देवेंद्र फडणवीसांचे ‘अधिक’ आणि ‘उणे’
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे विवेक रानडे , नागपूर यांच्या सौजन्याने  
  • Sat , 07 December 2019
  • पडघम राज्यकारण भाजप BJP देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis शरद पवार Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस NCP

तेव्हा मंत्री असलेल्या गणेश नाईक यांनी शिवसेना सोडताना केलेल्या टीकेला उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ‘जे कालपर्यंत प्रेम करत होते, पाया पडत होते, ते माझा आज एवढा तिरस्कार का करू लागले?’, असा प्रश्न विचारला होता, याचं स्मरण सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी तुफान टीका आणि पक्षांतर्गत कथित उठाव पाहून आठवला. महिना-सव्वा महिनाभरापूर्वीपर्यंत ज्यांच्यावर ‘महाराष्ट्र भाजपचा आधारस्तंभ’ म्हणून स्तुतीसुमने उधळली जात होती, ज्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रभावी नेतृत्व म्हणून पहिलं जात होतं, त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आत्ताच्या घडीला जोरदार टीकेची राळ उठली आहे, समाजमाध्यमांवर तर अत्यंत तिरस्करणीय भाष्यं केली जात आहेत. महाराष्ट्राचा ‘अयशस्वी मुख्यमंत्री’ असा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असं जे म्हटलं जातं, ते हेच आहे. 

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्ण अयशस्वी ठरले, ही टीका वास्तवाला धरून नाही असं माझं ठाम मत आहे, असं भाष्य मी गेल्या आठवड्याच्या मजकुरात सर्वांत शेवटी केलेलं होतं. कारण कोणत्याही पदावर आलेला कुणीही माणूस शंभर टक्के यशस्वी नसतो आणि शंभर टक्के अयशस्वीही नसतोच. जसं, माणूस शंभर टक्के सदवर्तनी नसतो आणि शंभर टक्के दुर्वर्तनीही नसतो, तसंच हे आहे. तसंच मुख्यमंत्री आणि राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं काही ‘अधिक’ आणि काही ‘उणे’ आहे. यातलं कोणतं पारडं जड आहे, हे प्रत्येक जण त्याच्या आकलनाप्रमाणं ठरवू शकतो. अर्थात हे ठरवण्यासाठी कोणत्या तरी राजकीय विचाराचा गडद रंगाचा चष्मा न घालता, एकारलेपणा न करता, विवेक बुद्धीनं बघण्याची गरज आहे.

एक महत्त्वाचा भाग म्हणजे मी यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री म्हणून  कारकीर्द पाहिलेली नाही. त्यांच्या संदर्भात ऐकलं, वाचलं आहे. पत्रकार म्हणून मी जे पहिलं त्या पार्श्वभूमीवर सांगतो - अनेकांना पटणार नाही, काहींना तर मिरच्या झोंबतील तरी सांगतोच, महाराष्ट्राच्या सर्वोत्कृष्ट तीन मुख्यमंत्र्यांचा माझा क्रम असा आहे,

एक - वसंतदादा पाटील,

दोन - सुधाकरराव नाईक आणि

तीन - देवेंद्र फडणवीस.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बजावलेली कामगिरी निश्चितपणे उजवी आहे. विरोधी पक्षात प्रदीर्घ काळ गेल्यानं लोकांच्या प्रश्नाची फडणवीस यांची जाण आणि संवेदनशीलता किंचितही बोथट नव्हती. उच्चविद्याविभूषित असलेले देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या विकासाची तळमळ आहे आणि त्यासाठी ते पायाला चक्र लावून फिरले याबद्दल कोणतंही दुमत नाही. मात्र, पहिल्या दिवसापासून फडणवीस यांना विरोधाला तोड द्यावं लागलं. कोणी कितीही नाकारो आधी स्वपक्षातच त्यांची सर्वांत जातीवरून हेटाळणी झाली, हे अनेकांनी अनुभवलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या पक्षांतर्गत इच्छुकांनी सुरुवातीला तर भर मंत्रीमंडळाच्या बैठकीतही त्यांचा एकेरी उल्लेख केला गेलेला आहे. त्याबद्दल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर हे उल्लेख थांबले. माझ्या चार दशकांच्या पत्रकारितेत मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीच्या जातीची एवढी चर्चा झाल्याचं आठवत नाही, पण फडणवीस यांनी कोणाच्याही जातीचा कधी उल्लेख केला नाही.

