अजूनकाही
हैद्राबादमधील डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची बातमी पुढे आली आणि सारा देश पुन्हा एकदा या प्रकरणामुळे हादरून गेला आहे! दिल्लीत घडलेल्या ‘निर्भया’ प्रकरणानंतर अनेक प्रकरणे या देशात वारंवार घडलेली आहेत. त्यामुळे अजूनही आपण कोणत्या समाजात राहत आहोत, हा प्रश्न चिंतातुर व अस्वस्थ करतो. आपल्या संस्कृतीचे वय वाढलेले असले तरी अजूनही आपल्या सभोवताल माणसाच्या रूपात असलेले अनेक लोक अत्यंत हिंस्त्र प्राणीपातळीवर वावरत आहेत, हेच अशा घटनांमधून सिद्ध होते!
हैद्राबादमध्ये घडलेल्या या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतल्यानंतर माणूस म्हणून आपण खूपच अस्वस्थ होतो. पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे.
या आरोपींनी पहिल्यांदा डॉक्टर महिलेला जाळ्यात ओढण्यासाठी तिची स्कूटी पंक्चर केली होती, असा खुलासा पोलीस तपासात पुढे आला आहे. या आरोपींनी महिला डॉक्टरला टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करताना पाहिले होते. त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने त्या स्कूटीची हवा काढून टाकली. ड्यूटी संपल्यानंतर ती महिला जेव्हा घरी जाण्यासाठी निघाली, तेव्हा स्कूटी पंक्चर झालेली तिला दिसली. रात्र झाल्यामुळे महिलेने तिच्या छोट्या बहिणीला फोन केला आणि गाडी खराब झाल्याची माहिती दिली. रस्ता सुनसान असल्यामुळे खूप भीती वाटत असल्याचेही तिने बहिणीला सांगितले. त्यामुळे छोट्या बहिणीने स्कूटी तिथेच ठेवून कॅबने घरी परत येण्याचा तिला सल्ला दिला.
फोनवरील हा संवाद ऐकून आरोपींपैकी दोघे त्या महिला डॉक्टरची मदत करण्यासाठी तिच्या जवळ पोहोचले. एक स्कूटी ठीक करण्याच्या बहाण्याने तिला लांब घेऊन गेला. तिथे आधीच इतर आरोपी दारू पीत बसलेले होते. त्या सर्वांनी बंधक करून तिला जबरदस्तीने दारू पाजली. नंतर एकाने तिचे तोंड आणि हातपाय पाय बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आणि या घृणीत कृत्यानंतर तिचे नाक व तोंड दाबून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
ही घटना बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३५ ते १० वाजताच्या दरम्यान घडली.
घटना घडल्यानंतर आरोपींनी मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि काही अंतर ते पुढे घेऊन गेले. रस्त्यात पेट्रोल पंपावरून त्यांनी पेट्रोल विकत घेतले. त्यानंतर फ्लायओव्हरच्या खाली अंधारात मृतदेह टाकून त्यावर पेट्रोल ओतून तो पेटवून दिला.
सदरहू महिला डॉक्टर हैदराबाद-बंगळुरू या महामार्गावर असलेल्या टोल प्लाझाजवळ शेवटची दिसली होती. तेथून तब्बल ३० किमी लांब असलेल्या ठिकाणी एका शेतकऱ्याला गुरुवारी सकाळी जळालेला अवस्थेत पुलाच्या खाली एक मृतदेह दिसला. त्यासंबंधीची माहिती त्याने पोलिसांना दिली. हरवलेल्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांना घटनास्थळी बोलावले. अर्धा जळालेला स्कार्फ आणि सोन्याच्या पेंडेंटवरून डॉक्टर महिलेची ओळख पटली.
जवळपासच्या लोकांनी बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकबद्दलही पोलिसांना सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता संबंधित ट्रक राजेंद्रनगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या मालकीचा असल्याचे पुढे आले. त्यानंतर सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरोपींना अटक केली गेली.
ही संपूर्ण घटना षडयंत्र रचून घडवण्यात आलेली असून यात चारही आरोपी सहभागी आहेत. त्यामुळे संपूर्ण चौकशी आणि पुरावांच्या आधारे न्यायालयाने या प्रकरणात आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हा एकूण घटनाक्रम लक्षात घेता आपल्या समाजात माणूस म्हणून वावरणाऱ्या लोकांच्या बाबतीत आपले मन साशंक होऊन जाते. सात वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. ही त्या घटनेची पुनरावृत्ती आहे! माणसातील हिंस्त्रतेची आणि क्रौर्याची परिसीमा गाठणारी ही घटना आहे.
माणूस मनुष्यकुळात जन्माला येतो म्हणून तो ‘माणूस’ ठरत नाही. तो प्राणीच असतो. मानवी कुळात जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून ‘घडत’ जाण्याची एक प्रक्रिया आहे. ती माणसाला ‘माणूस’ बनवते. त्यासाठी सांस्कृतिक मूल्यांचा फार महत्त्वाचा ‘रोल’ असतो. आपल्याकडे आपल्या धर्मव्यवस्थेने, समाजव्यवस्थेने आपले जे पुरुषसत्ताक वर्चस्वाचे मानस घडवलेले आहे, ते मानस ‘स्त्री’ला एक ‘माणूस’ म्हणून संबोधणारे नाही. ते मानस ‘स्त्री’ला एक ‘वस्तू’ मानणारे आहे. त्यामुळे तिला/स्त्रीला काही मन असते, भावभावना असतात, विचार असतो, संवेदना असतात. हे ते समजूनच घेत नाही. त्यातूनच स्त्रीसंबंधीच्या अंगाने पुरुषी मानसिकतेत एक हिंस्त्र जाणीव मूळ धरून असते. ही जाणीवच स्त्रीच्या संदर्भात लैंगिक पातळीवर पुरुषसत्ताक हिंस्त्रता आविष्कृत करणारी असते! अशा लोकांकडूनच या बलात्कारासारख्या घटना घडत असतात!
ज्यांच्या व्यक्तित्व घडणीत या जाणिवेचे माणूस बनण्याच्या प्रक्रियेतील योग्य सांस्कृतिकरण झालेले असते, तेथे अशा आविर्भावाच्या आविष्करणाचा भागच नसतो. म्हणूनच स्त्रीला आपल्या समाजव्यवस्थेत एक वस्तू वा उपभोग्य वस्तू मानणारी जी पुरुषसत्ताक मानसिकता आहे, त्या मानसिकतेला पोसणारी जी धर्मग्रंथे, जी शास्त्रे व ज्या सांस्कृतिक बाबी आहेत, त्यांच्यासंबंधीचा आणि त्यांच्या प्रभावाचा आपला भाव व आपला दृष्टिकोन आपण आधी बदलला पाहिजे! त्यासाठी फार मोठ्या प्रबोधनाची गरज आहे. त्याशिवाय अशा घटना रोखण्यासाठी अन्य दुसरा पर्याय नाही.
.............................................................................................................................................
या संदर्भातील अधिक वाचनासाठी पुढील दोन अभ्यासपूर्ण पुस्तके आवर्जून वाचावी अशी आहेत -
१) Against Our Will : Men, Women and Rape - Susan Brownmiller
२) A Natural History of Rape : Biological Bases of Sexual Coercion - Randy Thornhill, Craig T. Palmer
.............................................................................................................................................
लेखक अशोक नामदेव पळवेकर आंबेडकरी साहित्यिक व समीक्षक आहेत.
ashokpalwekar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment