दिवाळी २०१९ : ‘विज्ञानकथा’ या लेबलखाली येणाऱ्या कथा खरोखरच ‘विज्ञानकथा’ म्हणाव्यात का?
पडघम - सांस्कृतिक
मेघश्री दळवी, स्मिता पोतनीस
  • धनंजय, नवल, अनुभव, हंस, कथाश्री, माऊस, मराठी विज्ञान परिषद पत्रिका, पासवर्ड आणि किशोर या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे
  • Fri , 06 December 2019
  • पडघम सांस्कृतिक दिवाळी अंक धनंजय Dhananjay नवल Naval अनुभव Anubhav हंस Hans कथाश्री Kathashree माऊस Mouse मराठी विज्ञान परिषद पत्रिका पासवर्ड Password किशोर Kishor

नेमेचि येतो पावसाळा तसंच दर दिवाळीला दिवाळी अंकांचा पाऊस पडतो. काही दिवाळी अंक विशिष्ट विषयाला वाहिलेले असतात, तर काही अंक विविध प्रकारच्या लेखनाला स्थान देतात. एकूणच दिवाळी अंकांमधले विषय आणि लेखनप्रकार यामध्ये मराठीमधल्या साहित्याचं आणि विचारप्रवाहाचं प्रतिबिंब पडलेलं जाणवतं. मराठी वाचकांच्या आवडीचा अंदाज त्यावरून लावता येतो, आणि सोबत काही ट्रेंड्सचा शोध घेता येतो. 

विज्ञानाबद्दल जशी लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालीय, तशीच विज्ञानकथेचीही रसिक वाचकसंख्या वाढतेय, असं दिसून येतंय. गेल्या काही वर्षांमध्ये दिवाळी अंकांतल्या विज्ञानकथांच्या संख्येत लक्षणीय भर पडत चाललेली आहे. या वर्षी ३५हून अधिक विज्ञानकथा वेगवेगळ्या दिवाळी अंकांमधून प्रकाशित झालेल्या आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाशी आपली सतत होत जाणारी जवळीक आणि विविध माध्यमांमधून या कथाप्रकाराची वाढती ओळख, यामुळे बहुधा अनेक नवे लेखक विज्ञानकथा लिहून पाहत आहेत. विभिन्न क्षेत्रांमध्ये काम करणारे लेखक असल्याने विषय आणि हाताळणी यात खूप वेगळेपणा जाणवतो आहे. रोबॉट्स, टाइम ट्रॅव्हल हे ठराविक विषय तुरळक दिसतात. दूरच्या ग्रहांऐवजी होऊ घातलेल्या चंद्र किंवा मंगळ मोहिमांचा विचार आहे. एक पात्र वैज्ञानिक माहिती देत आहे, अशी ठोकळेबाज रचना काही ठिकाणी अजूनही आहे, पण बहुतांशी लेखन हे सहज, सोपं, संवादात्मक आहे.

‘नवल’ आणि ‘धनंजय’ या अंकांमध्ये विज्ञानकथा हमखास वाचायला मिळतात, या अंकांची ती परंपरा आहे. यावर्षी ‘नवल’मध्ये यशवंत रांजणकर यांची ‘ब्रह्मास्त्र’ ही दीर्घ विज्ञान-संदेह कथा आहे. संदेह फारसा नाही, मात्र विज्ञानाचा योग्य वापर, अनपेक्षित शेवट आणि लेखनात बारकावे चांगले पकडले असल्याने कथा लेखकाच्या लौकिकाला साजेशी झाली आहे. याच अंकात ‘इतिहास-पुरुष’ ही श्रीनिवास शारंगपाणी यांची विज्ञानकथा आहे. एक एकांडा शास्त्रज्ञ - त्याने लावलेला शोध - ही माहिती निवेदकाकडे येण्याचं कारण - शोधाचा गैरवापर होण्याची शक्यता, असा कथेचा सुपरिचित आलेख आहे. ‘इकडे-तिकडे’ ही मेघश्री दळवी यांची कथा उच्च मितींचा विचार करते.

‘धनंजय’मध्ये विज्ञानकथा वेगवेगळी रूपं घेऊन अवतरल्या आहेत. कधी त्या क्षणकथा म्हणजे इवल्याश्या फ्लॅश कथा आहेत. तर कधी गूढकथा किंवा रहस्यकथा आहेत. ‘नंदादेवी’ ही प्रसन्न करंदीकर यांची दीर्घ राजनीतीक कथा इतिहास, भूगोल, राजकारण, समाजकारण, रहस्य, सगळं गुंफून केलेली अतिशय सुरेख अशी विज्ञानकथा. पूर्णपणे थरारक आणि मेंदूला खाद्य देणारी. आशिष महाबळ यांच्या ‘लक्ष्मीदासाची कथा’ या पर्यावरण कथेत थ्री-डी प्रिंटिंगचा आगळा विचार केला आहे. संजय काळे यांची ‘कृष्णविवर’ या छान वाचनीय कथेची संकल्पनाही कृष्णविवर हीच आहे. परंतु ती गूढकथा म्हणून आलेली आहे. त्यातील विज्ञान संकल्पना योग्य रीतीने न आल्याने कदाचित तिला गूढकथा म्हटले गेलेले आहे. 

स्वरा मोकाशी यांच्या ‘रियालिटी गेम’ या कथेत गेमिंग आणि मुलं त्यात अडकून गेल्याने त्यामुळे आलेल्या समस्या यावर भाष्य आहे. ही स्थिती तशी वर्तमानातली आहे. त्यामुळे या कथेत भविष्याचं प्रक्षेपण तेवढंसं दिसत नाही. डॉ. द. व्यं. जहागीरदार यांच्या ‘परतीचे दोर’ या कथेत मंगळावर गेलेली राधा तिथून परत येण्यास नकार देते. परतीचे दोर ही संकल्पना इथे अतिशय अचूक प्रकारे वापरलेली आहे. सविता श्रीनिवास यांची ‘लॅन्टेरीनाचे गुपित’ ही अ. पां. देशपांडे यांनी अनुवादित केलेली विज्ञान संशोधनाची कथा तार्किक बाबतीत पटली नाही, तरी तरल भाषेसाठी लक्षात राहते. इतर भारतीय भाषेतील कथा वाचायला मिळाल्याने वाचक आणि लेखक, दोघांचंही क्षितिज विस्तारायला मदत होऊ शकते, हे विशेष. मेघश्री दळवी यांच्या चार विज्ञान क्षणकथा ‘धनंजय’मध्ये आहेत. हा नवा फॉर्म अनेक मराठी लेखक हाताळून पाहत आहेत हे खास नोंद घेण्यासारखं.

विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपल्या रोजच्या जीवनातले अविभाज्य भाग आहेत. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान कथांचं वाढतं प्रमाण निश्चितच स्वागतार्ह आहे. शिरीष नाडकर्णी यांच्या ‘नवल’मधल्या  ‘कुरघोडी’ या कथेत तंत्रज्ञान आज, आत्ता काय किमया करू शकतं हे सुरेख आलं आहे. सोबत मॅरथॉनचा माहोल अगदी तपशीलवार असल्याने कथेत रंगत येते. धनंजयमधील डॉ. बाळ फोंडके यांची ‘टिक टिक वाजते डोक्यात’, तसेच मुकुंद नवरे यांची ‘गाडीशी गट्टी चालकाला सुट्टी’, शिरीष नाडकर्णी यांची ‘चोराच्या उलट्या बोंबा’ याही आजच्या तंत्रज्ञानावर आधारित विज्ञानकथा आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने विविध डिव्हाईस जोडले गेल्यास खुनी हजर नसतानाही एखादा खून घडवून आणता येऊ शकतो. अमृतराव आणि डॉ. कौशिक या मालिकेतली बाळ फोंडके यांची ‘टिक टिक वाजते डोक्यात’ ही कथा ही शक्यता उत्तम प्रकारे खुलवून मांडते. मुकुंद नवरे यांची ‘गाडीशी गट्टी चालकाला सुट्टी’ ही कथा तंत्रज्ञानातील प्रगती साधणार्‍या ड्रायव्हरलेस कार्स हा विषय हाताळते. अशा गाड्या उपलब्ध झाल्यावर राजकारणी आणि बिझनेसमन यांनी त्यांचा केलेला विपरीत वापर कथेत खुबीने येतो. वास्तव विरोधाभास दाखवणारी ही कथा अगदी रोचक आहे, मात्र शीर्षक तितकंसं समर्पक वाटत नाही. शिरीष नाडकर्णी यांची ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ही कथादेखील आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करते. वेगळ्या पार्श्वभूमीमुळे ती चांगली लक्षात राहते. एकंदरीत रहस्य उलगडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अनेक कथांमध्ये आढळतो हे खास. काही वेळा या कथांमध्ये तांत्रिक माहिती जास्त वाटते, पण कथांचा एकूण परिणाम चांगला होत असेल तर हा असमतोल तितका जाणवत नाही.

विज्ञानकथा सहसा भविष्याचा वेध घेताना दिसतात. माणसाच्या मेंदूत चिप घालून भविष्यात  माणसाच्या आयुष्याशी कसा खेळ होऊ शकतो हे सांगणारी स्मिता पोतनीस यांची ‘बंधन’ ही रहस्यविज्ञानकथा अनेक पैलूंनी सजलेली आहे. बारीकसारीक तपशीलातून कथा जिवंतपणे उभी राहते. मेघश्री दळवी यांची ‘सेटी’ ही क्षणकथा या प्रकल्पाच्या भविष्याविषयी एक शक्यता दाखवते, तर त्यांचीच ‘तो दिवस’ ही क्षणकथा आणखी एका अनोख्या शक्यतेचा वेध घेते. कृत्रिम बुद्धिमत्ता पुढे कुठवर जाईल हा विज्ञानकथा लेखकांचा आवडता विषय, तो त्यांनी ‘अल्फाझेन’ या क्षणकथेत मांडला आहे. तर निरंजन दिवाळी अंकामधली स्मिता पोतनीस यांची ‘बोलीबोल’ ही कथा चॅटबॉटस कुठवर मजल मारू शकतात याचा धक्कादायक वेध घेते.

विज्ञानात प्रगती होत जाईल, नवनव्या मोहीमा उभ्या राहत जातील, तसतसे माणसांच्या आयुष्यात अभूतपूर्व असे प्रश्न उभे राहणार आहेत. ‘लोकमत’ दिवाळी अंकाच्या नागपूर आवृत्तीतली निरंजन घाटे यांची ‘कोलॅटरल डॅमेज’ ही कथा अशाच एका समस्येला हात घालते. समाजाची स्त्रीविषयक मानसिकता बदलणार की नाही असा प्रश्न पडतो. त्यांचीच ‘नरश्रेष्ठ’ ही आणखी एक कथा ‘दक्षता’ या दिवाळी अंकात आहे. रे रसेलच्या मूळ इंग्लिश कथेचा हा अनुवाद उत्तम जमला आहे. टप्प्याटप्प्यावर ट्विस्ट्स देणारी ही कथा रंजक तर आहेच, शिवाय आपल्या भविष्यातल्या एका विचित्र परिस्थितीचं चित्र उभं करते. 

उलट काही कथा आजच्या काळात घडताना दिसतात. ‘अनुभव’ दिवाळी अंकात मेघश्री दळवी यांची ‘पराडकरांची गोष्ट’ आजची आहे, आणि या कथेत आपल्या अस्तित्वावरच प्रश्न आहे. ‘हंस’ दिवाळी अंकात आशिष महाबळ यांची ‘कारटीची कथा’देखील आजचं विज्ञान मांडते, पौराणिक रूपकं वापरून वैज्ञानिक माहिती समजावून देते.

‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’च्या अंकात यावेळी वेगवेगळ्या विषयांवरच्या विज्ञानकथा आहेत. परिषदेच्या विज्ञानरंजन कथा स्पर्धा विजेत्या श्रीकांत कुमावत यांच्या ‘चक्रव्यूह’ कथेत विज्ञान अगदी सहजी येतं आणि कथा रंजक होते. वैशाली फाटक-काटकर यांच्या ‘अदृष्ट अनुबंधम’ कथेत दोन विचारांची जुगलबंदी चांगली आली आहे, मात्र कथेत नाट्य उभं राहत नाही. ज्ञानेश्वर गटकर यांची ‘जेलीफिश’ ही कथा विज्ञानाच्या पातळीवर कमी पडते, त्यातले वैज्ञानिक प्रयोग विश्वासार्ह वाटत नाहीत, पण लेखन आश्वासक आहे. स्मिता पोतनीस यांच्या ‘चौकोनी तिढा’ या नॅनो टेक्नॉलॉजीवरील कथेत विज्ञानाने माणसाच्या प्रेमभावनेत केलेली विचित्र ढवळाढवळ बुचकळ्यात टाकणारी आहे.

राजश्री बर्वे यांची ‘कथाश्री’मधील ‘हेस्टर टू गोवा’, शरद पुराणिक यांची ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’तील ‘माचीवरला गण्या’ आणि ‘झपूर्झा’मधील निलेश मालवणकर यांची ‘परग्रह’, या तिन्ही कथांमध्ये एलियन्स आहेत. मात्र या विषयाला न्याय देईल अशी वैज्ञानिक बैठक अनेक जागी योग्य प्रकारे यायला हवी होती.

या वर्षीच्या विज्ञानकथांमध्ये विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे खास मुलांकरता लिहिलेल्या विज्ञानकथा. ‘किशोर’ दिवाळी अंकात डॉ. जयंत नारळीकर यांची ‘टाइम मशीनची किमया’ आणि डॉ बाळ फोंडके यांची ‘रंगांधळा’ अशी दुहेरी मेजवानी आहे. डॉ. नारळीकरांची कालप्रवासावरची कथा काहीशी साचेबद्ध असली, तरी तिच्यातली इतिहासाची झलक रोमांचक आहे. डॉ. फोंडके यांनी आपल्या कथेत टोपीचे रंग ओळखण्याचं सुप्रसिद्ध गणिती कोडं आणि रंगांधळेपणा याची सांगड घातलेली दिसते. कुमारवयीन वाचकांसाठी डोकेबाजपणा आणि युक्ती यांची महती वेगळी सांगायला नको. त्यात विज्ञान सहजपणे गुंफल्याने ‘रंगांधळा’ ही कथा अत्यंत वाचनीय झाली आहे.

डॉ. फोंडके यांचीच ‘काट्याने काढला काटा’ ही विज्ञानकथा ‘वयम’ दिवाळी अंकात आहे. आवाज प्रदूषण या महत्त्वाच्या विषयाला ही कथा हात घालते आणि अनोखा उपाय सुचवते. चांद्रमोहिमा आणि चंद्रावर वसती करून राहण्याच्या कल्पना अलीकडे अनेकदा बातम्यांमध्ये दिसतात. त्यावर आधारित मेघश्री दळवी यांची ‘पिअरी स्टार’ ही कथा ‘पासवर्ड’ दिवाळी अंकात आहे. ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’च्या अंकात सुनील सुळे यांची ‘हॅपी बर्थडे सूझी’ ही वेगळ्या विषयावरची कथा अतिशय खुमासदार आहे. ‘माऊस’ या आणखी एका अंकात डॉ. अरुण मांडे यांची ‘खरंच, आईशप्पथ!’ ही कथा विशेष उल्लेख करण्यासारखी आणि शेवट तर आगळाच. कुमारांकरता खास विज्ञानकथा या ट्रेंडचं स्वागत निश्चितच करायला हवं.

ठराविक अंकांपलिकडे विज्ञानकथांना स्थान मिळत आहे, मधूनमधून त्या आपलं लेबल टाळताना किंवा वेगळ्या लेबलखाली दिसत आहेत, नवे लेखक आणि नवे विषय पुढे येत आहेत, ही खरोखरीच आनंदाची बाब आहे. पण तरीही विज्ञानकथा या लेबलखाली येणाऱ्या कथा खरोखरच विज्ञानकथा म्हणाव्यात का, हाही एक संशोधनाचा विषय आहे.  

............................................................................................................................................................

लेखिका स्मिता पोतनीस विज्ञानकथालेखक व समीक्षक आहेत.

potnissmita7@gmail.com

............................................................................................................................................................

लेखिका मेघश्री दळवी विज्ञानकथालेखक व समीक्षक असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.

meghashri@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Meghashri Dalvi

Thu , 12 December 2019

धन्यवाद गामा जी. पुढील वेळी विस्तृत विवेचन नक्की करू. यावेळी कथांमधले विषय वैविध्य आणि ट्रेण्ड्स याकडे लक्ष दिले आहे.


Meghashri Dalvi

Thu , 12 December 2019

धन्यवाद निलेश मालवणकर आणि शिरीष नाडकर्णी!


Nilesh Malvankar

Thu , 12 December 2019

विज्ञानकथांचा छान आढावा घेतलाय. कुमार वाचकांसाठी लिहिल्या जाणाऱ्या कथांचा धांडोळा घेतलात हे विशेष उल्लेखनीय. --- निलेश मालवणकर


Gamma Pailvan

Tue , 10 December 2019

मेघश्री दळवी व स्मिता पोतनीस,

लेख म्हणजे विज्ञानकथांचा गोषवारा झाला आहे. विज्ञानकथेचे निकष काय, त्यांत कोणत्या कथा बसतात वा बसंत नाहीत, अशा स्वरूपाचं विवेचन अपेक्षित होतं. कथेतल्या विज्ञानाची साहित्याशी सांगड कसा सांधली आहे वगैरे पैलूंविषयी वाचायला आवडलं असतं.
काहीका असेना, विज्ञानकथांना सुगीचे दिवस येताहेत ही स्वागतार्ह बाब आहे.
आपला नम्र,
गामा पैलवान


SHIRISH NADKARNI

Fri , 06 December 2019

विज्ञान कथांचं सांगोपांग विश्लेषण फारच प्रभावी केलंय. एवढ्या कथांचं वाचन करून प्रत्येक कथेला न्याय देत त्यावर लिहिणं ह्या साठी फार चिकाटी लागते. तो सारा खटाटोप नक्कीच प्रशंसनीय आहे . सर्व विज्ञानलेखकांच्या वतीने मेघश्री व स्मिताला धन्यवाद देतो. --- शिरीष नाडकर्णी


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......