शरद पवारांनी केली जम्माडी गंमत!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • शरद पवार. रेखाचित्र - संजय पवार
  • Fri , 22 November 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस NCP भाजप BJP शिवसेनाShivSena उद्धव ठाकरे Uddhav Thackeray देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis सोनिया गांधी Sonia Gandhi शरद पवार Sharad Pawar संजय राऊत Sanjay Raut

एक बालगीत फार प्रसिद्ध होते. ज्याची पहिली ओळ होती- ‘कुणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा’. 

आता याच चालीवर असं म्हणता येईल की, कुणास ठाऊक कसे पण पवार साहेबच ठरले या निवडणुकीतले ‘टॉक ऑफ द टाऊन!’

कारण निवडणूकपूर्व वातावरण आठवून पहा. सर्वत्र मोदी, शहा आणि मुख्यत: देवेंद्र फडणवीस छाये हुए थे!

या उलट अगदी पद्मसिंह पाटलांसाख्या घरच्यांनीही घरभेदीपणा केल्याने शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे बुडते जहाज ठरले होते.

अशा पार्श्वभूमीवर शरद पवार आज पुन्हा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येतच राहताहेत. आता(तरी) या शनिवार नंतर वृत्तवाहिन्यांनी बारसे केलेली ‘महाशिवआघाडी’ प्रत्यक्षात येऊन, सत्ता काबीज करेल का?

२४ ऑक्टोबरला निकाल लागून आता या रविवारी बरोबर महिना पूर्ण होईल. पण या घडीला कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही की, या निर्नायकी स्थितीचा शेवट काय होणार आहे?

या चर्चेत खरे तर तीनच पक्ष आहेत- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. पण यात शरद पवार असल्याने भाजपही या त्रिकोणाचा चौथा कोन बनून अधूनमधून चर्चेत राहतोय.

यालाच ‘पवार (गेम ऑफ) पॉवर’ म्हणतात!

२०१४ साली स्पष्ट बहुमत कुणालाच नसताना निकाल पूर्ण जाहीर होण्याआधीच पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देत भाजप महायुतीचं सरकार सत्तेवर आणलं आणि शिवसेनेला नंतर नाक दाबून सत्तेत सहभागी होणं भाग पाडलं.

२०१९ला पुन्हा पवारच या महिनाभर लांबलेल्या सत्तारोहणातले प्रमुख पुरोहित बनलेत. मात्र या वेळी त्यांनी माप सेनेच्या पारड्यात टाकलंय आणि भाजपची नाकेबंदी केली. पण हे करताना नाकेबंदी करताना लावलेली बॅरिकेडस सोयीनं हलवता येतील अशी ‘मुव्हेबल’ ठेवली.

गेल्या वेळी, म्हणजे २०१४ला दस्तुरखुद्द पवारांनीच स्वमुखे बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. या वेळी मात्र त्यांनी पक्ष प्रवक्ते नवाब मलिक यांना पुढे करत आणि जर तरची भाषा करत शिवसेनेसाठी एक दरवाजा खुला केला.

राष्ट्रवादीनं असा दरवाजा किलकिला करताच काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि हायकमांडच्या दरबारातले पृथ्वीराज चव्हाण यांनीही बिगर भाजप आणि शिवसेनेसह नवी आघाडी होऊ शकते, अशी एक शक्यता वर्तवून ठेवली.

दरम्यान भाजप सेनेमधला दुरावा इतक्या वेगानं वाढत गेला की, महायुतीला मतदान केलेल्या मतदारांना वाटायला लागले की, हे काय चाललेय काय? यांना स्पष्ट बहुमत देऊनही यांच्यात एकमत होत नाही? या अनाकलनीय राजकारणानं व रोजच्या शाब्दिक युद्धानं प्रथम आश्चर्य, मग संताप, नंतर हतबल व शेवटी हसू येऊ लागले. त्यांच्यासाठी हे मती कुंठीत करणारं होतं.

त्यात शरद पवार आणि संजय राऊत यांची विधानं कधी परस्परपूरक तर कधी संदिग्ध तर कधी विरोधी वाटावी अशी, पण रोज नित्यनवीन दावे, तारखा आणि सस्पेन्स!

भाजपने प्रथम आत्मविश्वास, मग अतिआत्मविश्वास, नंतर विजयोन्माद दाखवत सेनेसोबत जो विसंवाद निकालोत्तर झाला होता, तो चर्चेची दारं उघडी करत संवादात बदलण्याऐवजी आम्ही म्हणू तेच असे म्हणत सेनेला, विशेषत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच खोटे ठरवण्याचा आत्मघातकी खेळ खेळला. त्याचं अंतिम पर्यावसन राज्यपालांचं सत्तास्थापनेचं निमंत्रण ४८ तासानंतर शक्य नाही म्हणून साभार परत करावं लागलं. राजभवन पूर्ण हाताशी असून भाजपला हात हलवत परत यावं लागलं.

यानंतर राजभवनानं लोकशाही संकेताचा देखावा उभा करत प्रथम शिवसेनेला, नंतर राष्ट्रवादीला चोवीस तासात सत्ता स्थापनेचं आवाहन दिलं. यात सेनेनं वाढीव वेळ मागितली, ती अपेक्षेप्रमाणे नाकारली गेली. राष्ट्रवादीनेही तशीच विनंती केल्यावर राजभवन २४ तासांची मुदत संपायच्या आतच राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीचा खलिता केंद्राला पाठवून दिला. परदेशी जायला बॅग भरून तयार पंतप्रधानांनी तातडीनं मंत्रिमंडळ बैठक घेऊन ती शिफारस राष्ट्रपतींकडे वेगेवेगे पाठवली आणि राष्ट्रवादीला दिलेली मुदत संपायच्या आतच राष्ट्रपती राजवट राज्यात लागू ही झाली!

यानंतर ‘पवार गेम’ सुरू झाला. अगदी सुरुवातीला पवार म्हणाले- आम्हाला जनादेश विरोधात बसण्याचा आहे. त्यामुळे सत्तेचा काही संबंधच येत नाही. मग म्हणाले- सेना भाजपचा तो प्रश्न आहे त्यांनी सोडवावा. तोवर प्रवक्ते नव्या आघाडीच्या शक्यता बोलू लागले, तर पवार म्हणाले- असं मी ऐकतोय, पण आम्ही कुणाला पाठिंबा ऑफर केलाय, ना आमच्याकडे कुणी मागितलाय. पुढे म्हणाले- आघाडीत लढलोय तर काँग्रेसशी बोलावे लागेल. दोन्ही काँग्रेसचे नेते भेटू लागले. चर्चा होऊ लागल्या. पवार दिल्लीत जाऊन आले. तिथे बोलले, मग इथे बोलले. पुढे सेनेचे लोक मुंबई व दिल्लीत भेटले. मग पुन्हा दोन्ही काँग्रेस भेटले. राष्ट्रवादीचे पत्र तयार तर काँग्रेसचे आलेच नाही. मग पवार म्हणाले- आम्ही काँग्रेसची वाट पहातोय. काँग्रेस म्हणाली- विचार करावा लागेल. मग विचार करण्याच्या बैठका सुरू झाल्या. शिवसेना भिरभिरत्या नजरेनं पाहत राहिली. परत त्रिकोण साधण्याच्या कसरती सुरू झाल्या. त्यात भाजप मध्येच आश्रित माध्यमातून अफवा व नैतिक प्रश्न पसरवू लागले. राष्ट्रपती राजवट लागल्यावर भाजपला वाटले हा त्रिकोण विस्कटेल. तर उलटच झालं. नवी आघाडी म्हणू लागली आता घाई नाही, सहा महिने वेळ आहे.

नवी आघाडी झालीच आता फक्त पवार सोनिया भेट बाकी असा सांगावा आला. पवार सोनिया भेट झाली. सर्वांना वाटलं आता पवार घोषणा करतील, तर ते म्हणाले- सेनेसोबत जायचं वगैरे काही ठरलेलंच नाही. असा प्रस्तावच नाही. नेते भेटले पण ते आमदार असे भेटतच असतात! आम्ही काही विचार केलेला नाही. रात्र सरली. दुसऱ्या दिवशी काँग्रेस चर्चेसाठी हजर! परत चर्चा. तर पवार मध्येच मोदींना भेटून आले. मग परत उलटसुलट चर्चा दिवसभर आणि संध्याकाळी नव्या आघाडीवर चर्चा करायला दोन्ही काँग्रेसचे ज्येष्ठ श्रेष्ठ सुप्रिया सुळेंच्या बंगल्यावर जवळपास आठ तास!

असा हा पवारांचा जम्माडी गंमतचा खेळ आता शेवटच्या टप्प्यात आलाय अशी नवी बातमी आहे. सर्व कोन जुळलेत. आता चित्र स्पष्ट होईल अशा नव्या तारखा आल्यात.

शेवटच्या क्षणी पवार कुठल्या कोनात किती अंशात उभे राहतील, याबाबत जनतेसोबत प्रत्यक्ष त्रिकोणाच्या रेषा, कोन, अंश ही साशंकच राहतील.

जम्माडी गंमत म्हणतात ती हीच!

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......