‘प्रबोधनपुरुष न्या. महादेव गोविंद रानडे आणि ऋषितुल्य डॉ. रा. गो. भांडारकर : एक सम्यक आकलन’ हे रा. ना. चव्हाण लिखित पुस्तक ४ डिसेंबर रोजी पुणे प्रार्थना समाजाच्या १४९व्या वार्षिकोत्सवात प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाला पुणे विद्यापीठाचे इतिहास विभागाचे माजी प्रमुख प्रा. राजा दीक्षित यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
.............................................................................................................................................
‘प्रबोधनपुरुष न्या. महादेव गोविंद रानडे आणि ऋषितुल्य डॉ. रा. गो. भांडारकर : एक सम्यक आकलन’ या रा. ना. चव्हाण लिखित आणि रमेश चव्हाण संपादित पुस्तकाला प्रस्तावना लिहिणे ही माझ्यासाठी तिहेरी आनंदाची बाब आहे. रानडे-भांडारकर हे मला अत्यंत आदरणीय असणारे प्रबोधनपुरुष. त्यांच्याविषयीच्या पुस्तकात माझे चार शब्द समाविष्ट होणे, हे माझे भाग्यच म्हटले पाहिजे. पुस्तकाचे लेखक प. वा. रा. ना. चव्हाण हेसुद्धा माझे एक आदरस्थान आहे. त्यांचे चिरंजीव आणि पुस्तकाचे संपादक रमेश चव्हाण हे माझे ज्येष्ठ सन्मित्र आहेत. त्यामुळे ही प्रस्तावना लिहिताना आपण एका प्रशांत आणि पवित्र त्रिवेणीसंगमावर उभे असल्याची भावना माझ्या मनात आहे. त्यातून पुन्हा ज्याच्या स्थापनेच्या दीड शतकाचा टप्पा जवळ येऊन ठेपलेला आहे, अशा ‘पुणे प्रार्थना समाजा’तर्फे हे पुस्तक प्रकाशित होत असल्याने एका दुग्धशर्करायोगाचा प्रसाद हाती पडल्याची माझी भावना आहे.
रानडे-भांडारकर काय किंवा रा. ना. चव्हाण काय, या प्रत्येक व्यक्तीविषयी अत्यंत विस्तृत लेखन करणे शक्य आहे. पण शंभर-सव्वाशे पानांच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना त्या आकाराला अनुरूप लक्ष्मणरेषा आखली नाही, तर औचित्यभंगाचा दोष पदरी येईल. म्हणून शक्य तेवढे सूत्ररूपाने लिहिण्याचे योजलेले आहे. प्रस्तावनेसाठी माझ्यापुढे विचारार्थ असलेल्या लेखनाचा आकार पाहता मी ‘पुस्तक’ असा त्याचा उल्लेख करत आहे; पण खरे तर हे पुस्तक ग्रंथगुणी आहे. त्यामध्ये रा. ना. चव्हाण यांच्या लेखनाची पृष्ठसंख्या फक्त त्र्याहत्तर आहे; पण ते लेखन अर्थसंपृक्त आहे. पुस्तकाच्या विषयाला पूरक अशा मौलिक परिशिष्टांची जोड दिल्याने पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढले आहे. परिशिष्टांविषयी अधिक भाष्य करायला येथे वाव नाही. लेखकाच्या विवेचनाचा निव्वळ सारांश सांगणेसुद्धा मला अभिप्रेत नाही. पण त्या निमित्ताने काही निरीक्षणे नोंदवून थोडे विचारप्रतिपादन अवश्य करणार आहे. द्वा. गो. वैद्य लिखित ‘प्रार्थनासमाजाचा इतिहास’ (१९२७) या ग्रंथाच्या द्वितीयावृत्तीचे संपादन नुकतेच मी केले आहे. त्यामध्ये मांडलेले काही मुद्दे अपरिहार्यपणे येथे येऊ शकतील, हे आधीच नमूद करून ठेवतो.
वाई येथील सत्यशोधक व प्रार्थनासमाजी ‘दलितमित्र’ रामचंद्र नारायण चव्हाण (२९ ऑक्टोबर १९१३ - १० एप्रिल १९९३) हे एक सुधारकी वळणाचे आणि विधायक वृत्तीचे विचारवंत होते. वाईच्या वसंत व्याख्यानमालेतील माझ्या एका भाषणानंतर त्यांची-माझी गाठ पडलेली होती. एकदाच झालेल्या ओझरत्या भेटीतसुद्धा त्यांची जाण, जिज्ञासा आणि साधेपणा मला प्रकर्षाने जाणवला. पुढे मी त्यांना अधिक ओळखू लागलो तो मुख्यत: त्यांच्या लेखनातून. सुमारे साठ वर्षे त्यांनी समाजहितार्थ अव्याहत लेखन केले आणि सुमारे दीड हजार लेख लिहिले. त्यांचे लेखन म्हणजे वृत्तपत्रे-नियतकालिकांमध्ये केलेले स्फुट लेखन असल्याने खरे तर तो अनमोल ठेवा एकत्रितपणे आपल्या हाती आलाच नसता. पण त्या महाप्रचंड स्फुट लेखनाचे पृथक्करण करून संपादित स्वरूपात चाळीस पुस्तकांच्या रूपाने ते विचारधन त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण यांनी आपल्या हाती दिले आहे. पित्याने जेवढ्या व्रतस्थपणे लेखन केले, तेवढ्याच व्रतस्थपणे पुत्राने त्या लेखनाचे संपादन केले आणि पितृसेवेचा एक आदर्श निर्माण केला. पितृऋण आणि त्याद्वारे समाजऋण फेडण्याचा हा प्रयत्न ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. त्याबाबत रमेश चव्हाण यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.
मला आठवतंय की, रमेश चव्हाण जेव्हा विद्यापीठातील माझ्या विभागात येऊन मला भेटत असत, त्या पहिल्या टप्प्यात एका बाबतीत ते खंतावलेले असत. आपल्या या कामाची दखल कोणी घेत नाही, विशेषत: विद्यापीठे घेत नाहीत, अशी त्यांची रास्त खंत असायची. त्या पार्श्वभूमीवर मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंतरप्रणाली अभ्यासकेंद्राच्या वतीने रा. ना. चव्हाणांच्या साहित्याविषयी एक परिसंवाद आयोजित केला आणि डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते रमेश चव्हाणांचा सत्कारही केला. त्यांच्या कामाची विद्यापीठीय पातळीवर घेतली गेलेली ही पहिली मोठी दखल होती आणि सामाजिक-शैक्षणिक आदरबुद्धीने ती घेतलेली होती. आता परिस्थिती पुष्कळ बदलली आहे आणि यापुढे ती आणखी बदलेल याची मला खात्री आहे.
रमेश चव्हाण यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी सौ. वैशालीताई यांचा वाटा इतका मोलाचा आहे की, ‘सहधर्मचारिणी’ या शब्दाची सार्थताच जणू त्यातून प्रकट होते. उपचार म्हणून नव्हे, तर या उभयतांच्या कामाविषयीच्या सामाजिक कृतज्ञतेचा प्रातिनिधिक उद्गार म्हणून हे सर्व मी नमूद करत आहे.
रा. ना. चव्हाण हे उच्चशिक्षित नव्हते, पण उच्चसंस्कारित होते. ते नेते नव्हते, पण प्रबोधनकर्ते होते; कर्मयोगी विचारप्रतिपादक होते. ते जातिनिष्ठ नव्हे, तर प्रदेशवाचक व तरीही विेशधर्मी मराठा होते. ते हिंदू होते, पण सर्वधर्मसमभावी व सर्वधर्मसमन्वयवादी असे वैश्विक हिंदू होते. ते भाविक होते, पण भावूक नव्हते; ते एक सश्रद्ध बुद्धिवादी होते. त्यांचे लेखन नैमित्तिक आणि स्फुट होते, पण आस्था स्थायी आणि दूरदर्शी होती. त्यांची दृष्टी परिपक्व, समतोल, तौलनिक, समन्वयी, सहिष्णू, निर्विष, विधायक आणि व्यापक होती. परिणामी सत्यशोधकी व प्रार्थनासमाजी द्वैताचे त्यांच्या ठायी अद्वैत बनले होते. केशवसुतांच्या शब्दांचा थोडा उपयोग करून मी असे म्हणेन की, रा. ना. चव्हाण हे ‘साकल्याच्या प्रदेशा’चे वारकरी होते आणि ‘स्वर्गसमक्षते’चे माळकरी होते. ते समाजहितैषी आणि सर्वहितैषी होते.
या सर्व अजब रसायनाचे रहस्य तरी काय होते? या रहस्याची स्वतंत्र व विस्तृत मीमांसा शक्य आहे. पण तूर्त येथे या रहस्याचा एक प्रमुख घटक नमूद करतो. तो म्हणजे, ‘रानां’चे वडील प. वा. नारायणराव कृष्णाजी चव्हाण आणि गुरु कर्मवीर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे त्यांच्यावरील संस्कार. सत्यशोधकी व ब्राह्मो-प्रार्थनासमाजी परंपरांचे संस्कार आणि उक्ती-कृतीची एकरूपता ही त्या शुद्ध बीजापोटीची रसाळ-गोमटी फळे होती. सर्वांगीण सुधारणावादी व विवेकशील कर्मवीर असणारे म. विठ्ठल रामजी शिंदे हे महाराष्ट्राच्या आधुनिक युगाचा वैचारिक सुवर्णमध्य होते. रा. ना. चव्हाण यांनी त्यांचीच परंपरा आपल्यापरीने पुढे चालवली. या गुरु-शिष्यांना महाराष्ट्राने उपेक्षित ठेवले. पण काळ केव्हा ना केव्हा अशा उपेक्षित मानकऱ्यांना न्याय देतोच. आता त्या न्यायपर्वात आपण पोहोचलो आहोत, असे मला वाटते. चव्हाण घराण्याच्या ज्या तीन पिढ्यांचा उल्लेख मी आतापर्यंत केला आहे, त्यांचे कार्य पाहता ‘महर्षी शिंदे यांच्या विचार- कार्याने प्रभावित मिशनरी घराणे’ असे त्यांचे सार्थ वर्णन करता येईल.
रा. ना. चव्हाण यांचे जे जीवनसार मी सांगितले, ते विचारात घेता रानडे- भांडारकर हा त्यांच्या आदराचा, आस्थेचा व चिंतनाचा एक विषय होता यात आश्चर्य नाही. ‘रानडे-भांडारकर परंपरेतील अखेरचे शिलेदार’ असे महर्षी शिंदे यांचे समर्पक वर्णन डॉ. सदानंद मोरे यांनी केलेले आहे. रा. ना. चव्हाण हे त्या महर्षींचे शिष्य. ‘राना’ हे त्यांच्या आयुष्यातील जवळपास संपूर्ण जाणत्या काळात ब्राह्मो-प्रार्थना समाजांचे सभासद आणि ‘सुबोधपत्रिके’चे लेखक होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात रानडे-भांडारकर यांचे उल्लेख अनेक वेळा येत असत. त्या दोघांसंदर्भात रानांनी काही स्वतंत्र लेखही लिहिले. प्रस्तुत पुस्तक म्हणजे अशा पाच लेखांचा संग्रह आहे. हे लेख त्यांनी ‘नवभारत’ (वाई), ‘मराठी विश्वकोश’ (वाई), ‘रयत शिक्षण पत्रिका’ (सातारा) आणि ‘अस्मितादर्श’ (औरंगाबाद) अशा प्रतिष्ठित माध्यमांमध्ये लिहिले होते. त्यांचा लेखनकाळ (१९७६ ते १९९०) हा रानांच्या आयुष्यातील परिपक्व कालखंड होता.
त्यामुळे रानडे-भांडारकरांविषयीच्या त्या लेखांचे संकलन-संपादन ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. रमेश चव्हाण हे एखाद्या एकांड्या शिलेदाराप्रमाणे आपल्या वडिलांच्या ग्रंथांचे संपादन आणि विक्री करत आले. पण प्रस्तुत पुस्तकाबाबत प्रकाशनाचा त्यांचा भार पुणे प्रार्थनासमाजाने हलका करावा, हेसुद्धा यथोचित म्हटले पाहिजे.
सांप्रत पुणे प्रार्थनासमाजाची धुरा वाहणारे डॉ. दिलीप जोग आणि डॉ. सौ. सुषमा जोग हे दाम्पत्य व त्यांचे सहकारी यांनी त्या संस्थेच्या कार्यात बरेच चैतन्य आणले आहे. प्रस्तुत पुस्तक-प्रकाशनाची त्यांची कृती ही त्या धोरणाशी सुसंगत आहे. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर (६ जुलै १८३७ - २४ ऑगस्ट १९२५) हे प्रार्थनासमाजाचे थोर नेते म्हणून गणले जातात. आयुष्यातील सुमारे साडेपाच दशके त्यांनी विविध प्रकारे प्रार्थनासमाजाची सेवा बजावली. प्रा. रामकृष्णपंत यांना संस्कृत, प्राच्यविद्या, भारतविद्या, इतिहास, धर्मविचार यांचे गाढे अभ्यासक म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली. धर्मसुधारणा व समाजसुधारणांविषयीचे त्यांचे विचार लक्षात घेता ‘पुरोगामी पंडित’ असे त्यांचे वर्णन यथार्थ ठरेल.
प्रार्थनासमाजावर आरंभीच्या टप्प्यात होणाऱ्या टीकेचा विवेकी व अभ्यासपूर्ण प्रतिवाद रामकृष्णपंतांनी केला. विशेषत: प्रार्थनासमाजाच्या सुधारणावादावर टीकास्त्र चालवणाऱ्या ‘केसरी’कारांना त्यांनी मोठ्या हिरिरीने व तर्कशुद्धपणे उत्तर दिलेले होते. नेमस्त उदारमतवादी मार्गाने, पण ठामपणे त्यांनी जे सुधारकी विचार मांडले, त्यापायी त्यांना सामाजिक छळ सोसावा लागला. पण अत्यंत धीरोदात्तपणे ते सामाजिक रोषाला सामोरे गेले. ज्या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद एतद्देशियांसाठी दुर्मीळ होते, त्या काळात त्यांनी ते पद भूषवले. पुण्यातील ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर’ (स्थापना ६ जुलै १९१७) हे त्यांचे यथोचित स्मारक आहे. न्या. म. गो. रानडे यांनी १८९७मध्ये आपल्या या ज्येष्ठ मित्राविषयी असे गौरवोद्गार काढले होते : “डॉ. भांडारकर ह्यांची योग्यता ब्राह्मसमाजाच्या थोर पुढाऱ्यांपेक्षा मुळीच कमी नाही. डॉ. भांडारकर हे केवळ विद्वान गृहस्थ नाहीत. पुष्कळसे श्रम केल्याने विद्वत्ता कोणासही प्राप्त होते. ते विद्वान असून त्याच्याहीपेक्षा फार थोर आहेत. ते मार्गदर्शक आहेत; पण मार्गदर्शक आहेत असे म्हणण्यानेही त्यांच्या योग्यतेची खरी कल्पना होत नाही. ते आमचे गुरु आहेत, त्यांचे उदाहरण आम्ही आमच्या दृष्टीपुढे ठेविले आहे व त्यांच्याद्वारा आमच्या आयुष्यात आम्हांस पुष्कळच बोध झाला आहे.”
डॉ. भांडारकर यांनासुद्धा न्या. रानडे यांच्याविषयी याच कोटीतला आदर होता. न्यायमूर्ती महादेव (माधव) गोविंद रानडे (१८ जानेवारी १८४२ - १६ जानेवारी १९०१) हेसुद्धा कुशाग्र बुद्धी आणि गाढा व्यासंग यांसाठी ज्ञात असलेले प्रबोधनकर्ते होते. त्यांच्या थोरवीला अनेक पैलू होते. संस्था-स्थापक व संस्था-संवर्धक म्हणून त्यांची ख्याती होती. इतिहास, साहित्य, साहित्येतिहास, अर्थशास्त्र, धर्मसुधारणा, समाजसुधारणा, लोकशाहीवादी नेमस्त राजकारण इ. विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. मराठी साहित्य संमेलनाची आणि वसंत व्याख्यानमालेची परंपरा त्यांच्या कार्यातूनच उभी राहिली. स्त्रियांची बंधमुक्ती, बहुजनांचे शिक्षण, अस्पृश्यता निवारण आणि शेतकऱ्यांचे कल्याण यांबाबत रानडे यांना प्रगाढ आस्था होती. त्यांचे मार्ग मात्र मवाळ व उत्क्रांतीवादी होते. ते ‘परंपरावादी उदारमतवादी’ म्हणून ओळखले जातात. फुले-आंबेडकरांचा क्रांतिकारी जोश त्यांच्यात नव्हता; पण भावी बदलाविषयीची त्यांची दृष्टी मात्र अतिशय व्यापक होती.
उदाहरणार्थ, २५ डिसेंबर १८९२ रोजी ‘सामाजिक परिषदे’च्या अलाहाबाद अधिवेशन प्रसंगी ते म्हणाले ‘आपणा सर्वांना अपेक्षित असणारा बदल म्हणजे बंधनाकडून स्वातंत्र्याकडे, भोळसट भक्तिभावाकडून निखळ श्रद्धेकडे, जन्माधारित प्रतिष्ठेकडून करारबद्धतेकडे, बाह्य प्रामाण्याकडून विवेकाकडे, असंघटित जीवनाकडून सुसंघटित जीवनाकडे, धर्मांधतेकडून सहिष्णुतेकडे, आंधळ्या प्रारब्धवादाकडून मानवत्वाच्या प्रतिष्ठेकडे घडवून आणण्याचे स्थित्यंतर होय.’
राष्ट्रीय सभा (काँग्रेस), सामाजिक परिषद आणि औद्योगिक परिषद या देशव्यापी संस्थांच्या उभारणीत रानडे यांचा पुढाकार होता. प्रांतिक व स्थानिक पातळीवर त्यांनी स्थापलेल्या संस्थांची यादी तर फार मोठी आहे. न्या. रानडे, नामदार गोखले आणि महात्मा गांधी ही गुरु-शिष्य परंपरा लक्षात घेतली की, रानडे यांच्या कर्तृत्वाच्या उंचीची कल्पना येते. न्या. रानडे हे अखिल भारतीय पातळीवर नेतृत्व करणारे आणि देशभरातील नेत्यांच्या आदराला पात्र ठरलेले आधुनिक भारतातील पहिले मराठी धुरीण होते. लोकमान्य टिळकांनी ‘सर्वज्ञ: स हि माधव:’ या शब्दांत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘महापुरुष’ म्हणून, तर आचार्य शं. द. जावडेकर यांनी ‘सर्वांगीण सुधारक’ म्हणून न्या. म. गो. रानडे यांना गौरवले, यात त्यांच्या थोरवीचे मर्म साठवलेले आहे.
मुंबई विद्यापीठाचे पहिले चारही पदवीधर (१८६२) पुढे प्रार्थनासमाजाचे सभासद झाले. त्यांमध्ये रानडे-भांडारकरांचा समावेश होता. रानडे तर ‘पदवीधरांचे मुकुटमणी’ म्हणून ओळखले गेले. ३१ मार्च १८६७ या दिवशी मुंबईत प्रार्थनासमाज स्थापन झाला, तेव्हा रानडे-भांडारकर हे दोघेही मुंबईत नव्हते. ते थोड्या कालावधीने सभासद झाले. पुणे प्रार्थनासमाजाचेसुद्धा (स्थापना ४ डिसेंबर १८७०) ते सभासद झाले. प्रार्थनासमाजाच्या आरंभीच्या टप्प्यात त्याला अनेक मातब्बर नेते लाभले. पण रानडे-भांडारकर हे बहुव्यापी प्रतिभेचे आणि देशव्यापी प्रतिमेचे नेते म्हणजे त्यांतील सर्वात उत्तुंग शिखरे होती. बंगालमधील ब्राह्मोसमाजाचा (स्थापना १८२८) मोठा प्रभाव प्रार्थनासमाजावर होता. त्याला ‘ब्राह्मोसमाज’ याच नावाने संबोधावे, असा काहींचा आग्रह होता. परंतु ब्राह्मोसमाजाच्या काही गोष्टी नाकारून आणि आपली वेगळी अस्तित्वओळख टिकवून ‘प्रार्थनासमाज’ हे नाव कायम ठेवण्यात आले. रानडे-भांडारकरांचा रास्त आग्रह याला कारणीभूत ठरला. प्रार्थनासमाजाचे कार्य आणि एकंदर सर्वच सार्वजनिक व्यवहार नैतिकतेवर आधारलेला असावा, धर्मसुधारणेतून सर्वांगीण सुधारणेला चालना मिळेल, अशी त्या दोघांची धारणा होती. प्रार्थना समाजाला मध्ययुगीन महाराष्ट्रातील संतांच्या भागवत धर्माचे वैचारिक अधिष्ठान देण्यातसुद्धा या दोघांचा मोठा वाटा होता. प्रार्थनासमाजाच्या ज्या सहा मूलभूत तत्त्वांना १८७३ च्या सुमारास अंतिम रूप देण्यात आले, त्यामध्ये या दोघांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
न्या. रानडे यांचा ‘एकेश्वरनिष्ठाची कैफियत’ (A Thiest's Confession of Faith) हा दीर्घ लेख आणि डॉ. भांडारकर यांचा ‘ईश्वरविषयक ज्ञान’ हा लेख या दोहोंमुळे प्रार्थनासमाजाच्या तत्त्वज्ञानाला योग्य तो आकार प्राप्त झाला. त्या दोघांच्यात असणारी या संदर्भातील विचार व कार्याची एकरूपता पाहता ‘उजवे वामांग । तुका म्हणे एकचि अंग ॥’ या उक्तीची आठवण येते. या दोघांची ईश्वरकल्पना सगुण निराकाराची होती.
आधुनिक सुधारणांच्या पुरस्कारासाठी जुना शास्त्रार्थ सांगण्याची अन्वयार्थी पद्धत (Method of Interpretation) या दोघांनी वापरली. उपनिषदे, गीता आणि वारकरी संतांचा भागवत धर्म यांचा पाश्चात्त्य उदारमतवादाशी विवेकनिष्ठ मेळ घालून या दोघांनी केवळ प्रार्थनासमाजालाच नव्हे, तर प्रबोधनकालीन सुधारणावादाला एक दिशा प्राप्त करून दिली. या दिशेचे उत्तम आकलन असलेल्या महर्षी शिंदे व रा. ना. चव्हाण यांच्यासारख्यांना प्रार्थनासमाज व सत्यशोधक समाज या दोहोंच्या उद्दिष्टांमधील साम्याची व मार्गांमधील भिन्नतेचीसुद्धा जाण होती. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक कृतिशील अशी समन्वयात्मक भूमिका घेतली. वाई येथे ४ जुलै १९३३ या दिवशी स्थापन झालेला ‘प्रार्थना संघ’ तथा नंतरचा ‘ब्राह्मसमाज’ म्हणजे या भूमिकेचे साकार भूमीनिष्ठ रूप होते. प्रस्तुत पुस्तक हासुद्धा एका अर्थी त्या परिपक्व भूमिकेचा आविष्कार आहे.
त्यातील लेखांद्वारे रा. ना. चव्हाण यांनी रानडे-भांडारकरांच्या विचार-कार्याचे मर्म विशद केले आहे. मात्र तसे करताना निव्वळ भक्तिभावात्मक मांडणी त्यांना अभिप्रेत नाही. त्यामुळे हे लेखन चिकित्सक बनलेले आहे. ‘सत्यअसत्याशी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहुमता ॥’ ही तुकारामोक्ती अंगी बाणलेली असल्याने ज्यांच्याविषयी अत्यंत आदर आहे, अशा म. जोतीराव फुले आणि न्या. म. गो. रानडे यांच्यावरसुद्धा वेळप्रसंगी टीका करायला राना मागेपुढे पाहात नाहीत. रानडे यांच्या मर्यादांवरील त्यांचे चिकित्सक भाष्य वाचकांनी मुळातून वाचून पाहावे. टीका करतानासुद्धा त्यांची विधायक दृष्टी कायम राहते, हे महत्त्वाचे. रानांच्या तौलनिक मांडणीमुळे साम्यस्थळे, परस्पर-पूरकता, भेद आणि मर्यादा यांचा वेध घेत ते रानडे, फुले व आंबेडकर यांच्या संदर्भात जे भाष्य करतात, ते विचारांना चालना देते. प्रस्तुत पुस्तक दोन व्यक्तींविषयीचे असले तरी सुमारे शतकभराच्या महाराष्ट्राविषयीचे काहीएक विचारमंथन त्यातून प्रकट होते.
हे संपादित पुस्तक म्हणजे मुळातील स्फुटलेखनाचे संकलन असल्याने काही छोट्या मर्यादा स्वाभाविकपणे जाणवतात. त्यातील एक मर्यादा पुनरुक्तीची आहे. लेखांच्या काळानुसार थोडी का होईना, परस्पर-विसंगत मांडणी एखाद्या बाबतीत डोकावते. याचे एक उदाहरण न्या. रानडे यांचे शेतकऱ्यांच्या स्थितीविषयीचे विधान व त्यावर म. फुले यांनी ‘इशारा’ मध्ये (१८८५) केलेली टीका याबाबतचे आहे. रानडे यांच्यावरील पहिल्या दोन लेखांमध्ये (१९८०) त्यांच्या विधानाचा सूर व संदर्भ जाणून घेण्याची रानांची उदार दृष्टी दिसून येते. पण तिसऱ्या लेखात (१९९०) मात्र ही दृष्टी कठोरणाकडे झुकते. व्यक्तीची मते बदलू शकतात, हे खरे; पण एकाच पुस्तकात त्याचे दर्शन विसंगत वाटते. स्फुटलेखांच्या संकलनात असे घडू शकते. रानांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिला असता, तर हे चित्र बदलले असते. स्फुटलेखन एकत्रित करण्याच्या आकृतिबंधाची मर्यादा अशी की, या संकलनात मूळचा विस्कळीतपणा पूर्णांशाने दूर करता येत नाही. प्रस्तुत पुस्तकाच्या शीर्षकात ‘सम्यक’ असा शब्दप्रयोग केलेला असला तरी लेखनाच्या स्फुट स्वरूपामुळे सम्यकतेवर मर्यादा आलेल्या आहेत, असे मला वाटते. स्वतंत्र ग्रंथलेखनात जी तार्किक, एकसंध, सुसूत्र व समग्र मांडणी करता येते, ती त्या पद्धतीने संकलनात उतरू शकत नाही. या दृष्टीने संकलन हा काहीसा दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार असतो. त्यामुळे रा. ना. चव्हाण यांच्या लेखांचे संपादित ग्रंथ अन्वयार्थक ((interpretative) पद्धतीने वाचणे गरजेचे आहे. जे स्फुट लेखन विखुरलेल्या अवस्थेमुळे आणि विस्मृतीच्या शक्यतेमुळे काळाच्या उदरात गडप होण्याचा धोका होता, त्याला उपलब्धतेच्या आणि विषयवार जोडणीच्या कक्षेत आणणे हे मोलाचे काम झाले, यात शंका नाही.
पण अशी कामे वाचताना ती केवळ जिज्ञासापूर्तीच्या भावनेने न वाचता संशोधकीय, चिकित्सक व अन्वयार्थी नजरेने वाचली तर ती अधिक फलदायी ठरतात. चाळीस ग्रंथांचा बृहद् प्रकल्प रमेश चव्हाणांनी साकार केला आहे. त्यात आणखी भर पडू शकेल. पण आता या टप्प्यावर महाराष्ट्रातील (विशेषत: तरुण) संशोधकांनी या बृहद् प्रकल्पाचा पद्धतशीर अभ्यास करून त्याची संशोधकीय समीक्षा हाती घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे वैचारिक व सामाजिक योगदान अधोरेखित करता येईल आणि काही उणिवा नजरेत आल्या तर त्याही भरून निघतील. म. विठ्ठल रामजी शिंदे यांना अनुसरून रा. ना. चव्हाण यांनी जी एक विधायक परिवर्तन दृष्टी दिली आहे, तिचे उपयोजन आजच्या काळात समाजजीवनात कितपत आणि कसे शक्य आहे, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
प्रस्तावनेचा समारोप करताना रा. ना. चव्हाण यांचे रानडे-भांडारकरांविषयीचे एक महत्त्वपूर्ण प्रतिपादन मी नमूद करणार आहे. प्रार्थनासमाजाच्या इतिहासाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत मी ते दिलेले आहे. प्रस्तुत पुस्तकातील पाच लेखांव्यतिरिक्त अन्यत्र, म्हणजे ‘सुबोधपत्रिके’तील लेखांमध्ये (१५ व २९ जून १९५८) आलेले ते सुंदर भाष्य पुस्तकाच्या विषयासंदर्भात मूलभूत महत्त्वाचे आहे. रा. ना. चव्हाण म्हणतात, “प्रार्थनासमाजाच्याच नव्हे, तर मराठीच्या इतिहासात रानडे-भांडारकर हा एक समास झाला आहे. प्रार्थनासमाजाची स्थापना परमहंससभेतील चिकाटीच्या सभासदांनीच केली. पण सर्वसाधारणत: या प्रयत्नाला संपूर्ण तत्त्वज्ञानाचे स्वरूप रानडे व भांडारकर यांनी आणून दिले. हा असामान्य ‘समास’ जर प्रार्थनासमाजाला लाभला नसता, तर त्याचे रोपटे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने विशेष खुलून दिसले नसते. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात ज्याप्रमाणे ‘ज्ञानदेव-तुकाराम’ हा समास अत्यंत लाभदायक ठरला, त्याप्रमाणेच रानडे-भांडारकर ही युती मराठी एकेश्वरी चळवळीच्या इतिहासात असामान्य व अलौकिक अशी आहे.”
रानांनी रानडे-भांडारकरांचे वर्णन ‘मराठीच्या स्वयंप्रज्ञेची स्वावलंबी स्वरूपे’ अशाही समर्पक शब्दांमध्ये केलेले आहे. ‘तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष । चैतन्याचा वास जयामाजी ॥’ हे तुकोबांचे उद्गार ज्या रानडे-भांडारकरांना लागू पडतात, त्यांच्या चैतन्याचा परिसस्पर्श आदरणीय रा. ना. चव्हाण यांच्या या पुस्तकाद्वारे समस्त वाचकांना होवो, ही शुभकामना.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment