अजूनकाही
‘पागलपंती’चा ट्रेलर पाहून सदर चित्रपटाच्या वाईट असण्याच्या जितक्या शक्यता उद्भवतात, तितका वाईट तो नक्कीच नाही. ना तो खूप वाईट आहे, ना खूप चांगला. तो फक्त आहे, असायचं म्हणून आहे. चित्रपटकर्त्यांना तो निर्माण करता आला म्हणून आहे, नि तो पाहणारा प्रेक्षक अस्तित्वात आहे म्हणून आहे. तो वेळोवेळी विनोदीदेखील आहे. पण, हे विनोद एखाद्या विनोदी विधेतील चित्रपटात जितक्या संख्येनं असावेत, तितक्या प्रमाणात नाहीत. झालंच तर त्याचं नावच त्याबाबत अधिक बोलकं ठरणारं आहे. चित्रपट वेडेपणानं भरलेला आहे. तो वेडेपणा विनोदी असेलच असं नाही, पण तो आहे इतकं मात्र खरं.
चित्रपटाचा काही भाग, त्यातील काही मध्यवर्ती कल्पना या ‘गोलमाल ३’ (२०१०), हाउसफुल (२०१०), खुद्द दिग्दर्शक अनीस बाझमीचा कल्ट चित्रपट ‘वेलकम’ (२००७) अशा चित्रपटांकडून उसन्या घेतलेल्या आहेत. चित्रपटातील पहिलंच (तथाकथित) विनोदी दृश्यं ‘गोलमाल ३’मधील फटाक्यांच्या जळत्या दुकानांच्या दृश्याच्या धर्तीचं आहे. त्यामुळे अनेकदा दृश्य सुरू होताच आपल्या पुढे काय वाढून ठेवलं आहे, हे लक्षात येतं.
राज किशोर (जॉन अब्राहम) हा आयुष्यात साडेसाती मागे लागल्यानं अपयशी ठरलेला तरुण जंकी (आर्शद वारसी), चंदू (पुलकित सम्राट) यांच्यासोबत लोकांना चुना लावत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम करतो. त्याचं नशीब ‘हाऊसफुल’मधील अक्षय कुमारच्या पात्रासारखं आहे. जिथं जाणार तिथं नुकसान त्याचा पिच्छा पुरवतं. जंकी-चंदूच्या माता-पित्याचे नि संजना-मामाजी (इलियाना डिक्रुझ-ब्रिजेंद्र काला) या दोघांचे पैसे गडप करून उभे केलेले व्यवसाय तोट्यात घातल्याच्या घटनांनी त्यांचा संबंध राजासाहेब (सौरभ शुक्ला), वाय-फाय भाई (अनिल कपूर) या डी कंपनीशी येतो. या दोन डॉनचे पैसे परत करण्यासाठी म्हणून त्यांना त्यांच्याकडे काही जीवघेणी कामं करावी लागणार असतात. आधी उल्लेख केल्याप्रमाणे इथले बरेचसे विनोद, दृश्यं किंवा त्यांच्या संकल्पना या जुन्या चित्रपटांमधून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या घेतलेल्या आहेत.
तर या ढोबळ कथानकाभोवती असंबद्ध रीतीनं काही प्रसंग, काही लोक जोडले जाऊन त्यातून विनोदनिर्मिती करण्याची कधी अपयशी ठरणारे, तर कधी यशस्वी ठरणारे प्रयत्न केले जातात. टुल्ली (झाकीर हुसैन) आणि बुल्ली (अशोक समर्थ) हे दोन इतर डॉन आधीच्या डॉनचे शत्रू म्हणून इथं येतात. (या दोघांवर कुठलाही विनोद करणं मी टाळत आहे. त्यांची नावं पुन्हा वाचून हसून घ्यावं!) नीरज मोदी या भारतातील बँकांना लुबाडून लंडनला आलेल्या गुजराती माणसाभोवती एक लांबलचक उपकथानक उभं केलं जातं. त्याच्यामुळे मध्यवर्ती पात्रांचा संबंध एका पछाडलेल्या बंगल्याशी आणि एका भूताशी (ऊर्वशी रौटेला) येतो, ज्यातही पुन्हा काही ट्विस्ट येतात. ‘पागलपंती’ची एकूणच पटकथा फारच विस्कळीत आहे. इथं केवळ काही विनोद करायचे म्हणून ओढूनताणून त्या त्या प्रसंगांचं कथानकात उपयोजन केलं जातं.
