अजूनकाही
१. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता पवार कुटुंबियांविरुद्ध रणशिंग फुंकलं आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असा अण्णांचा दावा असून या प्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांची चौकशी करावी, अशी मागणी अण्णांनी केली आहे.
हिमालयातून कधी परत आलात, अण्णा? तुमच्या जनलोकपाल आंदोलनानंतर ('मुळे' नव्हे, 'नंतर') देशात घडून आलेल्या सत्तापरिवर्तनानंतर अडीच वर्षं नाना प्रकारची खळबळ माजवणाऱ्या घटना घडल्या. त्या हिमालयात तुम्हाला कळल्या नसणार. त्यांचीही माहिती घ्या, आम्ही रामलीला मैदान बुक करतो.
………………………..
२. बंगलोरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या विनयभंगाच्या प्रकाराला त्या महिलांनी परिधान केलेले शॉर्ट ड्रेस कारणीभूत आहेत. अशा महिलांच्या मते जितकी नग्नता अधिक, तितकी फॅशन जास्त. माझी बहीण किंवा मुलगी सूर्य मावळल्यानंतर परपुरुषासोबत ३१ डिसेंबरला बाहेर पडते, त्यावेळी तिच्यासोबत भाऊ किंवा पती नसतो. हे बरोबर नाही. पेट्रोलच्या संपर्कात आग आली तर आग भडकेलच, साखर पडेल तिथे मुंग्या येणारच. भारतीय संस्कृतीचे आचरण करा. आपल्या कुटुंबीयांसोबतच घराबाहेर पडा. : अबु आझमी
हे वक्तव्य अबु आझमींऐवजी बजरंग दल, श्रीराम सेने, विश्व हिंदू परिषद किंवा तत्सम कोणत्याही संस्कृतीरक्षक संघटनेच्या कोणाही सोमाजी गोमाजी कापशेच्या नावावर खपवता आलं असतं. आग काय, पेट्रोल काय, साखर काय, मुंग्या काय? अडचण बायका बाहेर पडल्याने होत नाही आझमीसाहेब, पुरुष बाहेर पडल्यामुळे होते- तेव्हा, सल्ले द्यायचे तर पुरुषांना द्या आणि निर्बंध लादायचे तर तेही पुरुषांवर लादा. तीन वर्षाच्या चिमुरडीपासून सत्तरीच्या म्हातारीपर्यंत कोणत्याही वयाच्या स्त्रीवर बलात्कार करणारे नराधम तिच्या शॉर्ट ड्रेसमुळे उत्तेजित होतात काय? तरी बरं, असल्या भाकड कल्पना भिरकावून देणारी आयेशा टाकिया यांचीच सून आहे.
३. अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्यात दरी वाढली असली तरी नुकतीच दोघांमध्ये बोलणी झाली. ती थांबायला नकोत. पिता-पुत्रांमधील नातं विशेष असतं. त्यामुळेच, हे दोघे लवकरच एकत्र येतील. : आझम खान
आझमसाहेब, तुम्हाला जे वाटतं तेच आम्हालाही वाटतं. किंबहुना, आपल्या मुलाचा मार्ग निष्कंटक करण्यासाठी पित्याने केलेली ही खेळी आहे, अशी आमची समजूत आहे. लेकरांसाठी बरेच बाप लोक अशी नाटकं करतात, हे आम्ही पाहिलेलं आहे. शिवाय आपल्या पक्षाचं चिन्ह लक्षात घ्या. सायकलवर कायमच डबलसीट बसण्याची सोय असते, हो की नाही?
………………………..
४. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मी बँकेत गेलो होते. रांगेत थांबलेल्या लोकांना कसे सामोरे जायचे हा विचार मनात होता. मग मी त्यांच्यासाठी एक गाणं तयार केलं. ‘देशभक्त है कतार में’ ही पहिली ओळ ऐकताच सगळे खूश झाले. मग मी माझ्या ओळी पूर्ण केल्या. ‘देशभक्त हे कतार मे, लगी है बडी भीड, तकलीफो से सज रही भारत की तकदीर’. ही ओळ पूर्ण करताच रांगेत उभ्या असलेल्या सर्वांनी आपण ३० तारखेपर्यंत रांगेत उभे राहायला तयार आहोत, असं सांगितलं. : भारतीय जनता पक्षाचे खासदार, दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी
तिवारीभाऊंनी थर्टी फर्स्टला गोमूत्राचा जादा डोस घेतला होता की कुमारी आसव वगैरे प्राशन केलं होतं चुकून? या सगळ्या मंडळींची मनं कशी एका घट्ट मुशीतली आहेत, पाहा. सगळ्यांना एकसारखंच स्वप्न पडतं वारंवार. शिवाय ते स्वप्न होतं, याचा विसरही पडतो लगेच.
………………………..
५. १७ हजार कोटींच्या कथित वेली चिटफंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने तृणमूल पक्षाचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांना अटक केली असून या प्रकरणात आठवड्याभरात अटक झालेले हे तृणमूलचे दुसरे खासदार आहेत. सुदीप यांनी कोणाकडून दोनतीन लाख रुपये घेतले असतील, तर ही काही एवढी मोठी गोष्ट नाही, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची पाठराखण केली. त्या म्हणाल्या, हाच वाद घालायचा असेल तर मोदींनाही अटक करायला हवी. करोडोंचा सूट घालण्यासाठी मोदींना कुठून पैसे मिळाले? भाजपनेते परदेशातून निधी गोळा करण्यासाठी अडाणींची मदत घेतात. ते चोरांचे बाप आहेत.
दीदी, कम्युनिस्टांनी दादागिरी केल्यामुळे वंगबंधूंनी त्यांना सत्तेवरून खालसा करून तुमची प्रतिष्ठापना केली आहे. तुम्हीही 'दीदीगिरी'च करू लागलात. भाजपने पाटीभर खाल्लं म्हणून तुम्हाला चमचाभर खाण्याचा अधिकार हवा आहे का? पाटीभर काय आणि चमचाभर काय, श्रीखंड ते श्रीखंडच.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment