अजूनकाही
प्रा. बाळासाहेब लबडे यांची ‘पिपिलिका मुक्तीधाम’ ही कादंबरी उद्या, १ डिसेंबर रोजी ग्रंथालीतर्फे ठाण्यात प्रकाशित होत आहे. ज्येष्ठ समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते या कादंबरीचे प्रकाशन होत आहे, तर ज्येष्ठ कथा-कादंबरीकार-नाटककार रत्नाकर मतकरी आणि कथा-कादंबरीकार सदानंद देशमुख हे प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने या कादंबरीविषयी...
............................................................................................................................................................
‘पिपिलिका मुक्तिधाम’ ही बाळासाहेब लबडे यांची कादंबरी कादंबरीलेखनाच्या परंपरेच्या पायवाटा सोडून नवी वाट वाचकांसमोर ठेवते. सर्वसाधारणपणे कथानक, पात्र, वातावरण, निवेदन शैली व आकृतिबंध या संरचनेत वाचण्याची सवय झालेल्या वाचकांना वरकरणी हे घटक या कादंबरीत कुठेच दिसत नाहीत. पण या कादंबरीत आलेले विषय मात्र एका विशिष्ट प्रादेशिक अनुभवापुरते मर्यादित दिसत नाहीत.
उदाहरणार्थ- या कादंबरीत ‘एफएम बोले तो...’सारखी समकालीन भाषा आहे. ‘ब्लॅक होल’चा संदर्भ येतो, ‘अरेबियन नाईट’ची माहिती येते. जेएनयूमधील चळवळ येते, कलम ३७०ची पार्श्वभूमी येते. चारेगावची दंगल येते. निवेदिका एल्गार परिषदेवर भाष्य करते, आपल्यावर अन्याय होतो म्हणून न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद येते, मराठा क्रांती मोर्चाची परिणीती समोर येते, आर्थिक आरक्षणापाठीमागचा सूर येतो, कार्ल मार्क्सचा विचार येतो, जैन धर्माचे तत्त्वज्ञान येते, इस्लाममधील आयात येते, ख्रिश्चन धर्मातील तत्त्वज्ञानाचा तळ येतो, बुद्ध धर्मातील विज्ञान येते, लाइव्ह चॅनेलचा परामर्श येतो, पत्रकारांचा ढोंगीपणा येतो, कामगारांचे दुःख येते, गो पालकांचा इतिहास येतो. तसेच मुंग्यांचाही इतिहास येतो. निवेदक मुंगी पुस्तक विक्रेत्यांचा भांडाफोड करते. राजकीय पक्षांचा मुखवटा बाहेर काढते. संस्कृत, उर्दू, हिंदी, इंग्रजी, पाली यासारख्या अनेक भाषा मराठी लिपीतून व्यक्त होतात. पुरुषोत्तम बोरकर यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास संघाची शिकवण, तुरुंगातील अनुभव, सोयीच्या जाहिराती, वर्तमान व्यवस्थेवर लोककथा, भागवत कथा, पोवाडा, लोक विलापिका, भारुड, पुराणकथा, स्तोत्र अशा अनेक माध्यमांतून अनेक विषयांवर भाष्य टाकणारी ही कादंबरी म्हणजे ‘मेक इन इंडिया’ आहे, असे म्हणता येईल.
मराठी कादंबरीत हा फॉर्म नवीन वाटत असला तरी यापूर्वी काही प्रमाणात व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘सत्तांतर’ कादंबरीत वाचकांना हा अनुभव आलेला आहे. अर्थात या कादंबरीत व त्या कादंबरीत आलेले भावविश्व वेगळे आहे. मुळात लेखक का लिहितो व कसे लिहितो? अशा प्रश्नांची उत्तरे ढोबळमानाने अशी मिळतात की, सभोवतालच्या वर्तमान व्यवस्थांचे आलेले अनुभव, वाचनातून, चिंतनातून तयार झालेली दृष्टी त्यांना कुठेतरी उत्कटपणे व्यक्त होण्यास प्रवृत्त करत असते. म्हणून त्यांना लिहावेसे, सांगावेसे वाटते. लेखक आपल्या अस्वस्थतेतून लेखनाकडे वळतो. लेखन करताना आपले अनुभवविश्व व्यवस्थितपणे वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या अनुभवलेखनाशी सुसंगत वाङ्मयप्रकार किंवा लेखनप्रकार निवडतो. केव्हा केव्हा तर तो या प्रकाराचा विचार न करता त्याला योग्य वाटेल तसा लेखन करत जातो. त्यामुळे समीक्षकांनी त्या लेखनाला जे नाव द्यायचे, ते त्यांनी द्यावे या भूमिकेवर येतो. बाळासाहेब लबडे यांनाही जे काही मांडायचे होते, ते परंपरागत चाकोरी लेखनातून त्यांना व्यक्त करणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी नवा फॉर्म निवडला.
‘पिपिलिका मुक्तिधाम’मध्ये कादंबरीच्या संरचनेतील कमी-जास्त घटक सहज सापडतात. उदाहरणार्थ या कादंबरीत चार मुंग्या मुक्तीच्या शोधात परकाया प्रवेश करून जे अनुभव घेतात, त्या अनुभवाचा कालावकाश येतो. यातली मुंगी बँड पथकात सामील होणे, धर्मचिकित्सात सहभागी घेणे, पुस्तक विकण्याचा अनुभव घेणे, मोर-कावळा-हत्ती-मुंगूस यांचे भावविश्व अनुभवणे, जमुरेचा खेळ दाखवणे, आख्यान रंगवणे, भारूडातून समाज वास्तव उघडे करणे, गोपालन करणाऱ्यांचा ढोंगीपणा उघड करणे, कौशी अक्काच्या माध्यमातून महिलांचे दुःख, संघर्ष व कष्ट ताकदीने वर्णन करणे, अशा अनेक गोष्टी करते. आणि शेवटी ‘ज्ञानाला अंत नाही’ या निष्कर्षाला येते.
कादंबरीत चार मुंग्या मुख्य भूमिकेत आहेत. पहिली लाली मुंगी पांड्या, दुसरी काळी मुंगी सख्या, तिसरी तांबडी मुंगी लाल्या आणि शेवटी निवेदिका मुख्य नायिका म्हणजे कामकरी मुंगी. कामकरी मुंगी हे नाव कादंबरीत नसले किंवा ती ‘मी’ या नावाने वावरत असली तरी त्यास धुतरीने कुड्या असे नाव दिले आहे. म्हणजे नेहमी कुडत असते, चिंतेत राहणारी या अर्थाने. धुतरी हे पात्र पोतराजाच्या रूपाने लोककथेच्या माध्यमातून वर्तमान व्यवस्थेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात या चार मुंग्या वारुळातून निघून मुक्तीचा मार्ग शोधताना जे अनुभव येतात, ते अनुभवविश्व म्हणजे ही कादंबरी.
कादंबरीची भाषा खिळवून ठेवते. लेखकाच्या अनुभवाचे जिवंतपण अधिक वास्तवदर्शी होण्यासाठी खूप मेहनत घेतलेली दिसते. त्यासाठी त्यांनी कोकणी भाषा, हिंदी भाषा, संस्कृत भाषा, इंग्रजी भाषा, पाली भाषा, बंबया हिंदीचा अभ्यास करून त्याद्वारे अनुभव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासोबतच ऋचा, स्तोत्र, लोक विलापिका, अग्नीसूक्त या सर्व त्या-त्या भाषेत लेखकाने नोंदवून वास्तवाची परिणामकारकता सिद्ध केली आहे. पोवाडा, भारुड, आख्यान, पुराणकथा, लोककथा यांचा वापर लेखकाने अत्यंत खुबीने केलेला आहे. त्यामुळे मराठी कादंबरीच्या भाषेत केलेले एवढे बदल अन्यत्र अपवादानेच सापडतात.
ही कादंबरी वर्तमान व्यवस्था सूक्ष्मपणे व भेदकपणे वाचकांसमोर ठेवते. त्यामुळे वाचक काही काळ विचारात पडतो. कादंबरीत आलेला उपहास, उपरोध तर मुळातून वाचण्यासारखा आहे. अनेक धर्मप्रमुखांशी मुंगी वाद घालून त्यातील फोलपणा उघड करते. ख्रिश्चन, जैन, हिंदू, इस्लाम व बौद्ध धर्मातील मर्यादा परखडपणे सांगत कोणताही धर्म माणूसमुक्तीसाठी अपात्र आहे, मुळात धर्माची मानवाच्या विकासासाठी गरजच नाही, या निष्कर्षाला ही मुंगी येते. म्हणून ती शेवटी म्हणते- “त्यामुळे मला जे पटते ते मी अनुसरण करते. कोणतीही विचारसरणी पूर्ण योग्य आणि पूर्ण अयोग्य असत नाही.” यासोबतच आजचा मिडिया, संघाचे धोरण, समाजसुधारक अशा अनेक विषयांचा घेतलेला शोध मराठी कादंबरीला ऊर्जा देणारा आहे.
कादंबरीच्या वरील बलस्थानासोबतच काही मर्यादाही वाचकांना जाणवू शकतात. लेखकाने आपली अनुभूती व्यक्त करण्यासाठी हा फॉर्म वापरला तरी वाचकांना काही भाग कंटाळवाणा वाटू शकतो. वास्तवाला जिवंतपणा येण्यासाठी लेखकाने काही भागात जे प्रयोग केले, ते सामान्य वाचकांच्या विचारापलीकडे आहेत. उदाहरणार्थ- लिंबोळ्या चगळ्याचा कार्यक्रम या भागातील लोककथेचे प्रयोग कथानकाची गती रोखणारे आहेत. विरुपण, संज्ञाप्रवाह, भाषेचे मोडतोड समजून घेण्यासाठी वाचकांना थांबून आकलन करावे लागते. कादंबरीचा प्रारंभ गोडी देणारा असला तर त्यापुढील सलग दोन भाग किंवा प्रकरणे मात्र उच्च अभिरुची असलेल्या वाचकांनाच कळेल अशा पद्धतीने मांडली आहेत. वरील छोट्या मर्यादांकडे दुर्लक्ष केले तरी ही कादंबरी मराठी भावविश्वात एका नव्या वळणावर पोहोचलेली दिसून येते.
सार रूपाने आपणास थोडक्यात या कादंबरीविषयी असे म्हणता येईल की, ‘पिपिलिका मुक्तिधाम’ म्हणजे मानवी मुक्ती व समग्रविश्व शांतीचे उपहास, उपरोध, विडंबनाद्वारे आणि प्रतिमा-प्रतीकांच्या माध्यमातून अत्यंत समर्थपणे मांडलेले चिंतन. कादंबरीच्या संरचनातील मोडतोड, भाषेतील प्रयोगशीलता, भूत वर्तमान व भविष्यकाळाचा व्यापलेला आशयाचा अवकाश वाचकांना कधी अस्वस्थ तर कधी अंतर्मुख करून जातो.
प्रादेशिक अनुभूतीच्या चौकटीबाहेर जाऊन समकालीन भारत सूक्ष्म पद्धतीने रेखाटण्यात लेखकाला कमालीचे यश प्राप्त झाले आहे. शीर्षकातील नाविन्यतेसोबतच जातिधर्माच्या फोलपणावर केलेले भाष्य, निवेदनाचा लोककथेचा फॉर्म, वर्तमान व्यवस्थेचा नवा अनुभव मराठी कादंबरीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो.
.............................................................................................................................................
लेखक शंकर विभुते नांदेडमधील यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.
shankarnvibhute@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 02 December 2019
शंकर विभूते,
लेखातली मुंगीची ही गोष्ट खास वाटली :
यावरनं मुंगी बेअक्कल आहे हे दिसतं. माणसाची मुक्ती म्हणजे काय हे हिला माहितीये. मग धर्मप्रमुखांशी वाद कशाला घालायला जातेय? स्वत:ची मुक्ती (उप)भोगंत गप पडून राहावं की. उगीच खाजवून खरूज काढायचीच कशाला? शिवाय, हिंदूंमध्ये धर्मप्रमुख नसतो हे हिला माहीत नाही. आद्य शंकराचार्यांनी अशा रद्दड व बथ्थड मुंग्यांसाठी एक श्लोक सांगून ठेवलाय :
आपला नम्र,
-गामा पैलवान