मतचाचण्या अधिक विश्वासार्ह करण्याच्या गरजेचे आकलन वाढवण्यात प्रणय रॉय यांच्या निवडणूकविषयक कार्यक्रमांचा मोठा वाटा आहे!
ग्रंथनामा - झलक
सर डेव्हिड बटलर
  • ‘कौल लोकमताचा’चे मुखपृष्ठ
  • Fri , 06 December 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक कौल लोकमताचा Kaul Lokmatacha प्रणय रॉय Pranoy Roy दोराब सोपारीवाला Dorab Sopariwala एनडीटीव्ही NDTV

‘कौल लोकमताचा : भारतीय निवडणुकांची उकल’ हे प्रणव रॉय व दोराब आर. सोपारीवाला यांचे पुस्तक नुकतेच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. ‘The Verdict: Decoding India's Elections’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद पत्रकार सतीश कामत यांनी केला आहे. मूळ पुस्तकाला ब्रिटिश सामाजिकशास्त्रज्ञ आणि निवडणूकतज्ज्ञ सर डेव्हिड बटलर यांनी लिहिलेले हे प्रास्ताविक...

.............................................................................................................................................

ऑस्ट्रेलियाच्या वाटेवर असताना, १९६७ साली मी अल्प काळ भारतात थांबलो होतो. ते माझे भारताचे पहिले दर्शन. नुफिल्ड कॉलेजमधील एक अभ्यासक जगदीश भगवती यांनी दिल्लीच्या उपनगरात एका छोट्याशा अनौपचारिक स्नेहभोजनासाठी मला निमंत्रण दिले होते. काही मिनिटांतच मी आणि माझी पत्नी मेरिलिन यांचे एका बाबीवर एकमत झाले... आम्हाला सहभागी होण्याची संधी लाभलेले हे सर्वोत्तम बुद्धिवंतांचे संमेलन होते. याच भावनेचा पुनरुच्चार मी त्यापैकी एकाकडे केला, तेव्हा त्याची प्रतिक्रिया होती- “यात काहीच आश्चर्य नाही. देशातील सर्वांत हुशार अर्थतज्ज्ञांपैकी पाच जण येथे आहेत.’’

भारतीय राजकारणाशी माझे प्रेमप्रकरण त्यानंतर बऱ्याच वर्षांनी - म्हणजे १९८३ साली सुरू झाले. तरुण भारतीय अर्थतज्ज्ञ प्रणय रॉय यांचे एक पत्र मला आले. भारतीय निवडणुकीच्या अभ्यासाविषयी ते आणि त्यांचे सहकारी अशोक के. लाहिरी यांना माझा सल्ला हवा होता. तेव्हा ते दोघे ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये होते. राजकीय क्षेत्रात काय करता येईल, हे माझ्या ब्रिटनमधील कामाच्या अनुभवापासून त्यांना शिकायचे होते. मला आठवते, मी त्यांना दिल्ली विमानतळावर भेटलो होतो आणि आजच रात्री आपण हैदराबादला जात आहोत, असे त्यांनी मला सांगितले होते.

त्या वेळी राज्य विधानसभेची निवडणूक होती. देशात प्रथमच या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली जाणार होती. आम्ही या निवडणुकीचा अभ्यास करत होतो. निकाल हळूहळू जाहीर होत होते. पूर्ण निकाल जाहीर व्हायला दोन दिवस लागले. मात्र ब्रिटिश निवडणुकांच्या माझ्या अभ्यासाच्या आधारे, पहिल्या तीन निकालांनंतरच या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत होणार, असा अंदाज मी बांधला होता. सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या विरोधात मतांचा मोठा ‘हेलकावा’ (स्विंग) असल्याचे पहिल्या तीन मतदारसंघांतील निकालावरून स्पष्ट होत होते. ‘एकदिशीय हेलकाव्या’चे तत्त्व (प्रिन्सिपल ऑफ युनिफॉर्म स्विंग) भारतातही लागू पडू शकते, असा विचार माझ्या मनात येऊन गेला. स्थानिक निवडणूक अभ्यासकांनी मात्र याची नोंद घेतलेली मला दिसली नाही. माझे अंदाज खरे ठरले. अनेक चाचण्यांचे अंदाज खोटे पाडत, काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. निवडणुकीपूर्वीच्या काळात मी अनेक राजकीय नेत्यांना भेटलो होतो, पण कोणालाच हा निकाल शक्य वाटला नव्हता.

१९८४ साली होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निरीक्षण करण्यासाठी भारतात पुन्हा येण्याचे वचन या रोमहर्षक अनुभवानंतर मी प्रणय आणि अशोक यांना देऊन टाकले. ही निवडणूक झाली त्या वर्षांत देश तीन धक्कादायक अनुभवांतून गेला होता- सुवर्णमंदिरातील खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधातील लष्करी कारवाई, भोपाळमधील विषारी वायू दुर्घटना आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या. जगभर हेडलाइन्स ठरलेल्या तीन सुन्न करणाऱ्या घटना एकामागून एक घडलेले हे अपवादात्मक वर्ष.

तोवर मी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांतील निवडणुकांचा अभ्यास केला होता. मात्र भारत अनेक दृष्टीने वेगळा होता. मुख्यतः त्यातील लोकसंख्येची व्याप्ती आणि भाषिक, वांशिक, तसेच धार्मिक गटांतील वैविध्य यामुळे. तरीही ब्रिटनमधील माझा अनुभव काही वेळा येथेही ज्या प्रमाणात प्रस्तुत ठरत होता, ते खरोखरीच लक्षणीय होते. उदाहरणार्थ, राष्ट्रीय स्तरावरील तसेच स्थानिक स्तरावरील भावनेच्या प्रभावाखाली प्रत्येक वेळी देशाचा कल कसे हेलकावे घेतो, याचा अनुभव येथेही काही प्रमाणात लागू होत होता.

१९८४तील निवडणूक स्पर्धेविषयी एका पुस्तकाचा प्रकल्प हाती घेण्याची कल्पना आणि त्यामागील प्रेरणा प्रणय रॉय यांची. ‘इंडिया डिसाइड्स’ असे नामकरण झालेल्या या प्रकल्पाचे स्वरूप १९८५पर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकांच्या निकालांची एकत्रित आकडेवारी आणि त्यावरील आमची तळटीप असे होते. आम्हीच ते प्रसिद्ध केले होते. पुढे ‘इंडिया टुडे’च्या सहकार्याने औपचारिकपणे पुस्तकरूपात ते प्रसिद्ध झाले.

त्या वेळी भारतीय लोकशाही तारुण्यावस्थेत होती. ती अस्तित्वात येऊन जेमतेम तीन दशके झाली होती. त्या वेळी देशात कार्यरत असे निवडणूक विश्लेषण शास्त्रज्ञ (सेफॉलॉजिस्ट) नव्हते. देशातील निवडणुकांचे निकाल एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, असा प्रयत्न कोणी केला नव्हता. किंबहुना निवडणुका म्हणजे तोवर बव्हंशी नेहरू-गांधी कुटुंबीयांच्या एकतर्फी विजयमालिका असल्यामुळे, ‘निवडणूक विश्लेषण शास्त्र’ ही संकल्पनाच देशात फारशी परिचित नव्हती. प्रारंभीचे पर्व हे ‘विद्यमान सत्ताधाऱ्यांप्रती ठाम विश्वासा’चे होते, नंतरच्या काळात ‘सत्ताधाऱ्यांप्रती रोषा’च्या उद्रेकाकडे लोकभावनेचा लंबक झुकला आणि पुन्हा मागे फिरला. प्रणय यांच्याकडे बुद्धिचातुर्य होते आणि माझ्या सूचनांच्या स्वीकाराविषयीचा खुलेपणाही. टेलिव्हिजनचे ते प्रारंभीचे दिवस होते. सर्वसामान्य लोकांपर्यंत सुगम भाषेत आणि तक्ते-चौकटींच्या स्वरूपात जटील माहिती पोचवण्यासाठी लागणारी तंत्रज्ञानस्नेही दृष्टीही त्यांच्याकडे होती. काँग्रेसच्या प्रगतीचा आलेख उंचावतच जाणार, असे मानण्याच्या त्या काळात, निवडणूक आकलनाच्या रूढ मापदंडांना प्रश्न विचारण्यास प्रणय नेहमीच उत्सुक असत.

निवडणूक विश्लेषण शास्त्राच्या अंगाने सांगायचे, तर ‘एकदिशीय हेलकावा’ ही ब्रिटनमध्ये लागू होणारी संकल्पना- एका छोट्या विभागातील मतांच्या हेलकाव्याची पुनरावृत्ती देशभर होण्याकडे असलेला कल- भारतात किती प्रमाणात लागू होते, हे दाखवून देण्यास पुस्तकाने साहाय्य केले. आकडेवारीतून हे समोर आले की, मतांच्या हेलकाव्यातील समानता ही सामान्यतः राज्यवार लागू होते, देशाच्या स्तरावर नाही. उदाहरणार्थ, उत्तर आणि दक्षिण भारतातील कल परस्परविरोधी असू शकतात.

हा घटक महत्त्वाचा होता, कारण त्या काळात भारतीय निवडणुकांतील मतचाचण्या बव्हंशी अविश्वासार्ह होत्या, अर्थात दोराब सोपारीवाला यांचे पाऊल या क्षेत्रात पडेपर्यंत! मतचाचण्या अधिक विश्वासार्ह करण्याच्या गरजेचे आकलन वाढवण्यात प्रणय यांच्या निवडणूकविषयक कार्यक्रमांचा मोठा वाटा आहे, असे  म्हणणे ही अतिशयोक्ती ठरणार नाही.

आमच्या पुस्तकाच्या अनेक सुधारित आवृत्त्या आम्ही काढल्या. भारतातील टेलिव्हिजनवरील पहिला स्वतंत्र निवडणूकविषयक कार्यक्रम प्रसारित करण्यास मी त्यांना साहाय्य केले होते. स्थानिक स्तरावरील छोटे निकाल, हे देशव्यापी पटाचा भाग म्हणून कसे समजून घ्यायचे, हे लोकांपर्यंत पोचवण्यास मी त्यांना मदत करत असे. जटील अशा सांख्यिकी जंजाळातून लोकांना पचवता येईल, असे निष्कर्ष कसे काढायचे, याविषयी ब्रिटिश निवडणुकांवर भाष्य करताना जमा केलेल्या अनुभवाचा फायदा त्यांना करून देणे, हेही माझे एक काम होते.

जेव्हा जेव्हा मी दिल्लीला भेट दिली, तेव्हा ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ हे माझे वास्तव्यस्थान होते. पुस्तकातील सुधारणा, आगामी निवडणूक अभ्यासविषयक कार्यक्रम यांच्या आखणीच्या निमित्ताने आमच्या चमूमध्ये बैठकांची सत्रे होत. प्रणयबरोबर एकामागून एक लोकसभा निवडणुकांत काम करणे हा आगळावेगळा आनंद होता आणि परस्परांना शिकण्या-शिकवण्याची संधी. अर्थात माझ्यासाठी शिकण्यासारखे अधिक होते.

प्रारंभीच्या काळातील या भेटींनी पुसता न येण्यासारखा प्रभाव टाकला होता. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा दिल्लीला येऊ लागलो, निवडणूक मोहिमांतील चैतन्य आणि प्रणय, राधिका, तसेच एनडीटीव्हीतील उगवता चमू यांचा उत्साह अनुभवू लागलो. भारतातील टीव्ही पाहणाऱ्या जनतेची निवडणूकविषयक समजूत खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. भारतीय राजकारण काँग्रेस वर्चस्वाचे पर्व मागे टाकून खूप पुढे गेले आहे. समाजमाध्यमांचे राजकारण, स्त्री-मतदारांचा वाढता प्रभाव, नव्याने उदयाला आलेले लोकानुयायी नेते, असे अनेक नवनवे प्रवाह राजकारणात दाखल झाले आहेत. निवडणुकीचा हा आधुनिक व्यापक पट उलगडून दाखवण्याचा प्रणय रॉय व दोराब सोपारीवाला यांचा अत्यंत समयोचित असा प्रयत्न म्हणजे ‘कौल लोकमताचा’. अर्थात, १९८० आणि १९९०च्या दशकांत आम्ही जे रचनाबंध नोंदवले आणि स्पष्ट केले होते, ते आजही अप्रस्तुत झालेले नाहीत, असा माझा विश्वास आहे.

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील निवडणुकांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. या अनुभवासाठी मी प्रणय यांचा ऋणी आहे.

.............................................................................................................................................

‘कौल लोकमताचा : भारतीय निवडणुकांची उकल’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5150/Kaul-Lokmatacha

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......