अजूनकाही
महात्मा जोतीराव फुले यांची काल १२९वी पुण्यतिथी साजरी झाली. अनेक युगप्रवर्तक कार्य करून, समाजाला अनेक बाबतीत दिशा देऊन हा महामानव २८ नोव्हेंबर १८९० रोजी अनंतात विलीन झाला. त्यांची श्रद्धा होती अशा विश्वनिर्मिकाच्या शोधात ते निघून गेले.
आजच्या टेक्नोसॅव्ही आणि आधुनिक युगात शे-सव्वाशे वर्षांपूर्वी काहीतरी काम केलेल्या या व्यक्तीला इतकं महत्त्व का द्यायचं? त्यांच्या असण्या-नसण्याची इतकी मीमांसा का करायची? लोक येतात, कार्य करतात अन जातात. तेव्हा महात्मा फुल्यांचे विचार, शिकवण अन् कार्याची आजची-उद्याची गरज, महत्त्व, यावर इतकी चिंता-चिंतन का म्हणून? आजच्या आमच्या पिढीसमोर इतर अनेकानेक अडचणी, आव्हानं असताना फुल्यांचा इतिहासजमा झालेला काळ का उगाळायचा? या महामानवाच्या कार्याची दखल, मीमांसा करतानाच आधुनिक शतकात या महामानवाच्या विचाराची, कार्याची गरज काय?
भविष्याची दिशा अन् वाटचाल गतकाळातच शोधावी लागते. काल काय झालं किंवा काय नाही झालं, हेच उद्या कसं आणि कुठं जायचं आहे, हे निश्चित करतं. म्हणूनच तर इतिहासाचं अध्ययन करायचं असतं. त्या त्या काळातल्या लढवय्यांचं शौर्य, महामानवांचे विचार, सुधारकांचं कार्य आत्मसात करायचं असतं. त्यातच कुठं तरी भविष्याची पाऊलवाट सापडते.
आजची आणि येणारी पिढी कोण महात्मा फुले? कुठले? काय केलंय त्यांनी? असे प्रश्न विचारू नये किंवा महात्मा फुल्यांचं कार्य पुस्तकांच्या पानांत बंदिस्त न होता येणाऱ्या पिढ्यांच्या कृतीत दिसावं, यासाठी त्यांच्या कार्याचा आढावा घेणं वेळोवेळी अत्यावश्यक ठरतं. अनेक रूढी-परंपरांवर त्यांनी हल्ला चढवल्यामुळे अनेकांच्या पोटात आजही शूळ उठतो. महात्मा फुल्यांना चूक किंवा दुर्लक्षित करण्याची प्रवृत्ती आजही काही सनातनी आस्था असणाऱ्या लोकांमध्ये आहे. तेव्हा फुल्यांच्या कार्यावर वेळोवेळी लिखाण करणं क्रमप्राप्त ठरतं. त्यांच्या कार्याचे, विचारांचे पाईक होऊन, त्यांच्या कार्याची मशाल पुढच्या पिढीच्या हवाली करताना आपलीही पिढी प्रकाश घेत वाटा शोधू शकेल यासाठी हा लेखप्रपंच…
कोण हे महात्मा फुले?
स्त्री शिक्षणाचा प्रणेता, दलितांच्या उत्थानाचा उद्गाता आणि शेतकऱ्यासाठी शेतकीचं तत्त्वज्ञान मांडणारा पहिला हाडाचा माणूस म्हणजे महात्मा फुले. एकाच वेळी अनेक क्षेत्रांत काम करत प्रस्थापित मूल्यांची, परंपरांची चिकित्सा करत न पटणाऱ्या रूढींना नाकारणारा, सत्याचा अखंड शोध घेणारा समाजप्रवर्तक विचारवंत म्हणजे महात्मा फुले. प्रस्थापित मूल्यांना आणि पुरोहितशाहीनं निर्माण केलेल्या पोथीनिष्ठ समाजरचनेला सर्वप्रथम सुरुंग लावून उदध्वस्त करणारा बुलंद माणूस म्हणजे महात्मा फुले. ‘सत्यमेव जयते’ हे ज्यांचे नित्यव्यवहाराचं ब्रीद होतं, ते म्हणजे महात्मा फुले. हेच ब्रीद पुढे भारताचं ब्रीदवाक्य झालं!
फुल्यांना का स्मरावं?
समाजाची सूत्रं पुढील पिढीच्या हवाली करताना गतकाळाचा इतिहास, वैभव, घटना, कार्य, व्यक्ती या येणाऱ्या पिढीला सांगणं आणि त्यांची त्या पिढीच्या शब्दांत मांडणी करणं, त्यांना दृष्टी\व्हिजन देणं, हेच मागच्या पिढीचं कर्तव्य ठरतं. यातूनच नवी पिढी आपापल्या वाटा शोधून घेते. इतिहासाच्या पाऊलखुणावरच नवी पिढी आपली नवी वाट शोधते. फुले देखील कधीतरी तत्कालीन नव्या पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांनीही इतिहासाचा अभ्यास करून आपली स्वतःची नवी वहिवाट शोधली. म्हणूनच कदाचित छत्रपती शिवाजीमहाराजांची समाधी, त्यांचा इतिहास, त्यांच्या कार्यावर पोवाडा रचावा असं त्यांना वाटलं. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास त्यांनी सुरुवात केली. शिवाजीमहाराजांचं कार्य नव्या पिढीला कळावं, त्यांनी त्यातून बोध घ्यावा हाच फुल्यांचा त्यामागील हेतू होता. अस्पृशांसाठी काम, पहिली मुलींची शाळा, पुस्तक लेखन व प्रकाशन, उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक ते अनेक उद्योगांची आदर्श उभारणी, अशा अनेक कार्यांच्या प्रेरणांतून त्यांचा दृष्टीकोन, व्यवहारवाद अन सत्याची शोध घेण्याची\सत्य मांडण्याची\सत्य स्वीकारण्याची वृत्ती दिसून येते.
आज जातीच्या बेड्यांत अडकवलेल्या सर्व महामानवांना त्यातून मुक्त करत त्यांचं कार्य अखिल समाजासाठी प्रेरक-मार्गदर्शक कसं होतं, हे आमच्या पिढीला कळावं, यासाठी फुल्यांच्या कार्याचा आढावा घेणं आवश्यक ठरतं.
महात्मा फुले या युगप्रवर्तक महामानवाची समाजानं केवळ प्रतिमा स्वीकारली आणि विचार निव्वळ भाषणापुरते ठेवले. आजही या महामानवाला आपण प्रतीकांपुरतंच मर्यादित करतो आहोत. त्यांचे विचार, कार्य वाचण्याची, त्यावर चर्चा करण्याची, त्यांचे विचार आत्मसात करण्याची आजच्या काळाची गरज आहे. जो समाज आपला इतिहास विसरतो, त्याकडे दुर्लक्ष करतो, तो नवा इतिहास निर्माण करू शकत नाही. आज आपण आपल्या या महामानवाला जर केवळ प्रतिमांत बंदिस्त केलं तर येणाऱ्या पिढ्यांसाठी ते प्रतिमांपुरतेही उरणार नाहीत.
महात्मा फुल्यांचं महत्त्व काय? हे काही लेखकांचे मत असे आहे -
माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत म्हणतात – “महात्मा फुले सर्वार्थाने समाजाचे नेते होते. नेतृत्वाच्या अंगी लागणारे सर्व गुण त्यांच्यात होते. सर्वांगीण समाजक्रांतीचे उज्ज्वल ध्येय, ते साकार करण्याकरिता अविरत परिश्रम, पडेल तो त्याग आणि कष्ट सोसण्याची तयारी, आघाडीवर राहून सर्व धोक्यांना सर्वप्रथम सामोरे जाण्याची धैर्यशील वृत्ती, कृती आणि वाणीमध्ये अजोड मेळ, सत्याची कास, असत्याची-अपप्रवृत्तीची चीड, बाणेदार स्वभाव, शुद्ध चारित्र्य, स्वतंत्र प्रज्ञा आणि विशाल हृदय या गुणसमुच्चयाने त्यांचे जात्याच देखणे व्यक्तिमत्त्व तेजस्वी झाले होते. त्यांनी हाताळलेल्या सर्व समस्या वंचित, दलित, पीडित बहुजनसमाजाच्या दुःखाची मूलगामी कारणे होती. समाजचौकटीवरच प्रहार करून ती मोडून टाकून नवसमाजनिर्मितीचे स्वप्नं त्यांनी उराशी बाळगले होते. हजारो वर्ष जे नियम, ज्या श्रद्धा, परंपरा आणि रीतिरिवाज, समाजाने धार्मिक भावनेने, तथाकथित परमेश्वरी आदेशानुसार आणि धर्मग्रंथांच्या आधारानुसार जोपासल्या होत्या, त्यांच्यावर आघात करून अज्ञानी समाजाला जागृत करायचे, आणि त्यांनी मानेवर घट्ट पकडून ठेवलेले जू फेकून द्यायला त्यांना प्रवृत्त करायचे, हा त्या काळी समाजद्रोहच होता. स्वतःच्या स्वार्थाकरिता ज्यांनी बहुजनांच्या मानेवर जे हे जू ठेवले, त्याचा तर कडाडून विरोध होणारच. परंतु ज्यांची यातून सुटका करायची त्या पीडित समाजाचाही त्याला प्रखर असहकार. मानसिक गुलामगिरी ही सर्व गुलामगिरीत भीषण. कारण ती प्रवृत्ती होऊन बसते.’’
ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे म्हणतात – “हा माणूस तत्कालीन इंग्रजी शास्त्राप्रमाणे केवळ लिहिणारा-वाचणारा नसून सर्वस्वी नव्या प्रकारच्या जीवघेण्या चळवळीसाठी पायपीट करणारा, नाना तऱ्हेच्या माणसांमध्ये मिसळणारा, दुष्काळी कामे हाती घेणारा, त्या काळातल्या बुरसटलेल्या लोकांकडून एक-दोन आण्यांपासून वर्गण्या गोळा करून त्याचा चोख हिशेब ठेवून लोकोत्तर व लोकांत अप्रिय अशी स्त्री व शूद्र यांच्या शिक्षणाची कामे करणारा, स्वतः पुस्तके लिहून, प्रती करून, छापून स्वतः खपवणारा, शुद्रांस न्याय मिळवून देण्याकरिता किंवा शुद्रांच्या हुशार मुलांपैकी गरिबांची मुले फुकट शिक्षण घेण्याकरीता अर्ज करून, खेटे घालून कामे यशस्वी करून घेणाऱ्या अशा प्रकारचा हा माणूस असल्यामुळे त्याच्या लेखनात पंडिती कमकुवतपणा नाही. जोतिबा फुल्यांनी पहिल्यांदाच मराठी गद्यात श्रमिकांची व शुद्रांची भाषा उमटवली आहे. खेड्यापाड्यातील लोकांचे वाक्प्रचार, म्हणी, उच्चारानुसार लेखन इ. गोष्टी त्यांच्या लेखनात आढळतात.’’
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेले पु.ल. देशपांडे म्हणतात- “ज्या दुदैवी ब्राह्मण विधवांना कधी फुस लावून कधी जबरदस्तीने त्यांच्या शरीराचा उपभोग घेऊन केरेपोतऱ्यासारखे फेकून दिलेले होते. त्यांच्यावर महात्मा फुले नुसत्याच विलापिका लिहीत बसले नाही. तर त्या अभागी स्त्रियांची सावित्रीबाईकडून बाळंतपणे केली. एवढेच नव्हे तर अशी बाळंतपणे केली जातील अशी पाटी स्वतःच्या घराबाहेर लावली. त्या माऊलींची सुटका करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचे कार्य अधिक जोखमीचे होते. कारण त्यांच्या ह्या कार्याला विरोध करून त्यांचे जीवन असह्य करणारे कुणी परकीय राज्यकर्ते नव्हते, तर ते धर्मांध स्वकीय होते.”
आपण फुल्यांची शिकवण का विसरतोय?
महात्मा फुल्यांचे विचार हा जळजळीत निखारा आहे. तो १५० वर्षांपूर्वी जसा धगधगत होता, तसाच आजही आहे. त्यातील धग जराही कमी झालेली नाही. आपला मेंदू अन् हात तो निखारा पेलवण्यासाठी आजही धजावत नाही. ज्या समाजासाठी फुले झटले, झगडले; तो समाज तेव्हाही त्यांच्या विरोधात होता आणि आजही त्यांना पूर्णपणे स्वीकारायला तयार नाही. धर्म, जात, दैव, कर्मकांड यांचा आजही आपल्यावर इतका प्रचंड पगडा आहे की, फुले स्वीकारायचे म्हणजे ईश्वरीय हात आपल्या पाठीशी आहे, हे स्पष्टपणे नाकारणे. हा नकारच आपण उच्चशिक्षित देऊ शकत नाही किंवा त्यासाठी हिंमत करत नाही. परिणामी फुल्यांना आपला समाज विसरत चालला आहे. फुल्यांचे विचार आत्मसात न करता त्यांना फक्त प्रतिमांपुरते ठेवण्याचा वैचारिक आत्मघात आजचा समाज करतो आहे.
याबाबत लेखक भालचंद्र नेमाडे एक निरीक्षण नोंदवतात- तुकाराम, नामदेव, चक्रधर, लोकहितवादी यांना उचलून धरणाऱ्या समर्थ, भाषिक व जातीय परंपरा मराठी समाजात होत्या म्हणून हे प्रतिभावंत गाडले गेले नाहीत. या उलट फुल्यांना उचलून धरणारी कोणतीच समर्थ परंपरा महाराष्ट्रात गेल्या शंभर वर्षांत टिकली नाही. आधुनिक काळातल्या बहुतेक सर्व मराठी पुढाऱ्यांना आपआपल्या जातीचे भरपूर पाठबळ मिळालेले दिसते. परंतु फुले, वि.रा. शिंदे ह्या प्रतिभाशाली पुढाऱ्यांना मात्र असे पाठबळ मिळालेले दिसत नाही.
महात्मा फुल्यांनी स्वतःचा हौद अस्पृश्यांकरिता खुला करून, महार-मांगांच्या मुलांसाठी शाळा स्थापन करून जातीभेदविरोधी मोहिमेला सुरुवात केली. स्वतः व पत्नीला (महाराष्ट्राच्या इतिहासात बोटावर मोजण्याइतक्याच समाजसुधाकरांनी आपल्या जोडीला कुटुंबातल्या स्त्रियांना घेतल्याचं उदाहरण दिसतं!) सोबत घेऊन शुद्रांसाठी शिक्षकाचं कार्य केलं. त्यांच्या अनुयायांनी मात्र नेमकी त्यांच्या याच कृतीला बगल दिली. बोलक्या सुधारकांची भूमिका घेतली. आजही फुल्यांच्या नावाचा जप सोयीनुसार करणाऱ्या मंडळींमध्ये जातीय भेद मानणारेच अनेक आहेत, असं खेदानं म्हणावंसं वाटतं.
सामाजिक समतेचं फुल्यांचं स्वप्न एव्हाना साकार व्हायला हवं होतं. पण ते साकार होण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच दूर जात आहे. बहुजनसमाज यावर आत्मचिंतन करताना दिसत नाही. केवळ जयंती-पुण्यतिथी अन त्यांच्या पुतळ्यांना हार-तुरे इतकंच आपण त्यांना मर्यादित करून टाकलं आहे. एकदा पूर्वजन्म, प्रारब्धयोग, ग्रहयोग वगैरे मानलं की, मग फुले, आंबेडकर, गाडगेमहाराज वगैरे महापुरुष पुतळे उभारून, जयंत्या-मयंत्या साजऱ्या करून आपल्या सोयीनुसार आठवण करण्याच्या व विसरून जाण्याच्या पातळीवर राहतात.
पु.ल देशपांडे असं म्हणतात की, फुले मानायचे म्हणजे पूर्वजन्म आणि कर्मसिद्धान्त ही दरिद्री जनतेने गरिबी विरुद्ध बंड करून उठू नये म्हणून केलेली फसवणूक आहे हे मान्य करावे लागेल. देवळातला देव दिनांचा वाली आहे, ह्या श्रद्धेने सारे काही आपोआप चांगले होईल ही भावना टाकून द्यावी लागेल. जोतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल तर जात, वर्णवर्चस्व, मुर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करावा लागेल.
ज्यांचा उद्धार करायचा त्यांचीच उदासीनता ही फुल्यांना आपल्या कार्यातला सगळ्यात मोठा अडसर अन दुःखही ठरले आहे. फुल्यांच्या १२९व्या पुण्यतिथीला हेच दुःख कायम आहे. न्यायमूर्ती पी.बी. सावंत खंत व्यक्त करतात की, मानसिक गुलामगिरीचा मंत्र गाडून टाकून स्वतंत्र विचाराला जे पटेल तेच मान्य करा. जोतिबांचा सत्य धर्माचा आदेशच आजची आपली उच्च शिक्षित पिढी पार विसरून गेली आहे. शेवटी बहुजनसमाज हा इतरांनी दिलेल्या ज्ञानावर गुजराण करणारा घाणीचा बैलच राहिला आहे. जिथे विचारातच क्रांती नाही, तिथे समाजक्रांती कशी होणार? जोतिबांच्या समता चळवळीचा रोख समाजस्थित्यंतराकडे होता. परंतु त्यांच्या खऱ्या विचारांची ज्योत पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचलीच नाही. पोचल्या त्या, ज्योतीवर दुसऱ्यांनी पेटवलेल्या स्वतःच्या दिवट्या. ज्योत तिथेच थबकून राहिली. आजच्या पिढीने त्यांची ही सत्यधर्माची आणि सामाजिक समतेची ज्योत हाती घेऊन समतेवर आणि शाश्वत मूल्यांवर आधारलेल्या नवसमाजनिर्मितीसाठी पुढे सरसावणं आवश्यक आहे.
या महात्म्याच्या विचारांची मशाल आम्ही पुढे नेऊ शकू का? त्यांनी जे विचार रुजवण्याचा तहहयात प्रयत्न केला, आम्ही ते समजून तरी घेणार आहोत का, की आपण या बाबत कपाळ करंटेच ठरणार आहोत?
.............................................................................................................................................
लेखक निखिल परोपटे मुक्त पत्रकार आहेत.
nparopate@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 02 December 2019
निखील परोपटे,
तुम्ही लिहिलंय की :
माझ्या मते याचं कारण असं की तुकाराम, नामदेव, चक्रधर, लोकहितवादी या लेखकांनी जनतेला कधीही दोष दिला नाही. जनतेत कितीही अवगुण असले तरी तिच्या श्रद्धांना ठेच पोहोचवली नाही (किंवा नसावी). फुल्यांनी सरसकट ईश्वराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं ते ठीक आहे. पण मग निर्मिक या संज्ञेचा आधार कशासाठी घेतला? हा विरोधाभास नव्हे काय? कुण्या ब्राह्मणाने कर्मसिद्धांताचा आधार घेऊन जर तत्कालीन अन्यायाची भलामण केली तर तो कर्मसिद्धांताचा दुरुपयोग झाला ना? पण फुले तर कर्मसिद्धांतास चुकीचं ठरवून त्यास ब्राह्मणांची पोट भरायची सोय असं म्हणतात. ते जनतेला रुचंत नाही. कारण लोकांना 'करावे तसे भरावे' याचा प्रत्यक्ष अनुभव आलेला असतो. ज्या समाजात आपण सुधारणा पाहू इच्छितो, त्याच्या कलाकलाने घ्यायला हवं ना?
तीच गोष्ट ब्राह्मणविरोधाची. फुकट्या ऐतखाऊ भिक्षुकांना केलेला विरोध योग्यंच आहे. पण विरोधाकरता विरोध कधीच समर्थनीय नाही. 'शेतकऱ्यांचा आसूड' या पुस्तकात ते ब्राह्मणांच्या विरोधात इतके वाहवत गेलेत की चक्क शिवाजीमहाराजांना अशिक्षित म्हणून घोषित केलंय. लोकांच्या श्रद्धेय स्थानाला धक्का लागतो ना अशाने? त्यामुळे फुल्यांचे विचार व कार्य कितीही उदात्त असलं तरी त्यांची परंपरा लोकांना आपलीशी वाटंत नाही.
आपला नम्र,
गामा पैलवान