आम्हा सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. संकल्प केला पाहिजे की, या घृणास्पद राजकारणाला बदलण्यासाठी आम्ही पुढे येणार आहोत!
पडघम - देशकारण
स्वामी अग्निवेश
  • सर्वोच्च न्यायालय, बाबरी मशीद आणि राममंदिराचे संकल्पित चित्र
  • Thu , 05 December 2019
  • पडघम देशकारण अयोध्या Ayodhya राममंदिर Ram Mandir राम जन्मभूमी Ram Janmabhoomi बाबरी मशीद Babri Masjid भाजप BJP

सर्वोच्च न्यायालयाने भीकेचा एक तुकडा देऊन मुसलमानांना सांगितलं की, बघा आम्ही तुमची जमीन त्यांना दिली. का दिली? निकालात न्यायालय म्हणते की, १९४९ मध्ये तिथं मूर्ती ठेवणं चुकीचं होतं. निकालपत्रात ही बाब ठळकपणे नोंदवलेली आहे. न्यायालय असंही म्हणतं की, १९९२मध्ये मस्जिद उद्ध्वस्त केली गेली, ते बेकायदेशीर व चुकीचं होतं. ही दोन बेकायदेशीर कामं करणं हे गुन्हेगारी कलम आहे. गुन्हेगारांना शिक्षा करणं न्यायालयाचं काम होतं की गुन्हेगारी काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन जमीन देणं हे त्यांचं काम होतं? मी न्याय व्यवस्थेला प्रश्न विचारतो की, हा निकालपत्रातला विरोधाभास नाही का?

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात परस्परविरोधी निरीक्षणं नोंदवलेली आहेत. मी सांगत नाही की, न्यायालयाचा निकाल मान्य करावा की नाही. जर निकाल मान्य करण्याची लाचारी असेल, तर तो मान्यच करावा लागेल. पण तो मान्य करण्यास भाग पाडलं जात असेल, तर तशा पद्धतीनं मान्य करवून घेणं योग्य होणार नाही. जर एका घटकाला लहान समजून निकाल दिला जात असेल, तर ते योग्य नाही. प्रत्येकाला समानतेनं न्याय मिळाला पाहिजे.

हे प्रकरण शहाबानो प्रकरणानंतर जास्त चिघळलं. धार्मिक संघटनांच्या दबावाखाली पंतप्रधान राजीव गांधींनी संसदेत शहाबानोची पोटगी रद्द करणारा कायदा केला. केंद्र सरकारनं धर्माच्या नावानं राजकारण करणाऱ्यांपुढे गुडघे टेकले. या घटनेनं दुसरा समूह दुखावला गेला. त्या वेळी राजीव गांधींनी त्यांना विचारलं, ‘तुम्हाला काय हवंय?’ त्यांनी सांगितलं, ‘आम्हाला राम मंदिर हवंय!’ राजीव गांधी म्हणाले, ‘कुठे हवं?’ तर ते म्हणाले, ‘अयोध्येमध्ये हवं आहे.’ राजीव गांधी म्हणाले, ‘मी देतो’.

राजीव गांधींनी आपल्या एका मंत्र्यांना फैजाबादला पाठवून दिलं. त्यांना ते म्हणाले, ‘जा न्यायालयात आणि एक अर्ज द्या.’ सकाळी १० वाजता अर्ज दिला जातो. संध्याकाळी चार वाजता त्यावर निकाल दिला जातो. लागलीच सात वाजता बाबरी मस्जिदचे दरवाजे उघडले जातात. मूर्तींचा पूजापाठ सुरू केला जातो. ही दृश्यं टीव्हीवर थेट प्रक्षेपित केली जातात.

एका दिवसात निर्णय दिला गेला, जो इतकी वर्षं लटकलेला होता. त्यानंतर सरकारकडून पुन्हा गृहमंत्री बुटासिंह यांना पाठवलं जातं. त्यांच्या हस्ते राम मंदिराची पायाभरणी केली जाते. मंदिराचं काम सुरू झाल्यानं हिंदू खुश होतील, असं काँग्रेस सरकारला वाटलं. त्यांनी हे काय नाटक लावलं होतं?

पंतप्रधानांना हेच काम उरलं होतं का? पंतप्रधानांनी बेरोजगारी दूर केली पाहिजे. सर्वांना समान शिक्षण दिलं पाहिजे. प्रत्येकाला सुदृढ आरोग्य दिलं पाहिजे. प्रत्येक आजारी माणसाला औषधोपचाराची व्यवस्था केली पाहिजे. सरकारला मंदिर आणि मस्जिदच्या प्रकरणात रस घ्यायची काही गरज नव्हती.

सर्वांची मतं गोळा करणं हे यामागचं धोरण होतं. आपली व्होट बँक मजबूत करण्याचं सूत्र सरकारनं वापरलं. बुटासिंह यांनी पायाभरणी करताच मंदिराची रूपरेषा जाहीर करण्यात आली. नंतरच्या काळात आलेले पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल कमिशन लागू केलं. देशातील इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची तरतूद या आयोगामध्ये करण्यात आली होती. सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या जनसंघाचे लालकृष्ण अडवाणी यांनी विचार केला की, सर्व मागास जमाती हिंदू आहेत. या सर्व हिंदूंना पं. सिंग यांचं सरकार आपल्याकडे घेऊन जाईल. तर मग माझ्याकडे काय राहील? असं झालं तर मग मी कुठल्या पक्षाचा नेता बनू?

मग अडवाणींनी घोषणा केली की, ‘व्ही. पी. सिंग तुमच्याकडे मंडल आहे, तर माझ्याकडे कमंडल आहे.’ अडवाणी म्हणाले, ‘बघा तुम्ही, मी तुमच्याकडील हिंदूंना माझ्याकडे कसं खेचून घेतो ते!’ अडवाणींनी सोमनाथपासून रथयात्रेला सुरुवात केली. त्यांच्या रथयात्रेनं सरकार हललं. त्याच वेळी पंतप्रधान व्ही. पी. सरकारनं मला चर्चेसाठी आमंत्रित केलं. त्या वेळी मी मंडल कमिशनचं समर्थन करत होतो. मी त्यांच्या पक्षात नव्हतो. पण मागास जाती समुदायांना सामाजिक न्याय मिळतो आहे, ही बाब माझ्यासाठी आनंददायी होती. त्यामुळे मी मंडल आयोगाचं समर्थन केलं होतं. त्या वेळी पंतप्रधान सिंग यांनी मला विचारलं, ‘‘स्वामीजी, मंदिर, मस्जिद प्रकरणावर काहीतरी तोडगा काढा. त्या वेळी मी व माझे मित्र सय्यद शहाबुद्दीन चंद्रशेखर यांच्या पक्षात होतो. तेव्हा मी शहाबुद्दीन यांना विचारलं, तसंच सुन्नी बोर्डाचे जफरयाब जिलानी यांच्याशीदेखील चर्चा केली. त्यांना विचारलं की,  या मुद्द्यावर काय तोडगा निघू शकतो?

त्या दोघांनी मला एक मजबूत तोडगा दिला. ते म्हणाले की, ‘मस्जिदची जी २.७ एकर जागा आहे, ती सोडून संपूर्ण ६७-७० एकर जागा रिकामी पडलेली आहे. ती जमीन त्यांना देऊन टाकावी.’

अडवाणींची रथयात्रा दिल्लीला आली. त्याआधी रथयात्रा पाटणा शहरात शिरण्यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी अडवाणींना अटक केली. त्यापूर्वीची एक घटना मी इथं नोंदवतो. आम्ही व्ही. पी. सिंग यांची भेट घेतली. मी त्यांना म्हणालो, ‘हे काय सुरू आहे?’ त्यावर ते म्हणाले, ‘या मुद्द्याचं काय समाधान होऊ शकतं?’ त्या वेळी सर्वांनी चर्चा केली. एक नकाशा अडवाणींसमोर ठेवून सांगितलं, ‘अशा प्रकारे भव्य मंदिर उभं राहू शकतं. हवी तेवढी जागा घ्यावी. मात्र त्या पावणेतीन एकरावर दावा सोडावा लागेल. जेवढी हवी तेवढी ३०-३५ एकर किंवा ४०-५० एकर जागा राममंदिरासाठी घ्या.’

त्या वेळी अडवाणी हसून आम्हाला म्हणाले, ‘मला बावळट समजता का? मी काय रामाचं अजून एक मंदिर निर्माण करायला निघालोय का? तुम्ही माझी घोषणा नीट ऐकलेली नाहीये.’ आम्ही त्यांना म्हणालो, ‘काय आहे तुमची घोषणा? अजून एकदा सांगा!’ त्या वेळी अडवाणी म्हणाले, ‘आम्ही म्हणतो की, सौगंध राम की खाते है, मंदिर वहीं बनायेंगे. ‘वहीं’चा अर्थ काय होतोय माहितीये का?’ आम्ही म्हटलं, ‘वहीं’चा अर्थ अयोध्या. त्यावेळी ते म्हणाले, ‘बिलकुल नहीं. ‘वहीं’चा अर्थ आहे मस्जिदमध्ये! जिथं इमाम नमाजचं नेतृत्व करतो, जिथं तो प्रवचन देतो ती चार बाय चार फूटाची जागा आहे, तिथंच भगवान रामाचा जन्म झाला होता.’

त्या वेळी आम्ही त्यांना आदरानं विचारलं, ‘महाराज, १५२८मध्ये मीर बाकी जो बाबरचा सरदार होता, त्याच्याबद्दल सांगितलं जातं की, त्यानं रामाचं मंदिर तोडून बाबरीचं निर्माण केलं. १५२८मध्ये अडवाणी ना तुम्ही होता, ना आम्ही होतो, ना अन्य कोणी होतं. परंतु जगातला रामाचा सर्वांत मोठा भक्त तुलसीदास होते. ते शरयू नदीच्या काठावर बसून ‘रामचरितमानस’ आणि ‘दोहावली विनयपत्रिका’ लिहीत होते. त्याच्या एका दोह्यातही किंवा एकाही कडव्यात मला दाखवावं की, ज्यात तुलसीदासनं लिहिलेलं आहे की, माझं भव्य आराध्य दैवत रामाचं मंदिर तोडून मस्जिद बनवली आहे. त्याबद्दल कुठेच एकही शब्द लिहिलेला नव्हता. तुलसीदास यांना जे दिसलं नाही,  ते अडवाणींना कसं दिसलं?’’

मी तुम्हाला खरंच सांगतो की, आपण चांगल्या रीतीनं, सुखासमाधानानं राहू शकतो. आपल्यामध्ये प्रेम, भाईचारा निर्माण होऊ शकतो. परंतु राजकारण्यांना हे मंजूर नसतं. त्यांना राजकारण करायचं असतं. त्यांना मंदिर आणि बाबरी मस्जिद यांचं राजकारण करायचं आहे. हिंदू-मुस्लीम, शेंडी-दाढी हे राजकारण त्यांना करायचं आहे. यातच त्यांना मतं मिळतात, पैसे मिळतात, सर्व काही यातच मिळतं.

माझा प्रश्न असा आहे की, तुलसीदास यांना रामाचं मंदिर दिसलं नाही. गुरुगोविंदसिंग पटना शहरात जन्मले. ते याच रस्त्यानं पंजाबला गेले. त्यांचं कितीतरी साहित्य उपलब्ध आहे. त्यात एक शब्द तरी मला दाखवा. त्यांनी कुठेही लिहिलेलं नाही की, रामाचं मंदिर तोडून मस्जिद बांधली गेली. छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर मुगल शासक औरंगजेबविरोधात लढत राहिले. त्यांनीही कुठेही उल्लेख केलेला नाही की, रामाचं मंदिर तोडून मस्जिदची उभारणी केली आहे. स्वामी दयानंद सरस्वती फैजाबादमध्ये उभं राहून सांगतात, ईसाई-मुस्लीम यांच्याशी ते शास्त्रार्थ करत होते. परंतु त्यांनीही त्यांच्या ‘सत्यार्थ प्रकाश’, ‘ऋग्वेदादिभाष्यभूमिका’ इत्यादी ग्रंथांतही त्याबद्दल उल्लेख केलेला नाही. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये जाऊन सुंदर भाषण दिलं. त्यांनी जगात साऱ्या हिंदू समाजाला गौरवान्वित केलं. विवेकानंदाच्या एकूण २०० पुस्तकांमध्ये एक ओळ नाही, ज्यात रामाचं मंदिर तोडून मस्जिद बांधली गेली, असा उल्लेख केला आहे.

महात्मा गांधींच्या मृत्युसमयी त्यांच्या ओठावर ‘हे राम’ हे शब्द होते. या संदर्भात गांधींनी कुठेही लिहिलेलं नाही, कुठेही सांगितलं नाही की, रामाचं मंदिर तोडून मस्जिद बांधण्यात आली. कुणालाही दिसलं नाही; पण ज्यांना राजकारण करायचं असतं, त्यांना चोहीकडे काहीही दिसतं.

अशा घृणास्पद आणि सांप्रदायिक राजकारणापासून आपल्याला सजग होण्याची गरज आहे. हे लोक आपल्याला आपसात लढवून सत्तेत येऊ पाहत आहेत. सर्वांनी एकत्र येऊन त्यांचं हे राजकारण बंद केलं पाहिजे. नाही तर हे आपल्यामध्ये भांडणं लावून समाजात तंटे घडवून आणून आपली खुर्ची पक्की करतील. तुम्हाला आणि आम्हाला सावधान राहण्याची गरज आहे. आपण सर्वांनी त्यांना दाखवून दिलं पाहिजे की, आम्ही आता तुमच्या चलाखीला बळी पडणार नाही. ते आपल्यामध्ये युद्ध घडवू पाहत आहेत, ते आपल्याला आतून तोडू पाहत आहेत, ते आपलं विभाजन घडवू पाहत आहेत, त्यांना भगवान रामाशी कुठलंही देणं-घेणं नाही.

मी एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एका भव्य रॅलीमध्ये विचारलं होतं की, ‘‘योगी जी, तुम्ही तर योगी आहात आणि मुख्यमंत्रीही आहात. तुम्ही सांगत आहात की, रामाचं भव्य मंदिर बांधायचं आहे. मंदिर बांधण्यापूर्वी संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये ‘रम’ (मद्य)ची जी मंदिरं खुली आहेत, ती आधी बंद करा. तुमच्या राज्यात दारूची दुकानं तर धडाधड सुरू केली जात आहेत आणि तुम्ही म्हणता आहात की राममंदिर बांधायचं! कसं बांधणार रामाचं मंदिर?”

त्यामुळे या सर्व घटना आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून प्रामाणिकपणे यावर विचार केला पाहिजे. पुढे जाण्यासाठी आम्हांला आता शपथ घ्यावी लागेल की,

‘‘हो सके तो अब कोई शम्मा जलाइये.

इस दौरे सियासत का अंधेरा मिटाये.

बस कीजिए आकाश में नारे उथालना

यह जंग है, इस जंग में ताकत लगाईये.”

आम्हा सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. सर्व तरुण आणि युवक-युवतींनी संघटित होऊन असा संकल्प केला पाहिजे की, या घृणास्पद राजकारणाला बदलण्यासाठी आम्ही पुढे येणार आहोत.

.............................................................................................................................................

हा लेख स्वामी अग्विवेश यांनी १८ एप्रिल २०१८ रोजी बिहारच्या गयामध्ये आणि १० नोव्हेंबर २०१९ रोजी मुंबईच्या खिलाफत हाऊसमध्ये दिलेल्या दोन भाषणांवरून तयार केलेला आहे.

व्हिडिओ पहा - 

.............................................................................................................................................

लेखक स्वामी अग्निवेश हे आर्यसमाजी, सामाजिक कार्यकर्ते असून माजी खासदार आहेत.

.............................................................................................................................................

अनुवादक कलीम अजीम ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

kalimazim2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......