अजूनकाही
आज आणि उद्या, म्हणजे २३ व २४ नोव्हेंबर २०१९ रोजी अमळनेर इथं ‘विभागीय खानदेशी बोली मराठी साहित्य संमेलन’ होत आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर आयोजित या संमेलनाचे अध्यक्ष कथाकार व कादंबरीकार अशोक कौतिक कोळी यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
माझ्या लेखनात काही विशिष्ट भूमिका वगैरे आहे का? तर आहे! निश्चित आहे... मी एका विशिष्ट भूमिकेतून लेखनाकडे वळलेलो आहे, हे मी खात्रीने सांगू शकेन! लेखक-कलावंताने अशी कुठली भूमिका घेतली पाहिजे का? तर निश्चित घेतली पाहिजे, असेही माझे मत आहे! त्याशिवाय त्याच्या लेखनाला मूल्य प्राप्त होणार नाही. लेखनाचे प्रयोजन केवळ कलेसाठी कला असे असता कामा नये. केवळ मनोरंजनासाठी लेखन ही गोष्ट मला मान्य नाही. तर लेखक कलावंताने आपली विशिष्ट अशी भूमिका घेतलीच पाहिजे आणि त्याबरहुकूम वाटचालही केली पाहिजे. घेतलेली भूमिका टाकून देता कामा नये. त्यासाठी क्षणिक प्रलोभनांपासून दूर राहता आले पाहिजे. प्रसंगी मानअपमान पचवता आले पाहिजेत. त्यासाठी मनाची निश्चितता, निग्रहपूर्वक साधना योजावी लागेल. तेव्हाच या हृदयीचे त्या हृदयी होईल... तेव्हाच लेखकाची निष्ठा सिद्ध होईल... जो आपल्या मूल्यांशी, भूमिकेशी ठाम असेल तोच लेखक कलावंत यशस्वी होईल. प्रसंगी तात्पुरती अवहेलना, अपमान त्याच्या वाट्याला येईल, पण एवढ्यातेवढ्याने तो डगमगून जाणार नाही. विशेष करून शासनकर्त्यांच्या दहशतीपुढे तो झुकणार नाही. असाच लेखक कलावंत आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठीच आजच्या संमेलानाचे प्रयोजन आहे, असे मला वाटते.
जो अन्याय, अत्याचार, मुस्कटदाबीच्या विरूद्ध बोलणार आहे, अशा कलावंताच्या पाठीमागे हे व्यासपीठ निश्चित उभे राहाणार आहे. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठीच असते. तो, या शहराने अनेक वेळा अनुभवलाय, नव्हे क्रांतीची, परिवर्तनाची ही भूमीच आहे. साने गुरुजींनी याच भूमीत क्रांतीची ज्योत पेटवली. आपल्या कार्यकर्तृत्वाने सारे रान पेटवून दिले. जगाला खरा धर्म कोणता हे सांगत मानवता धर्माची पताका तेवत ठेवली. कामगारांचा संप घडवून आनलाय. स्वातंत्र्य समरात येथूनच उडी घेतली. ‘श्यामची आई’सारखी अजरामर कलाकृती सादर केली. म्हणूनच या व्यासपीठावरून उभा राहणारा लेखक कोणती भूमिका घेणार आहे याला महत्त्व आहेच.
कोणत्याही काळात लेखकाच्या भूमिकेला महत्त्व असतेच. लेखक आपली भूमिका कोणाच्या बाजूने मांडतो. आपलं वजन तो कोणाच्या पारड्यात टाकतो याला महत्त्व आहेच. साहित्यिक -कलावंत म्हणून तो, कोणाच्या बाजूने उभा आहे, याला महत्त्व आहे. अर्थातच माझी भूमिका स्पष्ट आहे. माझी लेखणी नेहमीच शोषित, वंचित, पीडितांच्या बाजूने उभा राहिलेली आहे. म्हणजेच साने गुरुजींनी दाखवलेला मार्ग माझ्या लेखणीने अनुसरलेला आहे. याचा मला आनंदच आहे. लेखकाने नेहमीच व्यवस्थेसोबत वहावत जाता कामा नये. तर त्याने शोषित, वंचितांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. प्रसंगी सवंग प्रसिद्धी, पुरस्कार, खोटी मानमरारद नाही मिळाली तरी चालेल. यापैकी थोड्याबहुतांचा अंश लाभल्यानेच, या वाटेवरचा थोडाबहुत प्रवासी असल्यानेच हा अध्यक्षपदाचा मुकुट मला मिळाला आहे, असे मी मानतो.
त्यासाठी कारणीभूत ठरले आहे अर्थातच माझे लेखन. कुठलाही लेखक हा त्याच्या कलाकृतींतून बोलत असतो. अर्थातच माझी भूमिका मी माझ्या लेखनातून वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती संबंधितांनी जरूर तपासून बघावी. माझे लेखन मी कुणालाही खुश करण्यासाठी किंवा कुणाच्याही क्षणभर करमणुकीसाठी केलेले नाही. करमणूक, मनोरंजनासाठी इतरत्र भरपूर पर्याय उपब्ध आहेत. त्यासाठी अस्सल लेखकांनी लेखणी झिजवण्याची गरज नाही. म्हणूनच मी माझ्या लेखनाची प्रेरणा मनोरंजनाऐवजी माझ्या अवतीभवतीच्या माणसांची दुःखं, वेदनांना मुखर करण्यात मानली. काय होत्या आणि आहेत माझ्या लेखन प्रेरणा?
वाचन करत असताना माझ्या असे लक्षात आले की, आपल्या खानदेशी बोलीत भरघोस असे गद्यलेखन झालेलेच नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि प्रदेशातील बोलीतून ‘गोतावळा’, ‘बनगरवाडी’, ‘टारफुला’, ‘चौंडकं’ –‘भंडारभोग’ इत्यादी कलाकृती वाचायला मिळाल्या. मराठवाडा बोलीतील ‘पाचोळा’, ‘गांधारी’, वैदर्भीय बोलीतील ‘धग’, ‘मेड इन इंडिया’, ‘तहान’, ‘बारोमास’, तसेच कोकणी बोलीतील ‘माहिमची खाडी’, ‘इंधन’, मुंबईकडची ‘चक्र’ वगैरे ही यादी पुढे वाढवता येईल. मात्र येथे नमुना म्हणून काहीच नावे घेतली आहेत. या सर्व कलाकृतींचे वाचन करताना माझ्या लक्षात आवर्जून एक गोष्ट आली. ती म्हणजे या सर्व कलाकृती महान आहेत. ज्यांच्या त्यांच्या जागी श्रेष्ठ आहेत. एक उणीव मला मात्र त्या सर्वांमध्ये दिसली. तशी तर ती उणीव नाहीच. फार तर बारकुले निरीक्षण म्हणता येईल. ते निरीक्षण कोणते? तर या कलाकृतींमधून मला माझ्या आसपासचा माणूस दिसला नाही. माझ्या आसपासचा प्रदेश दिसला नाही. येथील कष्टकरी, शोषित, वंचितांचे वास्तव जिणं मला दिसलं नाही. त्याच्या सुख-दुःखाच्या गोष्टी दिसून आल्या नाहीत. कशा येणार? हे सगळे लेखक त्या त्या भौगोलिक परिप्रेक्ष्यातून आपापल्या प्रदेशातून आलेले होते आणि आपला अनुभव, आपला भवताल त्यांनी त्या त्या कलाकृतींतून जोरकसपणे मांडलेला होता.
अभ्यासक्रमातील धडे, कविताही याला अपवाद नव्हत्या. अभ्यासक्रमातील काही कलाकृतींतून विशेषतः कवितांतून माझ्या खानदेशी भूमीचे थोडेबहुत दर्शन घडत होते. मात्र ते मला पुरेसे वाटत नव्हते. ‘श्रावण मासीं हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे’ अशी स्थिती मला येथे कधी दिसून आली नाही किंवा लकाकणारी बोरही माझ्या दृष्टीपथात आली नाही.
तर या बाबतीतला माझा अनुभव काय होता? मी जगत असलेला, अनुभवत असलेला खानदेश या पाश्वभूमीवर मला वेगळा दिसला. खानदेशातील बालकवींच्या कवितेतील मखमली गालिच्याची हिरवळ मला दिसली नाही. ती, केव्हाच दुरापास्त झालेली होती. लकाकणारी बोरही कुठे दिसत नव्हती. त्याऐवजी अस्मानी-सुलतानी दुष्काळाने होरपळलेला खानदेश मला दिसत होता. एक काळ असा होता, येथे बारमाही वाहणाऱ्या आणि तुडुंब भरलेल्या नद्या होत्या. केळी, कापूस, काव्याचे भरभरून पीक देणारी सुपीक जमीन होती. आज त्या जमिनीला नापिकीने घेरलंय. तिच्यातील सृजन धनदांडग्यांनी हिरावून घेतलंय. आजमितीला येथला देवभोळा कास्तकार कर्जाचा डोंगर उपसता उपसता स्वतःच मातीमध्ये गाडला जात आहे. त्याच्या काळ्या कसदार सुपीक जमिनीवर शहरातल्या धनदांडग्यांची वक्रदृष्टी पडली आहे. परिणामी ही जमीन झपाट्याने बिनशेती, पडीक, नापिक बनत आहे.
वीज नाही, पाणी नाही शेतमालाला भाव नाही. भाव ठरवण्याचा अधिकार नाही. परिणामी तणावात जगत असलेला येथला कास्तकार दिवसेंदिवस दारिद्र्याच्या खाईत ढकलला जात आहे. शासनाचे धोरण याला कारणीभूत आहे. आश्रयदाताच त्याचा शोषणकर्ता ठरला आहे. ज्याच्याकडे वारंवार अपेक्षेने पाहावे त्या नेत्वृत्वाकडूनच तो नागवला जात आहे. बी-बियाने, खतांचे वाढते भाव, भ्रष्ट शासन प्रशासन, कर्जदार सावकार, सहकारी सोसायट्या, पतपेढ्या, बँका, जागतिकीकरणाच्या वाटेने आलेल्या विविध मल्टी नॅशन्शल कंपन्यानी आवाळलेला घट्ट पाश यांच्या चक्रव्यूहात येथला कास्तकार अडकून पडला आहे. या सर्व शोषणकर्त्या वर्गाने अपरिमित धुडगूस घातल्याने येथला शेतीव्यवसाय आतबट्ट्याचा ठरला आहे.
शोषणवादी वृत्तीचा पुढारी, सावकार, शासक-प्रशासक ही येथल्या काळ्या कसदार सुपीक जमानीला नापीक करणारी हरळी-कुंध्याची बेटं ठरली आहेत. या चिवट तणकटाने येथल्या शेतीभातीसह गावगाड्याला पुरते ग्रासून टाकले आहे. सबंध गावगाड्याला वेढून असलेल्या या लागट तणकटाला इच्छा असूनही खोदून काढणे, मुळासकट नष्ट करणे शेतकऱ्यांसाठी दुरापास्त झाले आहे. आजमितीला शेतात पीक कमी आन् ‘कुंधा’ जास्त झाला आहे. परिणामी शेती मरणपंथाला लागली असून शेतकरी आत्महत्यांची मालिका उभी ठाकली आहे. या सगळ्यांचा संदर्भ घेऊन माझ्या हातून ‘पाडा’, ‘कुंधा’, ‘दप्तर’, ‘रक्ताळलेल्या तुरी’, ‘गावाच्या तावडीतून सुटका’ यासारख्या कादंबऱ्या लिहून झाल्या ही माझ्यासाठी निश्चितच समाधानाची बाब ठरते. ‘कूड’, ‘सूड’, ‘आसूड’, ‘उलंगवाडी’सारख्या कथासंग्रहांतून माझ्या निर्मिती प्रदेशातील भवतालाला आकळण्याचे काम माझ्या हातून काही प्रमाणात झाले आहे.
खानदेशची माती तिच्या प्रसवशील प्रतिभेची साक्ष देणारी मऊ, भुसभुशीत जमीन आहे. केळी, कापूस, आणि काव्याचं भरभरून पीक देणारी ही माती जशी निर्मितीक्षम तसाच येथला कास्तकार सुद्धा उद्यमशील कष्टकरी आहे. मात्र वर्तमानकाळात अनेक संकटांनी त्याला पुरते घेरून टाकलेले आहे. त्याच्या गळ्याभोवती मृत्यूचा फास आवळणा-या प्रवृत्तींचा समाचार घेण्याचे व्यसनच जणू माझ्या लेखणीला जडलेले आहे. हे सगळे प्रयत्न खास खानदेशी बोलीतून झाल्याने खानदेशी ‘तावडी बोली’ला वाडःमयीन प्रतिष्ठा आणि ती भाषा बोलणाऱ्या समूहाच्या जगण्याला साहित्याची आशयवस्तू होण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे. मला तुमच्या पर्यंत पोहचवण्यात माझ्या या बोलीचाच खारीचा वाटा आहे, याची मला नम्र जाणीव आहे. नव्हे तिच्या प्रेमळ सहवासामुळेच मी या पदावर विराजमान झालो आहे.
माझी बोली माझ्यासाठी सर्व काही आहे. असे असले तरी इतर भाषाभगिणींबद्दल, बोलींबद्दलही माझ्या मनात ममत्व आहे. तावडी बोली माझी आई असली तर इतर खानदेशी बोली माझ्या माय - मावश्या आहेत. अहिराणी, पावरी, मावची, भिलाऊ, गुजरी, लेवागणबोली या खानदेशी बोली सगळ्या एकाच गोतातील आहेत, असे मी मानतो. त्यामुळे त्यांसर्वांविषयी आनंद, अभिमान बाळगणे मी माझे कर्तव्यच समजतो. शेवटी कुठलाही लेखक-कलावंत थेट आभाळातून कोसळत नाही. त्याच्या जडणघडणीत अनेक घटकांचा सहभाग असतो. समाज, संस्कृती व तेथील भाषिक सत्व शोषून घेतल्याशिवाय लेखक घडू शकत नाही. त्याच्या लेखकीय बाहूत बळ येऊ शकत नाही, असे मी मानतो. या अन्वेशीय परिवेशातच मी मला शोधतो. तेव्हा माझेच व्यक्तिमत्त्व उजळून निघते.
मी, अशोक कौतिक कोळी या व्यक्तिमत्त्वाने तुमच्यासमोर उभा असलो तरी माझ्यातील सारे सत्व येथील समाजाचे आहे. माझ्या बोली भाषेचे आहे, याची मला जाणीव आहे. खरे तर मी निमित्तमात्र आहे. येथल्या शोषित, पीडित, वंचितांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या समोर उभा आहे. त्यामुळे आजचा हा सन्मान माझा नसून त्या सर्वांचा आहे. गोरगरीब कष्टकरी समाजाचा आहे. हा सन्मान माझ्या पूर्वसुरींचा आहे. माय सरोसती बहीणाईचा, पूज्य साने गुरुजींचा आहे. मित्रांनो खानदेशच्या पुण्यभूमीत हा गौरव होतो आहे, ही माझ्यासाठी मोठीच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. या क्षणाला मी जन्मभर विसरू शकणार नाही.
.............................................................................................................................................
लेखक अशोक कौतिक कोळी कथा-कादंबरीकार आहेत.
ashokkautikkoli@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sun , 24 November 2019
अशोक कौतिक कोळी,
तुमचं हे विधान वाचलं :
एक विनंती आहे. तुम्हाला खानदेशी भाषेत व्यक्त व्हायचंय ना? मग खुशाल व्यक्त व्हा. ते सरकारच्या दहशतीविरुद्ध वगैरे जे काही आहे ना, ते कधीही ध्येय असू शकंत नाही. मुंबईपुण्याच्या शहरी नक्षल्यांनी अशी जनतेची एक समजूत करवून दिलीये की जातिवंत साहित्यिकाने सरकारच्या विरोधात लिहिलंच पाहिजे.
जेव्हा खरंच अशी वेळ आलेली ना, तेव्हा हेच तथाकथित साहित्यिक पायांत शेपूट घालून निमूट राहिले होते. मी १९७५ च्या आणीबाणीविषयी बोलतोय. अपवाद फक्त पु.ल.देशपांडे आणि दुर्गाबाई भागवतांचा. त्यातल्या दुर्गाबाईंचा मूळ पिंड संशोधिकेचा. त्यामुळे सरकारी दहशतीविरुद्ध खंबीरपणे भूमिका घेणारा निव्वळ साहित्यिक म्हंटलं तर फक्त पु.ल.देशपांडेच उरतात. त्यांनी आणीबाणी वगळता सरकारवर कधीही टीका केली नाही, किंवा व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने बोंबा मारल्या नाहीत. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर त्यांचं ध्येय माणसाला हसवणं हे होतं. भूमिका घेणं नव्हे.
तुम्ही शासनाविरुद्ध भूमिका जरूर घ्या, पण ते तुमचं ध्येय नव्हे. खानदेशी भाषेला उर्जितावस्थेत आणणं हे तुमचं ध्येय आहे. तुमच्या कार्यसिद्धीस शुभेच्छा.
आपला नम्र,
-गामा पैलवान