‘मूर्खपणातून निर्माण झालेले विनोद’ हा प्रकार समजण्यालायक असला तरी त्यात एक उपजत सहजता असायला हवी असते, जी इथं अगदीच मोजक्या ठिकाणी आढळते. (इन्स्टंट ग्ल्यूशी निगडीत एका लांबलेल्या दृश्याकडे अशी सहजता नसल्यावर काय होतं, याचं उदाहरण म्हणून पाहता येईल.) अशी सहजता बाझमीच्या आधीच्या चित्रपटांमध्ये होती. खुद्द बाझमीच ‘वेलकम’च्या यशातून बाहेर पडायला तयार नाही असं दिसतं, कारण इथलं अनिल कपूरचं मात्र ‘वेलकम’मधील मजनू भाईचंच एक टुकार रूप म्हणून समोर येतं. तर, गाड्या उडवण्याचे प्रसंग, चित्रपटाच्या थीममध्ये ‘वेलकम’च्या तुकड्याची छटा दिसणं, मजनू समोर यायचा तेव्हा वाजणारा तुकडा इथंही वाजवला जाणं, असे एक अन् अनेक प्रसंग सांगता येतील. बरं, या गोष्टींना सेल्फ-रेफरन्शियल, मेटा विनोद मानावं की नाही हाही प्रश्न आहे. कारण इथं लेखक-दिग्दर्शकाची चतुराई न अधोरेखित होता स्वतःच्या यशाच्या पुनर्निर्मितीचे क्षीण प्रयत्नच अधिक दिसतात.
सदर चित्रपटात एक दृश्य आहे, ज्यात अब्राहममधील देशप्रेमी अभिनेता जागा झाल्याचं दिसतं. तो आणि उपस्थित इतर लोक अनिल कपूरच्या पात्राला नीरज मोदीला (इनामुलहक) भारतात परत आणण्याच्या मोहिमेत सामील करत असतात असा प्रसंग. या प्रसंगाची रचनाच अशी केली जाते की, सुभाष घई दिग्दर्शित ‘कर्मा’शी (१९८६) अनिल कपूरचा असलेल्या संबंधाचा संदर्भ दिला जातो. सगळी पात्रं एकत्र येऊन ‘मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू…’ गाऊ लागतात. हे दृश्य म्हणजे चित्रपटातील विनोदाच्या काही सर्वोच्च बिंदूंपैकी एक मानता येईल. खेदाची बाब अशी की, अशा दृश्यांची इथं असलेली संख्या अगदीच कमी आहे. आणखी कुठल्यातरी दृश्यात ‘मि. इंडिया’चा उल्लेख येतो. म्हणजे एकीकडे हे येतं नि दुसरीकडे पात्रांची टुल्ली-बुल्ली अशी नावं येतात. इथल्या विनोदाची ही टोकं नि यादरम्यान कुठेतरी बसतील असे यातले इतर विनोद.
ऊर्वशी रौटेला म्हणे एका मुलाखतीत म्हणाली की, या चित्रपटानं तिच्यातील अभिनयाची क्षमता जगाला दाखवण्याची संधी तिला दिली. मुद्दा असा की, इथं तिचा अभिनय सोडून सगळं काही दिसत होतं. हेच इतर अभिनेत्रींबाबत. त्यांच्यातील अभिनयक्षमता दिसतील असा हा चित्रपट नाही. त्यामुळे पुरुष पात्रांभोवती वावरणाऱ्या बासनबाहुल्या म्हणूनच काय ते त्यांचं काम उरतं. बाकी पुरुष मंडळींपैकी बहुतेक लोक जे काही हातात पडलं आहे, त्याला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
सदर चित्रपट अधिक चांगला होऊ शकला असता की नाही ते माहीत नाही, कारण बाझमीनं गेल्या अर्ध्या दशकभरात काही विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली नाही. पण, तो अधिक चांगला असता तर नक्कीच आनंद झाला असता. तसेही समीक्षकांच्या वाट्याला आनंद देणारे सिनेमे नि आठवडे तरी किती येतात म्हणा!
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment