अजूनकाही
मागच्या आठवड्यात अवेळी, अकल्पित झालेला देवेंद्र फडणीस-अजित पवार यांचा शपथविधी हा भारतीय संविधानातील मूल्यांविरोधी आहे, असं सामान्य माणसालाही वाटू लागलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानं लोकतांत्रिक मूल्यांची बूज राखली. झाला प्रकार म्हणजे विधिमंडळ लोकशाहीचा पराभव होता, तर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानं झालेली उलथापालथ आणि त्यातून शपथविधीचं राजीनाम्यात झालेलं रूपांतरण हा इथल्या लोकशाहीचा विजय होता. झाला प्रकार महाराष्ट्राच्या संसदीय लोकशाहीच्या परंपरेला साजेसा नक्कीच नव्हता. कर्नाटकनंतर महाराष्ट्राचं हसू झालं!
सक्काळी सक्कीळी झालेला एकांतातला शपथविधी आणि सायंकाळी झालेला ‘महाराष्ट्र विकास आघाडी’चा अनेकांतातला शपथविधी, ही दोन दृश्यं लोकशाही मूल्यांचं राज्यातल्या वर्तमान स्थितीचं यथार्थ दर्शन घडवतात. एवढ्या सकाळी झालेला शपथविधी म्हणजे पळून गेलेल्या जोडप्यानं कुणाला काही कळायच्या आत गुपचूप एकमेकाला हार घालून कागदावरचे सोपस्कार उरकणं, या प्रकारात मोडणारा होता; तर आघाडीचा शपथविधी म्हणजे पै-पाहुणे आणि आप्त स्वकीयांच्या उपस्थितीतला विवाहसोहळा. एकांतापेक्षा अनेकांत झालेल्या शपथेला समाजमनाचा सर्वसमावेशक जनाधार लाभला.
याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आठवड्याच्या आतच या दोन्ही शपथविधीचे साक्षीदार होण्याचा आणि मुख्यमंत्र्यांना लोकशाही मूल्ये जपण्याची शपथ देण्याचा घटनात्मक अधिकार बजावणारे राज्यपाल एकच आहेत.
हा महाराष्ट्र आहे.... देशाला संविधान देणारा आणि त्याची बूज राखणारा.... हे मराठी अंतरंग असलेल्या, सह्याद्री-सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आणि कृष्णा, गोदावरी, तापी, वैनगंगेचं पाणी प्यायलेल्या अठरापगड मराठी जणांचा. इथं एकांतात झालेलं लोकांना खपलं नाही आणि रूचलंही नाही. म्हणून प्रात:काळी शपथ देण्या-घेण्याची झालेली घाई अखिल महाराष्ट्राला आणि देशभरातील लोकांना रुचली नाही.
सरदारकी राखण्यासाठी दिल्लीच्या पातशाहीच्या संगतीनं मराठी सोबतच फंदफितुरी करणारे मराठी मुलखात झालेले आहेत. पण महाराष्ट्राचा मूळ पिंड कधीही दिल्लीच्या तख्तासमोर झुकलेला नाही. याचा इतिहास औरंगजेबाच्या दरबारापासून महाराष्ट्राला ज्ञात आहे. पण मागील पाच वर्षांत मराठी पिंड सोडून राज्य दिल्लीच्या मागावर आणि वळणावर खूप चाललं, असंच मत सर्वसामान्य आणि राजकारणाच्या परिघाबाहेरच्या मराठी लोकांना वाटत होतं. लोक तसे खाजगीत बोलूही लागले होते. महाराष्ट्रात चाललेल्या या प्रकाराचं भान लोकांना झाल्यानं मराठी लोकांनीही सर्वांसाठी टांगता कौल दिला. ‘आम्हाला गृहीत धरू नका’ असंच जणू ठणकावून सांगितलं. कोल्हापुरातला विधानसभा निकाल याचं बोलकं उदाहरण आहे. आयाराम आणि गयाराम यांना मतपेटीतून ठणकावलं गेलं.
आता स्थापन झालेलं ‘महाराष्ट्र विकास आघाडी’चं सरकार राज्याचं सर्वसमावेशक सरकार असल्याचं दिसत आहे. जनादेशानं घोडेबाजार नियंत्रित केला. निवडणूकपूर्व मेगाभरती मनसबदार लोकांची होती. लोकशाहीत राजेशाहीतली सरदारकी नको म्हणत भल्याभल्यांना जनता जनार्दनानं लोकशक्तीद्वारे पाणी पाजलं, हे आगळंवेगळं वैशिष्ट्य या निवडणुकीचं राहिलं.
शरद पवारांसारखा जाणता राजकारणी महाराष्ट्र सावरायला मैदानात उतरला आणि सत्तेचं राजकारण त्यांनी जिकूंन दाखवलं. जनू सकल मराठी जनांचा कोंढाणा सर करण्यासाठी वयाच्या ऐंशीजवळ पोचलेला शेलारमामा दमदारपणे सरसावला. सर्वसमावेशक मराठी राजकारणासाठी लोकोत्तर भूमिका या वाढत्या वयात शरद पवारांनी करावी, कारण महाराष्ट्राची सखोल जाण असणारा समजणारा त्यांच्या एवढा बुजुर्ग आणि जाणता नेता महाराष्ट्रात सध्या तरी दुसरा कोणी नाही.
या निवडणुकीचे आणि सत्ता स्थापनेचे पडसाद देशभर दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत, हे सांगायला नको. गोवा आणि गुजरातमधून येत असलेल्या राजकीय हादऱ्याच्या बातम्या त्याचीच परिणती आहे, असं मानायला वाव आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही याचे पदसाद उमटू लागले आहेत.
शिवसेनेच्या हिंदुत्वासोबत जुळवून घेतल्याची आणि दोन्ही काँग्रेससोबत घरोबा केल्याची टीका होत आहे. असं असलं तरी यातला मोठा प्रेरणा घटक मराठी आहे, हे सोयीस्करपणे विसरलं जात आहे. भाजपचा देशपातळीवर जन्म व्हायचा होता, त्या वेळी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला महाराष्ट्रातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रोखठोक समर्थन दिलं होतं, हा इतिहास ज्वलंत आहे, हे विसरता येत नाही.
सेनेचं हिंदुत्व हे शिवरायांच्या स्मरणानं उच्चारलं जाणारं हिंदवी स्वराज्याचं हिंदुत्व आहे. त्याला मराठी मातीचा गंध आहे. जन्मभूमी, कर्मभूमी आणि पुण्यभूमी एकसमान अशा राष्ट्रवादाचा त्याला आधार नाही. त्याचा प्रमुख आधार मराठी अस्मिता आहे. प्रबोधनकार त्याच्या मुळाशी आहेत. सेनेचा भगवा स्वराज्याचा भगवा आहे.
सेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व मूलत: वेगळं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. सेनेचं हिंदुत्व शिवरायांच्या मराठी प्रतीकातून स्फुरणारं आहे, तर भाजपचं हिंदुत्व ‘बंच ऑफ थॉट’मधून स्फुरणारं आहे. सेनेचं हिंदुत्व राज्याच्या पश्चिमेकडील प्रगत सर्वसमावेशक मुंबई नगरातून विकास पावलेलं आहे, तर भाजपचं हिंदुत्व राज्याच्या पूर्वेकडील मध्य भारताच्या नागपुराहून हिंदी पट्ट्याच्या प्रेरणेतून विकास पावलेलं आहे. घाटावरचं पुणे आणि मैदानातलं नागपूर यापेक्षा मुंबईची सामाजिक-सांस्कृतिक वीण वेगळी आहे. मुंबईत मराठी प्रेरणा आहे.
नव्या आघाडीतील तिन्ही पक्षांनी सर्वसमावेशक भूमिका घेऊन कालसापेक्ष बदल घडवून ‘मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ अशा अपेक्षा मराठी लोकांच्या आहेत. किमान समान कार्यक्रम आणि शेतकरी, सर्वांमध्ये समान दुवा सांधणारा निर्माण होऊ शकतो. शेतकरी हा अस्स्ल मराठी दुवा सर्वांमध्ये राहण्यासारखा आहे.
शाहू-फुले-आंबेडकर आणि प्रबोधनकार यांच्या विचारांची कास धरली तर सबंध महाराष्ट्राची ऊर्जा या सरकारला मिळवता येईल. ‘तीन तिघाडा’ नाही तर ‘त्रिवेणी संगम’ होऊ शकतो. त्यासाठी सत्तेचे शिलेदार किती समर्थ ठरतात आणि या महापुरुषांच्या विचारांचं शिवधनुष्य महाआघाडीला किती प्रमाणात पेलवतंय, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment