अजूनकाही
२६/११च्या घटनेमधील कुठल्या विशिष्ट अंगावर लक्ष केंद्रित करायचं याबाबतच्या ‘हॉटेल मुंबई’च्या चित्रपटकर्त्यांच्या संकल्पना तशा स्पष्ट आहेत. राम गोपाल वर्माच्या ‘द अटॅक्स ऑफ २६/११’मध्ये जसं या घटनाक्रमाकडे मुख्यत्वे पोलिसांच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं, त्याच धर्तीवर ‘हॉटेल मुंबई’मध्ये २६/११ रोजी घडलेल्या हल्ल्यांपैकी ताजमहाल पॅलेस हॉटेलवर झालेल्या हल्ल्यावर सगळं लक्ष केंद्रित केलं जातं. नाही म्हणायला इतर ठिकाणी झालेल्या हल्ल्यांचे उल्लेख येत असले तरी ताज हॉटेलमधील घटना कायमच एकूण कथानकाच्या केंद्रस्थानी राहतात. त्यातही पुन्हा हॉटेलमधील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या काही संचांना कथानकाच्या केंद्रस्थानी ठेवलं जातं. त्यामानानं पोलिसांच्या हालचालींना तितकंसं महत्त्व मिळत नाही. याने होतं असं की, पोलीस कथानकाचा प्रमुख भाग नसल्यानं घडलेल्या घटनेकडे एका अधिक तटस्थ मानवी दृष्टिकोनातून पाहिलं जातं, आणि ना की पोलिसी प्रक्रियात्मक कारवायांच्या दृष्टिकोनातून.
चित्रपटाच्या केंद्रस्थानी ताजमधील कर्मचारी आणि ग्राहक यांचा एक एक संच आहे. हेमंत ओबेरॉय (अनुपम खेर) हा हॉटेलमधील मुख्य शेफ आणि त्याचा कनिष्ठ असलेला कर्मचारी अर्जुन (देव पटेल) हे दोघे कर्मचाऱ्यांच्या संचाचा भाग असतात. तर, झारा (नाझनिन बॉनिअडी) आणि डेव्हिड (आर्मी हॅमर) हे जोडपं, त्यांची लहान मुलगी आणि आया सॅली (टिल्डा कॉबहम-हार्वी) हे ग्राहक आहेत. चित्रपटाला सुरुवात होते, तेव्हा कुठल्याही इतर चित्रपटाप्रमाणे दैनंदिन कामकाजात अडकलेली ही सारी मंडळी दिसतात. एक प्रकारे वादळापूर्वीच्या शांततेच्या धर्तीवर त्यांचं आयुष्य आपल्याला दिसतं. या सगळ्या गोष्टींमुळे साहजिकच प्रेक्षकांचं या पात्रांशी एक भावनिक नातं तयार होणं अपेक्षित असतं.
‘हॉटेल मुंबई’ मांडणीच्या पातळीवर जेम्स कॅमेरून दिग्दर्शित ‘टायटॅनिक’ची (१९९७) आठवण करून देणारा आहे. हे या अर्थी की सदर चित्रपट अशा तऱ्हेच्या डिझास्टर चित्रपटांच्या मूलभूत साचेबद्ध रचनेच्या माध्यमातून आपल्या कथानकाची मांडणी करतो. अर्थात ना ही चित्रपटाची उणीव आहे, ना तशा अर्थाची तक्रार आहे. कारण, इथं कमी-अधिक फरकानं ही मांडणी परिणामकारक ठरते. याखेरीज ‘टायटॅनिक’प्रमाणेच इथंही वर्गसंघर्ष आणि कर्मचाऱ्यांचं धैर्य हे दोन मुद्दे कथानकात महत्त्वाचे ठरतात. ताज हॉटेलमधील बहुतेक कर्मचारी तिथल्या ग्राहकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतात, कित्येकदा आपला जीव धोक्यात घालताना, काही वेळा जीव गमावताना दिसतात. तर, वर उल्लेखलेल्या पात्रांखेरीज इतरही काही परदेशी आणि भारतीय पात्रांच्या माध्यमातून इथं वर्गसंघर्ष दिसतो. उदाहरणार्थ, वसिली (जेसन आयझॅक) या रशियन व्यक्तीने सगळे चेंबर लाऊंजमध्ये अडकलेले असताना मद्यपान करण्याची इच्छा व्यक्त करणं. अतिरेकी अमेरिकन आणि इतर परदेशी ग्राहकांना लक्ष्य करू पाहत आहेत, या गोष्टीच्या अनुषंगानं या अमेरिकन-ब्रिटिश पात्रांवर बराच भर दिला जातो. परिणामी चित्रपटकर्ते भारतातील घटनेकडे पाहणारे एका विशिष्ट, तिऱ्हाईत अशा दृष्टिकोनातून पाहतात असं दिसतं.
२६/११च्या हल्ल्यानंतर मुख्य धारेतील जवळपास सर्वच माध्यमांवर, खासकरून, वृत्तवाहिन्यांवर झालेली न्याय्य टीका म्हणजे आम्ही अधिक तत्पर आहोत, हे दर्शवण्याच्या नादात घडत असलेल्या बचावकार्याचं आणि पोलिसांच्या कारवायांचं चित्रण आणि थेट प्रक्षेपण केल्यामुळे अतिरेक्यांना मदत झाली. ‘हॉटेल मुंबई’मध्ये या मुद्द्याला एका समर्पक प्रसंगातून स्पर्श केला जातो. एक वृत्तवाहिनी हॉटेलमध्ये अडकलेल्या गृहस्थाशी संपर्क साधते नि त्याला विचारपूस करत असते. होतं असं की, त्या गृहस्थानं दिलेली उत्तरं अतिरेकी टीव्हीवर ऐकतात नि त्यांना हॉटेलच्या कुठल्या भागात लोक लपलेले आहेत हे कळतं. अगदी संक्षिप्त प्रसंगाच्या माध्यमातून माध्यमांचा समाचार घेतला जातो, असं मानता येईल.
ब्रेन वॉश केलेले अल्पवयीन अतिरेकी, जाळ आणि धुरानं काळवंडलेलं आकाश, हॉटेलमधून खाली उतरण्याचे प्रयत्न करताना दिसणारे लोक, वृत्तवाहिन्यांवरील फुटेजमध्ये दिसणारा हाहाकार, सोबतीला ताजमधून सतत सुरू असलेले गोळीबाराचे आणि स्फोटांचे आवाज या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून चित्रपटकर्ते थरार निर्माण करतात.
काही एक प्रसंग वगळता कुठेही पार्श्वसंगीताचा लवलेश नसल्यानं इथली हिंसा, समोरील पात्रांच्या चेहऱ्यावर आणि कृतींमधून दिसणारी हतबलता अधिक अंगावर येणारी ठरते. निक रेमी मॅथ्यूजचं छायाचित्रणात चित्रपटभर कायम राखलेली तपकिरी रंगछटा प्रभावी वातावरणनिर्मिती करते.
दर काही क्षणांनी कुणा व्यक्तीचा मृत्यू होत असताना, समोरील व्यक्तीच्या डोक्यात कुठल्याही क्षणी गोळी झाडली जात असताना निर्माण होणारं भय आणि त्यातून नाट्य या इथल्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत. हा अनुभव मिळवून देणं हे इथलं उद्दिष्ट मानल्यास आणि त्यातील उणिवांकडे दुर्लक्ष केल्यास अँथनी मारस दिग्दर्शित ‘हॉटेल मुंबई’ हा एक बऱ्यापैकी परिणामकारक चित्रपट ठरतो.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment