अजूनकाही
सध्या महाराष्ट्रात जे काही चालू आहे, ते पाहून अनेकांना ‘सिंहासन’ या चित्रपटाची आठवण होत असेल. जब्बार पटेल दिग्दर्शित व विजय तेंडुलकर लिखित या चित्रपटाचे कथानक बेतले होते प्रसिद्ध मराठी-इंग्रजी पत्रकार, कथा-कादंबरीकार अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या दोन कादंबऱ्यावर. साधूंच्या मूळ चित्रदर्शी भाषेला तेंडुलकरांनी पडद्याच्या भाषेत दोन्ही कादंबऱ्यांचे बेमालूम मिश्रण करून गुंफले आणि ‘सामना’ या पहिल्याच चित्रपटाच्या यशस्वी पदार्पणासह जब्बार पटेल यांनी ‘सिंहासन’ही ऑल टाईम ग्रेट सिनेमाच्या पंक्तीत नेऊन ठेवला. विशेष म्हणजे साधू व तेंडुलकर हे दोघेही तत्कालीन वृत्तपत्रीय पत्रकार होते. आपल्या नोकरीतील दैनंदिन नित्यनूतन घटना व अनुभव यांचा अत्यंत कसदार वापर या दोघांनी आपल्या सृजनात्मक लिखाणात केला. आज असे किती पत्रकार आपल्याला दिसतात, ज्यांच्यामध्ये ही क्षमता आहे?
तेंडुलकर-साधू ज्या काळात पत्रकारिता करत होते, तो काळ मुद्रित माध्यमांचा म्हणजे मुख्यत्वे वर्तमानपत्रांचा होता. वर्तमानपत्रेही काळ्या शाईत स्वस्त न्यूजप्रिंटवर छापली जायची. ऑफसेट छपाईचा काळ अवतरायचा होता. पण या काळ्या शाईत छापल्या जाणाऱ्या बातमीला, वृत्तांताला, लेखाला वा इतर मजकुराला सोन्यापेक्षा अधिक मूल्य होते.
टिळक-आगरकरांची नावे घेतल्याशिवाय आजही मराठी पत्रकारितेचा इतिहास सुरू होत नाही की, संपत नाही. पण आज ज्या प्रकारची पत्रकारिता आपण अनुभवतोय, ती पाहता टिळक-आगरकर तर लांबच राहिले, पण आचार्य अत्रे, ग. त्र्यं. माडखोलकर, अनंत भालेराव, गोविंद तळवलकर, ह.रा. महाजनी, माधव गडकरी यांच्या काळात जी पत्रकारिता होती, ती तरी आज उरली आहे का?
त्यात २४ तास वृत्तवाहिन्यांनी सुरुवातीचे नावीन्य गमावल्यानंतर दशकभरापूर्वीच भूताखेतासह, जन्म, राशी, कुंडली यासह जो काही धिंगाणा घातला, तो भारतीय परिवर्तन व विवेकी चळवळींना पराभूत करणारा ठरला. २०१४नंतर तर पत्रकारितेचे स्वातंत्र्य लिलावातच निघाले. यात वृत्तवाहिन्या आघाडीवर, तर मागील दाराने मुद्रित माध्यमेही.
मराठीपुरता विचार केला तर मुद्रित माध्यमे आजही बऱ्यापैकी आश्रित परिघाच्या बाहेर आहेत. त्यातही आपण अधिक नैतिक व इतरांना भुक्कड समजणाऱ्या टेंभेकरांचीही भूमिका सोयीनुसार बदलते. काय लिहायचे, काय नाही लिहायचे यातले गुप्त तह चाणाक्ष वाचक ओळखतातच. वृत्तवाहिन्यांवर बौद्धिक दिवाळखोरीचा रात्रंदिन उत्सवच चालू असतो. नमुन्यादाखल एक -
आत्ताची सर्वांत मोठी बातमी
अजित पवार यांची गाडी पार्किंगमधून काढून गेटजवळ आणलीय. अजित पवार आता बाहेर पडतील. पण ते कुठे जातील हे पाहणे इंटरेस्टिंग असेल!
मुद्दा असा, एका मोठ्या कादंबरीचा, चित्रपटाचा ऐवज समोर दिसत असताना हे आव्हान समर्थपणे पेलेल असा लेखक/पत्रकार नजरेसमोर येत नाही.
तरीही थोडा विचार करता ज्येष्ठांपासून सुरुवात करायची तर रंगनाथ पठारे हे नाव समोर येतं, कारण ‘ताम्रपट’ व आता ‘सातपाटील कुलवृत्तांत’मधून त्यांनी दमसास सिद्ध केलाय. अशाच दमसासातले दुसरे नाव विश्वास पाटील. पण आरोप-प्रत्यारोपापलीकडे जाऊन त्यांच्या लिखाणाची नीट समीक्षाच झालेली नाही.
पत्रकारांत ज्येष्ठांत सुरेश द्वादशीवार यांच्याकडे तो दमसास दिसतो.
या ऐवजाचे ललित रूपांतर न करता घटनाक्रमासह नोंद करून त्याला वेगळ्या दस्ताऐवजाचे रूप कुमार केतकर देऊ शकतात. पण एकेकाळी ‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ हा ग्रंथ लिहिलेले केतकर आज तितक्या उत्साहाने लिहू शकतील का? शिवाय ठाम भूमिका घेतल्याने पत्रकार म्हणून जी तटस्थता लागते, ती ते कितपत ठेवू शकतील?
नंतरच्या पिढीत विनय हर्डीकर, जयदेव डोळे, निखिल वागळे, हेमंत देसाई, प्रकाश अकोलकर, सुरेश भटेवरा, गिरीश कुबेर असे दस्तऐवजीकरण करू शकतील. त्यांचेही ग्रह-पूर्वग्रह आहेत, पण अभ्यास, आकलन, विश्लेषण, शैली याबाबत या सर्वांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे.
उत्तम कांबळे, संजय आवटे यांच्या लिहिण्याच्या क्षमता आहेत. पण सुचलं आणि लिहिलं यामध्ये जो चिंतनासाठी काळ द्यावा लागतो, ते तो कितपत देतील याबद्दल शंका वाटते.
नव्या पिढीत खूप नावे आहेत. पत्रकार-कथाकार समर खडस, जयंत पवार, मिलिंद किर्ती, प्रविण दशरथ बांदेकर, राजन गवस, सतीश तांबे, रमेश इंगळे उत्रादकर…
दस्ताऐवजीकरण करणारे लेखन विनोद शिरसाठ, रवि आमले, राम जगताप, मुकेश माचकर, अतुल कुलकर्णी, प्रताप आसबे, समीरण वाळवेकर, विजय चोरमारे, अशा पैकी कुणी हे काम करेल?
लेखिकांमध्ये राही भिडे, संध्या नरे पवार, वैशाली रोडे, मॄणालिनी नानिवडेकर, दीप्ती राऊत, अलका धुपकर, शिल्पा कांबळे, कल्पना भोसले, यांच्यासह नीरजा वा प्रज्ञा दया पवार आव्हान स्वीकारतील?
चित्रपटात महेश मांजरेकर, निशिकांत कामत, गजेंद्र अहिरे (त्यांनी मध्ये ‘सिंहासन-२’ची घोषणाही केली होती) सुमित्रा, सुनील, उमेश गिरीश कुलकर्णी, गिरीश मोहिते, शिवाजी लोटन पाटील, अजित शिरोळे, प्रवीण तरडे, राजेश मापूसकर अशी अनेक नावे आहेत.
मुद्दा आहे हे नाट्य समजून घेऊन पक्षीय मत-मतांतरांच्या पलीकडे जाऊन महाभारतासारखे या सत्तानाट्याचे पापुद्रे दाखवून मूळ ‘सिंहासन’च्या पुढे जाणारी गॉडफादरसारखी उत्कंठावर्धक तरीही समग्र मांडणी यातून कोण करू शकेल?
गेल्या पाच वर्षांत ज्या पद्धतीने सरकारपसंद चित्रपट तयार झाले, तशी भाटगिरी विरहित एक उत्तम कलाकृती करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, हे मात्र खरं.
राजकीय आपत्ती कलात्मक इष्टापत्ती म्हणून पहायची, साधायची कधी नव्हे ती अनेक वर्षांनी मराठीत संधी आलीय. ती साधेल कुणीतरी ही आशा.
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sun , 01 December 2019
आयशप्पत संजय पवार, तुमची यादी वाचून लई करमणूक झाली. तुम्ही अशाही पद्धतीने मनोरंजन करता हे पाहून अंमळ गंमत वाटली. तुम्ही राजू परुळेकर हे नाव ऐकलंय का? अनेक प्रसिद्ध लोकांच्या अनेक मुलाखती घेऊन त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रस्तुत यादीत त्यांचं नाव नसल्याचं पाहून जास्तीची करमणूक झाली. असो.
आपला नम्र,
गामा पैलवान
ramesh shinde
Fri , 29 November 2019
"‘सिंहासन – २’ लिहिण्याची /चित्रित करण्याची क्षमता असलेला कुणी लेखक/पत्रकार/दिग्दर्शक दिसतोय या नाट्यमय काळात?" या प्रश्नाचे उत्तर जे असेल ते असो. परंतु, संजय पवार यांनी आता असे लेख पाडण्याचे काम थांबवणे मराठी समाजाच्या दृष्टीने व पुरोगामी चळवळीच्या दृष्टीने इष्ट ठरेल! त्यांच्यात निरीक्षणाचीही अथवा विश्लेषणाचीही क्षमता दिसून येत नाही. सदरहू लेखात केवळ नावांची जंत्री देऊन काय साधले, महाशय? आपल्याला भविष्यातही सदरलेखनासाठी मंच उपलब्ध होतील, पटकथा लिहिण्याची कामे मिळतील, मराठी साहित्याच्या पुरोगामी वर्तुळात आपले स्थान अबाधित राहील, अशी तजवीज करण्यासाठीच एवढी नावे लिहिली काय? श्री. पवार यांच्या लेखांमध्ये अनेकदा तथ्यांचा अपलाप झाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी थोडा दम धरणे गरजेचे आहे. अन्यथा स्वतःसह सर्व पुरोगामी विचारांच्या चळवळीचा ते तेजोभंग करतील, हे सुज्ञास सांगावायला नको!