यांनाच या वनस्पतीपासून सोमरस कसा पिळून काढून पिण्यायोग्य कसा बनवायचा याचे तंत्र अवगत असावे. ऋग्वेदात सोम अत्यंत महत्त्वाचे विधीवत बनवले जाणारे द्रव्य होते, म्हणून सोमाविषयी प्रत्येक छोट्यात छोट्या बाबतींत अत्यंत कडक असे नियमन केलेले आहे. सोमपान कोणी करावे याबद्दल असणाऱ्या नियमांत एक नियम असा होता की, ज्या व्यक्तीच्या आधीच्या दहा पिढ्यांमध्ये केवळ शुद्ध आचरण करणाऱ्या व्यक्तीच होऊन गेल्या असतील, त्यांच्या कोणत्याही पिढीत अनाचार झालेला नसेल किंवा कोणत्याही पिढीत वर्ण बदललेला नसेल अशीच व्यक्ती सोम प्राशन करण्यास पात्र आहे. त्यासोबतच ज्याच्या घरात मुबलक आर्थिक सुबत्ता आहे व त्याच्या नोकरचाकरांनासुद्धा पुढील तीन वर्षे पुरेल इतके धनधान्य आहे अशाच व्यक्तीला सोम प्राशनाचा अधिकार असे. म्हणजेच ऋग्वैदिक काळात प्रत्येकच ब्राह्मणाला वा द्विजाला सोम प्राशनाचा अधिकार नव्हता. यावरून सोम किती महत्त्वाचे धार्मिक पेय होते ते समजते. वैदिकांच्या सांस्कृतिक जीवनात अत्यंत मोलाची भूमिका सोम बजावत असावा असे दिसते. सोम प्राशन करणारे (म्हणजे तो प्राशन करण्याचा अधिकार असणारे) आणि सोम प्राशन करण्याचा अधिकार नसणारे यांच्यात सरळसरळ भेद होता. तशा ऋचा ऋग्वेदात आढळतात.
७.
अठराव्या शतकात सार्कोस्टेमा प्रजातीतील (ब्रेव्हिस्टीगमा) वनस्पती सोम असल्याचे मानले जात होते. या वनस्पतीची योग्य ओळख ठरविणे महत्त्वाचे आणि आवश्यक तेव्हा ठरले जेव्हा मॅक्स म्युलर यांनी सोम वनस्पतीच्या प्रादेशिक स्थानावरून आर्यांच्या मूळ वसतीस्थानाचा शोध घेण्याची कल्पना काढली. त्यानंतर अनेक विद्याक्षेत्रांतील अभ्यासकांनी सोम वनस्पतीची ओळख शोधण्याचा प्रयत्न केला, काहींनी तर अगदी प्राचीन शिल्पांवरूनसुद्धा अनुमान बांधले. झोरोष्ट्रीयन पुरोहित येझ्दाच्या हातात असणारी वनस्पती म्हणजेच एफेड्रा प्रजातीतील सोम असा निष्कर्ष काही अभ्यासकांनी काढला. अफगाणिस्तानमधील हरहोती नदीच्या खोऱ्यात एफेड्रा प्रजातीच्या अनेक वनस्पती आढळतात, त्यातील एफेड्रा पॅचिक्लॅडा (Ephedra pachyclada) या वनस्पतीला तेथील स्थानिक लोकं हुम, हुमा आणि येमाहा अशा नावाने ओळखतात. याची अधिक माहिती पुढे आलेली आहे. अर्थात नंतरच्या काळात अनेक पर्यायवाची वनस्पतींना ‘सोम’ म्हणून संबोधण्यात आले. कारण मूळ सोम वनस्पतीची कमतरता किंवा तो ओळखू शकणारे लोक शिल्लक न राहिल्याने निर्माण झालेली दुर्मीळता किंवा आर्य-वैदिकांनी तो प्रदेश सोडून दिला असावा या अशा अनेक कारणांमुळे मूळ सोमाऐवजी अनेक पर्यायी वनस्पती आवश्यकतेनुसार, उपलब्धतेनुसार आणि प्रदेशानुसार वापरण्यात आल्या.
ऋग्वेद आणि अवेस्ता यांच्या संहितांसह कालांतराने वनस्पतीच्या जैवरासायनिक गुणधर्मांवरून सोम वनस्पतीचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. एफेड्रा प्रजातीच्या वनस्पतीपासून एफेड्रीन हे अल्कलॉईड (नत्रक) मिळवण्यात आले होते. या नत्रकाचा वापर सैनिकांची क्षमता वाढविण्यासाठी आणि त्यांच्यातील थकवा, उदासीनता, शिथिलता दूर करण्यासाठी पहिल्या महायुद्धात करण्यात आला. या नत्रकाचा शोध सर्वप्रथम चीनी संशोधकांनी लावला होता, कारण गेली हजारो वर्षे चीनी लोकांना एफेड्राचे गुणधर्म ज्ञात आणि वापरात आहेत.
ऋग्वेदात दिलेल्या वर्णनानुसार सोम वनस्पती केवळ एफेड्रा प्रजातीतील असू शकते असे मत अनेक संशोधक आणि अभ्यासकांनी मांडले आहे. त्यातील लक्षणीय नोंद म्हणजे जीवनजी जमशेदजी मोदी या पारशी पुरोहिताने गेल्डनर या जर्मन संस्कृत अभ्यासकांना आपल्या हओमात वापरल्या जाणाऱ्या एका वनस्पतीचा नमुना पाठविला होता. तो नमुना गेल्डनर यांनी त्या काळाचे नावाजलेले वनस्पतीविज्ञ ओ. स्फाट यांना तपासण्यासाठी दिला होता. ओ. स्फाट यांच्या अभ्यासानुसार तो नमुना एफेड्रा प्रजातीच्या वनस्पतीचा होता. आपल्या अभ्यास आणि निरीक्षणाअंती गेल्डनर एका निश्चित अशा निष्कर्षाला पोहचले होते, तरी तेव्हा त्यांनी सोम वनस्पतीची स्पष्ट ओळख सांगितली नव्हती. मात्र एका गोष्टीचा खुलासा त्यांनी केला होता, तो म्हणजे सोम आणि हओम या एकच वनस्पती आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अनुवादित केलेल्या सोम-सूक्तांच्या अनुवादात त्यांनी आपला निष्कर्ष जाहीर केलेला होता. त्यांच्या मते एफेड्रा म्हणजेच सोम वनस्पती होय.
याच जीवनजी मोदी यांनी तोच धार्मिक विधीत वापरल्या जाणारी हओम वनस्पतीचा नमुना १८८५मध्ये जेम्स एडवर्ड टीर्ने एचिसन या वनस्पतीशास्त्रज्ञा कडे पाठविला होता. जीवनजी मोदी यांना उत्तर देतांना एचिसन यांनी लिहिले होते की, आपण पाठवलेल्या वनस्पतीचा नमुना एफेड्रा प्रजातीचा आहे. ही वनस्पती प्रजाती बलुचिस्तान, अफगाणिस्तान, कश्मीर आणि तिबेट या भागात सर्वत्र आढळते. या भागात ही वनस्पती ‘हुम’ म्हणून ओळखली जाते. तर बलुचिस्तानमध्ये पेरीप्लोका अफायला या वनस्पतीला ‘हुम’ म्हणतात. ही वनस्पती पर्वतीय भागांत तसेच खोऱ्यात सारख्याच प्रमाणात वाढते. यात फक्त मांसल डहाळ्या आणि फांद्या असतात. फांद्यांचे जोड बोटांच्या पेरांसारखे जोडलेले असतात (ऊस जसा जोडलेला असतो तसा). खैबरखिंडीच्या आसपास आणि सगळ्या प्रांतात या वनस्पतीचा काढा आजारपण, अशक्तपणा दूर करण्यासाठी वापरतात. बलुचिस्तानात जरी दोन वेगळ्या वनस्पतींना हुम म्हणत असले तरी खऱ्या हुमची ओळख सगळ्यांना माहीत असते. कारण खऱ्या हुमच्या म्हणजेच एफेड्राच्या फांद्या बोटांच्या पेरासारख्या सांधे जोडलेल्या असतात. आज ज्या भागात हुम वनस्पती आढळते, तो म्हणजे हेरात खोरे, बलुचिस्तान, ब्राहुई, पख्तुन, साम, गिलगिट, चित्राल, काफिरीस्तान हाच भाग प्राचीन वैदिक-आर्यांचे युरेशिया सोडल्यानंतर केलेले प्राथमिक वस्तीस्थान मानला जातो. या पट्ट्यात एफेड्रा वनस्पती मोठ्याप्रमाणावर आढळते. तेथून वैदिक आर्य जसजसे पूर्वेकडे पसरत गेले, त्यांचे व सोम वनस्पतीमधले अंतर वाढत गेले. त्यामुळे पुरवठा कमीकमी होत गेला असावा आणि सोमाला पर्यायी वनस्पती वापरण्यास सुरुवात झाली असावी. दरम्यान काळाच्या ओघात शेवटी सोम एक मिथकीय वनस्पती बनून गेली असावी.
८.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्ध सुरु होताना आर. गॉर्डन वासन (R. Gordon Wasson) यांनी आपल्या Soma: The Divine Mashroom of Immortality पुस्तकाआधारे अमानिता मस्कारीया (Amanita muscaria) ही अळंबी (मशरूम) ऋग्वेदातील आणि अवेस्तातील मूळ सोम वनस्पती असल्याचा दावा केला. हे पुस्तक लिहिताना वासन यांनी कवकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, परिस्थितिकी, वांशिकवनस्पतीशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, विषविज्ञान (विषचिकित्सा) अशा विविध अभ्यास शाखांचा संदर्भ घेऊन लिहिले होते. असे असले तरी वासन यांनी आपल्या संशोधनासाठी केवळ ऋग्वेदातील काहीच ऋचांमधील सोम वनस्पतीचे वर्णन प्रमाण मानले होते. अवेस्तात असलेली हओमाची वर्णने त्यांनी विचारात घेतलेली नव्हती. ऋग्वेदाचे जे मंडल केवळ सोमास समर्पित आहे अशा नवव्या मंडलातील सोमाचे वर्णन फक्त त्यांनी लक्षात घेतलेले होते. त्यांपैकी सोमसर शुद्धीकरण प्रक्रिया सांगणारे सूक्त त्यांनी केंद्रस्थानी मानलेले होते. वासन यांनी प्रत्यक्षात मशरूममधून रस गाळून पाहण्यात यश सुद्धा मिळविले होते. अत्यंत आकर्षक व अभ्यासपूर्ण पद्धतीने वासन यांनी आपला दावा मांडलेला असला तरी अनेक अभ्यासकांनी तो तात्काळ फेटाळून लावला. ऋग्वेदात असलेले सोम वनस्पतीचे वर्णन आणि वैशिष्ट्ये केवळ एफेड्रा वनस्पती करते म्हणून तीच सोम ठरते, त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही वनस्पतीला सोम म्हणता येणार नाही असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.
एफेड्रा वनस्पती पर्णहीन असते. मांसल फांद्या मानवी बोटांसारख्या सांध्यावर जोडलेल्या असतात. त्या सरळ, उंच वाढतात. या वनस्पतीचा सुगंध देवदारच्या (देव-अदार) झाडासारखा असतो. लाकडी खोडापेक्षा फांद्यांत अधिक नत्रक (रस) असतो, त्याची चव तीव्र तुरट असते. वनस्पतीच्या वयानुसार वनस्पतीतले नत्रकाचे प्रमाण वाढत जाते. हे नत्रक पाण्यात विरघळते आणि तोंडावाटे घेता येते, त्यामुळे उत्तेजना वाढते. चार वर्ष पूर्ण केलेल्या वनस्पतीचा बहराचा काळ उत्तम असतो. पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा सुरु होण्याआधीचा काळ वनस्पती तोडण्यासाठी चांगला असतो. एफेड्रा सर्वत्र वाढणारी वनस्पती नाही तसेच एफेड्राच्या सर्वच वनस्पतींमध्ये नत्रक आढळत नाही.
एफेड्राच्या चार प्रजाती उत्तर भारत, अफगाणिस्तान आणि इराणमध्ये आढळतात : एफेड्रा जेरार्डीयाना (E. gerardiana / E. vulgaris), एफेड्रा मेजर (E. major / E. nebrodenis), एफेड्रा इंटरमिडिया (E. intermedia) आणि एफेड्रा पॅचीक्लाडा (E. pachyclada). एफेड्रा प्रजातीत एकूण १५७ शास्त्रीय वनस्पती समाविष्ट केलेल्या आहेत, त्यातील ६७ वनस्पतींची शास्त्रीय नावे निश्चित केलेली आहेत. एफेड्रा मेजर ही वनस्पती चीनमधील झिंगझियान प्रांतात मा. हुआंग म्हणून तर एफेड्रा इंटरमिडिया झोंग मा हुआंग म्हणून ओळखली जाते. चीनमधील झियाओह (Xiohe) आणि गुमुगो (Gumugo) या पुरातत्त्वीय स्थळांवर सुमारे इसपू.१८००-१४५० या काळातील एफेड्रा आणि इतर वनस्पती आढळून आल्या आहेत. या स्थळांवर दफन केलेल्या जागांवर एफेड्राचे तुकडे आणि लहान जुड्या, गव्हाचे दाणे, झाबुक (tamarisk), डिंगळा (sparcifolia), ज्येष्ठमध, दातेरी अशा वनस्पती सापडल्या आहेत. अशा काही वस्तू सुती किंवा (काही ठिकाणी) चामडी छोट्या पिशव्यांमध्ये बहरून ठेवलेल्या आढळल्या आहेत. झिंगझियांग हा प्रांत युरेशियन पट्ट्यांशी संलग्न आहे. चीनच्या या भागात प्राप्त झालेल्या अनेक पुराव्यांवरून असा अनुमान बांधता येती की मध्य-आशिया, स्टेप्स आणि झिंगझियांग प्रांतात अनेक गोष्टी, कर्मकांड, वनस्पती यांबद्दलच्या धारणा एकसारख्याच होत्या. इथे आढळलेली वनस्पती आणि ऋग्वेदातील सोम किंवा अवेस्तातील हओम यांत असणारे साधर्म्य अर्थात योगायोग म्हणता येणार नाही. चीनी भाषेतील शुमा (shuma) किंवा सुमा (suma) या संज्ञा सोमासाठीच वापरल्या असल्याचा अनुमान आहे.
९.
शतपथ ब्राह्मणच्या निर्मिती काळापर्यंत मूळ सोम सामान्यपणे मिळणे जवळजवळ बंद झाले होते. सुरुवातीला मूळ सोमावर बंधने आणून मर्यादित केला गेला आणि त्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले गेले. बौधायन श्रौतसूत्रात यजमान विक्रेत्याला विचारीत असे, हा सोम मूजवत पर्वतावरून आणला आहे का ? ऋग्वेदातसुद्धा मूजवत पर्वताचा उल्लेख अनेकदा आलेला आहे. सोमस्येव मौजवतस्य भक्षो विभिदको जागृविर्मध्यमच्छान || (ऋग्वेद १०.३४.१). शतपथ ब्राह्मणात मूळ सोम उपलब्ध नसल्यास विधीसाठी कोणकोणत्या वनस्पती वापराव्या, त्याचे पर्याय दिलेले आहेत (४.५.१०.२-६). एका वनस्पतीसाठी त्यात फाल्गुन वनस्पती अशी संज्ञा वापरलेली आहे. फुलांच्या रंगावरून लाल-फाल्गुन आणि तपकिरी-फाल्गुन असे दोन प्रकार सांगितले आहेत. योग्यतेनुसार आणि उपलब्धतेनुसार तपकिरी फाल्गुनापासून सोम मिळवावा. फाल्गुन आणि मूळ सोम ही शतपथ ब्राह्मणाच्या दृष्टीने सारखीच असल्याचे दिसते.
फाल्गुन वनस्पतीचे दोन प्रकार आहेत : अर्जुन वृक्ष (Terminalia arjuna) आणि ‘अर्जुनानी’ या गवताची प्रजाती. शतपथ ब्राह्मणात दिलेल्या कथेनुसार गायत्री सोम घेऊन जात असताना त्याची एक लहान फांदी तिच्या हातातून पडली आणि त्या(फांदी)मधून सोम वनस्पती उगवली म्हणून तिला ‘श्येनहृत’ असे नाव मिळाले आहे. (श्येनहृत या नावाचा स्पॅनिश अपभ्रंश स्यॅनोरिता-सेनोरिटा असा आढळतो. उत्तर पेरूत याच नावाच्या एका वनस्पतीला hierba de la Senorita म्हणजे ‘plant of Maiden’ मदनाचे झाड म्हणतात. सॅन पेड्रो समूहाचे लोक या वनस्पतीचा वापर कामौषधी बनविण्यासाठी करतात. या फुलाच्या गुणधर्मांचे कमळाशी असणारे साधर्म्य कुतूहलजनक आहे.) श्येनहृत न मिळाल्यास अदारचा वापर करावा. अदार न मिळाल्यास तपकिरी रंगाची दुर्वा सोम म्हणून वापरावी. दुर्वा म्हणजे Panicum (किंवा Cynodon) dactylon किंवा Agrostis linearis होय. तपकिरी दुर्वा मिळाली नाही तर कोणत्याही प्रकारची सोनेरी रंगाची कुश वनस्पती वापरावी. कुश म्हणजे Poa cynosuroides वनस्पती. सोम वनस्पतीचे पर्याय कसे निर्माण झाले याच्याही मिथक कथा आहेत. वर गायत्रीची जशी पाहिली तशीच अदारची आहे. सोमाला बळी देत असताना त्यातून रसाच्या चिळकांड्या उडाल्या त्यातून वनस्पती उगवली ती म्हणजे अदार (अदार म्हणजे कदाचित ‘देवदार’ वृक्ष असू शकतो. देवांचे अदार म्हणजे रस उडून उगवलेला म्हणून देवदार, देवांचा अदार वृक्ष म्हणून देवदार किंवा या नावाची एखादी दुसरी वनस्पती आहे का तिचा शोध घ्यायला हवा.
वर बघितल्याप्रमाणे सोम असण्याची शक्यता असणाऱ्या एफेड्राचा सुगंध देवदार सारखाच असतो). सगळ्या ब्राह्मण संहितांनी ऋग्वेदातल्या मूळ सोम वनस्पतीची ओळख स्वतंत्र ठेऊन त्यांचे पर्याय सुचविले आहेत. शतपथ ब्राह्मणाने तर ब्राह्मण वगळता इतरांना मूळ सोम उपलब्ध असला तरी देऊ नये असे म्हटले आहे. हे पर्याय सुचवितांना मूळ सोम वनस्पतीसदृश, वनस्पती निवडल्या आहेत. या पर्यायी वनस्पती पर्णहीन आणि मांसल देठ असलेल्याच आहेत. ब्राह्मणांच्या शाखांनुसार वेगवेगळ्या पर्यायी सोम वनस्पतींचा स्वीकार केला आहे. एका शाखेने ‘पुतिका’ नावाची वनस्पती सांगितलेली आहे. त्यावरून पुतिका एक प्रकारचे मशरूम असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न वासन आणि त्यांच्या सहकारी स्टेला क्रॅमरिश्च यांनी केला. पूर्व-भारतातील संथाळ ही प्राचीन आदिवासी जमातीत मशरूमला पुतका (पुत्का) म्हणतात, त्यावरून त्यांनी आपला अनुमान बांधला. मात्र शास्त्रीय स्तरावर पुतिका म्हणजे मशरूम असे त्यांना सिद्ध करता आले नाही.
ऋग्वेदात जे पुतिकातृण सांगितले आहे त्याला साध्या मराठी भाषेत रानशेर (Ascelepias aphylla) म्हणतात. वासन आणि स्टेला क्रॅमरिश्च यांनी संदर्भासाठी फक्त जर्मन भाषेतील ऋग्वेदाचा आधार घेतलेला आहे आणि तेच त्यांच्या उडालेल्या गोंधळाला कारणीभूत ठरले आहे. कारण मूळातील ऋग्वेदातील वर्णने आणि जर्मनमधील त्यांचा अनुवाद हे योग्य अर्थासकट आणि मूळाबरहुकुम असतीलच याची काहीही खात्री नाही. त्यामुळे वनस्पतींची वर्णने तंतोतंत नसण्याचीच शक्यता जास्त असू शकते. यासंदर्भात प्रतिवाद करताना रेनर स्टुर्हमान (Rainer Stuhrmann) यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत : १) ब्राह्मणे आणि श्रौतसूत्रे यांच्या संदर्भांवरून असे समजते की मूळ सोम वनस्पती कारणापरत्वे मिळेनाशी झाल्यावर तिला पर्याय म्हणून इतर अनेक वनस्पती त्याऐवजी वापरायला सांगितल्या आहेत.
ऋग्वेदातल्या दहाव्या मंडलातसुद्धा असे सोमाचे पर्याय सापडतात; २) ऋग्वेदातील सोम हा मद्य नव्हता कारण मद्य बनविण्यासाठी किण्वनप्रक्रिया (fermentation) घडून येणे आवश्यक असते, त्या किण्वनासाठी लागणारा भरपूर वेळ सोम बनविण्याच्या विधीत उपलब्ध नाही. वनस्पती पिळल्यानंतर लगेच त्या रसापासून सोम बनविला जात असे; ३) ऋग्वेदानुसार सोम वनस्पती केवळ पर्वतीय भागातच उगवत असे. सोमप्राशनानंतर होणारा परिणामसुद्धा महत्त्वाचा घटक आहे. आधी मांडल्यानुसार मूळ सोम वनस्पती मिळणे दुर्लभ झाल्याने पर्यायी वनस्पती म्हणून एफेड्रा, कॅनाबिस आणि अफू वापरण्यास सुरुवात झाली. काही शास्त्रज्ञांच्या मतानुसार इराणमध्ये मूळ सोम वनस्पती एफेड्रा मिळणे बंद झाल्यावर पेगॅनम हरमला म्हणजे हरमल, (Peganum harmala, सिरीयन रुई, विशेष म्हणजे संस्कृतमध्ये आजही या वनस्पतीचे नाव सोम आहे) आणि टॅमारीस्क (Tamarix, संस्कृत : शावक) प्रजातीच्या वनस्पती वापरायला सुरुवात केली. आर्यांनी अजून दक्षिणेकडे सिंध आणि भारतात आल्यावर सार्कोस्टेमा, पेरीप्लोका अफायला इ. वनस्पती वापरायला सुरुवात केली.
शतपथ ब्राह्मणात पर्यायी वनस्पतींची यादीच दिलेली आहे. तैतरिय ब्राह्मणानुसार पुतिकातृणाचा म्हणजे रानशेर वनस्पतीचा वापर करावा. पुतिका न मिळाल्यास अर्जुन (Terminalia arjuna) वनस्पतीचा वापर करावा. शतपथ ब्राह्मणात अदार वनस्पती सांगितली आहे, सध्या मात्र तिच्याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सोम प्राशन केल्यावर होणाऱ्या परिणामांवरूनसुद्धा वनस्पतींचे वर्गीकरण केलेले आहे : मनोत्तेजना करणारे (stimulant) औषध, किण्वनातून निर्माण होणारे मद्यसदृश्य औषध आणि यांपैकी वेगळे. मनोत्तेजना करणाऱ्या वनस्पतींमध्ये पेगनम हरमला, निम्फिया (Nymphea spe. / Nelumbo speciosum, मराठी : कोयकमळ, कमोद, कमळ) प्रजाती समाविष्ट केल्या आहेत. यापैकी निम्फिया प्रजातीतील कमळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या वनस्पती परमानंद देऊ शकणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात.
भारतात अनेक प्रकारची कमळे आढळून येतात त्यापैकी काहींना सोम अशीही ओळख आहे, तसेच कमळांमध्ये उत्तेजना निर्माण करणारे नत्रकेसुद्धा असतात. भारतीय वैदिक-ब्राह्मणी परंपरेत आणि बौद्ध धम्मात कमळ आणि त्याच्या फुलाला खूप महत्त्व असले तरी सोम आणि कमळ एकच असल्याचे प्रस्थापित करता येणे अवघड आहे. मात्र तरीसुद्धा एकूण विचार करता कमळ वनस्पतीचा सोम असण्याच्या दृष्टीने शोध घेणे महत्त्वपूर्ण ठरू शकेल. किण्वनाद्वारे मद्यार्क निर्माण करणाऱ्या वनस्पती सार्कोस्टेमा ब्रेव्हिस्टीग्मा त्यासोबत सार्कोस्टेमा व्हिमिनाले तसेच मधुका इंडिका (Madhuca Indica, मराठी : मोहाचे झाड), सेरोपेजिया (Ceropegia spe. / C. juncea मराठी : वेलखंटूडी) प्रजाती.
१०.
भारतीय अभ्यासक चिंतामण ग. काशीकर यांनी सोम वनस्पतीचा शोध घेताना हे स्पष्ट केले आहे की एफेड्रा ही वनस्पतीच मूळची सोम वनस्पती होय. यजुर्वेद संहिता, शतपथ ब्राह्मण, ऐतरेय ब्राह्मण व श्रौतसूत्रांमध्ये सोम वनस्पती विकत घेण्याचा संदर्भ आलेला आहे. यात अध्वर्यू म्हणजे ग्राहक विक्रेत्याला विचारीत असे, ही सोम वनस्पती मूजवत पर्वतावरून आणली आहे का? यावरून जर मूळ मूजवत पर्वतावरून आणलेली सोम वनस्पती मिळत नसेल तर इतर पर्यांयांची व्यवस्था केली असावी. कारण काही श्रौतसूत्रात अग्नीहोत्रात दररोज सोम टाकण्याबद्दल सांगितले आहे. जर दररोज सोमासारखी महाग आणि दुर्मीळ वनस्पती जाळण्यासाठी वापरायची तर तिला स्वस्त आणि पूरक पर्याय शोधणे क्रमप्राप्तच ठरते. किंवा सोम वनस्पती केवळ पर्वतीय भागांतच नाही तर जमिनीवर आणि दररोज अग्नीहोत्रात जाळण्याइतकी मुबलक प्रमाणात उपलब्ध होती असा याचा अर्थ होतो. मात्र ते शक्य दिसत नाही कारण मूळ सोम म्हणजे वैदिक लोकांसाठी अत्यंत दुर्मिळ. तेव्हा पर्यायी तुलनेने स्वस्त आणि सहज उपलब्ध सोम वनस्पती वापरणे हेच योग्य ठरते. मूजवत पर्वतावर मिळणारी सोम वनस्पती अर्थात अग्नीहोत्रात वापरत नसणार. काशीकर यांनी कोणत्याही प्रकारे सोम मशरूम असल्याचे नाकारले आहे. ऋग्वेदाहून खूप नंतरच्या मनुस्मृतीचा संदर्भ दिल्यास मशरूम हे ब्राह्मणांसाठी निषिद्धच मानले गेले आहे.
लशुनं गृखतं त्वैव पलाण्डुं कवकानि च | अक्ष्याणि द्विजातीनामेघ्य प्रभवानिच || (मनुस्मृती ५.४)
(लसूण, लाल गाजर, कांदे, छत्राक (मशरूम) असे अपवित्र पदार्थांपासून, उकिरड्यात उपन्न झालेल्या तंदुलीय इत्यादी भाज्या द्विजास अभक्ष्य (वर्ज्य) आहेत.)
छत्राकं विड्वराहं च लशुनं ग्रामकुक्कुटम् | पलाण्डुं गृखनं चैव मत्या जग्घ्वा पतेद्द्विज: || (मनुस्मृती ५.१८)
(छत्राक, गावडुक्कर, लसूण, गावकोंबडा, कांदा, गाजर हे पदार्थ बुद्धिपूर्वक खाल्ल्यास ब्राह्मण पतित होतो.)
मनुस्मृतीचा संदर्भ दिला तर किमान स्मृती काळात मशरूम हे ब्राह्मणांना पूर्णपणे निषिद्ध होते असे स्पष्ट होते. यम नावाच्या स्मृतीभाष्यकाराने मशरूम खाण्याविषयी काय म्हटले आहे ते पाहता येईल. जे छत्रक खातात, मग ते जमिनीवर उगवलेले असो की झाडांवर, ते ब्रह्महत्येचे पातक करतात, जे सर्व पातकांत सर्वात घोर आहे. अर्थात मनुस्मृती ऋग्वेदाहून खूपच नंतरची असली तरी तिच्या काळात मशरूम खाण्याबद्दल किती तिटकारा होता हे लक्षात येते. अशा पार्श्वभूमीवर एखादे मशरूम वैदिकांच्या सर्वांत महत्त्वाच्या कर्मकांडात, विधीत पूज्यनीय असेल असा अनुमान करवत नाही. किंवा थोडा उलट विचार केल्यास एखादी गोष्ट अनेक लोकांपासून सुरक्षित ठेवायची असल्यास त्या गोष्टीचे सेवन किंवा वापर धार्मिकदृष्ट्या निषिद्ध करून टाकणे सगळ्यात सोयीस्कर असते. हा देखील अंदाजच म्हणावा लागेल. कारण वर पाहिलेच आहे मनुस्मृती निर्माण व्हायच्या जवळपास हजार वर्षे आधी शतपथ ब्राह्मणाच्या काळातच सोम वनस्पती विलुप्त होण्याच्या मार्गावर होती. तेव्हा मशरूम सोम असू शकत नाही. आता अभ्यासकांनी दिलेल्या पर्यायातून म्हणजेच सार्कोस्टेमा ब्रेव्हिस्टिग्मा, पेरिप्लोका अफायला (Periploca aphylla), आणि एफेड्रा यांतून सोम वनस्पतीची ओळख निश्चित करता येईल. आता ऋग्वेद आणि नंतरच्या इतर संहिता यजुर्वेद, शतपथ ब्राह्मण यांच्यात एक सुनिश्चित अशी सलगता असेल तर या ग्रंथांच्या हवाल्याने सोम ही मूळ वनस्पती आणि तिचे पर्याय हे सोम आहेत असा निष्कर्ष काढता येतो. एफेड्रा वनस्पती या तीनमधून सर्वांत शक्य असलेली सोम वनस्पती असू शकते. या निष्कर्षाला शास्त्रीय आणि पुरातत्वीय आधार मिळालेला आहे, त्याचा विचार करता येईल.
११.
तुर्कमेनिस्तान भागातून इसपू. ३०००च्या आसपास आर्य बॅक्ट्रियामार्गे पर्शिया आणि भारतात आले होते. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सोम वनस्पती इंडो-इराणी वैदिक-झोराष्ट्रीयन लोकांच्या प्रवासानुसार, त्यांनी केलेल्या स्थलांतरांनुरूप बदलत गेलेले दिसते. त्यामुळे मूळ सोम वनस्पतीचा प्रदेश आणि वैदिक-आर्यांचे वसतीस्थान हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. ‘बॅक्ट्रिया अँड मार्जियाना आर्किओलॉजिकल कॉम्पलेक्स’ (Bactria and Margiana Archaeological Complex) म्हणजेच मार्जियाना सभ्यतेच्या परिप्रेक्ष्यात वैदिक-आर्यांच्या वसतीस्थानाविषयी जी नवीन माहिती प्रकाशात आलेली आहे. त्याच्या प्रकाशात सोम वनस्पतीची माहिती आणि ओळख समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. युरेशिया किंवा मध्य-आशियात उजेडात आलेली नवीन सभ्यता मार्जियाना आर्यांच्या स्थलांतरांबद्दल लक्षणीय माहिती प्रदान करते.
इसवीसनपूर्व तिसऱ्या आणि दुसऱ्या सहस्त्रकात ही सभ्यता उदयास आली. आजच्या अमु दर्या नदीच्या मध्य भागातील बॅक्ट्रिया आणि विशेषत: मार्जियाना (ग्रीक नाव) म्हणजेच तुर्कमेनिस्तान प्रदेशातील भागात ही आर्य-सभ्यता वसली होती. पूर्व-इराण, बलुचिस्तान या भागापर्यंत ही सभ्यता पसरली होती असे अनेक पुरावे प्राप्त झाले आहेत. ज्या मुरघाब नदीच्या काठावर ही सभ्यता उदयास आली होती, कालांतराने त्या मुरघाब नदीने आपले नैसर्गिक पात्र बदलले आणि ती पश्चिम दिशेला वाहायला लागली. रशियन पुरातत्वशास्त्रज्ञ व्हिक्टर सारीयानिदी यांच्या निष्कर्षानुसार मार्जियाना म्हणजे खरोखरीची मूळ आर्य सभ्यता. ही सभ्यता जगातल्या (अगदी सांस्कृतिकदृष्ट्यादेखील) सगळ्यात मोठी पाचवी सभ्यता होती. तेव्हा वैदिक-आर्य हे भटक्या जमातीसारखे, मागासलेले, रानटी लोकं होते असा जो गैरसमज, चुकीच्या इतिहास आकलनातून निर्माण झालेला आहे, तो दूर सारला पाहिजे. कारण मार्जियाना ही मूळ आर्य-संस्कृती आपल्या काळातील इजिप्त, मेलुहा, मेसोपोटेमियन या संस्कृतींच्या अगदीच मागे नव्हती, तर त्यांच्याशी बऱ्यापैकी संबंध ठेऊन होती असे महत्त्वाचे पुरावे मिळत आहेत. सारीयानिदी यांनी तुर्कमेनिस्तानात केलेल्या उत्खननात वैदिक कर्मकांडांशी मिळतेजुळते इसपू २००० ते २५०० या काळातील अनेक पुरातत्वीय अवशेष शोधून काढले आहेत. सिन्ताष्टा या पुरातत्वीय स्थळावरसुद्धा ऋग्वेदात वर्णन केलेल्या कर्मकांडाशी तंतोतंत जुळणारे अनेक अवशेष प्राप्त झाले आहेत. अगदी अश्वमेध यज्ञाचे अवशेषसुद्धा तिथे सापडले आहेत. तसेच ऋग्वेदात वर्णन केलेल्या दध्यांच या मिथकाशी जुळणारे अवशेष मिळाले आहेत. या मिथकानुसार इंद्राने दधिचीचे मुंडके कापून त्याच्या जागी घोड्याचे मुंडके बसवले होते.
इथे सापडलेल्या पुरातत्वीय अवशेषात एका मनुष्याच्या सांगाड्यावर मुंडक्याच्या जागी घोड्याचे मुंडके ठेवेलेले आहे, तर त्या मनुष्याचे मुंडके पायाच्या घोट्याजवळ ठेवलेले आहे. गुडघ्याजवळ गायीचे मुंडके ठेवलेले आहे. आर्य या भागात सभ्यता निर्माण करण्याआधी कमीतकमी पाचशे वर्ष तरी या भागात वस्ती करून होते, असे आढळून आले आहे. म्हणजे आर्य जरी स्थलांतर करीत होते तरी त्या स्थलांतरांच्या दरम्यान असलेला अवधी हा प्रचंड होता. दरवर्षी किंवा काही दशकातच ते जागा सोडून उठून चालायला लागत नव्हते असे म्हणता येते. या भागात सापडलेल्या अवशेषांत त्याकाळी वापरलेल्या अनेक वस्तु आढळल्या, त्यात एफेड्रा, कॅनाबिस (गांजा) आणि अफूचे अवशेषसुद्धा आढळून आले आहेत. मध्य-आशियातून स्थलांतर करीत असताना आर्य-वैदिकांनी सोम बनविण्यासाठी पर्याय शोधून काढले. मध्य-आशियातून मार्जियाना येथे उतरल्यावर वैदिक-आर्यांनी सोम बनविण्यासाठी एफेड्रा, कॅनाबिस आणि अफूचा वापर केला. पुढे प्रवास करताना इराण आणि भारतात केवळ एफेड्रा वनस्पतीचा वापर केला असावा, आणि कदाचित सर्वांत शेवटी सार्कोस्टेमा ब्रेव्हिस्टीग्मा या वनस्पतीचा वापर गंगेच्या खोऱ्यात उतरल्यावर त्यांनी सुरु केला असावा.
वर म्हटल्यानुसार मध्य-आशिया, युरेशिया भागातून खाली आलेल्या वैदिक-आर्यांनी इसपू. किमान तीन हजार वर्षांपूर्वी तुर्कमेनिस्तान प्रांतातील मुरघाब नदीच्या किनाऱ्यावर आपली सभ्यता उभारायला सुरुवात केली होती. या नदीच्या खोऱ्याचा स्पष्ट संदर्भ अवेस्तामध्ये आढळतो. ऋग्वेदात ज्या सरस्वती नदीचा वारंवार उल्लेख येतो ती नदी म्हणजेच मुरघाब नदी असू शकते. या काळापर्यंत वैदिक-आर्यांनी घोड्यांना पाळीव बनवून त्यांचा रथासाठी, प्रवासासाठी वापर सुरु केला होता. या भागातील गोनुर टेपे येथील झालेल्या उत्खननात ऋग्वेदात वर्णन असणारी मोठमोठी हवनकुंडे, यज्ञवेदी, सोम बनवण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी असे अनेक अवशेष प्राप्त झाले आहेत. सोम वनस्पती ठेचण्यासाठी लागणारे दगडी वरवंटेसुद्धा मिळालेले आहेत. तसेच वर सांगितल्याप्रमाणे यज्ञात वापरलेल्या सोम असण्याची शक्यता असलेल्या वनस्पतींचे अवशेषसुद्धा सापडले आहेत. एक मोठे पाणी भरून ठेवता येईल असे घंगाळसारखे पात्र सापडले आहे, ज्याचा उपयोग सोम बनविण्यासाठी केला जात असावा. हे पात्र जवळपास इसपू २०००वर्षांपूर्वीचे आहे.
सोम बनवण्यासाठी वापरली जाणारी अशा प्रकारची भांडी सारीयानिदी यांना पहिल्यांदा २००३ मध्ये सापडली. सारीयानिदी यांच्या संशोधनावरून केवळ सोम वनस्पतीचाच नाही तर वैदिक-आर्य मध्य-आशियातून, युरेशियातून आले होते या निष्कर्षालादेखील भक्कम आधार मिळतो. सारीयानिदी यांनी मांडलेल्या निष्कर्षानुसार आर्य म्हणजेच वैदिक-आर्य आणि इराणी-आर्य मार्जियानात आले तेव्हाच मूळ सोम वनस्पतीचा वापर बंद झालेला होता. याचा संदर्भ ऋग्वेदातसुद्धा दहाव्या मंडलात आढळून येतो. भारतविद्यातज्ज्ञ, धर्माभ्यासक आणि भाषाशास्त्राच्या अभ्यासकांच्या मते ऋग्वेदाचे दहावे मंडल सर्वात शेवटी लिहिले गेले आहे. यात असलेल्या भाषेवरून शतपथ ब्राह्मण आणि दहाव्या मंडलाच्या निर्मितीचा काळ जवळपास एकसारखाच असल्याचे मानले आहे. आपण वर पाहिले आहे शतपथ ब्राह्मणाच्या काळात मूळ सोम वनस्पती दुर्मीळ आणि काही लोकांपर्यंतच मर्यादित झाली होती, तसाच संदर्भ ऋग्वेदात आलेला आहे.
सोमं मन्यते पपिवान् यत्संपिंषन्त्योषधिम् |
सोमं यं ब्रह्मणो विदुर्ण तस्याश्नाति कश्चन || (ऋग्वेद १०.८५.३)
(ब्राह्मणाला माहीत असलेला सोम इतर लोकांना माहित नसतो, आणि ज्या लोकांना वाटतं ते सोम प्यायले आहेत, मुळात त्यांनी खरा सोम पिलेलाचा नसतो.)
१२.
मुरघाबच्या पट्ट्यात दक्षिण तुर्कमेनिस्तानात टोगोलोकमध्ये सुद्धा पुरातत्त्ववेत्त्यांनी इसपू. १७४५ या काळातला एक मोठा बांधकाम केलेला परिसर शोधला आहे. याच्या मध्यभागात एक वाडासदृश्य बांधकाम आहे. यातील एका खोलीत सापडलेल्या भांड्यांमधील अवशेषात मिळालेल्या गाळातील अतीसूक्ष्म घटकाचे रासायनिक विश्लेषण केले असता ते एफेड्रा आणि अफूचे असल्याचे निष्कर्ष मिळाले. अफूचे पुरावे दगडी उखळ आणि मुसळीवर देखील मिळाले आहेत. या भांड्यांचा वापर विधिवत पेय (सोम) बनवण्यासाठी केल्याचे दिसून येते. याच बांधकामात एक खोली एफेड्रा वनस्पती ठेवण्यासाठी वापरात होती असे लक्षात आले आहे. याच बांधकामात एका भागात यज्ञवेदीसुद्धा आढळून आल्या आहेत. ज्या ठिकाणी बळी दिले जात, तो भागसुद्धा ओळखला आहे कारण त्या ठिकाणच्या भिंतींवर अनेक रक्ताचे डाग आढळले आहेत. इथे सापडलेल्या एका भांड्यात एफेड्रासोबत अफू आणि गांजाचे अवशेष प्राप्त झाले आहेत. टोगोलोक किंवा गोनुरमधील लोक कोण होते अजून निश्चित झाले नसले आणि त्यांचा ऋग्वैदिक आणि अवेस्तान लोकांशी काय संबंध आहे हे अजून समजले नसले तरी या प्रदेशांत प्राप्त अवशेषांवरून असे म्हणता येते की त्यांच्या जगण्यात आणि धार्मिक कर्मकांडात अग्नी आणि एफेड्रा वनस्पतींशी जवळचा संबंध होता हे निश्चित आहे.
१३.
सोम वनस्पती आपली ओळख गमावून किंवा विलुप्त होऊन कमीत कमी ३००० वर्षांचा काळ लोटला आहे. दरम्यान अनेक वनस्पतींना सोम म्हणवून घेण्याचे भाग्यदेखील लाभले. अनेक शास्त्रीय संशोधने होतील, पुरात्त्त्वात नवीन शोध लागतील, सोम वनस्पतीच्या संदर्भात अनेक नवे सिद्धांत मांडले जातील. कदाचित एखादी वनस्पती सोम म्हणून मान्यता मिळवेलही, मात्र जे मिथक आणि रहस्य ऋग्वेदातल्या सोमाने / सोम वनस्पतीने निर्माण करून ठेवले आहे, ते कधीही नष्ट होणार नाही. हे मिथक जोवर शिल्लक आहे तोवर सोम वनस्पतीचा शोध सुरूच राहील. कारण मिथके कधीही आपलं पूर्ण रहस्य उजागर करीत नाही.
...आणि सोम हे वास्तवापेक्षा मिथक अधिक आहे.
.............................................................................................................................................
(‘मुराळी’ दिवाळी अंक २०१९मधून साभार)
.............................................................................................................................................
लेखक नितिन भरत वाघ कादंबरीकार व समीक्षक आहेत.
waghnakhe@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Fri , 13 December 2019
जबरदस्त माहिती. धन्यवाद! :-)
-गामा पैलवान