नंतर त्यांच्या देहयष्टीवरून यथेच्छ टिंगलटवाळी सुरू झाली, ती अजूनही थांबलेली नाही. खरं तर समाजमाध्यम आणि लोडेड कार्यकर्त्यांनी हे लक्षातच घेतलं नाही की, समाजात असंख्य लोक बेढब आहेत. देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्यावर ‘बच गया साला’ अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या, हे निरोगी समाजाचं लक्षण कसं समजता येईल? ज्याची पत्नी प्रचंड कुरूपपणे ट्रोल झाली, असे देवेंद्र फडणवीस एकमेव मुख्यमंत्री आहेत. आपण बहुसंख्य अर्धवट किंवा चूक माहितीवर आधारित आणि जहाल व विवेकशून्य प्रतिक्रियावादी (Mis or half informed rabid reactionary) समाजात राहतो,  असा समज त्यामुळे कुणाचा झाला तर त्यात गैर काहीच नाही. मात्र त्या टीकेकडे लक्ष न देता कार्यरत राहिलेल्या फडणवीस यांच्या ‘अधिक’मध्ये त्यांच्यातला हा समंजसपणा म्हणा की उमदेपणा म्हणा, महत्त्वाचा आहे.  

मराठा आरक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफी, मराठा तरुणाना रोजगारासाठी आर्थिक मदत, समृद्धी महामार्ग, सर्व लाभार्थीना पैसे थेट खात्यात, २४ तास वीज पुरवठा, जलयुक्त शिवार, नियुक्त्यांसाठी महापोर्टल, पत्रकार सन्मान योजना, एसटी महामंडळात महिलांना चालक म्हणून संधी, खाजगी शिक्षण संस्था चालकांच्या त्यांच्या सरकारने आवळलेल्या मुसक्या, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोफत पास, मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड औद्योगिक विकासासाठी प्रयत्न, विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याला जास्त निधी, नागपूरवर तर मेहेरनजर अशी असंख्य चांगली कामं फडणवीस सरकारच्या नावावर आहेत. त्यात त्रुटी नक्कीच काढता येतील, पण अशी अनेक लोकहिताची कामं फडणवीस सरकारच्या नावे आहेत. कर्जमाफीसाठी लाभार्थी शेतकरी निवडताना या सरकारने निश्चित केलेले निकष निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत. त्यामुळे धनदांडगे माफीपासून दूर राहिले. महापोर्टलमुळे निवड प्रक्रियेत होणारे घोटाळे बंद होणार आहेत. असो. सत्तेत पाच वर्ष पूर्ण राहिलेल्या कोणत्याही सरकारने केलेल्या कामाची यादी नेहमीच लांब असते.

तरीही या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावी झालेली नाही हेही तितकंच खरं, पण याची कारणंही समजून घेणं आवश्यक आहे. सरकारच्या आणि प्रशासनाच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट निर्णयाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते, हे खरं असलं तरी लोक सरसकट सरकार आणि प्रशासन एकाच मापाने मोजतात म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की, सरकारनं निर्णय घ्यायचे आणि प्रशासनानं अंमलबजावणी करायचे असते. नेमका घोळ  इथेच झाला. सुरुवातीला प्रशासनानं सहकार्य केलं नाही. नंतर मुख्यमंत्री कार्यालयात उभारल्या गेलेली समांतर यंत्रणा ‘चहापेक्षा किटली गरम’ ठरली. ही गरम किटली आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा (की परस्परांवर कुरघोडी करण्याचा?) होता. स्वत: फडणवीस स्वच्छ राहिले, पण या गरम किटल्यांतून उडालेले शिंतोडे आणि काही सहकारी व अधिकाऱ्यांच्या संशयास्पद वर्तनाचे डाग फडणवीस यांच्या प्रतिमेवर पडलेच. त्यासाठी जणू ‘क्लीन चीट’ची टाकसाळच फडणवीस यांनी सुरू केलेली होती. फडणवीस यांचा कारभार एकचालकानुवर्ती आहे, असा समज त्यातून जो साधार पसरत गेला.

सरकारच्या अनेक चांगल्या योजना आल्या, पण शेवटच्या स्तरावरील सामान्य लोकांपर्यंत लाभ पोहोचण्यास उशीर तरी झाला किंवा ते लाभ पोहोचलेच नाही . या संदर्भात फडणवीस कायमच अंधारात राहिले. Too good is too bad also हे ते विसरले. योजनांच्या अंमलबजावणीचे जे कागदी घोडे प्रशासनाने नाचवले गेले त्यावर फडणवीस विसंबून राहिले. अनेक प्रामाणिक व कार्यक्षम अधिकाऱ्याची योग्य जागी नियुक्त करणंही फडणवीस यांना जमलं नाही. प्रवीण परदेशी, अजोय मेहेता, राधेश्याम मोपलवार, यशस्वी यादव, सतीश माथुर, संजीव जैस्वाल, ब्रजेश सिंग यांच्यासारख्या अनेक अधिकाऱ्यांना ‘अभय’ देण्यानंही प्रशासनात वाईट तर ज्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली. त्यांना मोकळं सोडल्यानं जनतेत विपरीत संदेश गेला. सरकारच्या ‘स्टार्ट अप’ या योजनेची वाट लावण्यात असे कांही अधिकारीच जबाबदार आहेत. या योजनेत म्हणूनच १०० पैकी ८२ उद्यमी परराज्यातले समाविष्ट झाले. फडणवीस यांनी जाहीर करून आणि त्याबाबत विधानपरिषदेत आश्वासन देऊनही नागपूरच्या महिला पत्रकार सुनीता झाडे यांना आर्थिक सहाय्य मिळालं नाही. त्याला कारण ही बथ्थड नोकरशाही आणि या गरम किटल्याच आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बसून कारभार चालवण्यावर भर न दिल्यानं प्रशासनात शिस्त आलीच नाही. सांगली, कोल्हापूरच्या भीषण पुराच्या काळात फडणवीस निवडणूकपूर्व प्रचार यात्रेत रमले, ही तर फार मोठी घोडचूक होती. या पुरापासूनच फडणवीस यांच्या लोकप्रियतेला ओहोटी झपाट्यानं लागण्यास प्रारंभ झाला.     

मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राजकीय पातळीवरही फडणवीस राज्यातले यशस्वी नेते म्हणून पुढे आले. (पक्षातल्या काहींना फडणवीस यांनी डावललं यात आश्चर्य आणि गैरही काहीच नाही; फडणवीस यांच्याऐवजी पंकजा मुंडे, खडसे, तावडे मुख्यमंत्री असते तरी त्यांनीही कुणाला न कुणाला असंच डावललं असतं. त्यालाच राजकारण म्हणतात!) या काळात राज्यातल्या सर्व निवडणुकात पक्ष विस्तार करण्यात फडणवीस यांनी एकहाती यश मिळवलं. उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्री राखूनही शिवसेनेची कोंडी करण्याची कोणीही संधी त्यांनी सोडली नाही आणि महाराष्ट्र भाजपचा एकमेव चेहरा म्हणून ते पुढे आले. पण त्याच वेळी  सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती नकारात्मक होत गेली. ‘मी म्हणजे महाराष्ट्र’ आणि ‘मी म्हणतो तीच पूर्व दिशा’ असा (अहं)भाव त्यांच्या वृत्ती व देहबोलीत हळूहळू आला. त्यातच अन्य पक्षांतून आवक वाढली. फडणवीस यांनी त्याला उत्तेजन दिलं आणि ‘केडर’ नाराज होतं गेलं. (यातील दस्तुरखुद्द नागपुरातील अनेकांनी नंतर भाजपला मतदान करणं टाळलं. त्यातील अनेकांची नावं मला माहिती आहेत.)

शरद पवार म्हणजे महाराष्ट्र हे रुढ झालेलं राजकीय समीकरणही देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढल्यासारखं चित्र निर्माण झालं आणि त्यांच्या भाषेत ‘आम्ही’ ऐवजी ‘मी’ असा दर्प आला. पण त्यांना शरद पवार यांचा नेमका अंदाज आला नाही आणि अलीकडच्या दीड-दोन महिन्यांतल्या शरद पवार यांच्या खेळींनी फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीतून विरोधी पक्ष नेत्याच्या जागेवर नेऊन बसवलं! विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही शिवसेना आणि भाजपत (उद्धव आणि अमित शहा यांच्यात) बंद दाराआड ‘काय ठरलं’ होतं, हे सांगण्याचं धारिष्ट्य फडणवीस यांनी का दाखवलं नाही, हे एक कोडंच आहे. 

मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस ‘नॉट रिचेबल’ झाले हाही एक आक्षेप अगदी नागपूर ते मुंबई असा केला जातो आणि त्यात तथ्यही असलं (त्यात चहाच्या केटलींचा वाटा मोठा असला) तरी सत्तेत गेलेल्या कुणाचीही ती अपरिहार्य मजबुरीही असते हे विसरता कामा  नये. मुख्यमंत्रीच नव्हे तर राज्य मंत्रीपदाचीही व्यवधानं व्यापक असतात. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळणं आणि सुरक्षा हे फार मोठे अडथळे असतात. कुणाला आणि त्यातही कोणत्याही राजकीय विचाराच्या ज्येष्ठांना टाळणं किंवा ताटकळवत ठेवणं, हा फडणवीस यांचा  स्वभाव नाही, हे मी स्वानुभावानं सांगतो. ते आधी आमदार होते, त्या काळात फोन केला तर आमची भिन्न राजकीय विचारसरणी आड न आणता आणि वडिलकीचा मान राखून ते कमी-अधिक उशीरा का असेना नागपूरच्या आमच्या कार्यालयात किंवा माझ्या घरी येत असत. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांचे व्याप वाढले; ते कसे वाढतात हे ठाऊक असल्यानं मी त्यांना एसएमएस टाकून ठेवत असे आणि वेळ मिळताच त्यांचा फोन येत असे.

माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या कन्येच्या विवाहाचा अपवाद वगळता मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीस यांच्याशी एकही निवांत भेट नाही; झाली ती भेटही तशी ओझरतीच होती. त्यावेळीही मला पाहताच ते पटकन माझ्याकडे चालत आले. मी आता पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात नाही किंवा वृत्तवाहिन्यांवरही जात नाही, तरी ‘मुख्यमंत्री’ देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माझा कोणताही एसएमएस अनुत्तरीत राहिला नाही किंवा प्रतिसाद म्हणून त्यांचा फोन आला नाही असं घडलं नाही.

आज प्रथमच वाच्यता करतो, (प्रशासनानं दीर्घ वेळ लावला तरी) ‘ग्रंथाली’च्या मुंबईतील जागेचं आणि पत्रमहर्षी अनंतराव भालेराव स्मृती ग्रंथासाठी सरकारकडून अनुदान देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून केवळ एका एसएमएसवर केलेलं आहे. असं सांस्कृतिक भान जपणारे शरद पवार, विलासराव देशमुख आणि सुधाकरराव नाईक यांच्यानंतरचे फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचा हा अनुभव आहे.

फडणवीस जर पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर आज भाजपत दिसणारी कथित नाराजी म्हणा की बंडाळी झाली नसती उलट त्यांची स्तुती करण्याची अहमहमिका बघायला मिळाली असती. एका मोठ्या भूकंपानंतर अनेक लहान धक्के बसतात तसं हे काहीसं मुख्यमंत्रीपद हातून गेल्यावर फडणवीस यांना अनुभवायला मिळत आहे. त्या धक्क्यांच्या गर्दीत सहभागी न होता मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून त्यांच्यावर पूर्ण अयशस्वी असा ठप्पा मारताच येणार नाही. तो त्यांच्यावर अन्याय ठरेल. अन्य सर्व मुख्यमंत्र्याप्रमाणे फडणवीस यांच्यातही काही ‘अधिक’ आणि काही ‘उणे’ आहे. शिवाय राजकारणात कोणतीच परिस्थिती कायम नसते हे लक्षात घेता, उद्या काहीही घडू शकतं. फडणवीस यांच्यासाठी ही घडी, झालेल्या चुकांबाबत आत्मपरीक्षण करण्याची आणि त्यातून धडा घेण्याची आहे!  

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Vividh Vachak

Tue , 10 December 2019

संदेश भगत, आपली प्रतिक्रिया वाचली. आपण निष्कारण फडणवीसांच्या जातीवर घसरलात आणि आपली संकुचित वृत्ती दाखवून दिलीत. एकदा जातीच्या चष्म्यातून कुणाचे -- आणि तेही तथाकथित वरच्या जातींचे -- मोजमाप करायचे ठरवले की मग कसल्याही सडक्या विचारांचे उदात्तीकरण करता येते आणि सौजन्याची किमान पातळीसुद्धा ठेवण्याची जबाबदारी झटकता येते. पुन्हा त्यावर बोट ठेवले की जातीवादाचा आरोप करता येतो. पण ह्या comfort zone मधून जरा बाहेर पडून, वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करावा, ही सूचना. बर्दापूरकरांनी फडणवीसांच्या कामगिरीबद्दल टीकात्मक कित्येक लेख लिहिले आहेत (आणि ते ह्याच पोर्टलवर). असो. लेखाबद्दल बोलायचे झाले तर आपले कित्येक टीकात्मक लेख यापूर्वी वाचले आहेत म्हणून हा लेख वाचून जरासा धक्का बसला. परंतु कुणाच्याही कारभारातल्या त्रुटी दाखवणे ही पत्रकारितेची एक रीत आहे त्यामुळे आता जरा लक्षात येते आहे की ते लेख कुठल्या हेतूने लिहिले असावेत. माझे स्वतःचे (लांबून) केलेले निरीक्षण असे की, ओल्या दुष्काळाचे अरिष्टच इतके गहन होते की त्यातून अल्पकाळात महाराष्ट्राला सावरता येणे कठीणच होते, आणि त्यामुळे कुठलेही सरकार असते तर त्याच्या विरोधात लोकमत निर्माण झाले असते. पण ह्याचा अंदाज घेऊन फडणवीस यांनी शेतकरी प्रश्नात स्वतः लक्ष आणि प्रचाराची जबाबदारी इतर लोकांकडे सोपवायला पाहिजे होती असे वाटते. पण तरीही, defeat builds humility. फडणवीसांकडे आणखी खूप मोठी कारकीर्द शिल्लक आहे, आणि ह्या पराभवातूनही त्यांना महत्त्वाचा धडा मिळाला आहे, ह्या अनुभवाचा त्यांना फायदाच होईल.


Praveen Mehetre

Sun , 08 December 2019

धक्का मलाही बसला! मग अनपेक्षित धक्का दादा सोबत असल्याने बसला! पण प्रतिमेला तडा दिवंगत मुंढेच्या च्या वेळी परत या !परत या! या आळवणी वेळीच गेला! सर्व संस्था चे सुमारीकरण होत असताना ,कोणाकडून , किती आणि का अपेक्षा ठेवायच्या? आपले नियमित वाचन करतो! शुभेच्छा-सदिच्छा!


Sandesh Bhagat

Sun , 08 December 2019

महापोर्टल ला स्थगिती द्यायचा निर्णय महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांच्या मनातला निर्णय आहे. पूर्ण रद्दच करावी ही व्यवस्था. आणि आर आर पाटील यांच्या काळात ७८ हजार तरुणांची जशी पोलिस भरती झाली होती तशीच सर्व खात्यांत भरती व्हावी. हा खरा पारदर्शक कारभार. महापोर्टल हे फडणवीस च्या कुण्या नातेवाईकांचे आहे म्हणतात . आणखी मुख्यमंत्री मेडम न पण बराच घोटाळा केला . axis bank सारखा . फडणवीस रात्री उशिरा पर्यंत कूणाकूणा सोबत बैठका घ्यायचे ते पण बाहेर येऊ द्या .


Sandesh Bhagat

Sat , 07 December 2019

आपण जे काही लिहील त्यात तुमच फडणवीस पंता बद्दलचे प्रेमच दिसून येत आहे . जलयुक्त शिवार हे भ्रष्टाचाराचे कुराण आहे . कर्जमाफी फक्त नावा पुर्तीच . 24 तास वीज मिळण्याचे कारण विजेची मागणी कमी असणे कारण उद्योगाचे वाज्लेला बँड . पोर्टल म्हणजे धडधडित भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच् नुकसान . तुम्ही फडणवीस साहेबांची इतर cm सोबत केलेली तुलना पण चुकीची आहे . यात मिरच्या झौम्बण्याच काही कारण नाही पण...... असो आपले लोकसत्ता मधले लेखन पण ब्राम्हण च्या बाजूचे रहायचे .


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......