अजूनकाही
औरंगाबाद येथे २२, २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात जागतिक बौद्ध धम्म परिषद झाली. या परिषदेला केवळ औरंगाबाद शहरातील, जिल्ह्याच्या परिसरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातूनही हजारो लोक मोठ्या आस्थेने उपस्थित होते. ही परिषद आयोजित करण्यामध्ये आताचे उद्योग सचिव हर्षदीप कांबळे, त्यांच्या पत्नी रोचना व्ह्यानीच, (थायलंड) कॅन्सर हॉस्पिटलचे कार्यासन अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांसारख्या उच्च नोकरशहांनी पुढाकार घेतला होता. या परिषदेला जगातील १३ बौद्धधर्मीय देशांतून बौद्ध भिक्खू आले होते. त्यात ब्रह्मदेश, श्रीलंका, थायलंड, तिबेट, नेपाळ, कंबोडिया, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, बांगलादेश, इत्यादी देशांतील बौद्ध भिक्खूचा समावेश होता.
या सर्वांत महत्त्वाचे स्थान होते, ते म्हणजे भारतात आश्रयाला असलेले तिबेटचे चौदावे दलाई लामा यांना. तेच या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आकर्षण होते. त्यांनी २२ तारखेला औरंगाबादला आगमन करून २३ तारखेला सकाळी औरंगाबाद शेजारील चौका येथील लोकुत्तरा विहाराला भेट देऊन संध्याकाळी ते परिषदेला उपस्थित राहिले.
दोन्ही ठिकाणी त्यांनी धम्म उपदेश केला. औरंगाबादला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनाही संबोधित केले. त्याचप्रमाणे भारतासह विविध देशांतून आलेल्या बौद्ध भिक्खूंनीही या परिषदेतील उपस्थितांना धम्माविषयीचे मार्गदर्शन केले. या सर्व उपदेशांचा मध्य बिंदू म्हणजे ‘भारताने जगाला बौद्ध धम्माची फार मोठी देणगी दिली आहे. भगवान बुद्धाने शांती व करुणेचा संदेश जगाला दिला आहे. सर्वांनी बौद्ध धम्माप्रमाणे आचरण केल्यास जीवनात सुख व शांती मिळू शकते,’ याप्रमाणे होता. थोडक्यात महाराष्ट्रातील बौद्धधर्मीय विचारवंत सतत मांडत असतात, त्याप्रमाणे ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ या उपदेशाला धरूनच मार्गदर्शन झाले. त्यात वावगे असे काहीच नाही.
पण ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या नागसेन वनातील मिलिंद परिसरात झालेल्या या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला आलेल्या विविध देशांतील बौद्ध धर्माचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात सांगितलेल्या बौद्ध धम्माचा कितपत संबंध आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या ग्रंथावर त्याच वेळेस विविध देशांतील बौद्ध भिक्खूंनी ‘हा भगवान बुद्धाचा धर्म नसून डॉक्टर आंबेडकरांचा धम्म आहे,’ अशी टीका केली होती. त्याचा उल्लेख या ग्रंथाच्या प्रस्तावनेतच आहे. कारण डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या ग्रंथात दिलेला बौद्ध धम्म हा पूर्णपणे विज्ञानावर आधारलेला असून पुनर्जन्माला व कर्मकांडाला त्यात स्पष्ट विरोध करण्यात आला आहे.
पुनर्जन्माची संकल्पना ही हिंदू धर्माच्या ‘कर्म सिद्धान्ता’तावर आधारलेली आहे आणि त्याला डॉ. आंबेडकरांचा विरोध होता. ‘जो जसे कर्म करेल, तसेच त्याला त्याचे फळ मिळेल’ ही ती मूळ संकल्पना आहे. याचा हिंदू धर्मातील शोषक असलेल्या ब्राह्मणादी वर्ग, वर्णाला शूद्रांचे, दलित, शोषित-पीडितांचे शोषण करण्याला मदत झाली. आपण पूर्वीच्या जन्मात पाप केले असेल म्हणून या जन्मात आपण त्याचे वाईट फळे भोगत आहोत, हा विचार ब्राह्मणादी शोषक वर्गाने दलितांच्या माथी मारला होता. पुनर्जन्माची संकल्पना ही विज्ञानाच्या पातळीवरही टिकणारी नव्हती, तसेच वैचारिक पातळीवरही दलितांना हानिकारक होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वरील ग्रंथात व त्यांच्या संपूर्ण लिखाणात या कर्म सिद्धान्ताला विरोध केला आहे.
त्यामुळे साहजिकच अवतार या संकल्पनेलाही त्यांचा विरोध आहे. “यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत:। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥” म्हणजे जेव्हा जेव्हा धर्म संकटात येतो, तेव्हा तेव्हा ईश्वर त्याच्या रक्षणासाठी अवतार घेतो व धर्माचे रक्षण करतो, असा या ‘भगवद्गीते’तील या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकांनुसार भगवान बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, अशी मांडणी हिंदू धर्मीयांकडून सातत्याने केली जाते. या मांडणीला आंबेडकरवाद्यांकडून सातत्याने विरोधही केला जातो.
हिंदू धर्मीय व बौद्ध धम्मिय आंबेडकरवाद्यांत चालू असलेल्या या वैचारिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आकर्षण बिंदू असलेले दलाई लामा हे स्वत: एक पुनर्जन्मित लामा आहेत. अवताराची संकल्पनाही दलाई लामांना मान्य आहे.
त्यांच्या आधीच्या १३ लामांनी ज्याप्रमाणे पुनर्जन्म घेतला, त्याचप्रमाणे आताच्या चौदाव्या दलाई लामा यांनी सुद्धा पुनर्जन्मच घेतलेला आहे. हे त्यांनी स्वतः लिहिलेल्या आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की, ज्या दिवशी तेरावे दलाई लामा मृत्यू पावले, त्याच दिवशी तिबेटच्या सर्व भागात ज्या ज्या मुलांनी (मुलींनी नव्हे) जन्म घेतला असेल, त्याचा शोध नेमलेली एक समिती करत असते. अशा मुलांपैकी ज्या मुलांमध्ये दलाई लामाची लक्षणे दिसतील, उदाहरणार्थ त्यांच्यासारखा चेहरा, त्यांच्या अंगाखांद्यावर असलेले तीळ वा इतर ओळखी, तसाच रंग इत्यादी बाबी जुळून येतील अशा मुलाची निवड समिती ‘लामा’ म्हणून केली जाते. त्या मुलाला आपल्या ताब्यात घेऊन त्यांचे संगोपन, संपूर्ण शिक्षण, त्यांच्यावरील संस्कार, पुढील काळात ही समिती करते. स्वाभाविकपणेच त्या कुटुंबीयांनाही ही बाब गौरवाची वाटते. अधूनमधून कुटुंबियांच्या भेटीगाठीही होत असतात. अशा रीतीने दलाई लामा यांची निवड ही पुनर्जन्मावर आधारित आहे. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी पुनर्जन्माला केलेला विरोध आणि दलाई लामांचा पुनर्जन्म यांचा मेळ कसा बसेल? याचा विचार डॉ. आंबेडकरप्रणित बौद्ध धम्मीय अनुयायांनी करायला हवा.
त्याचप्रमाणे वर उल्लेख केलेल्या ज्या विविध देशांतून बौद्ध भिक्खू आले होते, त्या देशांतील बौद्ध धर्मसुद्धा त्या त्या देशातील रूढी, परंपरा व संस्कृतीनुसार वेगवेगळा आहे. त्यांच्यातील बरीचशी कर्मकांडेही वेगवेगळी आहेत. भगवान बुद्धाच्या मूर्तींची चेहरेपट्टीसुद्धा त्या त्या देशातील लोकांच्या चेहरेपट्टीशी मिळतीजुळती असते.
असे असणे साहजिक असले तरी तसा फरक असतो ही बाब ध्यानात घेतली पाहिजे. असे केले तरच अमेरिकन साम्राज्यवाद्यांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आत्मदहन करणाऱ्या व्हिएतनामी बौद्ध भिक्खू व म्यानमारमध्ये रोहिंग्या समुदायावर विस्थापनाची पाळी आणणारे तेथील बौद्ध धर्मीय शासक व बौद्ध भिक्खू यांच्या शांती संदेशात आपण फरक करू शकू.
तसेच या सर्व बौद्धधर्मीयात आणि डॉ. आंबेडकरांनी सांगितलेल्या बौद्ध धम्मात आपण योग्य तो फरक करू शकू. असा फरक समजून घेतल्यानंतरच आपण १९९२ साली बाबरी प्रकरणी आणि २००२ साली गोध्रा प्रकरणी देशभरात अशांती माजवणाऱ्याचे वैचारिक नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतांबरोबर, भारतात आश्रित असलेल्या शांतिदूत दलाई लामांचे संयुक्त फोटो कसे काय असू शकतात, तेही आपणाला नीटपणाने समजून घेणे सोपे जाईल.
.............................................................................................................................................
लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.
bhimraobansod@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 04 December 2019
कॉम्रेड भीमराव बनसोड,
तुमची दोन विधानं पटली नाहीत. १.
तुमचं म्हणणं खरं असेल तर कर्मसिद्धांताच्या नावाने बोंबाबोंब कशासाठी? करावे तसे भरावे असा अनुभव सर्वांना कधी ना कधी येतोच.
२.
हे तुम्हांस कोणी सांगितलं?डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी पुनर्जन्मावर संशोधन करून किमान ५० घटना नोंदवल्या आहेत. त्यांचं पुस्तक इथे आहे : https://www.amazon.co.uk/gp/product/B004EYSWWG पुनर्जन्मावर त्यांनी इतर बरीच पुस्तके लिहिली आहेत. तेव्हा पुनर्जन्म वैज्ञानिक अन्वेषण करण्यायोग्य संकल्पना निश्चितंच आहे.
आपला नम्र,
गामा पैलवान
Sandesh Bhagat
Wed , 04 December 2019
कॉम्रेड ला तसाही बुद्ध व आंबेडकर पूर्ण कळला असेल याबद्दल शंका आहे
Sandesh Bhagat
Wed , 04 December 2019
साहेब आपला बौद्ध धम्माबद्दल अभ्यास जरा कमी दिसतो . थोड धम्मा विषयी वाचन वाढवा तुम्हाला फार फरक नाही दिसणार . आणि दलाई लामा RSS च्या स्टेज वर जातात तर त्यात वाईट काय आहे .